Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 10-11

शौलाचा राज्याभिषेक

10 शमुवेलने मग एका खास तेलाची कुपी घेतली आणि शौलच्या मस्तकावर ती ओतली. शौलचे चुंबन घेऊन तो म्हणाला, “परमेश्वराने त्याच्या प्रजेचा नेता म्हणून तुला आभिषिक्त केले (निवडले) आहे. त्यांचा तू अधिपती होशील. भोवतालच्या शत्रूंपासून त्यांचे रक्षण करशील. त्यासाठीच परमेश्वराने तुझा अभिषेक केला आहे हे खरे आहे. याची साक्ष पटवणाऱ्या या खुणा ऐक [a] येथून निघालास की तुला बन्यामीनांच्या हद्दीत सेल्सह येथे राहेलीच्या कबरीजवळ दोन माणसे भेटतील. तुला ती म्हणतील, ‘तुमची गाढवे मिळाली. तेव्हा तुमच्या वडिलांची काळजी मिटली, पण आता ते तुमच्या काळजीत पडले आहेत. आता माझ्या मुलाला कुठे शोधू असे ते म्हणत आहेत.’”

शमुवेल पुढे म्हणाला, “पुढे गेलास की तुला ताबोरचा एला ओक वृक्ष लागेल. तिथे तुला देवाच्या भक्तीसाठी बेथलकडे निघालेली तीन माणसे भेटतील. त्यातल्या एकाजवळ तीन तान्ही करडं दुसऱ्याजवळ तीन भाकरी आणि तिसऱ्याकडे द्राक्षरसाचा बुधला असेल. ती माणसे तुझी विचारपूस करतील. त्यांच्याजवळच्या दोन भाकरी ते तुला देतील आणि तू त्या घेशील. मग तू गिबाथ एलोहिम येथे पोचशील. या ठिकाणी पलिष्ट्यांचा किल्ला आहे. या नगरात तू गेल्यावर भक्तीच्या उच्चस्थानाहून खाली येणारे संदेष्टे तुला भेटतील. भविष्य कथन करतील ते चालू असतानाच, परमेश्वराचा संचार झाल्याप्रमाणे ते नृत्य गायनात मशगुल असतील. ते सतार, संबळ, सनई, वीणा ही वाद्ये वाजवत असतील. तुझ्यात त्यावेळी परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तू राहणार नाहीस. अगदी वेगळाच होशील. त्यांच्याबरोबर तूही भविष्यकथन करु लागशील. असे झाले की तुला जे हवे ते तू साध्य करु शकशील. कारण परमेश्वराचीच तुला साथ असेल.

“गिलगाल येथे तू माझ्याआधी जा. मग मी तिथे येईन. यज्ञात होमार्पण आणि शांत्यर्पणे करीन. माझी तू सात दिवस वाट पाहा. मग मी तुला भेटेन आणि काय करायचे ते सांगेन.”

शौल संदेष्ट्यासारखा वागतो

शमुवेलला निरोप देऊन शौल जायला निघताच परमेश्वराने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. सर्व खुणांचा प्रत्यय त्याला त्या दिवशीच आला. 10 शौल आपल्या नोकरासह गिबाथ एलोहिम या टेकडीवर आला. तिथे त्याला इतर संदेष्टे भेटले. परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तो ही इतर संदेष्ट्यां प्रमाणे भविष्य करु लागला. 11 त्याला आधीपासून ओळखणाऱ्या लोकांनी हे पाहिले. तेव्हा ते आपापसात याची चर्चा करु लागले. “कीशच्या मुलाला काय झाले? तो ही संदेष्ट्यांपैकीच आहे की काय?” असे म्हणून लागले.

12 तिथे राहणारा एक माणूस म्हणाला, “हो ना! हा यांचा नेता आहे असे दिसते.” [b] तेव्हापासून “शौल संदेष्ट्यांपैकीच आहे की काय” अशी म्हणंच पडली.

शौल घरी परत येतो

13 यानंतर शौल आपल्या घराजवळच्या भक्तीस्थळापाशी पोचला.

