Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 13-14

यहोआहाजच्या कारकिर्दीला सुरुवात

13 येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. अहज्याचा मुलगा योवाश यहूदात राज्यावर आल्याला तेविसावे वर्ष चालू होते तेव्हाची ही हकीकत. यहोआहाजने सतरा वर्षे राज्य केले.

परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजने केल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजने केली, त्यात खंड पडू दिला नाही. मग परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेनहदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.

इस्राएली लोकांवर परमेश्वराची दया

तेव्हा यहोआहाजने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली. देवानेही त्याची विनंती ऐकली. अरामच्या राजाने इस्राएली लोकांचा केलेला छळ आणि इस्राएलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या.

त्यातून इस्राएलला तारण्यासाठी परमेश्वराने एक्राला पाठवले. तेव्हा मग अराम्यांच्या हातून इस्राएलींची मुक्तता झाली आणि इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले.

तरीही यराबामच्या घराण्याने जी पापे इस्राएल लोकांना करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही.यराबामची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली शोमरोनमध्ये अशेरा देवतेचे स्तंभ त्यांनी ठेवलेच.

अरामच्या राजाने यहोआहाजच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांना त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे यहोआहाजच्या सैनिकांची अवस्था होती.

इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात यहोआहाजने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत. पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनमध्ये लोकांनी त्याला पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.

योवाशची इस्राएलचा राजा म्हणून कारकीर्द

10 यहोआहाजचा मुलगा योवाश शोमरोनमध्ये इस्राएलचा राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले. 11 परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशने सोडले तर नाहीच, उलट तोही त्याच मार्गाने गेला. 12 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात, योवाशने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकीकत आलेली आहे. 13 योवाशच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशचे शोमरोनमध्ये इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले.

योवाश अलीशाला भेटतो

14 अलीशा आजारी पडला. त्या आजारातच पुढे तो मरण पावला. इस्राएलचा राजा योवाश त्याला भेटायला गेला. अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्याला रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, ही इस्राएलच्या रथांची आणि घोड्यांची वेळ आहे का?”

15 अलीशा योवाशला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.”

तेव्हा योवाशने धनुष्य व काही बाण घेतले 16 अलीशा मग राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले. 17 अलीशा त्याला म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्याला बाण मारायला सांगितले.

योवाशने बाण सोडला. अलीशा त्याला म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामवरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”

18 अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले.

योवाशने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला. 19 अलीशा संदेष्टा योवाशवर रागावला. तो त्याला म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्यांना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.”

अलीशाच्या कबरेवरचा चमत्कार

20 अलीशाने देह सोडला आणि लोकांनी त्याला पुरले.

पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते. 21 काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरीतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.

योवाश अराम्यांकडून इस्राएल नगरे जिंकून घेतो

22 यहोआहाजच्या कारकिर्दीमध्ये अरामचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता. 23 पण परमेश्वरालाच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वराला इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्याला त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.

24 अरामचा राजा हजाएल मरण पावला. त्याच्यानंतर बेन-हदाद राज्य करु लागला. 25 मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशचे वडील यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली.

अमस्याचे यहूदावर राज्य

14 योवाशचा मुलगा अमस्या यहुदाचा राजा झाला. तेव्हा इस्राएलचा राजा यहोआहाज याचा मुलगा योवाश गादीवर आल्याला दुसरे वर्ष होते. अमस्या राज्य करु लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. अमस्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. अमस्याच्या आईचे नाव यहोअदान. ही यरुशलेमची होती. परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित तेच अमस्याने केले. पण त्याबाबतीत तो आपला पूर्वज दावीद याच्या इतका पूर्णत्वाला गेला नाही. आपले वडील योवाश यांनी केले तेच अमस्याने केले. त्याने उंचवट्यावरील पुजास्थळे नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी अजूनही लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.

राज्यावर त्याची चांगली पकड असतानाच, आपल्या वडीलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला. पण त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही कारण मोशेच्या नियमशास्त्रात याबद्दलचे नियम सांगितलेले आहेत. मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने पुढील आज्ञा सांगितलेली आहे: “मुलांच्या गुन्ह्या करिता आईवडिलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडिलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”

मिठाच्या खोऱ्यात अमस्याने दहाहजार अदोम्यांना मारले. या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “जोकथेल” ठेवले अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.

अमस्याची योवाशवर चढाई करण्याची इच्छा

इस्राएलचा राजा येहू याचा मुलगा यहोआहाज त्याचा मुलगा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. संदेशात म्हटले होते, “ऊठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू.”

तेव्हा योवाशने यहूदाचा राजा अमस्या याला उत्तर पाठवले की, “लबानोनमधल्या काटेरी झुडुपाने लबानोनमधल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला, ‘तुझ्या मुलीला माझ्या मुलाची बायको करुन घ्यायचे आहे.’ पण लबानोनमधला एक वन्यपशू वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून पुढे गेला. 10 अदोमचा तू पराभव केलास हे खरे पण त्या विजयाने तू उन्मत्त झाला आहेस. पण आहेस तिथेच राहून बढाया मार. स्वतःला संकटात लोटू नको. हे ऐकले नाहीस तर तुझा आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल.”

