Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 14:1-15:22

यवाब दावीदाकडे एका चतुर बाईला पाठवतो

14 अबशालोमच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुवेचा मुलगा यवाब याला कळले. तेव्हा तकोवा येथे निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर बाईला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, “तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्याला शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या बाईसारखी तू दिसली पाहिजेस. राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल.” यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले.

मग तकोवा येथील बाई राजाशी बोलली. तिने स्वतःला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, “कृपाकरून मला मदत करा.”

राजाने तिची विचारपूस करुन तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, “मी एक विधवा बाई मला दोन मुलगे होते. एकदा शेतात त्यांचे भांडण जुंपले, त्यांना थोपवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला. आता सगळे घर माझ्याविरुद्ध आहे. सगळे मला म्हणतात, ‘आपल्या भावाचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला आमच्या स्वाधीन कर. त्याला आम्ही मारून टाकतो. कारण त्याने आपल्या भावाला मारले.’ माझा मुलगा हा आगीतल्या शेवटच्या ठिणगी सारखा आहे. त्यांनी माझ्या मुलाचा जीव घेतला तर ती आग नष्ट होईल. आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा तो एकुलता एक वारस आहे. तोही गेला तर माझ्या मृत पतीची मालमत्ता दुसरा कोणी हडप करील आणि या भूमीवर नावनिशाणीही राहणार नाही.”

हे ऐकून राजा तिला म्हणाला, “मी यात लक्ष घालतो. तू घरी जा.”

तेव्हा ती बाई राजाला म्हणाली, “माझे स्वामी या सगळ्याला मी जबाबदार आहे, मी दोषी आहे, तुम्ही आणि तुमचे आसन निर्दोष आहेत.”

10 राजा दावीद म्हणाला, “तुझ्याविरुद्ध कोणी काही बोलले तर त्याला माझ्याकडे आण तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही.”

11 ती तकोवा येथील बाई पुन्हा राजाला म्हणाली, “परमेश्वरा देवाच्या नावाची शपथ वाहून सांगा की या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्याला धक्का पोहचणार नाही याचे मला आश्वासन द्या.”

दावीद म्हणाला, “परमेश्वर असे पर्यंत कोणीही तुझ्या मुलाला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोचणार नाही.”

12 मग ती म्हणाली, “माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे परवानगी असावी.”

राजा म्हणाला, “बोल”

13 त्यावर ती म्हणाली, “तुम्ही देवाच्या लोकांच्या विरुद्ध योजना का केली आहे? होय, तुम्ही असे म्हणालात तेव्हा तुम्ही स्वतः दोषी ठरता. कारण तुम्ही आपल्या घराबाहेर घालवलेल्या मुलाला पुन्हा परत आणलेले नाही. 14 आपण सर्वच कधीना कधी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्याला आपल्यापासून पळायला लावत नाही. 15 स्वामी, हेच सांगायला मी येथपर्यंत आले. लोकांमुळे मी भयभीत झाले होते. मी मनाशी म्हणाले, ‘राजाशी मी बोलेन. कदाचित् तोच मला मदत करील. 16 तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या माणसापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जे दिले त्यापासून हा माणूस आम्हाला वंचित करू पाहात आहे.’ 17 स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते. कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरेवाईट तुम्ही जाणता. आणि देव परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.”

18 राजा दावीद त्या बाईला म्हणाला, “आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस.”

ती म्हणाली, “माझेस्वामी, विचारा.”

19 राजा म्हणाला, “तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले का?”

ती म्हणाली, “होय महाराज तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले. 20 अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहाळता याव्यात म्हणूनच, स्वरुप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. तुम्ही देवदूता सारखेच चाणाक्ष आहात. तुम्हाला या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात.”

अबशालोम यरुशलेमला परततो

21 राजा यवाबाला म्हणाला, “माझे वचन मी खरे करीन, आता अबशालोमला परत आणा.”

22 यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले. राजाचे अभीष्ट चिंतून तो म्हणाला, “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरून मी ताडले.”

23 मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमला यरुशलेमला घेऊन आला. 24 पण राजा दावीद म्हणाला, “अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे. त्याला मला भेटता मात्र येणार नाही.” तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला.

25 अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरुन प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याचा देह नखशिखान्त निर्दोष, नितळ होता. 26 दरवर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत असे. ते पाच पौंड भरत. 27 त्याला तीन मुलगे आणि एक मुलगी होती. या मुलीचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती.

अबशालोम यवाबाला भेटायला बोलावण्याची सक्ती करतो

28 यरुशलेम मध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत राजा दावीदाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही. 29 तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले. आपली राजाशी भेट घडवून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने त्याला पुन्हा बोलावणे पाठवले तरीही तो येईना.

