Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 8

करारकोशाची मंदिरात स्थापना

इस्राएलमधील सगळी वडीलधारी मंडळी,. सर्व घराण्यांचे प्रमुख आणि कुटुंबातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरुशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून करारकोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले. तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा माहिना चालू होता आणि ते दिवस मंडपाचा सण ह्या विशेष उत्सवाचे होते.

इस्राएलची सर्व वडीलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला. त्याबरोबरच सभामंडप आणि तिथली सर्व पवित्र उपकरणेही त्यांनी घेतली. या कामात याजकांना लेवींनी मदत केली. राजा शलमोन व इस्राएलचे सर्व लोक करार कोशाच्या समोर आले. तेथे त्यांनी अनेक बळी अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते. मग याजकांनी परमेश्वराचा तो करारकोश योग्य जागी ठेवला. मंदिरातील अतिपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला. करुबांचे पंख पवित्र करारकोशावर पसरलेले होते. पवित्र कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते. हे दांडे इतके लांब होते की अतिपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत. करारकोशाच्या आत दोन शिलालेख होते. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता.

10 अतिपवित्र गाभाऱ्यात [a] हा पवित्र करारकोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले. त्याबरोबर मंदिर मेघाने व्यापले. 11 परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेल्यामुळे याजकांना आपले काम चालू ठेवता येईना. 12 तेव्हा शलमोन म्हणाला,

“आकाशात सूर्य तळपतो तो परमेश्वरामुळे,
    पण तो स्वतःमात्र काळोख्या ढगात राहतो
13 तुला युगानुयूग राहाण्यासाठी हे मंदिर
    मी तुझ्यासाठी बांधले आहे.”

14 सर्व इस्राएल लोक तेथे उभे होते. त्या समुदायाकडे वळून शलमोनाने देवाला त्यांना आशीर्वाद द्यायला सांगितले. 15 शलमोन राजाने मग एक दीर्घ प्रार्थना म्हटली. ती अशी:

“इस्राएलचा परमेश्वर देव महान आहे. माझे वडील दावीद यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने सर्व काही केले. परमेश्वर माझ्या वडीलांना म्हणाला, 16 ‘माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणूनही अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुशलेम हे नगर मी निवडले आहे आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दावीदाची निवड केली आहे.’

17 “इस्राएलच्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या फार मनात होते. 18 पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘मंदिर उभारण्याची तुझी तीव्र इच्छा मी जाणून आहे. अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे. 19 पण तुझ्या हातून हे काम होणार नाही. तुझा मुलगा हे मंदिर उभारुन दाखवील.’

20 “परमेश्वराने अशा पध्दतीने आपले वचन खरे करुन दाखवले आहे. आता माझ्या वडीलांच्या गादीवर मी आलो आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे इस्राएल लोकांवर माझी सत्ता आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे. 21 त्यात पवित्र करारकोशासाठी एक गाभारा करवून घेतला आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांशी केलेला करार आहे. परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले तेव्हा केलेला तो करार यात आहे.”

22 एवढे बोलून शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला. सर्व लोक त्याच्या समोर होते. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरुन वर पाहात 23 शलमोन म्हणाला,

“हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस. 24 माझे वडील दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस आणि ते खरे करुन दाखवलेस. आपल्या मुखाने तू वचने दिलेस आणि तुझ्याच सामर्थ्यामुळे ते आज प्रत्यक्षात आले आहे. 25 माझ्या वडीलांना दिलेली इतर वचनेही. हे, इस्राएलच्या परमेश्वर देवा, तू खरी करुन दाखव तू म्हणाला होतास, ‘दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझे काटेकोर आज्ञापालन केले पाहिजे. तसे झाले तर तुमच्याच घराण्यातील कोणीतरी एकजण नेहमी इस्राएल लोकांवर राज्य करील.’ 26 परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, हा माझ्या वडीलांना दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे.

27 “पण परमेश्वरा, तू खरोखरच इथे पृथ्वीवर आमच्यामध्ये कायम राहाशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यांतही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी अपुरेच आहे. 28 पण कृपाकरुन माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझ्या परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक. 29 पूर्वी तू म्हणाला होतास, ‘येथे माझा सन्मान होईल.’ तेव्हा रात्रांदिवस या मंदिराकडे नजर असू दे. या मंदिरातील माझी ही प्रार्थना ऐक. 30 परमेश्वरा, इस्राएलचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करु तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात असते हे आम्हाला माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.

31 “कोणाच्या हातून कुणाच्या विरुद्ध काही अपराध घडल्यास त्याला या वेदीपुढे आणण्यात येईल. तो दुखावलेला माणूस त्याच्यावर अन्याय करणाऱ्या माणसाविरुद्ध शापवाणी उच्चारील तो निरपराध असेल तर तो तशी गवाही देईल. आपण निर्दोष असल्याचे तो शपथपूर्वक सांगेल. 32 तेव्हा तू ते स्वर्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्याला त्याप्रमाणे शिक्षा कर. तो जर निरपराध असेल तर त्याच्या चांगुलपणाच्या प्रमाणात त्याला बक्षीस देऊन त्याचे समर्थन कर.

33 “कधी इस्राएलच्या लोकांच्या हातून पाप घडले तर शत्रू त्यांचा पराभव करील. अशा वेळी हे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन या मंदिरात प्रार्थना करतील, तुझी स्तोत्रे गातील. 34 तेव्हा स्वर्गातून ती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. जो देश त्यांच्या पूर्वजांना तू दिलास तो त्यांना परत दे.

