Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 1

अहज्यासाठी संदेश

अहाबच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएल पासून वेगळा झाला.

एकदा अहज्या आपल्या शोमरोनमधल्या घराच्या माडीवर बसला होता. तेव्हा तिथल्या लाकडी कठडयावरुन तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. अहज्याने मग आपल्या सेवकांना बोलावले आणि सांगितले. “एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्या पुरोहितांना मी या दुखण्यातून बरा होईन का ते विचारुन या.”

पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “राजा अहज्याने शोमरोनहून आपले काही दूत रवाना केले आहेत. त्यांना जाऊन भेट त्यांना म्हण, ‘इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तेव्हा एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारायला का जाता? राजा अहज्याला हा निरोप सांगा तू बाल-जबूब कडे आपले दूत पाठवलेस याबद्दल परमेश्वर काय म्हणतो ते ऐक तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.’” मग एलीया उठला आणि अहज्याच्या सेवकांना त्याने जाऊन हा निरोप सांगितला.

तेव्हा ते दूत अहज्याकडे आले. अहज्याने त्यांना विचारले, “तुम्ही एवढ्या लौकर कसे आलात?”

ते अहज्याला म्हणाले, “आम्हाला एकजण भेटायला आला होता. त्याने आम्हाला तुमच्याकडे परत येऊन परमेश्वराचा हा निरोप सांगायला सांगितले, ‘इस्राएलात परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना का पाठवलेस? ज्याअर्थी तू असे केलेस त्याअर्थी तू आता बरा होणार नाहीस. तू मृत्यू पावशील.’”

अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हाला भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?”

तेव्हा ते दूत म्हणाले, “तो एक केसाळ माणूस होता आणि त्याने कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.”

तेव्हा अहज्या म्हणाला, “म्हणजे तो एलीया तिश्बी होता.”

अहज्याने पाठवलेले सरदार आगीत भस्मसात

अहज्याने आपला एक सरदार पन्नास माणसांसह एलीयाकडे पाठवला. हा सरदार एलीयाकडे गेला. एलीया तेव्हा एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा (संदेष्ट्या), राजाने तुला खाली बोलावले आहे.”

10 एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “मी खरेच देवाचा माणूस (संदेष्टा) असेन तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्मसात करु दे.”

तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्यात सरदारासह ती पन्नास माणसे जळून खाक झाली.

11 अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘खाली ये असा राजाचा निरोप आहे.’”

12 एलीयाने त्या सर्वाना सांगितले “मी परमेश्वराचा माणूस असेन तर आकाशातून अग्नी उतरुन त्यात तुम्ही सर्व जळून जाल.”

तेव्हा आकाशातून परमेश्वराचा अग्नी उत्पन्न झाला आणि त्यात ते सर्वजण जळून गेले.

13 अहज्याने तिसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो ही सरदार आपल्या बरोबरच्या लोकांसह एलीयाकडे आला. हा सरदार गुडघे टेकून बसला आणि एलीयाची त्याने विनवणी केली. तो म्हणाला, “हे देवाच्या माणसा, मी आणि माझ्याबरोबरचे हे पन्नासजण यांच्या प्राणांचे मोल तू जाणावेस. 14 आधीचे दोन सरदार आणि त्यांच्या बरोबरची पन्नास पन्नास माणसे आकाशातून आलेल्या अग्नीत नष्ट झाली. पण आता आमच्यावर दया कर आणि आम्हाला जीवदान दे.”

15 तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “या सरदाराबरोबर जा व त्याला भिऊ नकोस.”

तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला गेला.

16 एलीया अहज्याला म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनच्या बाल-जबूबकडे माणसे का पाठवलीस? तू असे केलेस म्हणून तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.”

अहज्याच्या जागी यहोराम

17 अहज्या मरण पावला. परमेश्वराने एलीयाला सांगितले होते तसेच झाले. अहज्याला मुलगा नव्हता. तेव्हा अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहोशाफाटचा मुलगा यहोराम यहूदावर राज्य करत असताना दुसऱ्या वर्षी हा यहोराम राज्य करु लागला.

18 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात अहज्या ने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली आहेत.

2 थेस्सलनीकाकरांस 1

पौल सिल्वान आणि तीमथ्य याजकडून, थेस्सलनीका येथील मंडळीला जो देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची आहे त्यांना

देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि शांति तुम्हांबरोबर असो.

