Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 2:1-3:2

दावीद राजाचा मृत्यू

दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले, “आता मी जाणार. मरण सगळ्यांनाच अटळ आहे. तूही आता चांगला खंबीर, जबाबदार पुरुष झाला आहेस. आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील. तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे ‘जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्राएलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल.’”

दावीद पुढे म्हणाला, “सरुवेचा मुलगा यवाब याने काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे हे शांततेच्या काळात केले. त्याचा तलवार खोचायचा कमरबंद आणि पायातले सैनिकी जोडे यांवर त्यांचे रक्त शिंपडले आहे. त्याला मीच शासन करायला हवे होते. पण आता तू राजा आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा तू त्यांना धडा शिकवू शकतोस. तो मारला जाईल याची तू खात्री करुन घे. त्याला शांततेने म्हातारपणी मरण येता कामा नये.

“गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.

“गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही. पण आता त्याला तसा सोडू नकोस. तू सुज्ञ आहेस. काय करायचे ते तुला समजते. त्याला म्हातारपणी शांततेने मरु देऊ नकोस.”

10 मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले. 11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे त्याने इस्राएलवर राज्य केले.

शलमोन राज्यावर ताबा मिळवितो

12 आता शलमोन राजा होता. तो आपल्या वडीलांच्या दावीदाच्या सिंहासनावर बसला. त्याच्या राजेपणाविषयी आता कोणताही किंतु नव्हता.

13 यानंतर हग्गीथेचा मुलगा अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, “तू सद्हेतूने आला आहेस ना?”

अदोनीया म्हणाला, “हो, ही शांतता भेट आहे. 14 मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.”

बथशेबा म्हणाली, “मग बोल.”

15 अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे. 16 आता माझे एक मागणे आहे. कृपा करुन नाही म्हणू नकोस.”

बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.

17 अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”

18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”

19 मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.

20 बथशेबा त्याला म्हणाली, “मला एक छोटीशी गोष्ट तुझ्याजवळ मागायची आहे. कृपाकरुन नाही म्हणू नकोस.”

राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”

21 तेव्हा बथशेबा म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”

22 राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी अबीशगेचीच मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस? बोलून चालून तो माझा मोठा भाऊ आहे. याजक अब्याथार आणि यवाब त्याला पाठिंबा देतीलच.”

23 मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन म्हणाला, “अदोनीयाला मी याची अद्दल घडवीन. त्याला आता प्राणाला मुकावे लागेल. 24 इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझ्या वडीलांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”

25 राजा शलमोनाने मग बनायाला आज्ञा दिली आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.

26 मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्याघरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडीलांबरोबर मार्गक्रमण करताना परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू त्यांना साथ दिली आहेस” 27 परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता.

28 हे सर्व यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला पाठिंबा न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घटृ धरुन बसला. 29 कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने बनायाला यवाबाला मारण्यासाठी पाठवले.

30 बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.”

पण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले.

तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले. 31 तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय. 32 नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा या आपल्यापेक्षा चांगल्या अशा दोन माणसांना त्याने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता. माझे वडील दावीद यांना त्यावेळी या हत्येची कल्पना नव्हती. तेव्हा परमेश्वरच यवाबाला त्याच्या कृत्यांबद्दल शासन करत आहे. 33 त्यांच्या हत्येबद्दल यवाब अपराधी आहे. त्याच्या कुटुंबालाही हे ओझे कायमचे वागवावे लागेल. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”

34 तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले. 35 यवाबाच्या जागी मग शलमोनाने बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथारच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकची केली. 36 मग त्याने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेममध्ये स्वतःसाठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको. 37 हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. तो तुझा अपराध असेल.”

38 तेव्हा शिमी म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमच्या आज्ञेत आहे.” शिमी मग यरुशलेममध्येच बराच काळ राहिला. 39 पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. गथचा राजा आणि माकाचा मुलगा आखीश याच्याकडे ते गेले. आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कळले. 40 तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.

41 शिमी यरुशलेमहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले. 42 तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, “यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस. 43 मग तू आज्ञाभंग का केलास? तू वचन का मोडलेस? 44 माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील. 45 पण मला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दावीदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”

46 मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.

राजा शलमोन सूज्ञता मागतो

मिसरचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करुन शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरुशलेमभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते. मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात.

प्रेषितांचीं कृत्यें 5

हनन्या आणि सप्पीरा

हनन्या नावाचा एक मनुष्य होता त्याच्या पत्नीचे नाव सप्पीरा होते. हनन्याने त्याच्याकडे जी काही जमीन होती ती विकली. परंतु विकून आलेल्या पैशातून त्याने थोडेच पैसे प्रेषितांच्या हातात दिले, त्याने त्यातील काही पैसे गुपचूप काढून स्वतःसाठी ठेवले होते. त्याच्या पत्नीला हे माहीत होते. तिने या गोष्टीला संमति दिली होती.

