Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 15:23-16

23 सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला. मग सर्व जण वाळवंटाकडे निघाले. 24 सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा करारकोश घेऊन निघाले होते. त्यांनी देवाचा पवित्रकोश खाली ठेवला. यरुशलेममधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून प्रार्थना म्हणत होता. [a]

25 राजा दावीद सादोकला म्हणाला, “हा देवाचा पवित्र कोश यरुशलेमला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरुशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल. 26 पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल.”

27 पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, “तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा. तुझा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा. 28 हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.”

29 तेव्हा देवाचा पवित्र करारकोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरुशलेमला परतले आणि तिथेच राहिले.

दावीदाचे अहिथोफेल विरुद्ध गाऱ्हाणे

30 दावीद शोक करत जैतूनच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला. त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले. तेही रडत होते.

31 एकाने दावीदाला सांगितले, “अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे.” तेव्हा दावीदाने देवाची करुणा भाकली. तो म्हणाला, “परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.” 32 दावीद डोंगरमाथ्यावर पोहोंचला. येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे त्या वेळी हूशय अर्की त्याला भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता, त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.

33 दावीद हूशयला म्हणाला, “तू माझ्याबरोबर आलास तर एवढे लोक आहेत त्यात आणखी तुझा भार. 34 पण तू यरुशलेमला परतलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिलवू शकशील. अबशालोमला सांग, ‘महाराज, मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो. पण आता तुमची सेवा करीन.’ 35 सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा. 36 सादोकचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा.”

37 तेव्हा दावीदाचा मित्र हुशय नगरात परतला. अबशालोम ही यरुशलेममध्ये आला.

सीबा दावीदाला भेटतो

16 जैतूनच्या डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती. दोनशे पाव, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते. राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी?” म्हणून सीबाला विचारले

सीबा म्हणाला, “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत. पाव आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षारस आहे.”

राजाने त्याला मफिबोशेथाचा ठावाठिकाणा विचारला.

सीबाने सांगितले, “मफिबोशेथ यरुशलेममध्येच आहे. कारण ‘आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील’ असे त्याला वाटते.”

तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “ठीक आहे, जे जे मफिबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे.”

सीबा म्हणाला, “मी आपल्या पाया पडतो. मी तुम्हाला आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.”

शिमी दावीदाला शाप देतो

पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी. तो दावीदाला पुन्हा पुन्हा शिव्याशाप देत चालला होता.

त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला. शिमी दाविदला शाप देतच होता, “चालता हो, तोंड काळं कर इथून. तू खूनी आहेस! देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांना तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस.”

सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्यासारख्या नगण्य माणसाने तुम्हाला शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करु द्या.”

10 पण राजा त्याला म्हणाला, “सरुवेच्या मुलानो, मी काय करु? शिमी मला शाप देत आहे. पण परमेश्वरानेच त्याला तसे करायला सांगितले आहे.” 11 अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, “माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे. बन्यामीनच्या वंशातील या शिमीला तर मला मारायचा हक्कच आहे. त्याला हवे ते म्हणू द्या. देवानेच त्याला तशी बुध्दी दिली आहे. 12 माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील.”

13 दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता.

14 राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. म्हणून त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले.

15 अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरुशलेम येथे आले. 16 दावीदाचा मित्र हूशय अर्की अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, “राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो.”

17 अबशालोम त्याला म्हणाला, “तू आपल्या मित्राची, दावीदाची साथ का सोडलीस? तुही त्याच्याबरोबर यरुशलेम का सोडले नाहीस?”

18 हूशय म्हणाला, “परमेश्वर ज्याची निवड करेल त्याला माझा पाठिंबा आहे. या आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे. 19 पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो. आता त्यांच्या मुलाची सेवा केली पाहिजे. मी तुमची सेवा करीन.”

अबशालोम अहीथोफेलचा सल्ला मागतो

20 अबशालोमने अहिथोफेलला विचारले “आम्ही काय करावे ते सांग.”

21 अहिथोफेल त्याला म्हणाला, “घराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या दासी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटतो ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठींबा मिळेल.”

22 मग सर्वांनी घराच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या दासींशी लैंगिक संबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली. 23 अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांना त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटले.

योहान 18:25-19:22

पेत्र पुन्हा खोटे बोलतो(A)

25 शिमोन पेत्र शेकत असता, त्याला विचारले गेले, “तू त्याच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?”

त्याने ते नाकारले, “मी नाही.”

26 मुख्य याजकाच्या नोकरांपैकी एकजण ज्याचा कान पेत्राने कापला होता त्याचा नातेवाईक होता. तो म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोब बागेत पाहिले नाही काय?”

27 पेत्राने पुन्हा ते नाकारले, आणि त्या क्षणी कोंबडा आरवला.

येशूला पिलातासमोर आणतात(B)

28 नंतर यहूदी येशूला कयफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले. तेव्हा पहाट झाली होती. आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाहीत. 29 म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या माणसावर कोणता आरोप करीत आहात?”

30 तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, “हा जर दुष्कर्मी नसता तर आम्ही याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”

31 मग पिलाताने त्यांना म्हटले, “तुम्ही याला घेऊन आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.”

यहूदी म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” 32 आपल्याला कसले मरण येणार हे सुचवून येशू जे वचन बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

33 मग पिलात पुन्हा राजवाड्यात गेला. येशूला बोलावले आणि विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

34 येशूने विचारले, “तू हे स्वतःहून विचारतोस की, दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले.”