35 “कधी त्यांच्या पापाचा दंड म्हणून तू त्यांच्या भूमीवर दुष्काळ पाडशील तेव्हा ते या ठिकाणाकडे येऊन तुझी प्रार्थना करतील व तुझ्या नावाची स्तुती करतील. ते त्यांच्या पापांपासून परावृत होतील. 36 तेव्हा स्वर्गातून त्यांची विनवणी ऐकून त्यांना क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव. आणि परमेश्वरा, तू त्यांना दिलेल्या भूमीवर पुन्हा पहिल्यासारखाच पाऊस पडू दे.

37 “कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही, किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड येऊन सगळे पीक फस्त करील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील. किंवा एखाद्या दुखःने लोक हैराण होतील. 38 असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली व मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना केली, 39 तरी त्याची प्रार्थना ऐक. आपल्या स्वर्गातील निवासस्थानातूनच ती ऐकून त्यांना क्षमा कर आणि मदत कर. लोकांच्या मनात काय आहे हे तूच फक्त जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर. 40 आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन राहावे म्हणून एवढे कर.

41-42 “तुझी थोरवी आणि सामर्थ्य इतर लोकांच्याही कानावर जाईल. मग ते दूरदूरच्या ठिकाणांहून या मंदिरात प्रार्थनेसाठी येतील. 43 तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांनाही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांना कळेल.

44 “कधी तू आपल्या लोकांना शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझी प्रार्थना करतील. 45 तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना मदत कर.

46 “लोकांच्या हातून काही पापही होईल. मी असं म्हणतो, कारण माणसाचा तो स्वभावच आहे. अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करुन दूरदेशी नेतील. 47 तिथे गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चात्ताप होईल आणि ते प्रार्थना करतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले’ अशी ते कबुली देतील.’ 48 ते कोठेतरी दूरच्या देशात असतील पण ते जर परराज्यात असताना अंतःकरणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना बहाल केलेल्या या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर 49 तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना ऐक. 50 त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या विरुध्द गेल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूंमध्ये त्यांच्या बद्दल दया उत्पन्न कर. 51 ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस तापलेल्या भट्टीतून बाहेर काढावे तसे त्यांना सोडवलेस हे लक्षात असू दे.

52 “परमेश्वर देवा, माझी आणि या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकरुन ऐक. त्यांनी केव्हाही याचना केली तरी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे. 53 पृथ्वीतलावरील सर्व माणसांमधून निवड करुन तू यांना आपले म्हटले आहेस. तू आम्हाला एवढे कबूल केले आहेस. मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.”

54 शलमोनाने देवापुढे ही प्रार्थना केली तेव्हा तो वेदीसमोर गुडघे टेकून बसला होता आणि त्याने हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले होते. प्रार्थना संपवून तो उभा राहिला. 55 मग त्याने इस्राएल लोकांना आशीर्वाद द्यावेत अशी मोठ्या आवाजात देवाला विनंती केली. शलमोन पुढे म्हणाला.

56 “परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांना विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्याने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत त्याने आपल्या फायद्याची अनेक वचने दिली होती. ती परमेश्वराने सर्वच्यासर्व खरी करुन दाखवली आहेत. 57 आपल्या पूर्वजांना त्याने साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हाला कधीही अंतर देऊ नये. 58 आम्ही त्याला अनुसरावे, त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे. 59 आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यात खंड पडू देऊ नये. 60 परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल. 61 तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे.”

62 मग राजासहित सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरा समोर यज्ञबली अर्पण केले. 63 शलमोनाने 22,000 गुरे आणि 1,20,000 मेंढरे मारली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वराला अर्पण केले.

64 मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्या दिवशी अर्पण केले. त्याने तेथे होम बली, धान्य आणि आधी शात्यार्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले.

65 शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्या-पिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला. 66 नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन, त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराचा सेवक दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.

प्रेषितांचीं कृत्यें 7:51-8:13

51 “तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात. 52 तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (ख्रिस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (ख्रिस्ताचा) विश्वासघात व खून केलात. 53 तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”

स्तेफनाचा वध होतो

54 यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले. 55 परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. 56 तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे!”

57 स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. 58 त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. 59 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!” 60 नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.

विश्वासणाऱ्यांवर संकट

स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरु झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा व शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले.

Trouble for the Believers

2-3 काही धार्मिक माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. शौलाने ख्रिेस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई. स्त्रिया व पुरुष यांना धरुन खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे. विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात, तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत.

शोमरोनात फिलिप्पाची सेवा

फिलिप्प [a] शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले. फिलिप्प ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले. यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.

शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. 10 अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत. “देवाची महान शक्ति असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे!” 11 त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांना चकीत केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत. 12 परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिप्पाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या. 13 स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्प बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.

स्तोत्रसंहिता 129

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

129 “मला आयुष्यभर खूप शत्रू होते.”
    इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
मला आयुष्यभर खूप शत्रू होते
    पण ते कधीही विजयी झाले नाहीत.
माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले.
    मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.
पण परमेश्वराने दोर कापले
    आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले.
जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला.
त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.
ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते.
    ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.
ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही.
    धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते.
त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत.
    लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.

नीतिसूत्रे 17:1

17 मुबलक अन्नाने भरलेल्या भांडणयुक्त घरापेक्षा कोरड्या भाकरीच्या तुकडा शांतीने खाणे बरे!

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center