Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 17-18

अहरोन मुख्य याजक असल्याचे परमेशवर सिद्ध करतो

17 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांशी बोल. त्यांच्या कडून चालण्यासाठी वापरतात तशा बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक माणसाचे नाव त्याच्या त्याच्या काठीवर लिही. लेवीच्या काठीवर अहरोनचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे. या काठ्या दर्शन मंडपात आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे. खरा याजक म्हणून मी एका माणसाची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी लोक तुझ्या आणि माझ्याविरुद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”

म्हणून मोशे इस्राएलच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्याला काठी दिली. त्या 12 काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनची होती. मोशेने त्या काठ्या कराराच्या मंडपात परमेश्वरा पुढे ठेवल्या.

दुसऱ्या दिवशी मोशेने मंडपात प्रवेश केला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्याला दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते. म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगव्व्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांना दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.

10 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेब. जे लोक नेहमी माझ्याविरुद्ध जातात त्यांच्यासाठी ही ताकिदीची खूण असेल. मी त्यांच्या नाश करु नये म्हणून माझ्या विरुद्ध तक्रारी करणे यामुळे बंद होईल.” 11 मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.

12 इस्राएलचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हाला माहित आहे आम्ही हरवलो आहोत. आमचा सगव्व्यांचा नाश होणार आहे. 13 जो कोणी माणूस नुसता परमेश्वराच्या पवित्र स्थानाजवळ येईल त्याचा नाश होईल. आम्ही मरणार हे खरे आहे का?”

याजकांचे आणि लेवीच्या वंशजांचे काम

18 परमेश्वर अहरोनला म्हणाला, “या पवित्र जागेविरुद्ध काही वाईट गोष्टी केल्या तर तू, तुझी मुले, तुझ्या वडिलांच्या कुटुंबातले सगळे लोक त्याला जबाबदार रहाल. तू आणि तुझी मुले याजकांविरुद्ध केलेल्या वाईट गोष्टींबद्दल जबाबदार राहाल. तुझ्या कुळातील इतर लेवी लोकांना आण. तुझ्याबरोबर आणि कराराच्या मंडपात काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील. लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील. ते तुझ्या बरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शन मंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशिल तेथे दुसरा कोणीही येऊ नये.

“पवित्र जागेची आणि वेदीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. इस्राएल लोकांवर मला पुन्हा रागवायचे नाही. इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी लोकांना निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांना मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शन मंडपात काम करतील. पण अहरोन फकत तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फकत तुम्हीच जाऊ शकता. अति पवित्र स्थानाच्या पडद्याआड फकत तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे-याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्याला मारुन टाकले जाईल.”

नंतर परमेश्वर अहरोनला म्हणाला, “लोक मला ज्या खास भेटी देतात त्यांची जबाबदारी मी स्वतः तुझ्यावर टाकली आहे. इस्राएलाचे लोक ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. त्या नेहमीच तुमच्या राहतील. लोक होमार्पण, धान्यार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला ने जळलेला भाग तुझा असेल. त्या सगव्व्या गोष्टी फकत तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील. 10 त्या गोष्टी फकत पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव.

11 “आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. हा तुझा वाटा आहे. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक शुद्ध माणूस ती खाऊ शकेल.

12 “आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षारस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वराला देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात. 13 लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात.

14 “इस्राएलमधून ज्या ज्या गोष्टी परमेश्वराला देण्यात [a] येतात त्या तुझ्या आहेत.

15 “स्त्रिचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वराला अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल. 16 मूल एक महिन्याचे झ्याल्यानंतर त्यांनी पैसे दिले पाहिजेत. त्याची किंमत दोन औंस [b] चांदी इतकी असेल. तू चांदी मोजायला अधिकृत मोजमापच वापरले पाहिजेस. अधिकृत मोजमापानुसार एक शेकेल म्हणजे 20 गेरा. [c]

17 “परंतु तू प्रथम जन्मलेल्या गाय, मेंढी आणि बकरीसाठी पैसे देऊ नकोस. ते प्राणी पवित्र आहेत. त्यांचे रकत वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला संतोष देतो. 18 पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल. 19 लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला पवित्र करार आहे. तो मोडता [d] येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”

20 परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, “तुला कुठलीही जमीन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांना मी वचन दिल्याप्रमाणे जमीन मिळेल. पण मी मात्र तुझी भेट आहे.