14 त्याला व त्याच्या नोकराला शौलच्या काकाने इतके दिवस तुम्ही कोठे होतात म्हणून विचारले.

शौल म्हणाला, “आम्ही आपली गाढवे शोधायला गेलो होतो. ती मिळाली नाहीत तेव्हा शमुवेलला भेटायला आम्ही गेलो.”

15 तेव्हा काका म्हणाला, “मग काय म्हणाला शमुवेल ते सांग ना!”

16 शौलने सांगितले, “गाढवांचा शोध लागला आहे असे शमुवेल म्हणाला.” शमुवेलच्या इतर वक्तव्याबद्दल, राज्याबद्दल त्याने काकाला काहीही सांगितले नाही.

शमुवेल शौलला राजा म्हणून घोषित करतो

17 शमुवेलने सर्व इस्राएली लोकांना मिस्पा येथे पमरेश्वराजवळ बोलावले. 18 शमुवेल त्यांना तेव्हा म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे: इस्राएलला मी मिसरमधून बाहेर काढले. मिसर आणि इतर राष्ट्रे यांच्या जाचातून मुक्त केले. 19 सर्व आपत्तीतून तुम्हाला सोडवणाऱ्या परमेश्वराचाच आज तुम्ही त्याग करायला निघालेला आहात. राजा हवा अशी तुमची मागणी आहे. तेव्हा आता आपापल्या वंशांप्रमाणे, घराण्यांसकट परमेश्वरापुढे हजर व्हा.”

20 सर्व वंशातील लोकांना त्याने आपल्या जवळ बोलावले, आणि राजाची निवड करायला सुरुवात केली. सर्वात आधी शमुवेलने बन्यामीन वंशाची निवड केली. 21 व त्यापैकी प्रत्येक कुळाला क्रमाक्रमाने समोर बोलावले. त्यातून मात्रीच्या कुळाची निवड केली. मग त्यांच्यापैकी प्रत्येकाला समोरुन जायला सांगितले. अशा रीतीने कीशचा मुलगा शौल याची निवड केली.

पण लोकांना शौल कुठे दिसेना. 22 त्यांनी परमेश्वराला विचारले, “शौल इथे आला आहे का?”

परमेश्वर म्हणाला, “शौल कोठारामागे लपून बसला आहे.”

23 लोकांनी धावत जाऊन त्याला तिथून बाहेर आणले. तो सर्वांच्या घोळक्यात उभा राहिला. सगळ्यांपेक्षा तो उंच होता. 24 शमुवेल तेव्हा सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “परमेश्वराने निवडलेला माणूस पाहा. याच्यासारखा तुमच्यात कोणीही नाही.”

तेव्हा लोकांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयजयकार केला.

25 शमुवेलने राज्याचे सर्व नियम लोकांना समजावून सांगितले. राजनीतीचा ग्रंथ लिहून परमेश्वरापुढे ठेवला आणि लोकांना घरोघरी परतायला सागितले.

26 शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. शूर सैनिकांना परमेश्वराकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शौलचे अनुयायित्व पत्करले. 27 पण काही कुरापती काढणारे मात्र म्हणालेच, “हा काय आमचे रक्षण करणार?” शौलवर टीका करत त्यांनी नजराणेही आणले नाहीत. पण शौल काही बोलला नाही.

अम्मोन्यांचा राजा नाहाश

अम्मोन्यांचा राजा नाहाश गादी आणि रुबेनी लोकांचा छळ करत होता. त्याने प्रत्येक इस्राएल माणसाचा उजवा डोळा काढला. कोणालाही त्यांच्या मदतीला जाऊ दिले नाही. यार्देन नदीच्या पुर्वेकडील एकाही इस्राएली पुरुषाची यातून सुटका झाली नाही. पण सात हजार इस्राएली माणसे मात्र अम्मोन्यांच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि याबेश गिलाद येथे आली

11 साधारण महिन्याभरानंतर अम्मोनी राजा नाहाश याने आपल्या सैन्यासह याबोश गिलादला वेढा दिला. तेव्हा याबेशाच्या लोकांनी नाहाशला निरोप पाठवला की तू आमच्याशी करार केल्यास तुझ्या आधिपत्याखाली आम्ही राहू.

