Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the VOICE. Switch to the VOICE to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 15:25-17:24

इस्राएलचा राजा नादाब

25 यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामचा मुलगा नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले. 26 नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडील यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये त्याने केली यराबामने इस्राएल लोकांनाही पाप करायला लावले होते.

27 बाशा हा अहीयाचा मुलगा. हे इस्साखारच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले. 28 आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.

इस्राएलचा राजा बाशा

29 बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले. 30 राजा यराबामने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांनाही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामवर कोप झाला.

31 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत. 32 बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.

33 आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा मुलगा बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले. 34 पण परमेश्वराच्या मते जे गैर ते त्याने केले. आपले वडील यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली होती.

16 यानंतर परमेश्वर हनानीचा मुलगा येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते. “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामच्या वाटेनेच गेलास. इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे. तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा मुलगा यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन. तुझ्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील. कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”

इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकीकत लिहीली आहे. बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा एला हा त्याच्यानंतर राज्य करु लागला.

तेव्हा परमेश्वराने येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वराला फार संताप आला होता. आधी यराबामच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामच्या कुळाचा संहार केला म्हणूनही परमेश्वराचा कोप झाला होता.

इस्राएलचा राजा एला

यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्विसावे वर्ष चालू असताना एला हा राजा झाला. एला हा बाशाचा मुलगा तिरसामध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.

जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथांपैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता. 10 जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलचा राजा झाला.

इस्राएलचा राजा जिम्री

11 जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची हत्या केली. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले. 12 बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच बाशाच्या घराण्याचा उच्छेद झाला 13 बाशा आणि त्याचा मुलगा एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वतः पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे परमेश्वराचा कोप झाला.

14 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.

15 आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते. 16 जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता. 17 तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला. 18 नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले. 19 आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. यानेही यराबामप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.

20 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करुन उठला तेव्हाची हकीकतही या पुस्तकात आहे.

इस्राएलचा राजा अम्री

21 इस्राएलच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथचा मुलगा तिब्री याच्या बाजूचे असून त्याला राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते. 22 तिब्रीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्री मारला गेला आणि अम्री राजा झाला. 23 यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना अम्री इस्राएलचा राजा झाला. अम्रीने इस्राएलवर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता. 24 त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दीडशे पौंड चांदी देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगराचे नाव शोमरोन ठेवले.

25 अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने गैर गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता. 26 नबाटाचा मुलगा यराबाम याने जी पापे केली तीच यानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलवर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. दीडदमडीच्या दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.

27 अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकीकत इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे. 28 अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहाब हा राज्य करु लागला.

इस्राएलचा राजा अहाब

29 यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा मुलगा अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले. 30 परमेश्वराने जे चुकीचे म्हणून सांगितले होते, ते सर्व अहाबने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता. 31 नबाटाचा मुलगा यराबाम याने केले ते तर अहाबने केलेच, पण ते पुरेसे वाटले नाही म्हणून की काय त्याने आणखी ही दुष्कृत्ये केली. एथबाल याची मुलगी ईजबेल हिच्याशी त्याने लग्न केले. एथबाल हा सिदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बाल या दैवताच्या भजनी लागला. 32 शोमरोन येथे त्याने बालच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली. 33 अशेराच्या पूजेसाठी स्तंभ उभारला. आपल्या आधींच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.

34 याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा मुलगा अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा सगूब हा वारला. नूनचा मुलगा यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले. [a]

एलीया आणि दुष्काळ

17 गिलादमधील तिश्बी या गावात एलीया हा संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल.”

मग परमेश्वर एलीयाला म्हणाला, “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.” तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला. रोज सकाळ संध्याकाळ त्याला कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.

पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ सुकला. तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, “सिदोनमधील सारफथ येथे जाऊन राहा तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”

10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?” 11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”

12 तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.”

13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. 14 इस्राएलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, ‘तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.’”

15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. 16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.

17 काही दिवसांनंतर या बाईचा मुलगा आजारी पडला. त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला. 18 तेव्हा ती बाई म्हणाली, “एलीया, तू तर संदेष्टा आहेस मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”

19 एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्याला ठेवले. 20 एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?” 21 मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घातल्यासारखे करुन प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”

22 एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्र्वासेच्छवास पुन्हा सुरू झाला व तो जिवंत झाला. 23 एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा मुलगा जिवंत आहे.”

24 ती बाई म्हणाली, “तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्यामार्फत बोलतो हे आता मला कळले.”-

प्रेषितांचीं कृत्यें 10:24-48

24 दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला. कर्नेल्य त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.

25 जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्याला भेटला. कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्याला अभिवादन केले. 26 पण पेत्र म्हणाला. “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.” 27 पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले.

28 पेत्र त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर जातींच्या लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही. पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला ‘अशुद्ध’ किंवा ‘अपवित्र’ मानू नये. 29 याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता, कृपा करुन मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलाविले?”

30 कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले. होते. 31 तो मनुष्य म्हणाला, ‘कर्नेल्या! देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो. 32 म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.’ 33 तेव्हा मी लागलीच तुम्हांला निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हांला जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हांला दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.”

कर्नेल्याच्या घरात पेत्र भाषण करतो

34 पेत्राने बोलायला सुरुवात केली: “मला आता हे खरोखर समजले आहे की, देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. 35 जो कोणी त्याची भक्ति करतो आणि योग्य ते करतो, त्याला देव स्वीकारतो, व्यक्ति कोणत्या देशाची आहे, हे महत्वाचे नाही. 36 देव यहूदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताद्वारे शांति जगात आली आहे. येशू सर्वांचा प्रभु आहे!

37 “सगळ्या यहूदा प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात योहानाने लोकांना बाप्तिस्म्याविषयी गालीलात जो संदेश दिला, त्याने झाली. 38 नासरेथच्या येशूविषयी तुम्हांला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्मा व सामर्थ्य देऊन रिव्रस्त बनविले. येशू सगळीकडे लोकांच्यासाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. त्यामुळे देव येशूबरोबर आहे हे दिसून आले.

39 “येशूने संपूर्ण यहूदी प्रांतात आणि यरुशलेमात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण येशूला मारण्यात आले. लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्याला खिळले. 40 परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले! देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले. 41 परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्याला पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत! येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले.

42 “येशूने आम्हांला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हांला आज्ञा केली. 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”

यहूदी नसलेल्यांवर पवित्र आत्मा येतो

44 पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला. 45 यहूदी विश्वासाणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले. यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतला गला, यामुळे ते चकित झाले. 46 आणि यहूदी नसलेल्या लोकांना निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुति करताना यहूदी लोकांनी पाहिले. 47 मग पेत्र म्हणाला, “या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हांला मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.” 48 म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंति केली.

स्तोत्रसंहिता 134

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.

134 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा.
    तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
सेवकांनो, तुमचे बाहू उभारा
    आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.
आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो.
    परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.

नीतिसूत्रे 17:9-11

एखाद्याने तुमचे काही वाईट केल्यानंतर जर तुम्ही त्याला क्षमा करु शकला तर तुम्ही मित्र बनू शकता. पण जर तुम्ही त्याची करणी सतत मनात ठेवली तर त्यामुळे मैत्रीत बाधा येईल.

10 हुशार माणूस तंबी दिल्या बरोबर शिकतो. परंतु मूर्ख माणूस शंभर फटके मारल्यावरही शिकत नाही.

11 वाईट माणसाला केवळ चुकाच करायच्या असतात. शेवटी देव त्याला शिक्षा करायला देवदूत पाठवेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center