Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 14:1-15:24

यराबामच्या मुलाचा मृत्यू

14 याच सुमारास यराबामचा मुलगा अबीया आजारी पडला. तेव्हा यराबाम आपल्या बायकोला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. संदेष्ट्याला तू दहा भाकरी, काहीगोड पुऱ्या आणि मधाचा बुधला दे. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”

मग राजाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते. पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा मुलगा फार आजारी आहे.” मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले.

यराबामची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता. अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे. परत जाशील तेव्हा इस्राएलचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलच्या समस्त प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली. याआधी इस्राएलवर दावीदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे, मनःपूर्वक मलाच अनुसरत असे, मला मान्य असलेल्या गोष्टीच तो करी. पण तुझ्या हातून अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे. 10 तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काडीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन. 11 तुझ्या घरातल्या ज्याला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.’”

12 अहीया संदेष्टा मग यराबामच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू गावात शिरल्याबरोबर तुझा मुलगा मरणार आहे. 13 सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्याताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे. 14 परमेश्वर इस्राएलवर नवीन राजा नेमील. तो यराबामच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल. 15 मग परमेश्वर इस्राएलला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्राटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा देवीचे स्तंभ त्यांनी उभारले याचा त्याला संताप आला. 16 आधी यराबामच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”

17 यराबामची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा मुलगा वारला. 18 सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.

19 राजा यराबामने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे. 20 बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा नादाब त्याच्यानंतर सत्तेवर आला.

21 शलमोनाचा मुलगा रहबाम यहूदाचा राजा झाला तेव्हा तो एक्के चाळीस वर्षाचा होता. यरुशलेममध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वतःच्या सन्मानासाठी या नगराची निवड केली होती. इस्राएलमधल्या इतर नगरांमधून त्याने हेच निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा. ती अम्मोनी होती.

22 यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले आणि परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती. 23 या लोकांनी उंचवट्यावरील देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. खोट्यानाट्या दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी या गोष्टी बांधल्या.

24 परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात याआधी जे लोक राहात असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलच्या लोकांना दिला होता.

25 रहबामच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमवर स्वारी केली. 26 त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून दावीदाने ज्या सोन्याच्या ढाली आणल्या होत्या त्याही त्याने पळवल्या. दावीदाने त्या यरुशलेममध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या. 27 मग रहबामने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या. 28 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.

29 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे. 30 रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.

31 रहबाम वारला आणि त्याचे आपल्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामचा मुलगा अबीया नंतर राज्यावर आला.

यहूदाचा राजा अबीया

15 नबाटाचा मुलगा यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, त्याचा (रहबामचा) मुलगा अबीया यहूदाचा पुढचा राजा झाला. अबीयाने तीन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमची मुलगी.

आपल्या वडीलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ट नव्हता. दावीदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याखातर त्याने अबीयाला यरुशलेमचे राज्य दिले. परमेश्वराच्या कृपेने त्याला मुलगाही झाला यरुशलेमला परमेश्वर दयेने सुरक्षितताही लाभली. हे सर्व दावीदासाठीच परमेश्वराने केले. दावीदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.

रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत. अबीयाने आणखी जे काही केले त्याची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे. अबीयाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा मुलगा आसा राज्य करु लागला.

यहूदाचा राजा आसा

यराबामच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला 10 आसाने यरुशलेमवर एक्के चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमची मुलगी.

11 आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले. 12 त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडीलांनी केलेल्या मूर्तीही हलवल्या. 13 आपली आजी माका हिला आसाने राणी, होण्यापासून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली. 14 उंचवट्यावरील पूजास्थळांची त्याने नासधूस केली नाही, मात्र आयुष्यभर तो परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला. 15 आसा आणि त्याचे वडील यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करुन घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यात होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.

16 आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत. 17 बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणेजाणे त्याला थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले. 18 आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेनहदाद हा तब्रिम्मोनचा मुलगा आणि तब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती. 19 आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल.”

20 राजा बेनहदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ माका, गालिल सरोवरालगतची गावे आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य पाठवले. 21 या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबुतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला. 22 मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामुग्री आणली. बन्यामीनमधील मेबा आणि मिस्पा येथे हे सर्व सामान त्यांनी वाहून नेले. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.

23 आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. 24 त्याचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा यहोशाफाट राज्य करु लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 10:1-23

पेत्र आणि कर्नेल्य

10 कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता. तो इटलीक नावाच्या पलटणीन शताधिपती होता. कर्नेल्य हा धर्मशील असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे. एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टान्त झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टान्तात देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”

कर्नेल्य देवदूताकडे पाहू लागला. तो भयभीत झाला होता. “काय आहे, प्रभु?”

देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठनण आहे. तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या माणसाला घेऊन ये, शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणततात; तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्राजवळ आहे.” कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला. नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले. कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्व काही सांगितले, आणि त्यांना यापोला पाठविले.

दूसऱ्या दिवशी ही माणसे यापो गावाजवळ आली, ती दूपारची वेळ होती. त्याच वेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला. 10 पेत्राला भूक लागली होती. त्याला खायला पाहिजे होते. ते पेत्रासाठी जेवण करीत असता पेत्राला तंद्री लागली. 11 आणि आपल्यासामोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काही तरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसू लागले. 12 त्या चादरीत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. उदा. चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी त्यात होते. 13 नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, उठ; यापैकी कोणताही प्राणी मारुन खा.”

14 पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभु! जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी अद्याप खाल्लेले नाही.”

15 पण ती वाणी त्याला पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत. त्यांना अपवित्र म्हणू नकोस!” 16 असे तीन वेळा घडले. मग त्या सगळ्या गोष्टी वर स्वर्गामध्ये पुन्हा घेतल्या गेल्या. 17 पेत्र भयचकित होऊन या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करु लागला.

ज्या लोकांना कर्नेल्याने पाठविले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले. ते दाराजवळ उभे होते. 18 त्यांनी विचारले, “शिमोन पेत्र येथेच राहतो काय?”

19 पेत्र अजूनसुद्धा या दृष्टान्ताविषयीच विचार करीत होता. पण आत्मा त्याला म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत. 20 ऊठ आणि पायऱ्या उतरुन खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे. काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.” 21 मग पेत्र खाली त्या माणसांकडे गेला. तो म्हणाला, “तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे. तुम्ही येथे का आलात?”

22 ती माणसे म्हणाली, “एका पवित्र दूताने तुम्हांला आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल्य हा शताधिपती आहे. तो चांगला धर्मशील मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हांला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे.” 23 पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले.

दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला. यापो येथील काही बंधुही पेत्राबरोबर गेले.

स्तोत्रसंहिता 133

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.

133 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात,
    तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
    अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे,
    अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.
    सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.

नीतिसूत्रे 17:7-8

मूर्खाने खूप बोलणे शहाणपणाचे नसते. तसेच राज्यकर्त्याने खोटे बोलणे शहाणपणाचे नसते.

काही लोकांना कुठेही गेले तरी लाच म्हणजे दैवी मंत्र वाटते आणि ती कामही करते असे वाटते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center