बंधूंनो, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो व तसे करणे योग्य आहे. कारण तुमचा विश्वास अद्भुत रीतीने वाढत आहे आणि जे प्रेम तुम्हांतील प्रत्येकाचे एकमेकांवर आहे ते वाढत आहे. म्हणून आम्हाला स्वतः देवाच्या मंडळ्यांमध्ये सर्व छळात व तुम्ही सहन करीत असलेले दु:ख, त्याविषयीची तुमची सहनशीलता सोशिकपणा आणि विश्वासाचा अभिमान वाटतो.

देवाच्या न्यायाविषयी पौल सांगतो

देव त्याच्या न्याय करण्यामध्ये योग्य आहे हा त्याचा पुरावा आहे. त्याचा हेतू हा आहे की ज्यासाठी आता तुम्हांला त्रास सोसावा लागत आहे, त्या देवाच्या राज्यात प्रवेश करण्यास तुम्हांला पात्र ठरविले जावे. खरोखर जे तुम्हांला दु:ख देतात त्याची दु:खाने परतफेड करणे हे देवाच्या दृष्टीने त्याच्यासाठी योग्य आहे. आणि आमच्याबरोबर जे तुम्ही दु:ख भोगीत आहात त्यांना आमच्याबरोबर विश्रांती देण्यासाठी, प्रभु येशू प्रकट होताना तो स्वर्गातून आपले सामर्थ्यवान दूत आणि अग्निज्वालेसह येईल. आणि ज्यांना देव माहीत नाही आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी आवश्यक त्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांना देव शिक्षा करील. ते अनंतकाळचा नाश असलेला असा शिक्षेचा दंड भरतील. ते प्रभु येशूच्या समक्षतेतून आणि वैभवी सामर्थ्यातून वगळले जातील. 10 त्या दिवशी जेव्हा तो त्याच्या पवित्र लोकांत गौरविला जाण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्याकडून आश्चर्यचकित केले जाण्यासाठी येईल तेव्हा त्यात तुमचाही समावेश आहे कारण त्याविषयी आम्ही सांगितलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला.

11 या कारणासाठी आम्ही नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करतो व विनंति करतो की, आमच्या देवाने त्याच्या पाचारणासाठी योग्य असे तुम्हाला गणावे तुमच्या विश्वासापासून निर्माण होणारे प्रत्येक काम व चांगुलपणाचा निश्चय समर्थपणे पूर्ण करावा. 12 यासाठी की आमचा देव आणि प्रभु येशूच्या कृपेने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे नाव तुमच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यामध्ये गौरविले जावे.

दानीएल 5

भिंतीवरील लेख

बेलशस्सर राजाने आपल्या हजार दरबाऱ्यांना मेजवानी दिली. राजा त्यांच्यासह मद्य पीत होता. राजाने मद्य पिता-पिता आपल्या सेवड्ढांना सोन्या चांदीचे प्याले आणण्याचा हुकूम दिला. हे प्याले, त्याचे आजोबा नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणले होते. राजघराण्यातील लोकांनी राजाच्या स्त्रियांनी आणि दासींनी त्या प्याल्यांतून मद्य प्यावे अशी राजाची इच्छा होती. म्हणून यरुशललेमच्या देवाच्या मंदिरातून आणलेले सोन्याचे प्याले त्यांनी आणले.राजा, दरबारी, राण्या व दासी हे त्यातून मद्य प्यायले. मद्य पिता-पिता ते त्यांच्या मूर्तिदेवतांची स्तुती करीत होते.ज्या देवतांची ते स्तुती करीत होते ती दैवते म्हणजे सोने, चांदी, कासे, लोखंड, लाकूड व दगड यापासून बनविलेले पुतळे होते.

मग अचानक एक मानवी हात भिंतीवर लिहिताना दिसू लागला. भिंतीच्या गिलाव्यावर बोंटांनी शब्द कोरले गेले, राजवाड्याच्या दिवठाणा जवळच्या भिंतीवर हाताने लिहीले जात असताना राजाने पाहिले.

बेलशस्सर राजा खूप घाबरला त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला व त्याचे हातपाय थरथर कापू लागले, पायातला जोर गेल्याने तो उभा राहू शकत नव्हता. राजाने मांत्रिक आणि खास्दी यांना बोलावून घेेतले. तो त्या ज्ञानी माणसांना म्हणाला, “हा लेख वाचून जो कोणी त्याचा अर्थ मला सांगेल, त्याला मी बक्षिस देईन. मी त्याला महावस्त्रे देईन, त्याला सोन्याची साखळी देईन. मी त्याला राज्याचा तिसरा महत्वाचा अधिकारी करीन.”

