Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 20-21

बेन-हदाद आणि अहाब यांच्यात लढाई

20 बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले. इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे बेन-हदादने दूतांकरवी निरोप पाठवला. संदेश असा होता, “बेन-हदादचे म्हणणे आहे, ‘तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि मुलेही माझ्या हवाली करावी.’”

यावर इस्राएलच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”

अहाबकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेनहदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस. उद्याच मी माझ्या माणसांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. तुमच्याजवळच्या सर्व मौल्यवान चीजा त्या माणसांच्या हवाली करा. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.’”

तेव्हा राजा अहाबने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, बेन-हदाद हा विघ्न आणत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोने-चांदी तसेच माझी बायका मुले मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.”

यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान तुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”

तेव्हा अहाबने बेन-हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेचे मी पालन करु शकत नाही.”

बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला. 10 तेव्हा बेन-हदादकडून दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाही तर देवाने माझे वाटोळे करावे.”

11 अहाब राजाचे त्याला उत्तर गेले. त्यात म्हटले होते. “बेनहदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्ख काळापर्यंत जगतो त्याच्या इतके फुशारुन जाऊ नये.”

12 राजा बेन-हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.

13 त्याच वेळी इकडे एक संदेष्टा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हातून या सैन्याचा पराभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.’”

14 अहाबने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?”

तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल.”

यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?”

“तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.

15 तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.

16 राजा बेन-हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला. 17 तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या माणसांनी त्याला सांगितले. 18 तेव्हा बेनहदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”

19 राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते. 20 प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अराममधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेनहदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला. 21 राजा अहाबने सेनेचे नेतृत्व करुन अरामच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामचा दारुन पारभव झाला.

22 यानंतर तो संदेष्टा राजा अहाबकडे गेला आणि म्हणाला, “अरामचा राजा बेनहदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आखा.”

बेन हदादची आणखी एक स्वारी

23 राजा बेन-हदादचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलचे देव हे पर्वतराजीतले देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू. 24 आता तुम्ही असे करायला हवे त्या 32 राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा. 25 जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएलोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.

26 वसंत ऋतुत बेनहदादने अराममधील लोकांना एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.

27 इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.

28 एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता: “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.’”

29 दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामचे एकलक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.

30 जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता. 31 त्याचे सेवक त्याला म्हणाले, “इस्राएलचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण जाडेभरडे कपडे घालून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून [a] इस्राएलच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल सुध्दा.”

32 त्या सर्वांनी मग भरडे कपडे घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, “तुमचा दास बेनहदाद तुमच्याकडे ‘जीवदान मागत आहे’”

अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा भाऊच [b] आहे.”

33 बेनहदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबने बेनहदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेनहदाद तुमचा भाऊच आहे.”

अहाबने बेनहदादला “आपल्यासमोर बोलावून घेतले.” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.

34 बेनहदाद अहाबला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील”

अहाब त्यावर म्हणाला, “या करारावर मी तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबने राजा बेन-हदादला मुक्त केले.

अहाबला संदेष्ट्याचा विरोध

35 एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला सांगितले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले. 36 तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्याला ठार मारले.

37 मग हा पहिला संदेष्टा एका माणसाकडे गेला. त्याला त्याने स्वतःला “फटका मारायला!” सांगितले.

त्या माणसाने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले. 38 त्या संदेष्ट्याने मग स्वतःच्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहात बसला. 39 राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा पंचाहत्तर पौंड चांदीचा दंड भरावा लागेल.’ 40 पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला.”

यावर इस्राएलचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”

41 आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले. 42 मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्याला तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.’”

43 यानंतर राजा शोमरोनला आपल्या घरी परतला. तो अतिशय चिंताग्रस्त आणि खिन्न झाला होता.

नाबोथचा द्राक्षमळा

21 अहाब राजाचा राजवाडा शोमरोनमध्ये होता. त्याच्या महालाशेजारी एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ नावाच्या माणसाचा होता. नाबोथचा द्राक्षमळा. एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.”

नाबोथ म्हणाला, “माझी जमीन मी देणार नाही. ती माझ्या कुटुंबाचे वतन आहे.”

तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथवर रागावलेला होता. ईज्रेलचा हा माणूस जे बोलला ते त्याला आवडले नाही. नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमीन मी तुम्हाला देणार नाहीं.” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकराले.

अहाबची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली. त्याला म्हणाली, “तुम्ही असे खिन्र का? तुम्ही जेवत का नाही?”

अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला. त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्याला सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.”

ईजबेल त्याला म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलचे राजे आहात. उठा, काही तरी खा म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. त्याचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.”

ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबची सही केली. अहाबचा शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडीलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली. पत्रातला मजकूर असा होता:

“एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांना एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल. 10 नाबोथबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या माणसांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांनी ठेचून मारा.”

11 इज्रेलमधल्या वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) अशा मंडळींनी ही आज्ञा मानली. 12 त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्या दिवशी सर्व लोकांना सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले. 13 मग, नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे असे दोन माणसांनी सांगितले. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. 14 मग त्या प्रतिष्ठित माणसांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता.

