Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
उत्पत्ति 34

दिनावर बलात्कार

34 दीना ही लेआ व याकोब यांची मुलगी होती. एके दिवशी ती त्या देशाच्या स्त्रियांना पाहाण्यास बाहेर गेली. तेव्हा त्या देशाचा राजा हमोर याचा मुलगा शखेम याने दीनाला पाहिले आणि तो तिला बळजबरीने घेऊन गेला व तिच्या बरोबर निजून त्याने तिला भ्रष्ट केले. शखेमाचे दीनावर प्रेम जडले आणि तिने त्याच्याशी लग्न करावे म्हणून त्याने तिची मनधरणी केली. शखेमाने आपल्या बापास सांगितले, “कृपा करुन ही मुलगी मला मिळवून द्या; मला तिच्याशी लग्न करावयाचे आहे.”

आपल्या मुलीशी त्या मुलाने भयंकर वाईट कर्म करुन तिला भ्रष्ट केले हे याकोबास समजले परंतु त्याची सर्व मुले गुरांढोरांबरोबर रानात होते म्हणून ते घरी येईपर्यंत त्याने या बाबतीत काहीही केले नाही. त्याच वेळी इकडे शखेमाचा बाप हमोर संबंधीत बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला.

नगरात जे काही घडले त्या विषयीची बातमी याकोबाच्या मुलांनी शेतात ऐकली तेव्हा त्यांचा राग भयंकर भडकला, इतका की ते रागाने वेडे झाले, कारण याकोबाच्या मुलीशी केलेल्या वाईट कर्मामुळे शखेमाने इस्त्राएलाची अब्रू घेतली होती; म्हणून मग ते सगळे भाऊ शेतातून घरी आले.

परंतु हमोर त्या भावांशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम दीनाशी लग्न करावयास फार आतुर झाला आहे. ह्या लग्नामुळे तुमच्या आमच्यामध्ये विशेष करार झाल्याचे दिसून येईन. मग त्यामुळे आमचे पुरुष तुमच्या स्त्रियांशी व तुमचे पुरुष आमच्या स्त्रियांशी लग्ने करु शकतील. 10 तसेच त्यामुळे तुम्ही ह्याच देशात आमच्या बरोबर राहूं शकाल; येथील जमीनजुमला विकत घेऊन येथे वतन मिळविण्यास व येथेच व्यापार उदीम करण्यास तुम्हाला मोकळीक मिळेल.”

11 शखेम देखील याकोबाशी व दीनाच्या भावांशी बोलला; तो म्हणाला, “कृपा करुन माझा स्वीकार करा; तुम्ही जे काही करण्यास मला सांगाल ते मी जरुर करीन; 12 तुम्ही मला फक्त दीनाशी लग्न करण्यास परवानगी द्या मग तुम्हाला पाहिजे ते म्हणजे रीतीप्रमाणे बायको साठी द्यावयाचे ते किंवा तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन.”

13 याकोबाच्या मुलांनी शखेम व त्याचा बाप यांच्याशी खोटेपणाने वागावयाचे ठरवले. आपल्या बहिणीला भ्रष्ट केल्यामुळे ते भाऊ अद्याप संतापाने वेडे झाले होते. 14 तेव्हा ते भाऊ त्याला म्हणाले, “आम्ही तुला आमच्या बहिणीशी लग्न करु देणे शक्य नाही कारण अद्याप तुझी सुंता झालेली नाहीं. आमच्या बहिणीने तुझ्याशी लग्न करणे चुकीचे, अनीतीचे व कलंक लावणारे होईल; 15 पण तू जर एवढी एक गोष्ट करशील तर मग आम्ही तुला तिच्याशी लग्न करु देऊ: ह्या नगरातील सगळ्या पुरुषांची आमच्या प्रमाणे सुंता झाली पाहिजे; 16 मग तुमचे पुरुष आमच्या स्त्रियांशी व आमचे पुरुष तुमच्या स्त्रियांशी लग्न करु शकतील आणि मग आपण सर्व एक राष्ट्र होऊ. 17 पण जर तुम्ही सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आम्ही दीनाला घेऊन जाऊ.”

