Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 35-36

बेथेलमध्ये याकोब

35 देव याकोबाला म्हणाला, “तू बेथेल या नगरात जाऊन राहा; आणि तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना त्या ठिकाणी ज्याने तुला दर्शन दिले त्या ‘एल’ (म्हणजे इस्राएलाचा देव) याची आठवण कर व त्याच देवाची उपासना करण्यासाठी तेथे एक वेदी बांध.”

तेव्हा याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्याबरोबरच्या सगळ्या दासांना म्हणाला, “तुमच्या जवळ असलेले लाकडांचे व धातूंचे परके देव फोडून तोडून टाका; तुम्ही स्वतःला शुद्ध करा; स्वच्छ कपडे घाला; आपण येथून निघून बेथेलास जाऊ; मी त्रासात व संकटात असताना ज्याने मला मदत केली त्या देवासाठी मी तेथे तेथे माझ्याबरोबर असत आला आहे.”

तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या जवळ असलेले सर्व परके देव आणून याकोबाला दिले आणि त्यांनी आपल्या कानातील कुंडलेही काढून दिली; तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नावाच्या नगराजवळील एका एला झाडाच्या खाली पुरुन टाकल्या.

याकोब व त्याची मुले यांनी ठिकाण सोडले. त्या भागात राहाणाऱ्या लोकांना त्याचा पाठलाग करुन त्यांना ठार मारावयास पाहिजे होते परंतु त्यांना फार भीती वाटली [a] म्हणून त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही. अशा रीतीने याकोब व त्याचे लोक कनान देशात लूज येथे पोहोंचले; त्यालाच आता बेथेल म्हणतात. याकोबाने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल बेथेल” असे ठेवले; याकोबाने या जागेसाठी हे नाव निवडले कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना ह्याच जागी प्रथम देवाने त्याला दर्शन दिले होते.

रिबकेची दाई दबोरा ह्या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे एका एला झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ असे ठेवले.

याकोबाचे नवे नांव

पदन अराम येथून याकोब परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. 10 देव याकोबाला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे मी ते बदलतो; तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे असेल;” आणि म्हणून देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.

11 देव त्याला म्हणाला, “मी सर्व शक्तिमान देव आहे; तुला भरपूर संतती होवो आणि त्यांची वाढ होऊन त्यांचे एक महान राष्ट्र बनो. तसेच तुझ्यातून इतर राष्ट्रे व राजे निर्माण होवोत; 12 मी अब्राहाम व इसहाक यांना जो काही विशिष्ट देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.” 13 मग देव तेथून निघून गेला. 14-15 मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण म्हणून द्राक्षारस व तेल ओतून तो पवित्र केला. तेव्हा हे एक विशेष ठिकाण झाले कारण येथेच देव याकोबाशी बोलला आणि म्हणून याकोबाने त्या ठिकाणाचे नाव बेथेल ठेवले.

प्रसूत होऊन राहेल मरते

16 याकोब व त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी व इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या. 17 परंतु राहेलीस यावेळी प्रसूती वेदनांचा अतिशय त्रास होत होता; त्याचवेळी राहेलीची सुईण तिची कठीण अवस्था पाहून तिला म्हणाली, “भिऊ नकोस राहेल, तू आणखी एका मुलास जन्म देत आहेस.”

18 त्या मुलास जन्म देताना राहेल मरण पावली परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव “बेनओनी” असे ठेवले; परंतु याकोबाने त्याचे नांव “बन्यामीन” असे ठेवले.

19 एक्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाला जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले 20 आणि याकोबाने तिच्या सन्मानाकरिता तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक दगडी स्तंभ उभा केला; तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे. 21 त्यानंतर इस्राएलाने (याकोबाने) आपला पुढचा प्रवास चालू केला; आणि एदेर बुरुजाच्या अगदी दक्षिणे कडे आपला तळ दिला.

22 इस्राएल तेथे थोडा काळ राहिला, त्यावेळी रऊबेन, इस्राएलाची म्हणजे आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला या विषयी इस्राएलाने ऐकले तेव्हा तो अतिशय संतापला.

इस्राएलाचे कुटुंब

याकोब (इस्राएल) यास बारा मुलगे होते.

23 लेआ हिचे मुलगे-याकोबाचा पाहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून;

24 राहेल हिचे मुलगे-योसेफ व बन्यामीन;

25 राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे-दान व नफताली;

26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद आशेर पदन अरामात झाले.