पण नाहाशने उत्तर दिले, “तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून इस्राएलची नाचक्की करीन तेव्हाच तुमच्याशी मी करार करीन.”

तेव्हा याबेशमधील वडीलधारी मंडळी त्याला म्हणाली, “आम्हाला सात दिवसाची मुदत दे. तेवढ्या वेळात आम्ही इस्राएलभर आमचा संदेश देऊन माणसे पाठवतो. आमचा बचाव करायला कोणीच आले नाही तर आम्ही आपण होऊन तुझ्या स्वाधीन होऊ.”

शौल याबोश-गिलादचे रक्षण करतो

शौल राहात होता तेथे म्हणजे गिबा येथे याबेशचे दूत येऊन पोचले. त्यांनी लोकांना हे सर्व सांगितले. तेव्हा लोकांनी रडून आकांत मांडला. शौल तेव्हा आपली गुरे चरायला घेऊन गेला होता. कुरणातून येतांना त्याने लोकांचा आक्रोश ऐकला. तेव्हा त्याने विचारले, “हे काय चालले आहे? लोकांना शोक करायला काय झाले?”

तेव्हा लोकांनी त्याला दूताचे म्हणणे सांगितले. शौलने ते ऐकून घेतले. त्याच वेळी त्याच्यात देवाच्या आत्म्याचा संचार होऊन तो संतप्त झाला. त्याने एक बैलांची जोडी घेऊन तिचे तुकडे तुकडे केले आणि दूतांना ते इस्राएलच्या सर्व प्रांतात फिरवायला सांगितले. त्याचबरोबर ही दवंडी पिटायला सांगितली. “सर्वजण शौल आणि शमुवेल यांच्या पाठीशी राहा. यात हयगय झाल्यास त्याच्या गुरांचीही अशीच गत होईल.”

परमेश्वराच्या धास्तीने लोक एकदिलाने एकत्र आले. शौलने बेजेक येथे या सर्वांना एकत्र बोलावले. तेथे इस्राएल मधून तीन लाख आणि यहूदातून प्रत्येकी तीस हजार माणसे होती.

या सर्वांनी शौलाच्या सुरात सूर मिसळून याबेशच्या दूतांना सांगितले, “उद्या दुपारपर्यंत तुमच्या बचावासाठी आम्ही येत आहोत असे याबेश गिलाद मधील लोकांना सांगा.”

शौलचा हा निरोप दूतांनी पोचवल्यावर याबेशच्या लोकांमध्ये आनंदी आनंद झाला. 10 ते अम्मोनी राजा नाहाश याला म्हणाले, “उद्या आम्ही तुमच्याकडे येतो मग आमचे हवे ते कर.”

11 दुसऱ्या दिवशी सकाळी शौलने आपल्या सैन्याची तीन गटात विभागणी केली. त्यांच्यासह शौलने दिवस उजाडताच अम्मोन्यांच्या छावणीत प्रवेश केला. पहारा बदलत असताना त्यांच्यावर हल्ला केला. दुपार व्हायच्या आधीच अम्मोन्यांचा त्यांनी पराभव केला. अम्मोनी सैन्याची दाणादाण उडाली. ते वाट सापडेल तिकडे पळत सुटले. प्रत्येक जण वेगळ्या दिशेला गेला. कोणी दोन सैनिक एका ठिकाणी नव्हते.

12 एवढे झाल्यावर लोक शमुवेलाला म्हणाले, “शौलाला विरोध करणारे, त्याचे राज्य नको असलेले कुठे आहेत ते लोक? त्यांना आमच्या समोर आणा. त्यांनाही मारुन टाकतो.”

