M’Cheyne Bible Reading Plan
पापाची सुरवात
3 परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?”
2 स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. 3 परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, ‘बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.’”
4 परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. 5 कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.”
6 स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले.
7 तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली.
8 संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला. आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली. 9 तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?”
10 तो म्हणाला, “बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो.”
11 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
12 आदाम म्हणाला, “तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिली, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”
13 मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस?”
ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”
14 म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला,
“तू हे फार वाईट केलेस म्हणून
तुझे पण वाईट होईल.
तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा
तू अधिक शापित आहेस.
तू पोटाने सरपटत चालशील
आणि आयुष्यभर तू माती खाशील
15 तू व स्त्री, यांस मी
एकमेकांचे शत्रु करीन.
तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे
शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची
तू टाच फोडशील पण
तो तुझे डोके ठेचील.”
16 नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला,
“तू गरोदर असताना
तुला त्रास होईल
आणि मुलांना जन्म देते वेळी
तुला खूप वेदना होतील.
तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील;
आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
17 नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला,
“त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती
परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस.
तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे.
तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;
18 जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल
आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील.
19 तू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशील
तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील.
आणि नंतर तू पुन्हा माती होशील, मी
तुला मातीतून उत्पन्न केले आहे;
आणि तू मरशील तेव्हा
परत मातीला जाऊन मिळशील.”
20 आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.
21 परमेश्वराने आदाम व त्याची बायको हव्वा यांच्यासाठी जनावराच्या चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली.
22 परमेश्वर म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्या सारखा झाला आहे. त्याला बरे व वाईट समजते. तर आता कदाचित जीवनांच्या झाडावरुन तो फळ घेईल आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील.”
23 तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले. 24 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले. नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले. तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली.
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे कार्य(A)
3 त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला; तो म्हणाला, 2 “तुमची अंतःकरणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आह्रे” 3 यशया हा संदेष्टा ज्याच्याविषयी बोलत होता तो हाच बाप्तिस्मा करणारा योहान. त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते:
“वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे;
‘प्रभु देवासाठी मार्ग तयार करा,
त्याच्या वाटा सरळ करा.’” (B)
4 योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात असे. 5 लोक योहानाचा उपदेश ऐकण्यास जात होते. यरूशलेम, सर्व यहूदीया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते. 6 आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा [a] देत होता.
7 योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशी [b] आणि सदूकी [c] आले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले? 8 म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या. 9 अणि ‘अब्राहाम माझा पिता आहे.’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका; मी तुम्हांस सांगतो की, देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो. 10 झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल.
11 “तुम्ही तुमची अंतःकरणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे, ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. 12 तो धान्य निवडायला येईल. तो भुसा बाजूला काढील व धान्य वेगळे करील. तो चांगले धान्य कोठारात साठविल व जे चांगले नाही ते जाळून टाकील. तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील.”
योहान येशूचा बाप्तिस्मा करतो(C)
13 तेव्हा येशू गालीलाहून यार्देन नदीकडे आला. त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा होता. 14 पण त्याला थोपवीत योहान म्हणाला, “खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे?”
15 येशूने त्याला उत्तर दिले, “आता असेच होऊ दे. देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे.” तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला.
16 येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला, तेव्हा आकाश उघडले, आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला. 17 त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
वेदीची पुनर्बांधणी
3 इस्राएल लोक आपापल्या नगरात सातव्या महिन्यांत परतले, तेव्हा एकमनाने सर्व जण यरुशलेममध्ये एकत्र आले. 2 योसादाकचा मुलगा येशूवा याने शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि इतर बरोबर असलेल्या लोकांच्या सहकार्याने, होमार्पणे वाहण्यासाठी इस्राएलच्या देवाची वेदी बांधली. देवाचा एकनिष्ठ सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिचे बांधकाम झाले.