18 ह्या करारामुळे हमोर व शखेम यांना फार आनंद झाला. 19 दिनाच्या भावांनी जे सांगितले ते लवकर करण्यास शखेमाला तर फारच उत्साह व आनंद वाटला.

शखेम त्यांच्या घराण्यात सर्वांत आदरणीय होता. 20 हमोर व शखेम त्या नगरातील वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले. ते म्हणाले, 21 “ह्या इस्राएल लोकांची आपल्याशी मैत्रीचे संबंध ठेवावयाची खरोखरच इच्छा आहे. त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे. व व्यापार करु द्यावा. त्यांनी आमच्याशी शांततेने राहावे असे आपल्यालाही वाटते; आपल्या सर्वांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या स्त्रियांशी लग्ने करण्यास आपणास मोकळीक आहे आणि आपल्या स्त्रिया त्यांना लग्नात देण्यात आपल्यालाही आनंद आहे. 22 परंतु त्यांची एक अट पूर्ण करण्याचे आपण सर्वांनी कबूल केले पाहिजे; ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी या इस्राएल लोकांप्रमाणे सुंता करुन घेण्याचे मान्य केले पाहिजे. 23 जर हे आपण करु तर मग त्यांची शेरडेमेंढरे गुरेढोरे व संपत्ती आपल्याला मिळाल्याने आपण श्रीमंत होऊ; म्हणून आपण त्यांच्याशी असा करार केला पहिजे मग ते आपल्या बरोबर येथेच वस्ती करुन राहतील.” 24 तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले; आणि त्यावेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करुन घेतली.

25 तीन दिवसानंतर सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी यांना माहीत होते की ते लोक आता दुर्बल व कमकुवत असणार म्हणून मग ते नगरात गेले व त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले. 26 दीनाच्या त्या दोन भावांनी शिमोन आणि लेवी यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले. 27 नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीज वस्तू लुटल्या, कारण त्यांच्या बहिणीला शखेमाने भ्रष्ट केल्याने त्यांच्या रागाचा पारा अद्याप खूपच चढलेला होता. 28 तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरातील व शेतातील सर्व वस्तू लुटल्या; 29 तसेच त्यांनी तेथील लोकांच्या मालकीची धनदौलत, मालमत्ता व सर्व चीजवस्तू आणि त्यांच्या बायका व मुलेबाळे देखील घेतली.

30 परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरुद्ध उठतील; आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्वलोक एकत्र होऊन आपल्या विरुद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.”

31 परंतु ते भाऊ म्हणाले, “आम्ही त्या लोकांना आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे वागू द्यावे काय? नाही, कदापि नाही! त्या लोकांनी आमच्या बहिणीशी असे वागणे चुकीचे व अनीतीचे होते!”

मार्क 5

येशू दुष्ट आत्मा लागलेल्या मनुष्याला बरे करतो(A)

मग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गरसेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा लगेच एक दुष्ट आत्मा लागलेला मनुष्य स्मशानातून निघून त्याच्याकडे आला. हा मनुष्य कबरेमध्ये राहत असे. आणि कोणीही त्याला साखळदंडानी सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते. कारण पुष्कळदा त्याच्या पायात बेड्या घालून साखळ्यांनी बांधलेले असतानाही त्याने साखळ्या तोडल्या आणि बेड्यांचे तुकडे केले. कोणीही त्याला काबूत आणू शकत नव्हते. तो रात्रंदिवस कबरांतून आणि डोंगरातून मोठ्याने ओरडत असे आणि दगडांनी स्वतःस ठेचून घेत असे.