मग राजाची सगळी ज्ञानी माणसे आत आली.पण त्यांना लेख वाचता आला नाही. त्याना त्याचा अर्थ कळू शकला नाही. बेलशस्सर राजाचे दरबारी गोंधळून गेले.त्यामुळे राजा फारच घाबरला,तो काळजीत पडला, त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला.

10 तेवढ्यात राजाचा व राजदरबाबाऱ्यांचा आवाज ऐकून राजमाता मेजवानी चालली होती तिथे आली. ती म्हणाली, “राजा, चिरंजीव भव! घाबरू नकोस, भीतीने असा पांढराफटक होऊ नकोस. 11 तुझ्या राज्यात पवित्र दैवतांचा आत्मा ज्याच्यामध्ये वास करतो, असा एक माणूस आहे. तुझ्या वडिलांच्या काळात, ह्या माणसाने त्याला रहस्ये समजतात हे दाखवून दिले होते. तो अतिशय चलाख व सुज्ञ असल्याचे सिध्द झाले होते. ह्या गोष्टींत तो देवतासमान आहे. तुझ्या आजोबांनी, नबुखद्नेस्सर राजाने, त्याला सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून नेमले होते. मांत्रिकांवर व खास्द्यांवर त्याचा प्रभाव होता. 12 मी ज्या माणसाबद्दल बोलत आहे, त्याचे नाव दानीएल आहे. राजाने त्याला बेलट्शस्सर असे नाव दिले आहे. बेलट्शस्सर (दानीएल) फार चलाख आहे व त्याला अनेक गोष्टी माहीत आहेत, स्वप्नांचा अर्थ सांगण्याची, रहस्ये उलगडण्याची, अवघड प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याला बोलावून घे, तोच तुला भिंतीवरील लेखाचा अर्थ सांगेल.”

13 मग दानीएलला राजासमोर उभे करण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “तुझे नाव दानीएल आहे का? माझ्या वडिलांनी यहूदातून आणलेल्या कैद्यांपैकी तू एक आहेस का? 14 तुझ्या अंगात देवतांचा आत्मा आहे असे मला कळले आहे. तुला रहस्ये समजतात, तू फार चलाख व फार ज्ञानी आहेस असे मी ऐकले आहे. 15 भिंतीवरचा हा लेख वाचण्यासाठी मांत्रिक व ज्ञानी माणसे येथे आली. मला, त्यांनी ह्या लेखाचा अर्थ स्पष्ट करून सांगावा,अशी माझी अपेक्षा होती. पण त्यांना ते सांगता आले नाही. 16 मी तुझ्याबद्दल ऐकले आहे. तुला गोष्टींचा अर्थ स्पष्ट करता येतो आणि अवघड प्रश्नांची तू उत्तरे शोधू शकतोस असे मला समजले आहे. जर तू भिंतीवरचा लेख वाचून, त्याचा अर्थ मला सांगितलास, तर मी तुला महावस्त्रे देईन, सोन्याची साखळी तुझ्या गव्व्यात घालीन आणि तुला माझ्या राज्यातील प्रमुख पदांपैकी तीन क्रमांकाचे पद देईन.”

17 मग दानीएल राजाला म्हणाला “बेलशस्सर राजा तुझी दाने तुलाच लखलाभ हावेत! त्या भेटी पाहिजे तर दुसऱ्या कणला दे.मला काही नको. मात्र भी तूला भिंतीवरचा लेख वाचून अर्थ सांगतो.

18 “राजा, परात्पर देवाने, तुझ्या आजोबांना,राजा नबुखद्नेस्सरला खूप मोठा व सामर्थ्यशाली राजा केले. देवाने राजाला खूप महत्व दिले. 19 वेगवेगव्व्या राष्ट्रांतील आणि निरनिराळे भाषा बोलणारे लोक नबुखद्नेस्सरला घाबरत. का? कारण परात्पर देवाने त्याला महान बनविले होते. जर एखाद्याने मरावे असे नबुखद्नेस्सरला वाटले,तर तो त्याला मारे. ह्याउलट एखाद्याने जगावे असे त्याला वाटल्यास तो त्याला जगू देई. त्याच्या इच्छेप्रमाणे तो एखाद्याला महत्व देई, तर एखाद्याला क्षुद्र लेखी.