30 तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, “माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे. त्यात जवाचे पीक आले आहे ते पेटवून द्या”

अबशालोमच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली. 31 तेव्हा यवाब उठून अबशालोमकडे आला आणि त्याला म्हणाला “तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली?”

32 अबशालोम यवाबाला म्हणाला, “मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्याला विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी इथे येण्यात काय मतलब? तेव्हा मला त्याला भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला खुशाल मारून टाकावे.”

अबशालोमची राजा दावीदाशी भेट

33 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले. राजाने अबशालोमला बोलावले. अबशालोम आला. त्याने राजाला वाकून अभिवादन केले. राजाने त्याचे चुंबन घेतले.

अबशालोमची अनेकांशी मैत्री

15 यानंतर अबशालोमने स्वतःसाठी रथ आणि घोड्यांची तजवीज केली. तो रथातून जात असताना पन्नास जणांचा ताफा त्याच्यापुढे धावत असे. रोज लौकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोले. चौकशी करुन तो विचारी, “तू कोणत्या शहरातून आलास?” तो सांगत असे. “मी इस्राएलच्या अमुक अमुक वंशातला” तेव्हा अबशालोम म्हणे, “तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही.”

अबशालोम पुढे म्हणे, “मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल. तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करु शकेन. यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन.”

अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्याला आभिवादन करु लागला तर अबशालोम त्या माणसाला मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करुन तो त्याला स्पर्श करी. त्याचे चुंबन घेई. राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना तो असेच वागवी. असे वागून त्याने सर्व इस्राएलांची मने जिंकली.

दावीदाचे राज्य हस्तगत करण्याची अबशालोमची योजना

पुढे चार वर्षानी [a] अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, “हेब्रोनमध्ये मी परमेश्वराला नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ दे. अराममधील गशूर येथे राहात असताना मी तो बोललो होतो. परमेश्वराने मला पुन्हा यरुशलेमला नेले तर मी परमेश्वराच्या विशिष्ट सेवेला वाहून घेईन असे मी बोललो होतो”

तेव्हा राजा दावीदाने त्याला निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले.

अबशालोम हेब्रोन येथे आला. 10 पण त्याने इस्राएलच्या सर्व वंशामध्ये हेर पाठवून लोकांना कळवले, “रणशिंग फुंकल्याचे ऐकल्यावर ‘अबशालोम हेब्रोनचा राजा झाला आहे’ असा तुम्ही घोष करा.”

11 अबशालोमने स्वतःबरोबर दोनशे माणसे घेतली. यरुशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती. 12 अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्याला अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.

अबशालोमच्या बेताचा राजाला सुगावा लागतो

13 एकाने दावीदाकडे येऊन वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे.

14 तेव्हा यरुशलेममध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, “आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरुशलेमच्या लोकांना तो मारून टाकेल.”

15 तेव्हा राजाचे सेवक त्याला म्हणाले, “तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत.”

दावीद आपल्या लोकांसह निसटतो

16 आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्न्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले. 17 राजा आणि त्याच्यामागोमाग सर्व लोक निघून गेले. अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले 18 त्याचे सर्व सेवक तसेच एकूणएक करथी, पलेथी आणि (सहाशे गित्ती) राजामागोमाग चालत गेले.

19 गथ येथील इत्तयला राजा म्हणाला, “तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे. तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे. 20 तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार. तू कशाला भटकंत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर. तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.”

21 पण इत्तय राजाला म्हणाला, “परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आता जगणे, मरणे तुमच्याबरोबरच.”

22 दावीद इत्तयला म्हणाला, “मग चल तर किद्रोन ओहोळा पलीकडे आपण जाऊ.”

तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला-माणसांसह किद्रोन ओहोळा पलीकडे गेला.

योहान 18:1-24

येशूला अटक(A)

18 या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती, त्या बागेत तो व त्याचे शिष्य गेले.

आणि त्याला धरून शत्रूच्या हाती देणार यहूदा यालाही ही जागा ठाऊक होती. कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर नेहमी तेथे येत असे. तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी, परुशी यांना वाट दाखवीत यहूदा तेथे बागेत आला. ते मशाल, कंदील आणि हत्यारे घेऊन आले होते.

मग येशू आपल्या बाबतीत जे काही होणार हे सर्व जाणून पुढे जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोण पाहिजे?”

“नासरेथचा येशू.” ते म्हणाले.