त्याने य़ेशूला दुरून पाहिले तेव्हा तो येशूकडे धावत आला आणि त्याच्यापुढे पडून त्याने त्याला नमन केले. व तो मोठ्याने ओरडून काय पाहिजे? मी तुला देवाची शपथ घालून विनवितो की, “मला छळू नकोस.” (कारण येशू त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून नीघ.”)

मग येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?”

तो मनुष्य येशूला म्हणाला, “माझे नाव सैन्य [a] आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.” 10 त्यांना या हद्दीतून घालवू नये म्हणून. तो मनुष्य येशूला पुन्हा पुन्हा विनवीत होता.

11 तेथे डोंगराच्या कडेला डूकारांचा एक मोठा कळप चरत होता. 12 मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंति केली आणि म्हणाला, “आम्हांला त्या डुकरांत पाठव म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू.” 13 मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली. मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरांत शिरले. मग तो दोन हजारांचा कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व बुडून मेला.

14 त्या कळापाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले. 15 ते येशूकडे आले आणि त्यांनी त्या भूतग्रस्ताला तेथे बसलेले पाहिले. त्याने कपडे घातले होते. तो शुद्धीवर आलेला व ज्याला सैन्य नावाच्या भुतांनी पछाडले होते तो तोच होता हे पाहिले तेव्हा त्यांना भीति वाटली. 16 काही लोक तेथे होते व त्यांनी येशूने काय केले हे पाहिले होते, त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले. 17 मग लोक त्याला आमचा प्रांत सोडून जा असे विनवू लागले.

18 येशू नावेतून जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेल्या मनुष्याने त्याला आपणाबरोबर येऊ द्यावे अशी विनंति केली. 19 पण येशूने त्याला येऊ दिले नाही. तो त्यास म्हणाला, “आपल्या घरी तुझ्या लोकांकडे जा आणि प्रभुने तुझ्यासाठी जे केले ते सर्व सांग. प्रभूने तुझ्यावर कशी दया केली तेही सांग.”

20 मग तो निघाला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले याविषयी दकापलिस येथील लोकांना सागू लागला, तेव्हा सर्व लोकांना आश्चर्च वाटले.

येशू मृत मुलीला जीवन देतो व आजारी स्त्रीला बरे करतो(B)

21 नंतर येशू नावेत बसून परत सरोवरापलीकडे गेल्यावर, मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. तो सरोवराजवळ होता. 22 याईर नावाचा यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला. याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला. 23 आणि आग्रहाने विनंति करून त्याला म्हणाला, “माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे. मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा.”

24 मग येशू त्याच्याबरोबर गेला. लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागे चालत होता व ते त्याच्याभोवती गर्दी करीत होते.

25 त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती बारा वर्षांपासून रक्तस्रावाने पीडलेले होती. 26 बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊनसुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते. पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता.

27 त्या स्त्रीने येशूविषयी ऐकले तेव्हा ती गर्दीत त्याच्यामागे आली व त्याच्या झग्याला तिने स्पर्श केला. 28 कारण ती म्हणत होती, “जर मी त्याच्या कपड्यांना शिवले तरी बरी होईन.” 29 जेव्हा तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला, तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला. व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणवले. 30 येशूला ताबडतोब जाणीव झाली की, आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे. तो गर्दीत वळून म्हणाला, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”

31 शिष्य येशूला म्हणाले, “लोक तुमच्याभोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता, आणि तरीही विचारता, मला कोणी स्पर्श केला?”

32 परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभोवार बघतच राहिला. 33 त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती स्त्री भीतिने थरथर कांपत होती. तिने य़ेशूला सर्व काही सांगितले. 34 येशू त्या स्त्रीला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.”

35 तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हणाली, “तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता?”

36 येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहूद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास धर.”

37 येशूने फक्त पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांनाच आपल्याबरोबर येऊ दिले. 38 ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. त्याने लोकांना मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले. 39 तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही. ती झोपली आहे.” 40 ते सर्व त्याला हसले.