21 “इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळच्या सर्व गोष्टीतला दहावा हिस्सा देतील. म्हणून तो दहाव्वा भाग मी लेवीच्या सर्व वंशजांना देतो. ते दर्शन मंडपात जे काम करतील त्याचा हा मोबदला आहे. 22 परंतु इस्राएलच्या इतर लोकांनी कधीनी दर्शन मंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले तर त्यांना मारून टाकण्यात यावे. 23 लेवीचे जे वंशज दर्शन मंडपात काम करतात ते त्याच्याविरुद्ध केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. मी इस्राएल लोकांना जी जमीन देण्याचे वचन दिले आहे ती जमीन लेवीना मिळणार नाही. 24 परंतु इस्राएल लोकांजलऴ जे आहे त्याच्या दहावा भाग ते मला देतील. आणि तो दहावा भाग मी लेवी लोकांना देईन. म्हणून मी लेवी लोकांबद्दल असे बोललो: त्या लोकांना मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती मिळणार नाही.”

25 परमेश्वर मोशेला म्हणाला, 26 “तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएलाचे लोक त्यांच्या जवळ जे जे आहे त्या सगव्व्याचा दहावा भाग परमेश्वराला देतील. तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस. 27 पिक काढल्यानंतर तुला धान्य देण्यात येईल आणि द्राक्षारसही देण्यात येईल. म्हणून ती तुझी परमेश्वराला देण्यात येणारी अर्पणे असतील. 28 याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वराला अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वराला जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील. 29 इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वराला अर्पण केला पाहिजेस.

30 “मोशे लेवी लोकांना सांग: इस्राएलचे लोक त्यांच्या कापणीचा आणि द्राक्षारसाचा दहावा भाग त्यांना देतील. तेव्हा तुम्ही त्यातला सर्वात चांगला भाग परमेश्वराला द्यावा. 31 उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यांनी खावा. तुम्ही दर्शन मंडपात जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे. 32 आणि जर तुम्ही सर्वांत चांगला दहावा भाग परमेश्वराला द्याल तर तुम्ही कधीही अपराधी होणार नाही. तुम्हाला हे नेहमी आठवेल की त्या भेटी म्हणजे इस्राएल लोकांकडून पवित्र अर्पणे होत आणि तुम्ही मरणार नाही.”

स्तोत्रसंहिता 55

प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे मास्कील

55 देवा, माझी प्रार्थना ऐक
    कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.
देवा, कृपा करुन माझे ऐक
    आणि मला उत्तर दे मला माझ्या तक्रारी सांगू दे.
माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट बोलले,
    तो दुष्ट माणूस माझ्यावर ओरडला.
माझे शत्रू रागात होते आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला.
    त्यांनी माझ्यावर संकटाचा पाऊस पाडला.
माझे ह्रदय धडधडत आहे
    मी खूप घाबरलो आहे.
मी भीतीने थरथर कापत आहे.
    मी भयभीत झालो आहे.
मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते.
    मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.
    मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.

मी पळून जाईन, मी माझी सुटका करेन.
    मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.
प्रभु त्यांचा खोटेपणा बंद कर. [a]
    या शहरात मला खूप हिंसा आणि भांडणे दिसत आहेत.
10 माझ्या भोवती संकटे आहेत.
    दिवस रात्र आणि शहराच्या सर्व भागात संकटे आहेत
    या शहरात महाभयंकर घटना घडत आहेत.
11 रस्त्यावर बरेच गुन्हे घडत आहेत.
    लोक सर्वत्र खोटे बोलत आहेत आणि फसवणूक करत आहेत.

12 जर शत्रूंनीच माझा अपमान केला
    तर मी तो सहन करु शकेन.
जर शत्रूंनीच माझ्यावर हल्ला केला
    तर मी लपू शकेन.
13 परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र,
    माझा साथी, माझा दोस्त.
14 आपण आपली गुपिंतं एकमेकांना सांगितली
    आपण देवाच्या मंदिरात बरोबर प्रार्थना केली.

15 माझे शत्रू त्यांची वेळ यायच्या आधीच मरावेत अशी माझी इच्छा आहे,
    जिवंतपणीच त्यांचे दफन व्हावे असे मला वाटते.
का? कारण ते त्यांच्या घरात भयंकर गोष्टी करण्याच्या योजना आखतात.

16 मी देवाला मदतीसाठी हाक मारीन
    आणि परमेश्वर माझे रक्षण करील.
17 मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बोलतो.
    मी देवाला माझ्या तक्रारी सांगतो आणि तो त्या नीट ऐकतो.
18 मी पुष्कळ लढाया लढलो आहे.
    पण देवाने मला नेहमीच सोडविले व सुखरुप परत आणले.
19 देव माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो.
    तो अनादि अनंत काळचा राजा मला मदत करेल.

माझे शत्रू त्यांचे जीवन बदलणार नाहीत.
    ते देवाला घाबरत नाहीत.
    आणि त्याला मान ही देत नाहीत.
20 माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात.
    ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत.
21 माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत.
    ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात.
त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात
    परंतु ते सुरीसारखे कापतात.