11 योवाशच्या या इषाऱ्याकडे अमस्याने दुर्लक्ष केले. तेव्हा यहूदातील बेथ-शेमेश या ठिकाणी इस्राएलचा राजा योवाश यहूदाचा राजा अमस्या याच्या समोर लढाईला उभा ठाकला. 12 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. यहूदातील एकूण एक सर्व माणसांनी आपापल्या तंबूत पळ काढला. 13 अहज्यापुत्र योवाशचा मुलगा यहूदाचा राजा अमस्या याला इस्राएलचा राजा योवाश याने बेथशेमेश येथे अटक केले. योवाशने अमस्याला यरुशलेम येथे आणले. तेथे पोचल्यावर यरुशलेमच्या तटबंदीला योवाशने एफ्राईमच्या दरवाज्यापासून कोपऱ्यातील दरवाजापर्यंत जवळ जवळ सहाशे फुटांचे खिंडार पाडले. 14 पण परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने, चांदी आणि सर्व पात्रे योवाशने लुटली. तसेच येथील सर्व माणसांना बंदिवान केले. मगच तो शोमरोनला परतला.

15 यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या या लढाईतील पराक्रमाबरोबरच योवाशने केलेल्या इतर महान कृत्यांचीही नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात केलेली आहे. 16 योवाश मरण पावला आणि आपल्या पूर्वंजांना जाऊन मिळाला. इस्राएलच्या राजांशेजारी शोमरोनमध्ये त्याचे दफन झाले. योवाशनंतर त्याचा मुलगा यराबाम गादीवर आला.

अमस्याचा मृत्यू

17 इस्राएलचा राजा यहोआहाज याचा मुलगा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जिवंत होता. 18 त्याने केलेल्या सर्व थोर कृत्यांची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात केलेली आहे. 19 अमस्याविरुध्द यरुशलेममध्ये लोकांनी कट केला. तेव्हा अमस्या लाखीश येथे पळाला. पण लोकांनी माणसे पाठवून त्याचा लाखीशर्पंत पाठलाग केला आणि त्यांनी अमस्याचा तेथे वध केला. अमस्याचा मृत्यू 20 लोकांनी अमस्याचा मृतदेह घोड्यावर लादून परत आणला. दावीदनगरात यरुशलेम येथे आपल्या पूर्जजांच्या समवेत त्याचे दफन झाले.

यहूदावर अजऱ्याचा अंमल

21 मग यहूदाच्या सर्व लोकांनी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता. 22 राजा अमस्याच्या निधनानंतर त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.

दुसरा यराबाम याची इस्राएलवर सत्ता

23 इस्राएलचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनमध्ये राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा योवाश याचा मुलगा अमस्या याच्या कारकिर्दींचे पंधरावे वर्ष होते. यराबामने एक्के चाळीस वर्षे राज्य केले. 24 यराबामने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच या यराबामने चालू ठेवली. 25 लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंतची इस्राएलची भूमी यराबामने पुन्हा संपादन केली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्या प्रमाणेच हे घडले. 26 इस्राएलचे दास काय किंवा स्वतंत्र माणसे काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, हे परमेश्वराने पाहिले. यातला कोणीच इस्राएलला वर आणण्याच्या पात्रतेचा नाही हे त्याने ओळखले 27 इस्राएलचे नाव जगाच्या पाठीवरुन पुसून टाकू असे काही परमेश्वर म्हणाला नव्हता. तेव्हा योवाशचा मुलगा यराबाम याच्यामार्फत परमेश्वराने इस्राएलला तारले.

28 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात यराबामच्या पराक्रमांची नोंद आहे. दिमिष्क आणि हमाथ त्याने इस्राएलच्या भूमीला पुन्हा जोडले याचीही नोंद त्यात आहे. (ही नगरे यहूदाच्या ताब्यात होती) 29 यराबाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. यराबामचा मुलगा जखऱ्या राजा म्हणून गादीवर आला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:23-19:12

23 तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला, आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.

इफिस व अखया (करिंथ) येथे अपुल्लो

24 अपुल्लो नावाचा एक यहूदी होता. तो आलेक्सांद्र येथे जन्मला होता. तो उच्च शिक्षिंत होता. तो इफिस येथे आला. त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते. 25 देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता. 26 नंतर तो यहूदी लोकांच्या सभास्थानात धैर्याने बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी त्याला बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला एका बाजूला घेतले. आणि देवाच्या मार्गाविषयी अधिक अचूक रीतीने त्याला स्पष्ट करुन सांगितले.

27 अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्याला उत्तेजन दिले. आणि तेथील येशूच्या अनुयायांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे (येशूवर) विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली. 28 जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले. आणि पवित्र शास्त्राच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.

इफिस येथे पौल

19 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले. पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?”

ते अनुयायी त्याला म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही!”

तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?”

ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”

पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता. त्याने लोकांना सांगितले की, त्याच्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय.”

जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. या गटात सर्व मिळून बारा पुरुष होते.

पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे. परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले. व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला, आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले. आणि तुरन्नाच्या शाळेत दररोच त्यांच्याशी चर्चा केली. 10 हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांपर्यंत प्रभु येशूचे वचन पोहोंचले.

11 देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. 12 पौलाने वापरलेले रुमाल आणि कपडेही काही लोक नेत असत. लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवीत असत. जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.

स्तोत्रसंहिता 146

146 परमेश्वराची स्तुती करा.
    माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन.
    मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका.
    लोकांवर विश्वास टाकू नका.
    का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते
    आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात.
    ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
    परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.
    परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
जे लोक दु:खी कष्टी आहेत.
    त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो.
    तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो.
    संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो.
परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो.
    परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 परमेश्वर सदैव राज्य करील
    सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील

परमेश्वराची स्तुती करा.

नीतिसूत्रे 18:2-3

मूर्खाला इतरांपासून शिकायची इच्छा नसते. त्याला फक्त स्वतःच्याच कल्पना सांगायच्या असतात.

लोकांना वाईट माणूस आवडत नाही. लोक त्या मूर्खाची चेष्टा करतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center