27 याकोब मग “किर्याथ अरबा” (म्हणजे “हेब्रोन”) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे गेला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते. 28 इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला. 29 आणि दीर्घ आयुष्यानंतर तो अशक्त होऊन मरण पावला. त्याचे मुलगे एसाव व याकोब यांनी त्याला त्याच्या बापाला पुरले होते त्याच जागी पुरले.

एसावाचे वंशज

36 एसाव (म्हणजे “अदोम”) याची वंशावळ एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे-एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हित्ती याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ. एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते. आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले.

6-8 याकोब व एसाव यांच्या कुटुंबांची एवढी वाढ झाली की कनान देश सर्वांना पुरेनासा झाला म्हणून एसाव आपला भाऊ याकोब याजपासून बाजूला निघाला; तो आपल्या बायका, मुले, मुली तसेच सर्व नोकर चाकर, गाईगुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळवलेली धनसंपत्ती व मालमत्ता हे सर्व घेऊन सेईर या डोंगराळ प्रदेशाकडे गेला.

एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ:

10 एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल.

11 अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज;

12 अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक.

13 रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती.

बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले.

14 सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी अहलीबामा ही एसावाची तिसरी बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे एसाव व अहलीबामा यांचे मुलगे होते.

15 एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे:

एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज 16 कोरह, गाताम व अमालेख;

हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले.

17 एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे-नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा;

हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले.

18 एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले;

19 हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत.

20 एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे:

लोटन, शोबाल, सिबोन, 21 अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले.

22 लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम. (तिम्ना ही लोटानाची बहीण होती.)

23 शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.

24 सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.)

25 अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.

26 दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान.

27 एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते.

28 दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते.

29 होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी-लोटान, शोबाल, सिबोन, अना, 30 दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले.

31 इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते.

32 बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती.

33 बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

34 योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने त्याच्या जागी राज्य केले.

35 हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती.

36 हदाद मेल्यावर मास्त्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.

37 साम्ला मेल्यावर फरात (युफ्रेटीस) नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.

38 शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले.

39 बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.

40-43 एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या प्रमुखांची नावे:

तिम्ना, आल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पीनोन, कनाज तेमान, मिब्सार, माग्दीएल व ईराम हयातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले.

मार्क 6

येशू आपल्या गावी जातो(A)

येशू तेथून निघाला आणि आपल्या गावी गेला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या माणासाला ही शिकवण कोठून मिळाली? आणि त्याला कोणते ज्ञान देण्यात आले आहे की, यासारखे चमत्कार त्याच्या हातून केले जातात? तो सुतार नाही काय? तो मरीयेचा मुलगाच ना? तो याकोब, योसे, यहूदा आणि शिमोनाचा भाऊ नव्हे काय? व या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय?” त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.

मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांचा सन्मान होत नाही असे नाही पण त्याच्या गावात, शहरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात होत नसतो.” आणि तेथे त्याला चमत्कार करता आला नाही. फक्त त्याने काही रोगी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.

येशू बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवितो(B)

त्याने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठविले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला. त्याने त्यांना आज्ञा दिल्या की, “काठीशिवाय प्रवासासाठी त्यांनी काही घेऊ नये. भाकर पिशवी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका. त्यांनी वहाणा घालाव्यात पण जास्तीचा अंगरखा नको. 10 तो त्यांना म्हणाला, ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडेपर्यंत राहा. 11 आणि ज्या ठिकणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत ते गाव तुम्ही सोडून जा. आणि त्यांच्याविरूद्ध साक्ष म्हणून तुमच्या पायाची धूळ तेथेच झटकून टाका.”

12 मग शिष्य गेले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी उपदेश केला. 13 त्यांनी पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना जैतुनाचे तेल लावून त्यांना बरे केले.

हेरोद येशूला बाप्तिस्मा करणारा योहान समजतो(C)

14 हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ आहे.”

15 इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.”

तर काही जण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.”

16 परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तो मरणातून उठविला गेला आहे.”

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला असे मारले गेले

17 कारण हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती. त्याचा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले. त्या कारणामुळे त्याने असे केले. 18 योहान हेरोदाला सांगत असे की, “तुझ्या भावाच्या पत्नीशी असे लग्न करणे तुला योग्य नाही.” 19 याकरिता हेरोदीयाने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्याला ठार मारण्याची संधी पाहात होती. परंतु ती त्याला मारु शकली नाही. 20 कारण हेरोद योहानाला भीत असे. हेरोदाला माहीत होते की, योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे, म्हणून तो त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे.