22 तू तुझ्या चिंता परमेश्वराकडे सोपव
    आणि तो तुझी काळजी घेईल.
    परमेश्वर चांगल्या लोकांचा कधीही पराभव होऊ देणार नाही.

23 देवा, त्या खोटारड्या आणि खुनी माणसांना त्यांचे
    आयुष्य अर्धे राहिलेले असतानाच त्यांच्या थडग्यात पाठव
आणि माझे म्हणशील तर, माझा तुझ्यावर भरंवसा आहे.

यशया 7

सिरीयावर संकट

यहुदाचा राजा आहाज हा योथामचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र. आहाजच्याकारकिर्दीत रसीन हा सिरीयावर राज्य करीत होता तर रमाल्याचा पुत्र पेकह हा इस्राएलचा राजा होता. एकदा रसीन व पेकह हे दोघे यरूशलेमवर चाल करून गेले. पण त्यांना ते शहर काही जिंकता आले नाही.

“सिरीया आणि एफ्राइम (इस्राएल) यांच्या सैन्यांची एकजूट झाली आहे आणि त्यांनी एकत्र तळ ठोकला आहे,” असे दाविदच्या वंशजाला कळविण्यात आले. जेव्हा राजा आहाज ह्याला हा. संदेश कळला तेव्हा तो व त्याची प्रजा अतिशय घाबरून गेले. रानातील वृक्ष वाऱ्याने ज्याप्रमाणे कापतात तशीच भीतीने त्यांची स्थिती झाली.

तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या डोहाला पाणी मिळते तेथे तू व तुझा मुलगा शआर-याशूब असे दोघे आहाजला भेटा व त्याच्याशी बोला.

“आहाजला सांगा, ‘सावध राहा पण शांत राहा भिऊ नकोस. रसीन आणि रमाल्याचा पुत्र ह्यांना घाबरू नकोस. ते दोघे जळलेल्या काड्यांप्रमाणे आहेत. पूर्वी त्यांच्यात आग होती पण आता ते नुसते धुमसताहेत! रसीन, सिरीया आणि रमाल्याचा पुत्र हे खूप चिडले आहेत. त्यांनी तुझ्याविरूध्द कट केला आहे. ते म्हणाले, “आपण चाल करून जाऊ आणि यहुदाविरूध्द लढून यहुदा जिंकू. आपण आपापसात यहुदाची वाटणी करू आणि ताबेलाच्या पुत्राला यहुदाच्या गादीवर बसवू. असा त्यांचा बेत आहे.”’”

“पण त्यांचा बेत सिध्दीस जाणार नाही. असे काही घडणार नाही. असे माझा परमेश्वर प्रभू म्हणाला. आता एफ्राइम (इस्राएल) एक राष्ट्र आहे पण 65 वर्षांनी ते राष्ट्र म्हणून राहाणार नाही. तेव्हा, जोपर्यंत रसीन हा दमास्कसचा राजा आहे आणि एफ्राईमची (इस्राएलची) राजधानी शोमरोन येथे रमाल्याचा पुत्र राज्य करीत आहे तोपर्यंत, रसीन व रमाल्याचा पुत्र यांनी केलेला बेत सिध्दीस जाणार नाही. तू जर ह्या संदेशावर विश्वास ठेवला नाहीस तर तुझी लोकांनीही तुझ्यावर विश्वास ठेवू नये.”

इम्मानुएल-देव आमच्या बरोबर आहे

10 परमेश्वर आहाजशी बोलतच राहिला 11 परमेश्वर म्हणाला, “ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत हे सिध्द् करण्यासाठी तू काही निशाणी मागून घे. तू तुला हवी असलेली निशाणी माग. ती निशाणी पाताळातून येवो अगर आकाशातून.”

12 पण आहाज म्हणाला, “पुरावा म्हणून मी कोठलीही निशाणी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”

13 तेव्हा यशया म्हणाला, “हे दाविदाच्या वंशजा, लक्षपूर्वक ऐक. तू लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहातोस. हे पुरेसे नाही म्हणून आता तू देवाच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेस का? 14 तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वतःहून चिन्ह देईल:

त्या कुमारिकेकडे पाहा [a] ती गर्भवती आहे.
    ती मुलाला जन्म देईल.
    ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
15 इम्मानुएल मध व लोणी खाईल.
    अशा रीतीने जगत असतानाच ह्यातूनच तो चांगले करावे व वाईट सोडावे हे शिकेल.
16 पण तो चांगल्या वाईट गोष्टींतील फरक कळण्याइतका मोठा होण्याआधी एफ्राइम (इस्राएल)
    व सिरीया हे वैराण बनलेले असतील.
    तुला आता त्या दोन राजांची भीती वाटते.

