Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 18:1-19:10

दावीदाची युध्दाची तयारी

18 दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग, शंभर-शंभर, हजार हजार माणसांवर अधिकारी, सरदार नेमले. सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय (यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा) आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली.

तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, “मी ही तुमच्याबरोबर येतो.”

पण लोक म्हणाले, “नाही, तुम्ही आमच्याबरोबर येता कामा नये. कारण आम्ही युध्दातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तरी अबशालोमच्या लोकांना त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा दहाहजारांच्या ठिकाणी आहात. तेव्हा तुम्ही शहरात राहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला यालच.”

तेव्हा राजा लोकांना म्हणाला, “मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन.”

राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले.

यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली, “माझ्या साठी एक करा. अबशालोमशी सौम्यपणाने वागा.” राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.

दावीदाच्या सैन्याकडून अबशालोमच्या सैन्याचा पराभव

अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमच्या अरण्यात ते लढले. दावीदाच्या सैन्याने इस्राएलाचा पराभव केला. त्यांची वीस हजार माणसे त्यादिवशी मारली गेली. देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मेली.

अबशालोमचा दावीदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला तेव्हा अबशालोम बसून निसटायचा प्रयत्न करु लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यामध्ये अबशालोमचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला.

10 एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, “अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले.”

11 यवाब त्या माणसाला म्हणाला, “मग तू त्याचा वध करुन त्याला जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुदा आणि एक पट्टा इनाम दिला असता.”

12 तो माणूस म्हणाला, “तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, ‘लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.’ 13 अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते. आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.”

14 यवाब म्हणाला, “इथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही.”

अबशालोम अजून जिवंत असून एलावृक्षात अजून तसाच लटकत होता. यवाबाने तीन भाले घेतले आणि ते अबशालोमवर फेकले. भाले अबशालोमच्या हृदयातून आरपार गेले. 15 यवाबाजवळ दहा तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला.

16 यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांना अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले. 17 यवाबाच्या माणसांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. वर दगडांची रास रचून तो खंदक भरुन टाकला.

अबशालोमबरोबर आलेल्या इस्राएलानी पळ काढला आणि ते घरी परतले.

18 अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला मुलगा नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वतःचेच नाव दिले होते. आजही तो “अबशालोम स्मृतिस्तंभ” म्हणून ओळखला जातो.

यवाब दावीदाकडे हे वृत्त पाठवतो

19 सादोकचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला, “मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्याला सांगतो.”

20 यवाब त्याला म्हणाला, “आज तुला दावीदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग पण आज नको. कारण खुद्द राजाचा मुलगा मरण पावला आहे.”

21 मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, “तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग.”

त्या माणसाने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.

22 सादोकचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली “काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे.”

यवाब म्हणाला, “मुला. तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.”

23 अहीमास म्हणाला, “त्याची मला पर्वा नाही मला जाऊ द्या.”

तेव्हा यवाबाने त्याला परवानगी दिली.

अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.

दावीद बातमी ऐकतो

24 राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला एक माणूस धावत येताना दिसला. 25 पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले.

राजा दावीद म्हणाला, “तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे.”

धावता धावता तो माणूस शहराच्या जवळ येऊन पोचतोय तोच 26 पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, “तो पाहा, आणखी एक माणूस एकटाच धावत येतोय.”

तेव्हा राजा म्हणाला, “तो ही बातमी आणतोय.”

27 पहारेकरी म्हणाला, “पहिल्याचे धावणे मला सादोकचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते.”

राजा म्हणाला, “अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार”

28 अहीमासने “सर्व कुशाल असो” असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, “देव परमेश्वराला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”

29 राजाने विचारले, “अबशालोमचे कुशल आहे ना?”

अहीमास म्हणाला, “यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही.”

30 राजाने मग त्याला बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.

31 मग तो कूशी आला तो म्हणाला, “माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांना परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.”

32 राजाने त्याला विचारले, “अबशालोम ठीक आहे ना?”

त्यावर कूशीने सांगितले, “तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणसा सारखीच (अबशालोमसारखी) गत होवो.”