त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आईवडील व जे त्याच्याबरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला. 41 त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला, “तलीथा कूम” (म्हणजे “लहान मुली मी तुला सांगतो, ऊठ.”) 42 ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली (ती बारा वर्षाची होती.) ते फार आश्चर्यचकित झाले. 43 नंतर त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की हे कोणाला कळता कामा नये. त्याने तिला खाण्यास देण्याविषयी सांगितले.

ईयोब 1

धार्मिक माणूस ईयोब

ऊर देशात ईयोब नावाचा एक माणूस राहात होता. तो फार चांगला व श्रध्दाळू माणूस होता. ईयोब देवाची भक्ती करीत असे. ईयोब वाईट गोष्टीपासून दूर राहात असे. ईयोबला सात मुले आणि तीन मुली होत्या. ईयोब जवळ 7,000 मेंढ्या, 3,000 उंट, 1,000 बैल आणि 500 गाढवी होत्या,तसेच खूप नोकरही होते. पूर्वेकडच्या देशांतील तो सर्वात श्रीमंत माणूस होता.

ईयोबाची मुले आळीपाळीने आपापल्या घरांत भोजन समारंभ करीत असत आणि आपल्या बहिणींनाही बोलावीत असत. मुलांच्या भोजन समारंभानंतरच्या सकाळी ईयोब सर्वांत आधी उठून प्रत्येक मुलासाठी होमार्पणे करीत असे. तो म्हणे. “कदाचित् भोजन समारंभाच्यावेळी माझ्या मुलांनी निष्काळजीपणाने पाप केले असेल.” आपली मुलं देवाची उपासना करायला योग्य व्हावीत म्हणून ईयोब असे करीत असे.

नंतर एके दिवशी देवपुत्र (देवदूत) परमेश्वराला भेटायला आहे. त्यांच्याबरोबर सैतानही होता. परमेश्वराने सैतानाला विचारले, “तू कोठे होतास?”

सैतानाने उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडत फिरत होतो.”

मग परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू माझा सेवक, ईयोबाला पाहिलेस का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कुणीही नाही. तो खरोखरच फार चांगला सात्विक माणूस आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो.”

सैतानाने उत्तर दिले, “होय, पण त्याच्याजवळ देवाची भक्ती करण्यामागे सबळ कारण आहे. 10 तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे. 11 पण जर तू त्याच्या जवळ जे काही आहे त्या सगळ्यावर आघात केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करील हे मी खात्रीपूर्वक सांगतो.”

12 नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला. “बरं आहे, तू त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंचे काहीही करु शकतोस. पण तू त्याच्या अंगाला मात्र हात लावायचा नाहीस.”

मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.

ईयोब सर्वकाही गमावतो

13 एक दिवस ईयोबाच्या सर्वांत मोठ्या मुलाकडे त्याची इतर मुले व मुली जेवत होते व द्राक्षारस पीत होते. 14 तेव्हा एक निरोप्या ईयोब कडे आला व म्हणाला, “बैल नांगरीत होते आणि गाढवे जवळच चरत होती. 15 परंतु शबाई लोक आमच्यावर चाल करुन आले आणि त्यांनी तुझी गुरे पळवून नेली. त्यांनी माझ्याखेरीज इतर सर्व नोकरांना मारुन टाकले. तुला हे सांगण्यासाठी मी एकटा स्वतःचा कसाबसा बचाव करुन आलो आहे.”

16 पहिला निरोप्या हे सांगत असतानाच दुसरा निरोप्या ईयोबकडे आला. तो म्हणाला, “आकाशातून वीज पडून तुझ्या मेंढ्या व नोकर-चाकर जळून गेले. फक्त मीच तेवढा बचावलो आहे व तुला सांगायला आलो आहे.”