17 “पण खरे म्हणजे तू परमेश्वराला भ्यायला पाहिजेस. का? कारण परमेश्वर तुझ्या वाट्याला काही काळ क्लेश देईल. ते क्लेश यहूदातून एफ्राइमच्या निघून जाण्याच्या वेळेप्रमाणे असतील, त्यानंतर असे क्लेश आताच तुमच्या वाट्याला येतील. तुझ्या वडिलांच्या वंशजांना आणि तुझ्या प्रजेला हे क्लेश सोसावे लागतील. देव काय करील बरे? देव अश्शूरच्या राजाला तुझ्याविरूध्द् लढण्यास भाग पाडील.

18 “त्यावेळी परमेश्वर ‘माशा’ व ‘मध माश्यांना’ बोलावील. 19 वाळवटांतील झऱ्याजवळच्या खडकाळ दऱ्यांत, झाडांझुडपांत व पाणथळ जागांत ते आपला तळ ठोकतील. 20 परमेश्वर अश्शूर देशाचा उपयोग यहुदाला शिक्षा करण्यासाठी करून घेईल. अश्शूर देशाला भाडोत्री म्हणून घेऊन त्याचा उपयोग वस्तऱ्याप्रमाणे केला जाईल. देव जणू काही ह्या वस्तऱ्याचा उपयोग करून यहुदाचे डोके, पाय भादरेल आणि त्याची हजामतही करील.

21 “त्यावेळी प्रत्येक माणूस एक कालवड व दोन मेंढरे पाळू शकेल. 22 त्या माणसाला पुरेल एवढे लोणी त्याला त्यांच्या दुधापासून मिळेल. देशातील प्रत्येक माणूस त्या वेळी लोणी व मध खाऊन राहील. 23 आता ह्या देशातील भूमीवर एक हजार द्राक्षवेली असलेले द्राक्षमळे आहेत. प्रत्येक द्राक्षवेलीची किंमत एक हजार चांदीची नाणी एवढी आहे. 24 पण हे द्राक्षमळे काट्यांनी व तणांनी भरून नष्ट होतील. ह्या भूमीत जंगल माजेल. व तिचा उपयोग शिकारीसाठीच होईल. 25 एकेकाळी ज्या टेकड्यांवर लोक शेती करून धान्य पिकवीत होते त्या टेकड्यांवर काट्याकुट्यांचे रान माजेल. कोणीही माणूस तिकडे फिरकणार नाही. फक्त मेंढ्या व गुरेढोरे तिकडे जातील.”

याकोब 1

देवाचा आणि प्रभु येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,

देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर विखुरलेले आहेत त्यांना सलाम!

विश्वास आणि शहाणपण

माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वतःला अत्यंत सुदैवी समजा, कारण तुम्हांला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो. आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे व्हावे.

म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल. पण त्याने विश्वासाने मागितले पाहिजे व संशय धरू नये. कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातील लाटेसारखा आहे. 7-8 अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्याला काही प्राप्त होईल. कारण तो द्विधा आहे आणि तो जे करतो त्या सर्वांत तो अस्थिर आहे.

खरी संपत्ती

गरिबीत असलेल्या बंधूने, देवाने त्याला आध्यात्मिक संपत्ती दिलेली आहे याविषयी अभिमान बाळगावा. 10 आणि श्रीमंत बंधूने देवाने त्याला दीनतेत आणले याचा अभिमान बाळगावा. कारण तो एखाद्या रानफुलासारखा नाहीसा होतो. 11 सूर्य त्याच्या प्रखर उष्णतेसह वर येतो आणि झुडपे वाळून जातात. मोहोर गळून पडतो व त्याचा लोभसवाणा पेहराव नाहीसा होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात असताना नाहीसा होईल.

परिक्षा देवापासून येत नाही

12 धन्य तो पुरूष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याला विजेत्याचा मुगूट मिळेल. तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे. 13 कोणीही, जेव्हा तो परीक्षेत पडतो, तेव्हा असे म्हणू नये की, “हे संकट देवाने माझ्यावर आणले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही. 14 तर प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो. 15 मनात वासना निर्माण झाली की, तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा ते मरणाला जन्म देते.

16 माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. 17 प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते. 18 सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण “प्रथम फळ” व्हावे यासाठी त्याने असे केले.

ऐकणे आणि आज्ञा पाळणे

19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा: प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागावण्यात मंद असावा. 20 कारण मनुष्याच्या रागामुळे देव ज्या नीतीमत्त्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही. 21 म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगऴ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या. आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्विकारा.

22 देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. 23 जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले नैसर्गिक तोंड पाहणाऱ्यासारखा आहे. 24 तो मनुष्या स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. 25 पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत, त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो, सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.

देवाच्या उपासनेचा मार्ग

26 जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवीत नाही, तर तो स्वतःला फसवितो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे. 27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center