13 पण शौल म्हणाला, “नाही, आज कोणाचीही हत्या आता करायची नाही. परमेश्वराने इस्राएलला तारले आहे.”

14 तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आता आपण सगळे गिलगाल येथे जाऊ. तेथे पुन्हा नव्याने शौलाला राजा म्हणून घोषित करु.”

15 त्याप्रमाणे सर्वजण गिलगाल येथे जमले. परमेश्वरासमोर त्यांनी शौलला राजा केले. परमेश्वरासमोर शांत्यर्पणे केली. शौल आणि सर्व इस्राएली यांनी उत्सव साजरा केला.

योहान 6:43-71

43 पण येशूने उत्तर दिले, “आपापसात कुरकूर करु नका. 44 पित्यानेच मला पाठविले आहे. पिताच लोकांना माझ्याकडे पाठवितो, त्या लोकांना मी शेवटच्या दिवशी परत उठवीन. पित्याने जर एखाद्या व्यक्तीला आकर्षित केले नाही, तर ती व्यक्ति माझ्याकडे येऊ शकत नाही. 45 संदेष्टयांनी असे लिहिले आहे की, ‘देव सर्व लोकांना शिक्षण देईल.’ [a] लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात, तेच लोक माझ्याकडे वळतात. 46 देवाने ज्याला पाठविले त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही देवाला पाहिले नाही. फक्त त्यानेच देवाला पाहिले आहे.

47 “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळाले आहे. 48 मी जीवन देणारी भाकर आहे. 49 तुमच्या वाडवडिलांनी अरण्यांत असताना देवाने दिलेला मान्ना खाल्ला. परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरण पावले. 50 जी स्वर्गातून उतरते ती भाकर मी आहे. जर ही भाकर कोणी खाईल तर तो कधीच मरणार नाही. 51 स्वर्गातून खाली उतरलेली जिवंत भाकर मी आहे. जर कोणी ती भाकर खाईल तर तो अनंतकाळासाठी जिवंत राहील. आणि ती भाकर म्हणजे माझे शरीर आहे. जगातील लोकांना जीवन मिळावे यासाठी मी माझे शरीर देईन.”

52 नंतर यहुदी आपापसात वाद घालू लागले. ते म्हणाले, “हा मनुष्य आपले स्वतःचे शरीर आम्हांला कसे काय खायला देऊ शकेल?”

53 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे शरीर खाल्ले पाहिजे आणि त्याचे रक्त प्याले पाहिजे. जर तुम्ही हे करणार नाही, तर तुमच्यात खरे जीवन नाही. 54 जो कोणी माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो, त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल. शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन. 55 माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. 56 जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो.

57 “पित्याने मला पाठविले. तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो. म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील. 58 आपल्या वाडवडिलांनी अरण्यांत जी भाकर खाल्ली, त्या भाकरीसारखा मी नाही. त्यांनी ती भाकर खाल्ली परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरुन गेले. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाते तो अनंतकाळ जगेल.”

59 कफर्णहूम नगरातील सभास्थानात शिक्षण देताना येशूने या सर्व गोष्टी सांगितल्या.

अनंतकाळच्या जीवनाचे शब्द

60 येशूच्या शिष्यांनी हे ऐकले, त्यांपैकी अनेकजण म्हणाले, “हे शिक्षण स्वीकारण्यास फार कठीण आहे. कोण हे शिक्षण मान्य करील?”

61 आपले शिष्य याविषयी कुरकूर करीत आहेत, हे येशूने ओळखले. म्हणून तो त्यांना म्हणाला. “ही शिकवण तुम्हांला त्रासदायक वाटेल काय? 62 तर मग मनुष्याचा पुत्र जेथून आला तेथे परत जाताना पाहून तुम्हांला तसेच त्रासदायक वाटेल काय? 63 शरीराद्वारे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हांला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते. 64 परंतु तुमच्यातील काहीजण विश्वास ठेवीत नाहीत.” जे लोक विश्वास ठेवीत नव्हते, ते येशूला माहीत होते. येशूला हे अगदी सुरुवातीपासूनच माहीत होते. आणि जो मनुष्य त्याचा विश्वासघात करणार होता, तोही त्याला माहित होता. 65 येशू म्हणाला, “म्हणूनच मी तुम्हांला म्हटले की, ‘जर पिता एखाद्या व्यक्तीला माझ्याकडे येऊ देत नसेल तर ती व्यक्ती येणारच नाही.’”