3 आपल्या लगतच्या राष्ट्रातील लोकांची धास्ती वाटत असूनही तिला न जुमानता त्यांनी वेदी बांधली जुना पाया तसाच ठेवून त्यांनी त्यावर वेदी उभारली आणि तिच्यावर ते सकाळ संध्याकाळ होमार्पणे वाहू लागले. 4 मग त्यांनी मोशेच्या नियमशस्त्राला अनुसरुन रोज ठराविक संख्यचे होमबली अर्पण करुन मंडपांचा सण साजरा केला. 5 त्यांनंतर नित्याचे होमार्पण, नवचंद्रदिनी करायचे होमार्पण आणि परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे सणांचे आणि दिवसांचे बळी द्यायला त्यांनी सुरुवात केली. याखेरीज लोकांनी परमेश्वराला स्वेच्छेनेही अनेक गोष्टी अर्पण केल्या. 6 अशाप्रकारे, अजून मंदिर बांधून झालेले नसूनही सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून इस्राएल लोकांनी परमेश्वराला होमबली वाहायला सुरुवात केली.
मंदिराची पुनर्बांधणी
7 बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पाथरवटांना आणि सुतारांना द्रव्य पुरवले. अन्नधान्य, द्राक्षारस आणि तेलही दिले. सोरी आणि सीदोनच्या लोकांकडून लबानोनहून गंधसरुची लाकडे मागवण्याचा मोबदला म्हणून त्यांनी या वस्तू दिल्या. शलमोनाने पहिल्यांदा हे मंदिर बांधताना आणले तसे या लोकांना हे ओंडके जलमार्गाने योफा या समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरात आणावयाचे होते. या वाहतुकीला पारसचा राजा कोरेश याने परवानगी दिली.
8 शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकचा मुलगा येशूवा यांनी यरुशलेमच्या मंदिरात परतल्याच्या दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. इतर याजक, लेवी हे त्यांचे बांधव व बंदिवासातून यरुशलेमला परतलेले एकूण सर्वजण त्यांच्या बरोबरीने कामाला लागले. परमेश्वराचे मंदिर बांधण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी त्यांनी वीस वर्षे व त्यापुढील वयाच्या लेवींना नेमले. 9 देखरेख करणाऱ्यांची नावे अशी: येशूवा आणि त्याची मुले, कदमीएल आणि त्याची मुले हे यहूदाचे वंशज, हेनादाद आणि त्याचे लेवी भाऊबंद. 10 मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाल्यावर याजकांनी आपला याजकीय पोषाख घातला आणि हाती कर्णे घेतले. आसाफाच्या मुलांनी झांजा घेतल्या. भजनासाठी ते आपापल्या जागी उभे राहिले. इस्राएलचा राजा दावीद याने पूर्वींच त्यांची ही व्यवस्था ठरवून दिली होती.
11 “देवाची स्तुती करा कारण देव चांगला आहे,
तो सर्वकाळ प्रेम करतो”
अशी स्तुतिगीते त्यांनी आळीपाळीने [a] गायिली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या आणि परमेश्वराची स्तुती केली.
12 पण यावेळी वृध्द याजक, लेवी आणि घराण्या-घराण्यांतील वडीलधारी मंडळी यांना मात्र रडू आवरेना, कारण त्यांनी पूर्वीचे मंदिर बघितलेले होते. त्याच्या देखणेपणाची त्यांना आठवण झाली. नवीन मंदिर पाहून ते मोठ्याने रडले. इतर लोकांचा आनंदाने जयघोष चालू असताना या मंडळींना रडू येत होते. 13 हे आवाज खूप दूरपर्यंत ऐकू जात होते. एकंदर आवाज एवढा मोठा होता की त्यातला रुदनस्वर कोणता व हर्षध्वनी कोणता हे ओळखू येत नव्हते.
पेत्र एका लंगड्या मनुष्याला बरे करतो
3 एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे तीन वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती. 2 जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले, तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काहीं मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे. 3 त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले.
4 पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले. “आमच्याकडे पाहा!” 5 त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले; त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. 6 परंतु पेत्र म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काही तरी आहे, ते मी तुला देतो: नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग!”
7 मग पेत्राने त्या माणासाचा उजवा हात धरला व त्याला उठविले. आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ति आली. 8 तो माणूस उडी मारुन उभा राहिला व चालू लागला. तो चालत, बागडत, आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. 9-10 सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुति करताना पाहिले. लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते.