21 मग एके दिवशी संधी आली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालीलातील प्रमुख लोकांना मेजवानी दिली. 22 हेरोदीयाची मुलगी मेजवानीच्या ठिकाणी आली व तिने नाच केला आणि हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदीत केले.

तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” 23 तो गंभीरपणे शपथ वाहून म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मगशील ते मी तुला देईन.”

24 ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?”

आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.”

25 आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.”

26 राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्याला तिला नकार द्यावा असे वाटले नाही. 27 तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठविले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. 28 ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. 29 योहानाच्या शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते तेथे आले. त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.

येशू पाच हजारहूंन अधिक लोकांना जेवू घालतो(D)

30 प्रेषित येशूभोवती जमले. त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्याला सांगितले. 31 नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.”

32 तेव्हा ते सर्वजण नावेत बसून निर्जन ठिकाणी गेले. 33 परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व येशू तेथे येण्याअगोदरच ते तेथे पोहोंचले. 34 येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला व त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.

35 या वेळेपर्यंत बराच उशीर झाला होता आणि (दिवस मावळतीला आला होता) मग त्याचे शिष्य त्याच्याकडे आले व म्हणाले, “ही निर्जन जागा आहे व बराच उशीर झाला आहे. 36 लोकांना पाठवून द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.”

37 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”

ते त्याला म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे दीनारांच्या [a] भाकरी विकत आणाव्या काय?”

38 तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा, की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”

त्यांनी पाहिले तेव्हा ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”

39 येशूने शिष्यांना सांगितले, “सर्व लोकांना गटागटाने हिरवळीवर बसायला सांगा.” 40 तेव्हा सर्व लोक गटागटाने बसले. प्रत्येक गटात पन्नास ते शंभर लोक होते.

41 येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले. त्याने त्याचे वाटे केले. त्याने तेथे आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले. भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या. दोन मासेसुद्धा वाटून दिले.

42 मग ते सर्व जेवून तृप्त झाले. 43 त्यांनी भाकरीच्या व माशांच्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या भरल्या. 44 आणि जे पुरुष जेवले, त्यांची संख्या पाच हजार होती.

येशू पाण्यावर चालतो(E)

45 नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगितले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले. 46 त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.

47 संध्याकाळ झाली तेव्हा नाव सरोवराच्या मध्यभागी होती आणि जमिनीवर येशू एकटाच होता. 48 मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता व तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला. 49 जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. 50 कारण त्या सर्वांनी त्याला पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भीऊ नका, मी आहे,” 51 नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. 52 कारण त्यांना भाकरीच्या संदर्भातील चमत्कार समजलाच नव्हता आणि त्यांची मने कठीण झाली होती.

येशु रोग्यानां बरे करीतो(F)

53 त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतच्या किनाऱ्याला आले व नाव (होड़ी) बांधून टाकली. 54 ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले. 55 लोक हे सागण्यासाठी इतर सर्व लोकांकडे पळाले आणि आजाऱ्यांना खाटेवर घालून जेथे तो आहे असे ऐकले तेथे घेऊन जाऊ लागले. 56 खेड्यात, गावात किंवा शेतात आणि, जेथे बाजाराच्या जागी कोठे तो गेला तेथे लोकांनी आपल्या आजारी माणसांना आणून ठेवले. त्यांनी त्याला फक्त त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श करू देण्याची विनंति केली. ज्यांनी त्याला स्वर्श केला ते बरे झाले.

ईयोब 2

सैतान ईयोबाला पुन्हा त्रास देतो

आणखी एके दिवशी देवपुत्र परमेश्वराला भेटायला आले. त्यांच्याबरोबर सैतानही होता. सैतान परमेश्वराला भेटायला आला होता. परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कुठे गेला होतास?”

सैतान परमेश्वराला उत्तर देत म्हणाला, “मी पृथ्वीवरच इकडे तिकडे भटकत होतो.”

नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष देत होतास का? सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो खरोखरच फार चांगला व विश्वासू आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो. तू मला निष्कारण त्याच्या जवळच्या सर्व गोष्टींचा नाश करायला सांगितलेस आणि तरीही तो विश्वासू राहिला आहे.”

