Historical
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
40 मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली.
त्याने माझे ओरडणे ऐकले.
2 परमेश्वराने मला विनाशाच्या खड्यातून उचलले.
त्याने मला चिखलातून बाहेर काढले.
त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले,
त्याने माझे पाय स्थिर केले.
3 परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले.
माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे.
बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील.
ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील.
4 जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल.
5 परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्र्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस
तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस.
परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही.
तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन, मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत.
6 परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस. [a]
तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात.
होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात.
7 म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे.
माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते.
8 माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे
मी तुझी शिकवण अभ्यासली आहे.
9 मी विजयाची चांगली बातमी मोठ्या सभेत सांगितली,
मी माझे तोंड बंद ठेवले नाही.
परमेश्वरा, तुला ते माहीत आहे.
10 परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले.
मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही.
परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात.
मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही.
11 म्हणून परमेश्वरा तुझी करुणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस.
तुझा दयाळूपणा आणि निष्ठा माझे सतत रक्षण करो.”
12 माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे
ते मोजण्या न येण्याइतके आहेत.
माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे.
आणि मी त्यांपासून पळू शकत नाही.
माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत.
माझे धैर्य नाहीसे झाले आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव.
परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर.
14 ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत.
परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर
आणि त्यांची निराशा कर.
ते लोक मला दु:ख देणार आहेत.
त्यांना शरमेने पळून जायला लाव.
15 ते वाईट लोक माझी थट्टा करतात.
त्यांना गोंधळायला लावून बोलता येणार नाही असे कर.
16 परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत
त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे.
त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते.
17 प्रभु, मी केवळ एक गरीब,
असहाय माणूस आहे.
मला मदत कर.
मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र
41 जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील.
संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल.
2 परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल.
पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल.
देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.
3 तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शक्ती देईल.
तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील.
4 मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर.
मी तुझ्या विरुध्द पाप केले, पण मला क्षमा कर आणि मला बरे कर.”
5 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात.
ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि विस्मरणात जाईल?”
6 काही लोक मला भेटायला येतात
परंतु त्यांच्या मनात काय आहे ते सांगत नाहीत.
ते माझ्याबद्दलची काही बातमी मिळवण्यासाठी येतात.
नंतर ते जातात आणि त्यांच्या अफवा पसरवतात.
7 माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात,
ते माझ्याविरुध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
8 ते म्हणतात, “त्याने काही तरी चूक केली
म्हणूनच तो आजारी आहे.
तो कधीच बरा होऊ नये अशी मी आशा करतो.”
9 माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला.
पण आता तो माझ्याविरुध्द गेला आहे.
10 म्हणून परमेश्वरा, माझ्यावर दया कर.
मला उठू दे, मग मी त्यांची परत फेड करीन.
11 परमेश्वरा, माझ्या शत्रूंना मला दु:ख द्यायला संधी देऊ नकोस.
तरच मला कळेल की तू माझा स्वीकार केला आहेस.
12 मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास.
तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन.
13 इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो.
तो नेहमी होता आणि नेहमी राहील.
आमेन आमेन.
भाग दुसरा
(स्त्रोतसंहिता 42-72)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील
42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.
खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
5-6 मी दु:खी का व्हावे?
मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
“परमेश्वरा, तू मला का विसरलास?
माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
11 मी इतका दु:खी का आहे?
मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
तो मला वाचवेल.
43 देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे.
तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर.
माझा बचाव कर.
मला त्या माणसापासून वाचव.
2 देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस
तू मला का सोडलेस?
माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते
तू मला का दाखवले नाहीस?
3 देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल.
ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील.
ते मला तुझ्या घराकडे नेतील.
4 मी देवाच्या वेदीजवळ जाईन
मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन.
देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
5 मी इतका खिन्न का आहे?
मी इतका का तळमळतो आहे?
मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी.
मला देवाची स्तुती करायची आणखी संधी मिळेल.
तो मला वाचवेल.
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबासाठी मास्कील
44 देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे.
आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले,
खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.
2 देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास
आणि तो आम्हाला दिलास
तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस
तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
3 हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही.
त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही.
हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास.
देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का?
कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.
4 देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा दे
आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने.
5 देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू.
तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.
6 माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही.
माझी तलवार मला वाचवू शकणार नाही.
7 देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस.
तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.
8 आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही
तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.
9 परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास.
तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
10 तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस.
शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले.
तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तत: विखरुन टाकले.
12 देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस.
तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.
13 तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस.
आमचे शेजारी आम्हाला हसतात.
ते आमची मस्करी करतात.
14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत,
ज्यांना स्वत:चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
15 मी लाजेने वेढला गेलो आहे.
दिवसभर मला माझी लाज दिसते.
16 माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले
माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.
17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस
आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
18 देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही.
आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही.
19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस,
मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.
20 आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का?
आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.
21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात.
त्याला आपल्या ह्रदयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.
22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत.
मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
23 प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस?
ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.
24 देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस?
तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
25 तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस
आम्ही धुळीत [b] पोटावर पडलो आहोत.
26 देवा, ऊठ! आम्हाला मदत कर.
मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबाचे शोशन्नीमया सुरांवर बसवलेले मास्कील प्रीतीचे स्तोत्र
45 मी राजासाठी या गोष्टी लिहितो
तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते.
एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत
त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.
2 तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस.
तू चांगला वक्ता आहेस,
म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
3 तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान,
तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर.
4 तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये.
तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.
5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत.
तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील.
6 देवा [c] तुझे सिंहासन नेहमी साठी आहे.
चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे.
7 तुला चांगुलपणा आवडतो
आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा,
तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचा [d] राजा निवडले.
8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरु, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो.
हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदीत करण्यासाठी संगित ऐकू येते.
9 राजांच्या मुली करवल्या आहेत.
तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.
10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल.
तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
11 राजाला तुझे सौंदर्य आवडते.
तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल.
तू त्याला मान देशील.
12 सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील.
श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 राजकन्या म्हणजे एक किमती
आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.
14 सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते.
तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
15 त्या अतिशय आनंदात आहेत.
आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.
16 राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील.
तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.
17 मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन.
लोक सदैव तुझी स्तुती करतील.
2006 by World Bible Translation Center