Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the GNT. Switch to the GNT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 22

मीखायाचा अहाबला सावधगिरीचा इषारा

22 पुढील दोन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली. तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलचा राजा अहाब याला भेटायला गेला.

यावेळी अहाबने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामच्या राजाने गिलाद मधील रामोथ आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.” आणि अहाब राजा यहोशाफाटला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथला अरामी सैन्याशी लढाल का?”

यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत. पण प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”

तेव्हा अहाबने संदष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. अहाबने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ येथे अरामी फौजेवर चालून जावे का? की काही काळ थांबावे?”

संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हाला जय मिळवून देईल.”

पण यहोशाफाटने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”

राजा अहाब म्हणाला, “तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा मुलगा मीखाया. पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते.”

यहोशाफाट म्हणाला, “अहाब राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”

तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.

10 यावेळी दोन्ही राजे राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्या ठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालले होते. 11 त्यांच्यापैकी एक कनानाचा मुलगा सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे, ‘ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस असे देवाचे म्हणणे आहे. म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.’” 12 सिद्कीयाचे हे म्हणणे इतर सर्वच संदेष्ट्यांना पटले. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”

13 हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला. त्याला भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”

14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगीन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”

15 मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्याला विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथला अरामच्या सैन्यावर आता चढाई करु का?”

मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”

16 पण अहाब त्याला म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. कितीदा मी तुला तेच सांगू?”

17 तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलचे सैन्य डोंगरांवर इतस्ततः पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे: ‘यांना कोणी नेता नाही. यांनी घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.’”

18 मग अहाब यहोशाफाटला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”

19 इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. त्याचे दूत त्याच्या शेजारी उभे आहेत. 20 देव म्हणाला, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथला अरामवर हल्ला करावा असे मला वाटते. त्यात त्याला मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना. 21 मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’ 22 परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले जा आणि अहाब राजाला या मोहात पाड तुला यश येईल.’”

23 मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, “तेव्हा खरी हकीकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरालाच वाटते.”

24 मग सिद्कीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाला त्याने एक थापड मारली. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”

25 मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”

26 तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा. 27 मीखायाला तुरुंगात घालायला त्यांना सांगा. त्याला फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत येईपर्यंत त्याला तिथेच राहू द्या.”

28 मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वरमाझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”

29 नंतर राजा अहाब आणि राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामच्या सैन्याशी लढायला गेले. गिलाद प्रांतात हे युध्द झाले. 30 अहाब यहोशाफाटला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करुन युध्दाला सुरुवात केली.

31 अरामच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले. 32 तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटला पाहिले. तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले. त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला. 33 हा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मारले नाही.

34 तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नेमका इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दुर जाऊ.”

35 युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामच्या सैन्याकडे पाहात होता. त्याला एवढा रक्तस्त्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला. 36 सूर्यास्ताच्या वेळी इस्राएलच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.

37 राजा अहाबला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनला आणला. त्याला त्यांनी तिथे पुरले.

38 शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबचा रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नेमके घडले.

39 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे. 40 अहाब मरण पावला व त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.

यहुदाचा राजा यहोशाफाट

41 अहाब इस्राएलचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट [a] हा आसाचा मुलगा. 42 यहोशाफाट वयाच्या पस्तिसाव्या वर्षी राजा झाला आणि यरुशलेममध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची मुलगी. 43 यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपल्या वडीलांप्रमाणेच होता. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्या ठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.

44 इस्राएलच्या राजाशी त्याने शांततेचा करार केला. 45 राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकीकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.

46 धर्माच्या नावाखाली देह विक्रय करणाऱ्या स्त्रीपुरुषांना यहोशाफाटने प्रार्थनास्थळांमधून हाकलून लावले. यहोशाफाटचे वडील आसा राज्य करीत असताना हे लोक त्या ठिकाणी होते.

47 याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहात असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.

48 राजा यहोशाफाटने काही मालवाहू गलबते बांधली. त्यात त्याचा हेतू ओफीरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली. 49 इस्राएलचा राजा अहज्या याने यहोशाफाटला मदतीचा हात दिला. त्याच्या माणसांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली. पण अहज्याची कुमक स्वीकारण्यास यहोशाफाटने नकार दिला.

50 यहोशाफाट मरण पावला त्या नंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोराम राज्य करु लागला.