33 (यावरुन अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले) तो फार शोकाकुल झाला. वेशीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्याला रडू कोसळले. आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, “अबशालोम, माझ्या मुला, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते रे पोरा!”

यवाब दावीदाला खडसावतो

19 लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्याला म्हणाले, “राजा अबशालोमसाठी शोक करत आहे. तो फार दु:खात आहे.” दावीदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती. पण लोकांसाठी मात्र तो दु:खाचा दिवस ठरला. राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दु:खात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले.

ते शांतपणे नगरात परतले. युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते. राजा आपला चेहरा झाकून घेऊन आपला मुलगा अबशालोम याच्या नावाने “अरे माझ्या मुला अबशालोम” असा मोठ्याने आक्रोश करत होता.

यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्याला म्हणाला, “आपल्या सेवकांना तू आज मान खाली घालायला लावली आहेस. तुझ्या सेवकांनी तुझा जीव वाचवला. तुझी मुले, मुली, बायका दासी यांचे प्राण वाचवले. ज्यांनी तुझा द्वेष केला त्यांच्यावर तू प्रेम दाखवतो आहेस आणि ज्यांनी तुझ्यावर लोभ केला त्यांना तू दूर सारतो आहेस. तुझी माणसे, तुझे सेवक यांना तुझ्या दृष्टीने काही किंमत नाही हे तुझ्या वागण्यावरुन स्पष्ट झाले आहे. आज अबशालोम जगला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर तुला फार आनंद झाला असता असे दिसते. आता ऊठ आणि आपल्या सेवकांशी बोल. त्यांना प्रोत्साहन दे. आत्ताच उठून तू हे ताबडतोब केले नाहीस तर आज रात्रीपर्यंत तुझ्या बाजूला एकही माणूस उरणार नाही याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो आणि हा तुझ्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वात मोठा आघात असेल.”

तेव्हा राजा उठून वेशीपाशी गेला. राजा तेथे आल्याची खबर सर्वत्र पसरली. तेव्हा सर्व जण राजाच्या दर्शनाला जमले.

दावीद पुन्हा राजा होतो

अबशालोमला पाठिंबा देणारे सर्व इस्राएल लोक आपापल्या ठिकाणी पळून गेले होते. इस्राएलच्या सर्व घराण्यातील लोक आता बोलू लागले “पलिष्टी आणि आपले इतर शत्रू यांच्यापासून राजा दावीदाने आपल्याला संरक्षण दिले. पण तो अबशालोमपासून पळून गेला. 10 म्हणून अबशालोमची आपण राज्य करण्यासाठी निवड केली. पण तो आता लढाईत मरण पावला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा दावीदाला राजा करु.”

योहान 20

काही अनुयायांना येशूची कबर रिकामी दिसते(A)

20 मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले. म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभुला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहीत नाही.”

मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले. तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला. आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.

मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला. तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला. शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्धा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते.

येशू मरीया मग्दालियाला दिसतो(B)

10 मग शिष्य त्यांच्या घरी गेले. 11 पण मरीया थडग्यासमोर रडत उभी राहिली, ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली 12 आणि तिने दोन देवदूतांना पांढऱ्या पोशाखात जेथे येशूचे शरीर होते तेथे बसलेले पाहिले. एकजण डोके होते, तेथे बसला होता व एकजण पायाजवळ बसला होता.

13 त्यांनी तिला विचारले, “बाई तू का रडत आहेस?”

ती म्हणाली, “ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत आणि मला माहीत नाही, त्यांनी त्याला कोठे ठेवले आहे.” 14 यावेळी ती पाठमोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले. पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे.

15 तो म्हणाला, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाला शोधत आहेस?”

तिला वाटले तो माळी आहे, ती म्हणाली, “दादा, जर तू त्याला कोठे नेले असशील, तर मला सांग तू त्याला कोठे ठेवले आहेस, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”

16 येशू तिला म्हणाला, “मरीये.”

ती त्याच्याडे वळाली आणि अरेमी भाषेत मोठ्याने ओरडली, “रब्बुनी!” (याचा अर्थ गुरुजी)

17 येशू तिला म्हणाला, “माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही, तर माझ्या भावांकडे जा आणि त्यांना सांग: मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे व माझ्या देवाकडे व तुमच्या देवाकडे जात आहे.”