येशूने उत्तर दिल, “तो मी आहे” (आणि विश्वासघात करणारा यहूदा तेथे त्यांच्यामध्ये उभा होता) जेव्हा येशू म्हणाला, “तो मी आहे,” ते मागे सरले आणि जमिनीवर पडले.

पुन्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्हांला कोण पाहिजे?”

आणि ते म्हणाले, “नासरेथचा येशू.”

येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले की तो मी आहे. जर तुम्ही मला शोधत असाल तर या लोकांना जाऊ द्या.” हे यासाठी घडले की, जे शब्द बोलण्यात आले होते. ते सर्व पूर्ण व्हावेत, “जे तू मला दिलेस त्यांतील एकही मी गमावला नाही.”

10 मग शिमोन पेत्र, ज्याच्याकडे तलवार होती, त्याने ती बाहेर काढली व मुख्य याजकाच्या सेवकाचा कान कापला (सेवकाचे नाव मल्ख होते) 11 येशूने पेत्राला आज्ञा केली, “तुझी तलवार तिच्या जागेवर ठेव! पित्याने दिलेला प्याला मी पिऊ नये काय?”

येशूला हन्नाकडे आणतात(B)

12 मग शिपायांची तुकडी व त्यांचा सरदार आणि यहूदी रक्षक यांनी येशूला अटक केली. त्याला त्यांनी बांधले आणि 13 त्याला प्रथम हन्नाकडे आणले. तो कयफा या प्रमुख याजकाचा सासरा होता. कयफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता. 14 आणि कयफा हाच असे म्हणणारा होता की सर्व माणसांसाठी एका माणसाने मरणे बरे.

येशूला ओळखण्याविषयी पेत्र खोटे बोलतो(C)

15 शिमोन पेत्र व दुसरा शिष्य येशूच्या मागून चालले. कारण हा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, म्हणून तो येशूच्या बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात आत गेला. 16 परंतु पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन तेथे कामावर असणाऱ्या मुलीला सांगून पेत्राला आत आणले. 17 ती मुलगी पेत्राला म्हणाली, “तुही त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?”

पेत्राने उत्तर दिले, “मी नाही.”

18 थंडी असल्याने नोकरांनी व रक्षकांनी स्वतःला गरम राखण्यासाठी शेकोटी पेटविली होती व ते शेकत उभे राहिले होते. पेत्रही त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला होता.

मुख्य याजकाकडून येशूची चौकशी(D)

19 तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले, 20 येशूने त्याला उत्तर दिले की, “मी उघडपणे जगाशी बोललो, सभास्थानात व मंदिरात जेथे सर्व यहूदी एकत्र जमतात तेथे मी नेहमी शिकविले आणि मी गुप्त असे काहीच बोललो नाही. 21 मला तू का विचारतोस? ज्यांनी माझी शिकवण ऐकली, त्यांना विचार, मी काय बोललो ते त्यांना माहीत आहे.”

22 येशूने असे म्हटले तेव्हा तेथे उभे असलेल्या रक्षकाने येशूला चपराक मारली. रक्षक म्हणाला, “तू प्रमुख याजकाला असे उत्तर देतोस काय?”

23 येशूने त्याला उत्तर दिले, “जर मी वाईट बोललो असेन तर तसे सांग की मी चुकीचे बोललो पण जर चांगले बोललो असलो तर तू मला का मारतोस?”

24 हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कयफाकडे पाठविले.

स्तोत्रसंहिता 119:97-112

मेम

97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते.
    मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात.
    तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे.
    कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त
    कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून
    दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस
    म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द
    मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते.
    त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.

नून

105 परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे
    माझा मार्ग उजळतात.
106 तुझे नियम चांगले आहेत.
    मी ते पाळायचे वचन देतो आणि मी दिलेले वचन पाळीन.
107 परमेश्वरा, मी खूप काळ दुख: भोगले आहे.
    कृपा करुन आज्ञा दे आणि मला पुन्हा जगू दे.
108 परमेश्वरा, माझ्या स्तुतीचा स्वीकार कर
    आणि मला तुझे नियम शिकव.
109 माझे आयुष्य नेहमीच धोक्यात असते
    पण मी तुझी शिकवण विसरलो नाही.
110 दुष्ट लोक मला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
    पण मी तुझ्या आज्ञा मोडल्या नाहीत.
111 परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन
    त्यामुळे मला खूप आनंद होतो.
112 मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक
    तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.

नीतिसूत्रे 16:8-9

योग्य मार्गाने थोडेसे मिळवणे हे फसवणूक करुन खूप मिळवण्यापेक्षा चांगले आहे.

माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center