Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 9-10

शलमोनाला पुन्हा देवाचे दर्शन

शलमोनाच्या मनात होते त्याप्रमाणे त्याने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांचे काम पूर्ण केले. यापूर्वी गिबोनमध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्याला दर्शन दिले. परमेश्वर त्याला म्हणाला,

“मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थान माझ्या ध्यानीमनी राहील. तुझे वडील दावीद यांच्या प्रमाणेच तू तुझी वर्तणूक ठेव. ते न्यायी आणि प्रामाणिक होते. तूही माझ्या आज्ञा पाळ, मी सांगितलेले सर्व करत राहा. तू त्याप्रमाणे वागलास तर तुमच्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी राजासनावर येईल. तुझ्या वडीलांना मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांचीच सत्ता इस्राएलवर राहील असे मी म्हटले होते.

6-7 “पण तू किंवा तुझी मुलेबाळे यांचा मार्ग भरकटला, माझ्या आज्ञांचे पालन झाले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात तर मात्र मीच दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना मी हुसकावून लावीन. इतर लोक तुमच्याकडे कुचेष्टेने बोट दाखवतील. तुमची टर उडवतील. मंदिर मी पवित्र केले आहे. येथे येऊन लोक माझे आदराने स्मरण करतील. पण माझे आज्ञापालन केले नाहीत तर ते मी जमीनदोस्त करीन. हे मंदिर नामशेष होईल. ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचा असा विध्वंस का बरे केला?’ यावर इतर जण सांगतील, ‘याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाचा त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले.’”

10 परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली. 11 त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूपच मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते. 12 हिराम मग सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्याला ती तितकीशी पसंत पडली नाहीत. 13 राजा हिराम म्हणाला, “काय ही तू दिलेली नगरे?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो. 14 हिरामने शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी नऊहजार पौंड सोने पाठवले होते.

15 शलमोनराजाने मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.

16 मिसरच्या राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानीं लोकांना त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते. 17 शलमोनाने ते पुन्हा बांधून काढले. तसेच खालचे बेथ-होरोनही बांधले. 18 तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे, 19 अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्याला हवे ते ते बांधले.

20 इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते. 21 इस्राएल लोकांना त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे. 22 इस्राएल लोकांना मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकारी, कारभारी, सरदार, रथाधिपती आणि चालक अशा पदांवर होते. 23 शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर साडेपाचशे अधीक्षक होते. मजूरांवर ते देखरेख करीत.

24 फारोची मुलगी आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.

25 शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांतीबली अर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळी. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे.

26 एसयोन गेबेर येथे शलमोनाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे. 27 समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाश्यांबरोबर पाठवले. 28 शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून एकतीसहजार पाचशे पौंड सोने शलमोनाकडे आणले.

शलमोनाच्या भेटीस शबाची राणी

10 शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली. नोकरा चाकरांचा लवाजमा आणि मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुशलेमला आली. शलमोनाला भेटल्यावर तिने सुचतील ते सर्व प्रश्न विचारले. शलमोनाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला कुठलाच प्रश्न अवघड वाटला नाही. शलमोन अतिशय हुषार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने बांधलेला सुंदर महालही तिने बघितला. त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांचा पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्र्चर्याने थक्क झाली.

ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते वस्तुस्थितीला धरुनच होते. पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे. तुझ्या बायका [a] आणि कारभारी खरेच फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेचे भाग्य त्यांना लाभले आणि तुझ्या ज्ञानाचा लाभ त्यांना होतो. परमेश्वर देव थोर आहे. तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलचा राजा केले. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे. म्हणूनच त्याने तुला राजा केले. तू नियमशास्त्राचे पालन करतोस आणि लोकांना न्यायाने वागवतोस.”

10 मग शबाच्या राणीने राजाला जवळजवळ 9,000 पौंड सोने नजर केले. शिवाय मसाल्याचे सुगंधी पदार्थ आणि मौल्यवान हिरेही दिले. इस्राएलमध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले.

11 हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली. 12 शलमोनाने या लाकडाचा वापर मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलमध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही.