18 मरीया मग्दालिया ही बातमी घेऊन शिष्यांकडे गेली. “मी प्रभुला पाहिले आहे!” आणि तिने त्यांना सांगितले की, त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत.

येशू त्याच्या शिष्यांना दिसतो(C)

19 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.” 20 असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.

21 पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.” 22 आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23 जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पापक्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”

येशू थोमाला दिसतो

24 आता थोमा (याला दिदुम म्हणत) बारा शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. 25 तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.”

26 एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.” 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.”

28 थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”

29 मग येशू त्याला म्हणाला, “तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.”

योहानाने हे पुस्तक का लिहिले?

30 आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अदभुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत. 31 पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.

स्तोत्रसंहिता 119:153-176

रेश

153 परमेश्वरा, माझे दु:ख बघ आणि माझी सुटका कर.
    मी तुझी शिकवण विसरलो नाही.
154 परमेश्वरा, माझ्यासाठी माझी लढाई लढ.
    तू वचन दिल्याप्रमाणे मला जगू दे.
155 दुष्ट लोक जिंकणार नाहीत कारण
    ते तुझे नियम पाळत नाहीत.
156 परमेश्वरा, तू खूप दयाळू आहेस.
    तू ज्या गोष्टी योग्य आहेत असे सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
157 मला दु:ख देण्याचा प्रयत्न करणारे अनेक शत्रू मला आहेत
    पण मी तुझ्या कराराप्रमाणे वागणे सोडले नाही.
158 मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा,
    ते तुझा शब्द पाळत नाहीत आणि मी त्यांचा तिरस्कार करतो.
159 बघ, मी तुझ्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
    परमेश्वरा, तुझ्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे.
160 परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते
    आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील.

शीन

161 शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला.
    पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो.
162 परमेश्वरा, तुझा शब्द मला आनंदी करतो,
    नुकताच एखादा खजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो.
163 मला खोटे आवडत नाही.
    मला त्याचा वीट आहे पण परमेश्वरा, मला तुझी शिकवण आवडते.
164 मी दिवसातून सात वेळा तुझ्या चांगल्या
    नियमांसाठी मी तुझी स्तुती करतो.
165 जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल.
    कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही.
166 परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास म्हणून मी वाट बघत आहे.
    मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत.
167 मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा,
    मला तुझे नियम खूप आवडतात.
168 मी तुझा करार आणि तुझ्या आज्ञा पाळल्या.
    परमेश्वरा, मी जे काही केले ते सर्व तुला माहीत आहे.

ताव

169 परमेश्वरा, माझे आनंदी गाणे ऐक.
    तू कबूल केल्याप्रमाणे मला शहाणा कर.
170 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
    वचन दिल्याप्रमाणे माझा उध्दार कर.
171 तू मला तुझे नियम शिकवलेस म्हणून
    मी एकदम गुणगान गायला सुरुवात केली.
172 तुझ्या शब्दाला उत्तर देण्यासाठी मला मदत कर आणि मला माझे गाणे म्हणून दे.
    परमेश्वरा, तुझे नियम चांगले आहेत.
173 परमेश्वरा, मला मदत करण्यासाठी माझ्यापर्यंत
    पोहोच कारण मी तुझ्या आज्ञांप्रमाणे वागणे पसंत केले.
174 परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास असे मला वाटते.
    पण तुझी शिकवण मला आनंद देते.
175 परमेश्वरा, मला जगू दे
    आणि तुझे गुणगात करु दे. तुझ्या निर्णयाला मला मदत करु दे.
176 मी हरवलेल्या मेंढीप्रमाणे रस्ता चुकलो.
    परमेश्वरा, मला शोधायला ये.
मी तुझा सेवक आहे
    आणि मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.

नीतिसूत्रे 16:14-15

14 जेव्हा राजा रागावतो तेव्हा तो कुणालाही ठार मारु शकतो. आणि शहाणा माणूस राजाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो.

15 राजा जेव्हा आनंदी असतो तेव्हा जीवन सगळ्यांसाठी चांगले असते. राजा जर तुमच्यावर खुष असला तर ते वसंतात ढगातून पडणाऱ्या पावसासारखे असते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center