17 दुसरा निरोप्या हे सांगत असतानाच आणखी एक निरोप्या आला. तिसरा निरोप्या म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या आपल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवल्या. त्यांनी हल्ला करुन उंट पळवून नेले आणि नोकरांना मारुन टाकले. फक्त मीच त्यातून सुटून तुला सांगायला आलो आहे.”

18 तिसरा निरोप्या हे सर्व सांगत असताना आणखी एक निरोप्या तिथे आला. चौथा निरोप्या म्हणाला, “तुझी मुले व मुली तुझ्या मोठ्या मुलाकडे खात होते व द्राक्षारस पीत होते. 19 तेव्हा वाळवंटातून सोसाट्याचा वारा आला आणि त्याने तुझे घर पडले. घर तुझ्या मुलामुलींवर पडल्यामुळे ते मेले. केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगायला इथे आलो.”

20 ईयोबने जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला खुप दु:ख झाले आहे हे दाखविण्यासाठी त्याने आपले कपडे फाडले, डोक्यावरचे केस काढले व जमिनीवर पडून त्याने देवाची आराधना सुरु केली. 21 तो म्हणाला:

“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो
    तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते.
मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन
    आणि माझ्याजवळ काहीही नसेल.
परमेश्वर देतो
    व तोच ते परतही घेतो.
परमेश्वराचे नाव धन्य असो.”

22 या रीतीने ईयोबाच्या हातून पाप घडले नाही. देवाने चूक केली आहे असे काही तो बोलला नाही.

रोमकरांस 5

देवाशी नीतिमान

ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे. आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो. आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते. आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीति ओतली आहे.

आम्ही जेव्हा आमचे स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी आमच्यासाठी मरण पावला. आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.

तर मग आता आपण ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. 10 आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. 11 इतकेच नव्हे तर ज्याच्याद्वारे आमचा देवाबरोबर समेट झाला त्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हीसुद्धा देवाविषियी अभिमान बाळगतो.

आदाम आणि ख्रिस्त

12 म्हणून पाप जसे एका मनुष्याद्वारे, जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, तसेच सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण आले. 13 नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी पाप जगात आले होते. परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते. 14 परंतु मरणाने आदामाच्या काळपासून ते मोशेच्या काळापर्यंत राज्य केले. ज्यांनी पाप केले नाही, त्याच्यांवरसुद्धा मरणाने राज्य केले.

देवाची आज्ञा न मानून आदामाने पाप केले म्हणून तो मेला आदाम, ख्रिस्त जो येणार होता, त्याचे प्रतिरुप आहे. 15 पण देवाची मोफत देणगी आदामाच्या पापासारखी नाही. कारण आदामाच्या पापामुळे पुष्कळ जण मरण पावले. देवाची कृपा आणि दान, एक मानव येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आली व विशेषेकरुन सर्व लोकांकरिता विपुल झाली. 16 आदामाने पाप केल्यानंतर तो दोषी ठरला होता पण देवाची देणगी वेगळी आहे. देवाची मोफत देणगी पुष्कळ पापांनंतर आली आणि त्या देणगीमुळे तिने आपल्या लोकांना देवासमोर नीतिमान केले. 17 एका मनुष्याच्या पापामुळे मरणाने राज्य केले. पण आता काही लोक देवाच्या कृपेची विपुलता आणि देणगी जिच्यामध्ये नीतिमत्व आहे, ते अनुभवतात, ते विशेषेकरुन येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील.

18 म्हणून एका पापामुळे सर्व मनुष्यांना शिक्षा झाली तसेच एका नीतिमत्वाच्या कृत्याने सर्व लोकांना अनंतकालचे जीवन देणारे नीतिमत्व मिळाले. 19 यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान ठरविण्यात येईल. 20 पापे वाढवण्यासाठी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. परंतु जेथे पाप वाढले तेथे देवाची कृपाही विपुल झाली. 21 अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, त्याच रीतीने देवाची कृपाही, नीतिमत्वाने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे अनंतकाळच्या जीवनसाठी राज्य करील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center