M’Cheyne Bible Reading Plan
याकोब बन्यामीनाला मिसरला देण्यास कबूल होतो
43 त्याकाळी कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता. 2 याकोबाच्या मुलांनी मिसरहून आणलेले सगळे धान्य घरातील माणसांनी खाऊन संपल्यावर याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा मिसरला जा व आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.”
3 परंतु यहूदा याकोबास म्हणाला, “त्या देशाच्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हाला ताकीद दिली; तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकटया भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर मी तुमच्याशी बोलणार देखील नाहीं.’ 4 तेव्हा तुम्ही बन्यामीनाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही जाऊन धान्य आणू. 5 पण तुम्ही बन्यामीनाला पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास जाणार नाही. तुमच्या धाकटया भावाशिवाय तुम्ही परत मागे येऊ नका असे त्या आधिकाऱ्याने आम्हास बजावून सांगितले आहे.”
6 इस्राएल (याकोब) म्हणाला, “पण तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे त्या प्रमुख अधिकाऱ्याला तुम्ही का सांगितले? आणि त्यामुळे तुम्ही मला पेचात का पाडले?”
7 त्या भावांनी उत्तर दिले, “त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हा सर्वाविषयी काळजी व चिंता दाखवून मोठया प्रेमाने व कळकळीने आपल्या घरच्या सर्वांविषयी विचारपूस केली, कारण त्याला आपल्या घरच्या सर्वांविषयी माहिती करुन घ्यावयास पाहिजे होती. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा एखादा भाऊ सध्या घरी आहे का?’ आम्ही तर नुसती त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्हाला काय माहीत की तो आमच्या भावाला त्याच्याकडे घेऊन यावयास सांगेल म्हणून.”
8 मग यहुदा आपल्या बापाला म्हणाला, “बाबा बन्यामीनाला माझ्याबरोबर पाठवा. मी त्याची सगळी काळजी घेईन, कारण आम्हाला धान्य आणावयास मिसराला गेलेच पाहिजे; नाही तर आपण सर्व आपल्या मुलाबाळांसकट मरुन जाऊ. 9 त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो; तसेच त्याची सगळी जबाबदारीही मी घेतो. मी जर त्याला परत माघारी आणू शकलो नाही तर मग तुम्ही मला जन्माचा दोषी ठरवा. 10 तुम्ही आम्हाला अगोदरच जाऊ दिले असते तर आतापर्यंत धान्य आणण्याच्या आमच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”
11 मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “हे जर अगदी खरे असेल तर मग तुम्ही बन्यामीनाला तुमच्याबरोबर घेऊन जा; परंतु त्या प्रमुख अधिकाऱ्याकरिता आपल्या देशातून आपण मिळवलेल्या काही किंमती वस्तू, काही पदार्थ म्हणजे थोडा मध, पिस्ते, बादाम, डिंक, गंधरस वगैरे देणग्या भेट म्हणून घेऊन जा. 12 यावेळी दुप्पटीपेक्षा पैसा बरोबर न्या. मागच्यावेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा; कारण कदाचित त्या अधिकाऱ्याकडून काही चूक झाली असेल. 13 बन्यामीनाला घेऊन त्या अधिकाऱ्याकडे परत जा. 14 त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे राहाल तेव्हा सर्व समर्थ देव तुम्हाला सहाय्य करो अशी मी प्रार्थना करतो; तसेच तो बन्यामीनाला व शिमोनाला सुखरुपपणे परत मागे पाठवो यासाठी ही देवाची प्रार्थना करतो. असे घडले नाही तर मग माझ्या मुलांना गमावल्याबद्दल मी शोक करीन.”
15 अशा रीतीने त्या भावांनी प्रमुख अधिकाऱ्याकरिता भेट वस्तू घेतल्या व पहिल्यावेळी घेतले होते त्याच्या दुप्पट पैसे यावेळी संगती घेतले बन्यामीनाला घेऊन ते मिसर देशाला रवाना झाले.