20 “पण नबुखद्नेस्सरला गर्व झाला, तो दुराग्रही बनला. म्हणून त्याची सत्ता काढून घेेतली गेली. त्याला सिंहासन सोडावे लागले, त्याच्या वैभवाचा लोप झाला. 21 मग त्याला सक्तीने लोकांपासून दूर करण्यात आले. त्याचे हदय पशूप्रमाणे झाले. तो जंगली गाढवांबरोबर राहिला व त्याने गाईप्रमाणे गवत खाल्ले. तो दवात भिजला तो धडा शिकेपयैत त्याला हे भोगावे लागले. मगच त्याला पटले की मनुष्याच्या राज्यावर परात्पर देवाचे प्रभुत्व असते, परात्पर देवाच्या इच्छेप्रमाणे राज्याचा राजा ठरविला जातो.

22 “पण बेलशस्सर, तुला हे सर्व ठाऊकच आहे तू नबुखद्नेस्सरचा नातूच [a] आहेस पण अजूनही तू नम्र झाला नाहीस. 23 नाही! तू नम्र झाला नाहीस उलट तू स्वर्गातल्या देवाच्याविरुध्द गेलास. देवाच्या मंदिरातील प्याले आणण्याचा तू हुकूम दिलास. त्या प्याल्यातून तू, तुझे राजदरबारी, तुझ्या स्त्रिया आणि दासी मद्य प्यालात, आणि सोने-चांदी, कासे, लोखंड, लाकूड वा दगड यांच्यापासून बनविलेल्या देवतांची तू स्तुती केलीस. ते खरे देव नाहीत. ते पाहू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत. त्यांना काही समजत नाही तू, तुझ्या जीवनावर व तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या देवाचे प्रभुत्व आहे, त्याचा मान राखला नाहीस. 24 म्हणूनच भिंतीवर ज्याने लिहिले तो हा हात देवाने पाठविला. 25 भिंतीवरचे शब्द पुढीलप्रमाणे आहेतः

मेने, मेने, तेकेल, उफारसीन.

26 “ह्या शब्दांचा अर्थ असा:

मेने:
    देवाने तुझ्या राज्याच्या शेवटाचे दिवस मोजलेत.
27 तेकेल:
    तुला तोलले गेले, तेव्हा तू उणा पडलास
28 उफारसीनः
    तुझे राज्य तुझ्याकडून काढून घेण्यात येत आहे.
    त्याचे विभाजन होईल व ते मेदी व पारसी यांच्यात विभागले जाईल.”

29-30 मग बेलशस्सरने दानीएलला महावस्त्रे देण्याचा हुकूम दिला. त्याने दानीएलला सोन्याची साखळी व राज्यैंतील तिसऱ्या क्रमांकाचे पद दिले. त्याच रात्री, खास्द्यांचा राजा, बेलशस्सर याला ठार मारण्यात आले 31 आणि दारयावेश नावाचा बासष्ट वर्षे वयाचा मेदी नवा राजा झाला.

स्तोत्रसंहिता 110-111

दावीदाचे एक स्तुतीगीत.

110 परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला,
    “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन.
    माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”

परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल.
    तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूंवर त्यांच्या देशात जाऊन राज्य करशील.
तू तुझ्या सैन्याची जमवाजमव करशील
    त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील.
त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील.
    हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील. [a]

परमेश्वराने वचन दिले आहे
    आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही.
“तू सदैव याजक राहिला आहेस
    मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”

माझा प्रभु तुझ्या उजव्या बाजूला आहे.
    तो रागावेल तेव्हा इतर सर्व राजांचा पराभव करील.
देव सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील.
    सर्व जमीन प्रेतांनी झाकली जाईल
    आणि बलवान राष्ट्रांच्या नेत्यांना देव शिक्षा करील.

राजा वाटेत झऱ्याचे पाणी पितो.
    तो खरोखरच त्याचे मस्तक उचलेल आणि अतिशय सामर्थ्यवान [b] होईल.

111 परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात
    त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या
    चांगल्या गोष्टी लोकांना हव्या असतात.
देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो.
    त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे
    हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
देव त्याच्या भक्तांना अन्न देतो.
    देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या
    त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते.
    त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात.
    त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
देव आपल्या माणसांना वाचवतो.
    देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
10 शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते.
    जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात.
    देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center