सैतानाने उत्तर दिले, “कातडीला कातडी [a] मनुष्य जिवंत राहाण्यासाठी सर्व काही देऊ शकतो. परंतु जर तू तुझ्या शक्तीचा वापर त्याला शारीरिक इजा करण्यासाठी केलास तर तो तुला तुझ्या तोंडावर शाप [b] देईल.”

तेव्हा परमेश्वर सैतानाला म्हणाला, “ठीक आहे. तो आता तुझ्या हाती आहे. मात्र त्याला मारण्याची परवानगी मी तुला देत नाही.”

मग सैतान परमेश्वराकडून निघाला. त्याने ईयोबाला ठणकणारी गळवे दिली. ईयोबच्या सर्वांगावर तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे होती. म्हणून ईयोब कचऱ्याच्या ढीगाजवळ बसला. आपली गळवे खाजविण्यासाठी त्याने खापराचा तुकडा वापरला. ईयोबाची बायको त्याला म्हणाली, “तू अजूनही देवाशी निष्ठावान आहेस का? तू देवाला शाप देऊन मरुन का जात नाहीस?”

10 ईयोबाने बायकोला उत्तर दिले, “तू एखाद्या मूर्ख बाईसारखी बोलत आहेस. देव जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतो तेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. तसाच आपण संकटांचाही स्वीकार तक्रार न करता केला पाहिजे.” त्याच्या संकटकाळातसुध्दा ईयोबने पाप केले नाही. तो देवाच्याविरुध्द बोलला नाही.

ईयोबचे तीन मित्र त्याच्या भेटीसाठी येतात

11 ईयोबाचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि शोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी ईयोब वर आलेल्या संकटांविषयी ऐकले होते. ते आपली घरे सोडून एका ठिकाणी भेटले. ईयोबला भेटून त्याला सहानुभूती दाखवावी व त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले. 12 परंतु बऱ्याच अंतरावरुन जेव्हा त्यांनी ईयोबला पाहिले तेव्हा तो ईयोबच आहे याची त्यांना खात्री वाटेना. तो खूप वेगळा दिसत होता. त्यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले आणि धूळ आपल्या डोक्यावर उडवून घेतली. 13 नंतर तिन्ही मित्र सात दिवस व सात रात्री ईयोबा बरोबर बसून राहिले. ईयोबाशी कुणी एक शब्दही बोलले नाही कारण ईयोब किती सहन करत आहे ते त्यांना दिसत होते.

रोमकरांस 6

पापात मेलेले पण ख्रिस्तात जिवंत

तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय? खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू? तुम्हांला माहीत नाही का की ज्या आपण प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.

कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरुपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरुपाने त्याच्याशी जोडले जाऊ. आपणांला हे माहीत आहे की, आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये. कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो.

आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर जिवंतही राहू. कारण आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही. मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही. 10 जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो. 11 त्याच रीतीने तुम्ही स्वतःला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा.

12 यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करु नये. 13 आणि अनीतिची साधने व्हावीत म्हणून तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पापाच्या स्वाधीन करु नका. त्याऐवाजी तुम्ही जे मरणातून उठविलेले लोक व जे आता जिवंत आहात ते आपणांला देवाच्या स्वाधीन करा. आपल्या शरीराचे अवयव नीतीची साधने व्हावीत म्हणून देवाच्या स्वाधीन करा. 14 पाप तुम्हांवर राज्य करणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात.

नीतिमतेचे दास

15 तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? 16 खात्रीने नाही. तुम्हांला माहीत नाही काय की जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञापालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात. तुम्ही पापांत चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता. पापांमुळे आध्यात्मिक मरण येते. पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हांला नीतिमत्व मिळते. 17 पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता. पाप तुम्हांला काबूत ठेवीत होते. पण देवाचे उपकार मानू या की, ज्या गोष्टी तुम्हांला शिकविल्या गेल्या त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या. 18 तुम्हांला पापांपासून मुक्त केले गेले. आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले. 19 तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे व लोकांना समजावे म्हणून मी उदाहरणाचा उपयोग करीत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव अशुद्धतेच्या आणि परिणाम म्हणून गुलाम होण्यासाठी स्वैरतेच्या अधीन केले त्याच रीतीने आता आपल्या शरीराचे अवयव देवाच्या सेवेला नीतिमत्वाचे गुलाम व्हावे म्हणून अर्पण करा.

20 कारण जेव्हा तुम्ही पापाचे गुलाम होता, तेव्हा नीतिमत्वासंबंधाने मोकळे होता. 21 आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे. 22 परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे. 23 कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center