त्या भावांना योसेफाच्या घरी जाण्याचे निमंत्रण दिले जाते
16 मिसरमध्ये त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामीनास पाहिले; तेव्हा योसेफ आपल्या कारभाऱ्यास म्हणाला, “या लोकांना माझ्या घरी आण. एक चांगला पोसलेला पशू मारुन भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.” 17 तेव्हा त्या कारभाऱ्याने त्याला सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले.
18 योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या पोत्यात आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणास येथे आणले आहे, त्यावरुन आपणास दोषी ठरवून ते आपली गाढवे घेतील व आपल्याला गुलाम करतील असे वाटते.”
19 म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले. 20 ते म्हणाले, “महाराज, आम्ही शपथ घेऊन खरे तेच सांगतो; मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो. 21-22 आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हाला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हाला परत देण्यासाठी आम्ही आमच्या सोबत आणले आहेत; आणि आता यावेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत.”
23 परंतु योसेफाच्या घरच्या कारभाऱ्याने उत्तर दिले, “भिऊ नका; माझ्यावर विश्वास ठेवा; तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या पोत्यात देणगी म्हणून ते पैसे ठेवले असतील. मागच्या खेपेच्या धान्याचे पैसे तुम्ही मला दिले याची मला पक्की आठवण आहे.”
नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले. 24 मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले; त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांस वैरण दिले. 25 आपण योसेफासोबत भोजन करणार आहो हे त्या भावांना समजले. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत काम करुन योसेफाला देण्याच्या भेटीची तयारी केली.
26 योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्या सोबत आणलेली भेट अर्पण केली व त्यांनी त्याला भूमिपर्यंत लवून मुजरा केला.
27 मग योसेफाने ते सर्व बरे खुशाल आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचे म्हातारे वडील, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले, ते बरे आहेत का? ते अजून जिवंत आहेत ना!”?
28 त्या भावांनी उत्तर दिले, “होय महाराज! आमचे वडील सुखरुप आहेत; ते अजून जिवंत आहेत.” आणि त्यांनी पुन्हा लवून नमन केले.
29 मग योसेफाने आपला सख्खा भाऊ बन्यामीन यास पाहिले. (योसेफ व बन्यामीन यांची आई एकच होती) तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा भाऊ?” नंतर योसेफ बन्यामीनास म्हणाला, “मुला! देव तुझ्यावर कृपा करो!”
30 मग योसेफ घाईघाईने खोली बाहेर निघून गेला. आपला प्रिय भाऊ बन्यामीन याला प्रेमाने घट्ट मिठी मारावी असे त्याला फार वाटले आणि त्याला खूप रडू आले; म्हणून गुपचूप तो आपल्या खोलीत गेला व खूप रडला. 31 मग तोंड धुऊन तो परत आला; मग स्वतःस सावरुन तो म्हणाला, “आता आपण भोजनास बसू या.”
32 योसेफ एकटाच एका मेजावर बसला होता. त्याचे भाऊ दुसऱ्या मेजावर एकत्र बसले; मिसरचे लोक आणखी दुसऱ्या मेजावर बसले कारण इब्री लोकांबरोबर जेवणे चुकीचे आहे असे ते मानीत. 33 योसेफाचे भाऊ त्याच्या समोरील मेजावर बसले. त्यांच्या बसण्याची व्यवस्था त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे केली असल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. 34 वाढपी, योसेफाच्या पुढच्या मेजावरील पक्वान्ने घेऊन त्यांना वाढीत होते; परंतु त्यांनी बन्यामीनास इतरापेक्षा पांचपट अधिक वाढले. ते सर्व भाऊ योसेफाबरोबर भरपूर जेवले व मनमुराद प्यायले.
मंदिराचा भावी विध्वंस(A)
13 येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, खूप मोठ्या दगडांनी बांधलेली या मंदिराची इमारत किती सुंदर आहे.”
2 येशू त्याला म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पडला जाईल.”
3 येशू मंदिरासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्याला एकांतात विचारले, 4 “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हांस सांगा. आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?”
5 नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. 6 पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील. 7 जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या आफवांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडाणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही. 8 एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी धरणीकंप होतील आणि दुष्काळ होतील. पण या गोष्टी म्हणजे नाशाची सुरूवात आहे.