66 येशूने हे सर्व सांगितल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण त्याल सोडून गेले; येशूच्या मागे जाण्याचे त्यांनी सोडून दिले.

67 नंतर येशूने आपल्या बारा शिष्यांना विचारले, “तुम्हांलासुद्धा मला सोडून जावेसे वाटते काय?”

68 शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी आम्ही कोठे जाणार? अनंतकलच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत. 69 आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही पवित्र व्यक्ति आहात हे आम्हांला माहीत आहे.”

70 मग येशूने उत्तर दिले, “तुम्हा बारा जणांना मी निवडले. पण तुमच्यातील एक सैतान आहे.” 71 शिमोन इस्कर्योत याचा मुलगा यहूदा याच्याविषयी येशू बोलत होता. यहूदा बारा शिष्यांपैकी एक होता. परंतु पुढे हाच यहूदा येशूच्या विरुद्ध उठणार होता.

स्तोत्रसंहिता 107

भाग पांचवा

((स्तोत्रसंहिता 107-150)

107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
    कारण तो चांगला आहे.
    त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
    परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
    त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.

त्यांतले काही वाळवंटात फिरले.
    ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
    आणि अशक्त होत होते.
नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि
    तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो.
    देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.

10 देवाची काही माणसे कैदी होती
    आणि काळ्याकुटृ तुरुंगात गजांच्या आडबंद होती.
11 का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले.
    त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
12 त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले.
    ते अडखळले आणि पडले.
    त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
13 ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
14 देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले,
    ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.
15 त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी
    ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.
16 देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव करायला मदत करतो.
    देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो.
    देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.

17 पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात.
    आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
18 त्या लोकांनी खायचे नाकारले
    आणि ते जवळ जवळ मेले.
19 ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली.
    आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
20 देवाने आज्ञा केली आणि
    त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
21 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी
    करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
22 परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा.
    परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.

23 काही लोक बोटीतून समुद्रापार जातात.
    त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले.
24 त्या लोकांनी परमेश्वर काय करु शकतो ते पाहिले.
    त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या.
25 देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला,
    लाटा उंच उंच जायला लागल्या.
26 लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले
    आणि खोल समुद्रात खाली टाकले.
वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.
27 ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते.
    खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निरुपयोगी होते.
28 ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
29 देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले.
30 समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आनंदित झाले.
    देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.
31 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल
    आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
32 देवाची मोठ्या सभेत स्तुती करा.
    वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.

33 देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले.
    देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
34 देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले.
    का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
35 देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले.
    देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
36 देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले
    आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
37 त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली
    आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
38 देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला.
    त्यांचे कुटुंब वाढले.
    त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
39 अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान
    आणि अशक्त राहिली.
40 देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले
    आणि ओशाळवाणे वाटायला लावले
आणि त्याला खाली पाहायला लावले.
    देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले.
41 पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली
    आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.
42 चांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात.
    पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही.
43 जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील
    नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.

नीतिसूत्रे 15:1-3

15 शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे राग निघून जातो. पण तिखट उत्तरामुळे राग वाढतो.

शहाणा माणूस बोलतो तेव्हा इतरांना ऐकावेसे वाटते. पण मूर्ख माणूस केवळ मूर्खताच बडबडतो.

सगळीकडे काय चालले आहे ते परमेश्वर बघतो. परमेश्वर सगळ्या माणसांना बघत असतो. चांगल्या आणि वाईट.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center