15 ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हाला हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता” 16 यावर अहाबने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला.

17 यावेळी परमेश्वर एलीयाशी बोलला. (एलीया हा तिश्बी येथील संदेष्टा) परमेश्वर म्हणाला, 18 “शोमरोनमधल्या राजा अहाबकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो त्या मळ्यावर कब्जा करायला तिथे गेला आहे. 19 अहाबला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.’”

20 तेव्हा एलीया अहाबकडे गेला. अहाबने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, “तुला मी पुन्हा सापडलो. तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस.”

एलीया म्हणाला, “हो, तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस. 21 तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, ‘मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना ठार करीन. 22 नबाटाचा मुलगा यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांनाही पाप करायला लावलेस.’ 23 शिवाय परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी बायको ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेल मध्ये कुत्री तुटून पडतील. 24 तुझ्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल.’”

25 अहाबने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची बायको ईजबेल हिने त्याला हे सर्व करायला लावले. 26 अहाबने आणखी एक पातक केले ते म्हणजे त्या लाकडी ठोकळ्यांची, मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांना दिला.

27 एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता.

28 परमेश्वर एलीया संदेष्ट्याला म्हणाला, 29 “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपपर्यंत मी त्याला संकटात लोटणार नाही. त्याचा मुलगा राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.”

प्रेषितांचीं कृत्यें 12:24-13:15

24 देवाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्येत पसरत होता. व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.

25 बर्णबा व शौलाने त्यांचे यरुशलेम येथील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले. त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.

बर्णबा व शौल खास कामसाठी निवड होते

13 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणे: बर्णबा, निग्र शिमोन, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला), आणि शौल. ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले आहे”

म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.

कुप्र येथे बर्णबा व शौल

पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीया शहराला गेले. नंतर ते समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. जेव्हा बर्णबा व शौल सलमीन शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचा संदेश यहूदी लोकांच्या सभास्थानात दिला. मार्क म्हटलेला योहान त्यांच्या मदतीला होता.

ते संपूर्ण बेट पार करुन पफे शहरास गेले. पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बर्येशू होते. तो खोटा संदेष्टा होता. बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. सिर्ग्य पौल राज्यपाल होता. व तो हुशार होता. त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलाविले. त्याला त्यांचा संदेश ऐकावयाचा होता. परंतु अलीम जादूगार हा बर्णबा व शौल यांच्या विरुद्ध होता. (ग्रीक भाषेत बर्येशूसाठी अलीम शब्द वापरतात. त्याचा अर्थ तोच आहे.) राज्यपालाने येशूवर विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण शौल आत्म्याने भरला होता. (शौलाचे दुसरे नाव पौल) पौलाने अलीमकडे (बर्येशूकडे) पाहिले व म्हणाला, 10 “सैतानाच्या पुत्रा! जे काही योग्य असेल त्या सर्वांचा तू शत्रू आहेस. तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. तू देवाचे सत्य नेहमी खोटेपणात बदलण्याचा प्रयत्न करतोस! 11 आता तुला देवाने स्पर्श करताच तू आंधळा होशील. भर दिवसाच्या उन्हातही तुला काही काळ दिसणार नाही.”

मग अलीमसाठी सर्व काही अंधकारमय झाले, चाचपडत तो इकडेतिकडे फिरु लागला. कोणीतरी मदतीला घेऊन त्याचा हात धरुन जाण्यासाठी प्रयत्न करु लागला. 12 जेव्हा राज्यपालाने ते पाहिले (सार्ग्य पौल) त्याने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.

पौल व बर्णबा कुप्र सोडतात

13 पौल व जे लोक त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले. ते पंफुल्यातील पिर्गा गावी आले. परंतु योहान (मार्क) त्यांना सोडून परत यरुशलेमला गेला. 14 त्यांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते अंत्युखियास गेले. (जे पिसीडीयाजवळ होते.)

अंत्युखियात असताना शब्बाथ दिवशी ते यहूदी सभास्थानात गेले आणि तेथे बसले. 15 पवित्र शास्त्रातील नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लोखाणाचे वाचन झाले, मग सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला: “बधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही तरी तुम्हांला सांगायचे असेल तर कृपा करुन बोला!”

स्तोत्रसंहिता 137

137 आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो
    आणि सियोनची आठवण काढून रडलो.
आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.
बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले.
    त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले.
    त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
परंतु परक्या देशात आम्ही
    परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही.
यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो,
    तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो,
    तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते.
मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.

यरुशलेम नेहमी माझा सर्वांत
    मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.
बाबेल, तुझा नाश होईल.
    जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल.
    तू जसा आम्हाला दु:ख देतोस तसेच दु:ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.
जो माणूस तुझी मुले धरतो आणि
    त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.

नीतिसूत्रे 17:16

16 मूर्खाकडचा पैसा वाया जातो. का? कारण तो मूर्ख पैशाचा वापर शहाणा होण्यासाठी करत नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center