पेत्र लोकांच्या पुढे भाषण करतो
11 तो लंगडा मनुष्य पेत्र व योहान यांना बिलगून उभा होता. सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. कारण तो मनुष्य बरा झाला होता. ते पेत्र व योहान उभे असलेल्या शलमोनाच्या द्वारमंडपाकडे [a] धावत येऊ लागले.
12 जेव्हा पेत्राने हे पाहिले, तो लोकांना म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, ह्यामुळे तुम्हांला आश्चर्य का वाटत आहे? तुम्ही आमच्याकडे असे पाहात आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे. तुम्हांला असे वाटते का की, आमच्या चांगुलपणामुळे असे घडले? 13 नाही! देवाने हे केले! तो अब्राहामाचा देव आहे, इसहाकाचा देव आहे आणि तो याकोबाचा देव आहे, आमच्या पूर्वजांचा तो देव आहे. त्याचा खास सेवक येशू याला त्याने गौरव दिलेला. परंतु तुम्ही येशूला मारण्यासाठी दिले.पिलाताने येशूला मुक्त करण्याचा निर्णय घेतला, परंतु तुम्ही पिलाताला सांगितले की, तुम्हांला येशू नको. 14 येशू शुद्ध आणि चांगला (निष्पाप) होता. परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको, तुम्ही पिलाताला सांगितले की येशूऐवजी आम्हांला एक खुनी दे. 15 आणि म्हणून जो जीवन देतो त्याला तुम्ही मारले! परंतु देवाने त्याला मरणातून उठविले, आम्ही त्याचे साक्षी आहो. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले.
16 “येशूच्या सामर्थ्यानेच हा लंगडा बरा झाला. आम्ही येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला म्हणून हे घडले. तुम्ही या मनुष्याल पाहू शकता. आणि तुम्ही त्याला ओळखता. येशूवरील विश्वासाने तो पूर्णपणे बरा झाला. तुम्ही हे घडलेले पाहिले!
17 “माझ्या बंधूनो, तुम्ही येशूला जे केले ते तुम्ही अजाणता केले. (तुम्हांला समजत नव्हते, तुम्ही काय करीत आहात. तुमच्या नेत्यांनासुद्धा हे समजले नाही.) 18 देवाने सांगितले या गोष्टी घडतील. देवाने भविष्यवाद्यांकरवी हे सांगितले की, त्याचा ख्रिस्त दु:खसहन करील व मरेल. मी तुम्हांला सांगितलेले आहे की, देवाने हे कसे घडवून आणले. 19 म्हणून तुम्ही तुमची ह्रदये व जीवने बदलली पाहिजेत! देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील. 20 मग प्रभु (देव) तुम्हांला आध्यात्मिक विश्रांतीसाठी वेळ देईल. तो तुम्हाला येशू देईल, ज्याला त्याने ख्रिस्त म्हणून निवडले.
21 “परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोंडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे. 22 मोशे म्हणाला, ‘प्रभु तुमचा देव तुम्हांला संदेष्टा देईल. तो संदेष्टा तुमच्या स्वतःच्या (यहूदी लोकांच्या) मधूनच देईल. [b] तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल. तो जे तुम्हांला सांगेल ते सारे तुम्ही पाळा. 23 जो कोणी संदेष्ट्याची (भविष्यवादी) आज्ञा पाळणार नाही, त्याचे आपल्या बांधवांमधून मुळासकट उच्चाटन होईल.’
24 “शमुवेल व इतर संदेष्टे (भविष्यावादी) जे शमुवेलानंतर झाले, जे देवासाठी बोलले, ते या आताच्या काळाविषयी बोलले. 25 संदेष्टे ज्या गोष्टीविषयी बोलले, त्या गोष्टी तुम्हांला मिळाल्या आहेत. देवाने तुमच्या वाडवडिलांशी (पूर्वजांशी) जो करार केला तो तुम्हांला मिळाला आहे. देवाने तुमचा पिता अब्राहाम याला म्हटले, ‘तुझ्या कुटुंबामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होतील. [c] 26 देवाने आपला खास सेवक येशू याला प्रथम तुमच्याकडे पाठविले, तुमच्या वाईट मार्गापासून तुम्हांला परावृत करण्याकडून.’ तुम्हांला आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला पाठविले.”
2006 by World Bible Translation Center