पेत्र म्हणाला, “हनन्या, तू तुइया अंतःकरणावर सैतानाला का अधिकार चालूव देतोस? तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसाविण्याचा प्रयत्न केलास. तू जमीन विकलीस, पण त्यातील काही पैसे स्वतःसाठी का ठेवलेस? ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती. आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्यांशी नाही, तर देवाशी खोटे बोललास!”

5-6 जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला. काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले, तो अति भयभीत झाला.

सुमारे तीन तासांनंतर त्याची पत्नी आत आली, सप्पीरा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत जे झाले ते काहीच माहीत नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, तुमच्या शेतासाठी तुम्हांला किती पैसे मिळाले, (अमुक) इतक्याच पैशांना मिळाले काय?”

सप्पीरास उत्तर दिले, “होय, आम्हाला शेत विकून तेवढेच पैसे मिळाले.”

पेत्र म्हणाला, “देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्यानवऱ्याने का ठरविले? ऐक! त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसांनी तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळच आहेत! (तुझ्या नवऱ्याला जसे नेले) तसेच ते तुलाही नेतील.” 10 त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की, ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले. 11 सर्व विश्वासणारे आणि इतर दुसरे लोक ज्यांनी याविषयी ऐकले ते अतिशय भयभीत झाले.

देवाचे पुरावे

12 प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत. 13 आणि इतर लोकांतील कोणी त्यांच्याजवळ उभे राहण्याचे धैर्य करीत नसत. परंतु सर्व प्रेषितांची स्तुति करीत; 14 आणि किती तरी लोक पुढे येऊन प्रभु येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या. 15 त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत. 16 लोक यरुशलेम सभोवतालच्या गावांगावातून येऊ लागले, आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले. तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली.

यहूदी प्रेषितांना मना करण्याचा प्रयत्न करतात

17 प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र (सदूकी नावाचा एक गट) यांना फार हेवा वाट लागला. 18 त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले. 19 पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला, 20 “जा आणि मंदिरात उभे राहा. येशू ख्रिस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.” 21 जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले, त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती, आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले, प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले.

त्यांनी यहूदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन, जे यहूदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले. 22 जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले, तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहूदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले. 23 शिपाई म्हणाले, “तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यांसा कुलुप लावलेले होते. तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत. परंतु आम्ही जेव्हा दार उघडले, तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही!” 24 मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले, व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले.

25 नंतर कोणी एक आला आणि म्हणाला, “ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत!” 26 तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील.

27 त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले. 28 तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”

29 पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्हांला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही! 30 तुम्ही येशूला मारले. तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळले. परंतु त्याच देवाने, जो आमच्या वाडवडिलांचा (पूर्वजांचा) देव होता, त्याने येशूला मरणातून उठविले! 31 देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसाविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की, यहूदी लोकांनी त्यांची ह्रदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या. 32 पवित्र आत्मासुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.”

33 जेव्हा यहूदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले, तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जिवे मारण्यासंबधी विचार सुरु केला. 34 सभेमध्ये गमलीएल नावाचा एक परुशी उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता. आणि सर्व लोक त्याला मान देत असत, त्याने लोकांना सांगितले की, काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा. 35 नंतर तो त्यांना म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनो, या लोकांना जे काही करण्याचा विचार तुम्ही करीत आहात त्याबद्दल सावधगिरी बाळगा. 36 काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे चारशे जण त्याला जाऊन मिळाले, पण त्याला ठार मारण्यात आले त्याचवेळी त्याचे अनुयायीही पांगले, ते काहीच करु शकले नाहीत. 37 नंतर, गालीलातून यहूदा नावाचा माणूस आला. ती वेळ जनगणनेची होती. त्यानेही काही अनुयायांचे नेतृत्व केले. त्यालासुद्धा मारण्यात आले. व त्याचे सर्व अनुयायी पांगले व पळून गेले. 38 म्हणून आता मी तुम्हांला सांगतो: या लोकांपासून दूर राहा. त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील. 39 पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल!”

यहूदी लोकांनी गमलीएलचा सल्ला मानला. 40 त्यांनी पेषितांना पुन्हा बोलाविले, त्यांना फटके मारले. आणि येशूच्या नावाने पुन्हा त्यांनी काही बोलू नये असा आदेश दिला. आणि त्यांनी प्रेषितांना सोडून दिले. 41 प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदानालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो यामुळे ते आंनदी झाले. 42 आणि नंतर प्रेषितांनी लोकांना शिकविण्याचे सोडले नाही. प्रेषित लोकांना सातत्याने शुभवार्ता सांगत राहिले. येशू हा प्रभु आहे, हे ते दररोज मंदिरात व लोकांच्या घरांमध्ये सांगत असत.

स्तोत्रसंहिता 125

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

125 जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत.
    ते कधीही थरथरणार नाहीत.
    ते सदैव असतील.
यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे.
    तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील.
दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत.
    जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.

परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा.
    ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा.
दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात.
    परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील.

इस्राएलमध्ये शांती नांदू दे.

नीतिसूत्रे 16:25

25 एखादा मार्ग लोकांना योग्य वाटतो. पण तो मार्ग मृत्यूकडे नेतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center