9 “तुम्ही सावध असा. ते तुम्हांला न्याय सभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हांला मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हांला राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे राहावे लागेल. 10 या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे. 11 ते तुम्हांला अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळची करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचविले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.
12 “भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांविरूद्ध उठतील आणि ते त्यांना ठार करवितील. 13 आणि माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.
14 “जेव्हा तुम्ही ‘नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट’, (दानीयेल संदेष्ट्याने सांगितलेला ओसाडीचा अमंगल पदार्थ) जो जिथे नको तेथे पाहाल.” (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) “तेव्हा जे येहूदीयांत आहेत त्यांनी डोंगरात पळून जावे. 15 जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. 16 आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये.
17 “त्या दिवसांत ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पीत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल. 18 हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. 19 कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल. 20 देवाने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.
21 “आणि जर कोणी तुम्हांला म्हणेल की पाहा,ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर त्यावर विश्वास ठेवू नका. 22 कारण काही लोक आपण रिव्रस्त किंवा संदेष्टे आसल्याचा खोटा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांना फसविण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील. 23 तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हांला सर्व काही सांगून ठेवले आहे.
24 “परंतु त्या दिवसांत ही संकट येऊन गेल्यावर,
‘सूर्य अंधकारमय होईल
व चंद्र प्रकाश देणार नाही.
25 आकाशातून तारे पडतील
आणि आकाशातील बळे डळमळतील.’ (B)
26 “आणि लोक मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील. 27 नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशांतून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.
28 “अंजिराच्या झाडापासून धडा घ्या. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हांला उन्हाळा जवळ आला हे समजते. 29 त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे. 30 मी तुम्हांला खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. 31 स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
32 “त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. देवदूतालाही नाही व पूत्रासही नाही. फक्त पित्याला माहीत आहे. 33 सावध असा, जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
34 “ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासाला निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पाहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. 35 म्हणून तुम्ही जागरूक असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हांस ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हांला माहीत नाही. 36 जर तो अचानक आला तर तुम्ही त्याला झोपलेले सापडू नका. 37 मी तुम्हांला सांगतो, ते सर्वांना सांगतो, ‘जागृत राहा.’”
ईयोब बिल्ददला उत्तर देतो:
9 मग ईयोब उत्तरा दाखल म्हणाला:
2 “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे,
परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल?
3 मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही.
देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि माणसाला त्याच्या एकाही प्रश्र्नाचे उत्तर देता येत नाही.
4 देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे.
देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील?
5 देव क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांना ते कळत देखील नाही.
6 पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो.
देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
7 देव सूर्याशी बोलू शकतो आणि त्याला उगवू देत नाही.
ताऱ्यांनी चमकू नये म्हणून देव त्यांना लपवू शकतो.
8 देवाने एकट्याने आकाश निर्माण केले.
तो सागराच्या लाटांवर चालतो.
9 “देवाने सप्तर्षि, मृगशील व कृत्तिका यांना निर्माण केले.
दक्षिणेकडचे आकाश [a] ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
10 लोकांना न कळणाऱ्या आश्र्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या.
देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
11 देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्याला बघू शकत नाही.
तो जातो तरी त्याची महानता माझ्या लक्षात येत नाही.
12 देवाने जरी काही घेतले तरी
त्याला कोणीही अडवू शकत नाही.
‘तू काय करीत आहेस?’
असे त्याला कुणी विचारु शकत नाही.
13 देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही.
राहाबाचे मदतनीससुध्दा देवाला घाबरतात.
14 म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही.
त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
15 मी निष्पाप आहे, पण मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही.
मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
16 मी हाक मारल्यानंतर त्याने ओ दिली तरी
तो माझे ऐकतो यावर मी विश्वास ठेवणार नाही.
17 देव मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील.
काहीही कारण नसताना तो मला जखमा देईल.
18 देव मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही.
तो मला अधिक कष्ट देईल.
19 मी देवाचा पराभव करु शकत नाही.
तो सर्वशक्तिमान आहे.
मी त्याला न्यायालयात खेचू शकत नाही आणि त्याला माझ्या बाबतीत न्यायी बनवू शकत नाही.