13 दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासहित मायदेशी निघून गेली.

14 शलमोन राजाला दरसाल जवळपास एकोणऐंशी हजार नऊशेवीस पौंड सोने मिळत राहिले. 15 या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले.

16 शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीचे वजन पंधरा पौंड होते. 17 तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्यात चार पौंड सोने होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमध्ये त्याने या ठेवल्या.

18 शिवाय शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते. 19 सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते. 20 तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणत्याही राज्यात नव्हते.

21 शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमधली सर्व शस्त्रास्त्रे आणि सामुग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.

22 राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत.

23 शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुध्दि चातुर्य होते. 24 लोक त्याला पाहायला उत्सुक असत. देवाने त्याला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे. 25 ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणी. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.

26 शलमोनाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बाराहजार घोडे यांचा संग्रह होता. रथांसाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यात रथ ठेवले. काही रथ त्याच्या जवळ यरुशलेममध्येही होते. 27 राजाने इस्राएलला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुशलेम नगरात चांदी दगडधोंड्यासारखी आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते. 28 मिसर आणि क्यू येथून शलमोन घोडे आणवत असे. त्याचे व्यापारी क्यूमध्ये ते खरेदी करत आणि तेथून ते इस्राएल मध्ये आणत. 29 मिसरचा एक रथ साधारण 15 पौंड चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत पावणेचार पौंड चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना शलमोन हे रथ आणि घोडे विकत असे.

प्रेषितांचीं कृत्यें 8:14-40

14 यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. 15 जेव्हा पेत्र व योहान आले. तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. 16 या लोकांचा प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. 17 मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.

18 शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला. 19 शिमोन म्हणाला, “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल, अशी शक्ति मला सुध्दा द्या.”

20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुइया पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास! 21 या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. 22 आपले ह्रदय बदल, तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या सोडून दे. प्रभूला (देवाला) प्रार्थना कर. कदाचित तुइया पश्चात्तप्त अंतःकरणामुळे तो तुला क्षमा करील. 23 कारण तुइया मनात कटू मत्सर भरलेला आहे. व तू पापाचा दास झालेला आहेस, हे मला दिसून आले आहे!”

24 शिमोनाने उत्तर दिले, “आपण दोघेही माइयासाठी देवाजवळ प्रार्थना करावी. यासाठी की, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माइयावर न येवो!”

25 नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली (जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले.) त्यांनी प्रभुचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.

इथिओपियाच्या मनुष्याला फिलिप्पा शिक्षण देतो

26 देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा-तो रस्ता वाळवंटातून जातो.”

27 मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. 28 आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टयाचे पुस्तक वाचत होता.

29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!” 30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ तुम्हांला कळतो का?”

31 तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करुन मला सांगायला हवे.” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. 32 पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होता:

“वधायला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता.
    लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत राहिला.
    त्याने आपले तोंड उघडले नाही.
33 त्याला लज्जित केले गेले, त्याचे हक्क काढून घेतले गेले.
    त्याच्या पिढीविषयी कोणतीही गोष्ट पुढे वर्णीली जाणार नाही.
    कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.” (A)

34 तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “क्रुपा करुन मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसन्या कोणाविषयी बोलत आहे?” 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करुन येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.

36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ) आले. अधिकारी म्हणाला, “पहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” 37 [a] 38 आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरुन पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. 39 जेव्हा ते पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. 40 आपण अजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरीयाला गेला.

स्तोत्रसंहिता 130

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

130 परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे
    म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे.
    माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या
    पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
    म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.

मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे.
    माझा आत्मा त्याची वाट बघत आहे.
    परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे.
    मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.
    केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते.
परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि
    परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.

नीतिसूत्रे 17:2-3

सेवकाचा हुशार मुलगा मालकाच्या आळशी मुलावर ताबा मिळवील. तो हुशार मुलगा मालकाचे सर्व काही घेईल.

सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी आगीत टाकतात. लोकांची मने मात्र परमेश्वर शुध्द करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center