इस्राएलचा राजा अहज्या

51 अहज्या अहाबचा मुलगा होता. यहोशाफाटच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले. 52 अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडील अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा मुलगा यरोबाम या सगळ्यांनी केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांना आणखी पापात लोटले. 53 आपल्या वडीलांप्रमाणेच अहज्यानेही बाल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबवर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.

प्रेषितांचीं कृत्यें 13:16-41

16 पौल उभा राहिला. आणि आपला हात उंचावून (लोकांचे लक्ष वेधून घेऊन) म्हणाला, “माझ्या यहूदी बांधवानो व इतर लोकहो, जे तुम्ही खऱ्या देवाची उपासना करता, ते कृपा करुन माझे ऐका! 17 इस्राएलाच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली. ते ज्या काळात इजिप्तमध्ये परकी म्हणून राहत होते, त्याकाळात देवाने त्यांना यशस्वी होण्यास मदत केली. मोठ्या सामर्थ्याने देवाने त्यांना त्या देशातून बाहेर आणले. 18 आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षांत त्यांना सहनशीलता दाखविली. 19 देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांना दिल्या. 20 हे सर्व साधारणपणे चारशेपन्रास वर्षांत घडले.

“त्यानंतर देवाने आपल्या लोकांना शास्ते (नेते) दिले. ते शमुवेल संदेष्टेयाच्या काळापर्यंत. 21 मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो चाळीस वर्षेपर्यंत राजा होता. 22 नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दावीदाला त्यांचा राजा केले. दावीदाविषयी देव असे बोलला: दावीद, इशायाचा पुत्र, हा मला आवडला, मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व तो करील.

23 “याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. 24 येशू येण्यापूर्वी सर्व यहूदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. 25 जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हांला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’

26 “माझ्या बंधूनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हांला सांगितली गेली. 27 जे यरुशलेममध्ये राहतात ते यहूदी व यहूदी पुढारी यांना जाणीव झाली नाही की, येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्यांनी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहूदी लोकांनी येशूचा धिक्कार केला, जेव्हा त्यांनी असे केले, तेव्हा त्यांनी भविष्यावाद्यांचे म्हणणे खरे ठरविले! 28 येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत. पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्याला जिवे मारावे.

29 “शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते. ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले. व त्याला कबरेत ठेवले. 30 पण देवाने त्याला मरणातून उठविले 31 यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालीला पासून यरुशलेमपर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे शाक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.

32 “आम्ही तुम्हांला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो. 33 आम्ही त्यांची लेकरे (वंशज) आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करुन दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतो:

‘तू माझा पुत्र आहेस.
    आज मी तुझा पिता झालो आहे.’ (A)

34 देवाने येशूला मरणातून उठविले. येशू पुन्हा कबरेत जाऊन माती बनणार नाही. म्हणून देव म्हणाला:

‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र
    व सत्यअभिवचने मी तुला देईन.’ (B)

35 पण दुसऱ्या ठिकाणी देव म्हणतो:

‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव घडू देणार नाहीस.’ (C)

36 “ज्या काळात दाविद राहत होता तेव्हा त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे केले. मग तो मेला. आपल्या वाडवडिलांशेजारी त्याला पुरले. आणि कबरेत त्याचे शरीर कुजले 37 पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठविले, त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. 38-39 बंधूनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे: या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हांला मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हांला तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही. पण प्रत्येक व्यक्ति जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वाविषयी न्यायी ठरविली जाते. 40 संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा. भविष्यवादी म्हणाला:

41 ‘ऐका, जे तुम्ही संशय धरता!
    तुम्ही चकित होता पण मग दूर जाता व मरता;
कारण तुमच्या काळामध्ये
    मी (देव) काही तरी करीन ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी
ते स्पष्ट करुन सांगितले तरी
    तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.’” (D)

स्तोत्रसंहिता 138

दावीदाचे स्तोत्र.

138 देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो.
    मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो.
    मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो.
तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस.
    आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.
देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली
    आणि तू मला होकार दिलीस.
    तू मला शक्ती दिलीस.

परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील
    तेव्हा ते तुझी स्तुती करतील.
ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील
    कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे.
देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळ्यालोकांचा कैवारी आहे
    गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे
परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.
देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव.
    जर माझे शत्रू माझ्यावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे.
    परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते.
    परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.

नीतिसूत्रे 17:17-18

17 मित्र नेहमी प्रेम करतो. खरा भाऊ संकटाच्या वेळीसुध्दा मदत करतो.

18 केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center