देवाला न्यायालयात नेण्यासाठी बळांचा वापर कोण करेल?
20 मी निष्पाप असलो तरी, माझे बोलणेच मला अपराधी बनवते.
मी निष्पाप आहे, पण मी बोलल्यावर माझे तोंडच मला अपराधी शाबीत करते.
21 मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही.
मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
22 मी स्वतःशीच म्हणतो: ‘सगळ्याच्याच बाबतीत हे घडते.
पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात.
देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.’
23 काही तरी भयानक घडते आणि निष्पाप माणूस मरतो तेव्हा देव त्याला फक्त हसतो का?
24 एखादा वाईट माणूस सत्ता बळकावतो तेव्हा देव पुढाऱ्यांना जे घडते आहे ते बघण्यापासून दूर ठेवतो का?
हे जर खरे असेल तर देव म्हणजे आहे तरी कोण?
25 “माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात.
माझे दिवस उडून जातात आणि त्यात सुखाचा लवलेशही नसतो.
26 भूर्जपत्रापासून बनवलेली जहाज जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात.
गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्या प्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
27 “मी जरी म्हणालो, ‘की मी तक्रार करणार नाही,
माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन.’
28 तरी त्यामुळे काहीही बदल होणार नाही.
दु:खाचे मला अजूनही भय वाटते.
29 मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे.
मग प्रयत्न तरी कशाला करायचे?
मी म्हणतो, ‘विसरुन जा सारे!’
30 मी माझे अंग बर्फाने धुतले
आणि हात साबणाने स्वच्छ केले.
31 तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल.
नंतर माझे स्वतःचे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
32 देव माझ्यासारखा माणूस नाही.
म्हणूनच मी त्याला उत्तर देऊ शकत नाही.
आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
33 दोन्ही बाजू [b] ऐकून घेणारा कुणी मध्यस्थ असावा असे मला वाटते.
मध्यस्थ आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलणारा असावा.
34 देवाच्या शिक्षेची छडी दूर करणारा कुणी असावा असे मला वाटते.
त्यामुळे देव मला भीती घालू शकणार नाही.
35 नंतर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन.
परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.
Obey Your Government Rulers
13 प्रत्येकाने वरिष्ठ अधिकान्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत. 2 परिणामी, जो अधिकाऱ्याला विरोध करतो, तो स्वतःला जे देवाने आज्ञापिले आहे त्याला विरोध करतो व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वतःवर न्याय ओढवून घेतील. 3 अधिकारी चांगल्या कृत्यांसाठी नाही तर वाईट कृत्यांसाठी धाक असतात. तुला अधिकाऱ्याची भीति वाटू नये काय? चांगले ते कर म्हणजे तुझी प्रशंसा होईल.
4 होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे, परंतु वाईट करशील तर त्याची भीति बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही. त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे. 5 यासाठी देवाचा राग जो केवळ शिक्षेद्वारे प्रगट होतो त्याच्यामुळे नव्हे, तर तुझ्या सद्विवेकबुध्दीने अधीन राहणे आवश्यक आहे.
6 आणि त्यामुळेच तुम्ही कर देता. कारण ते देवाचे अधिकारी आहेत. व हेच काम ते करतात. 7 तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक. ज्यांना कर द्यावयाचा त्यांना कर दे. ज्यांना जकात द्यावयाची त्यांना जकात दे. ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर. ज्याला मान द्यायचा त्याला मान दे.
लोकांवर प्रीति करणे हाच एक नियम
8 एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे. 9 “व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, वाईटाचा लोभ धरु नको” [a] या आज्ञांमुळे मी असे म्हणतो आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” [b] या शब्दात सामावलेली आहे. 10 प्रीति शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीति नियमशास्त्राची पूर्णता आहे.
11 आणि तुम्ही हे करा कारण तुम्हांस ठाऊक आहे की, आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे, कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे. 12 रात्र जवळ जवळ संपत आली आहे आणि “दिवस” जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करु. 13 दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो, तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको, 14 तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि आपल्या पापी वासना मध्ये गुंतून राहू नका.
2006 by World Bible Translation Center