35 पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले, तू काय केले आहेस?”

36 येशू म्हणाला, “माझे राज्य या जगाचे नाही, जर ते असते तर यहूद्यांपासून माझी सुटका करण्यासाठी माझे सेवक लढले नसते का? पण माझे राज्य दुसऱ्या ठिकाणचे आहे.”

37 पिलात म्हणाला, “तर तू एक राजा आहेस!”

येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे तू म्हणतोस तेव्हा बरोबर म्हणतोस. खरे पाहता, या कारणासाठी मी जन्मलो आणि सत्याविषयी साक्ष देण्यासाठी मी या जगात आलो. जे सर्व सत्याच्या बाजूचे आहेत ते माझे ऐकतात.”

38 पिलताने विचारले, “सत्य काय आहे?” असे म्हणून तो पुन्हा यहूद्यांकडे गेला. आणि म्हणाला, “मला याच्यात काहीच अपराध सापडत नाही. 39 पण वल्हांडण सणात मी तुम्हांसाठी एकाला सोडावे अशी तुमच्यामध्ये रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”

40 ते ओरडले, “नको, त्याला नको! आम्हांला बरब्बाला सोडा!” बरब्बा एक दरोडेखोर होता.

19 मग पिलाताने येशूला नेऊन फटके मारण्याची आज्ञा दिली. आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला, व त्याला जांभळे वस्त्र घातले. ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले.

पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहूद्यांना म्हणाला, “पाहा! मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे, तुम्हांला हे समजावे म्हणून की, मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही.” जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला, तेव्हा पिलात त्यांना म्हणाला, “हा पहा तो मनुष्य!”

मुख्य याजक व त्यांचे रक्षक त्याला पाहताक्षणीच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!”

पण पिलाताने उत्तर दिले, “तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवण्यास कोणतेही कारण मला दिसत नाही.”

यहूद्यांनी जोर देऊन म्हटले, “आम्हांला नियमशास्त्र आहे, आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने मेलेच पाहिजे. कारण त्याने स्वतःदेवाचा पुत्र असल्याचा दावा केला.”

जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा तो अधिकच घाबरला. आणि तो आत राजवाड्यात परत गेला. येशूला त्याने विचारले, “तू कोठून आला आहेस?” पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. 10 पिलात म्हणाला, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला वधस्तंभावर खिळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे, हे तुला समजत नाही का?”

11 येशूने उत्तर दिले, “जर वरून अधिकार देण्यात आला नसता, तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे.”

12 तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, पण यहूदी मोठमोठयाने ओरडत राहिले, “जर तुम्ही या माणसाला जाऊ दिले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतः राजा असल्याचा दावा करतो, तो कैसराला विरोध करतो.”

13 जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने येशूला बाहेर आणले आणि “फरसबंदी नावाची जागा,” (जिला इब्री भोषेत गब्बाथा) म्हणतात तेथे तो न्यायासनावर बसला. 14 तो तर वल्हांडणाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची वेळ झाली होती.पिलात त्या यहूद्यांना म्हणाला, “पहा हा तुमचा राजा.”

15 यहूदी ओरडले, “त्याला घेऊन जा! त्याला घेऊन जा! आणि वधस्तंभावर खिळून मारा!”

पिलाताने त्यांना विचारले, “मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय?”

मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हांला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही.”

16 मग त्याने त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी त्यांच्या हाती दिले.

येशूला वधस्तंभावर खिळून मारतात(C)

मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला. 17 येशूने स्वतःचा वधस्तंभ वाहिला. तो बाहेर कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी गेला. (इब्री भाषेत त्याला गुलगुथा म्हणतात.) 18 गुलगुथा येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले. त्यांनी आणखी दोन मनुष्यांनासुद्वा वधस्तंभावर खिळले. त्या दोघांना त्यांनी येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले.

19 आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, “ येशू नासरेथकर-यहूद्यांचा राजा.” 20 ती पाटी यहूदी भाषेत लिहिली होती. पुष्कळ यहूदी लोकांनी ती पाटी वाचली, कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते. तसेच ते लॅटीन, ग्रीक, आरामी भाषेतही होते.

21 यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, “‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे, ‘असा दावा करतो, असे लिहा.’”

22 पिलाताने म्हटले, “मी जे लिहिले ते लिहिले.”

स्तोत्रसंहिता 119:113-128

सामेख

113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत
    त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 मला लपव आणि माझे रक्षण कर.
    परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस
    आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन.
    माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
117 परमेश्वरा, मला मदत कर म्हणजे माझा उध्दार होईल.
    मी नेहमीच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन.
118 परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला तू परत पाठव.
    का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्या सांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
119 परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे.
    म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.
120 परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते,
    मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.

ऐन

121 जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा,
    ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
122 माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे.
    परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
    त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
123 परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि
    तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
124 मी तुझा सेवक आहे.
    मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे,
    मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.
126 परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे.
    लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
127 परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला
    तुझ्या आज्ञा आवडतात.
128 मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. [a]
    मला खोटी शिकवण आवडत नाही.

नीतिसूत्रे 16:10-11

10 राजा बोलतो तेव्हा त्याचे शब्द म्हणजे कायदा असतो. त्याचे निर्णय नेहमी योग्य असायला हवेत

11 परमेश्वराला सर्व काटे आणि तराजू योग्य असायला हवे असतात. त्याला सर्व व्यापारातील करार न्यायी असायला हवे असतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center