Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 9-11

शौलाच्या कुटुंबियांवर दावीदाची मेहेरनजर

दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का? योनाथानसाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे”

सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्याला दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्याला विचारले, “तूच सीबा काय?”

सीबा म्हणाला, “होय, मीच तुमचा दास सीबा.”

तेव्हा राजा म्हणाला, “शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्याला मिळाला पाहिजे.”

सीबा राजाला म्हणाला, “योनाथानचा मुलगाच आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.”

तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला.

सीबाने सांगितले, “तो लो-दबार येथे, अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे.”

तेव्हा राजा दावीदाने योनाथानच्या मुलाला आणण्यासाठी तेथे माणसे पाठवली. योनाथानच्या मुलगा मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला, “मफीबोशेथ?” राजाने विचारले.

मफीबोशेथ म्हणाला, “होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.”

त्याला दावीद म्हणाला, “भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन. तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंक्तीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.”

मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, “मेलेल्या कुत्र्या एवढीही माझी किंमत नाही. पण आपण या सेवकावर कृपादृष्टी करत आहात.”

दावीदाने मग शौलचा सेवक सीबा याला बोलवले. त्याला तो म्हणाला, “शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे. 10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.”

सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते. 11 सीबा दावीदाला म्हणाला, “मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन.”

तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला. 12 मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले. 13 मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरुशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या टेबलावर भोजन करीत असे.

दावीदाच्या दूतांचा हानून कडून अपमान

10 पुढे अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला. दावीदाने विचार केला, “नाहाशचा माझ्यावर लोभ होता तेव्हा त्याचा मुलगा हानून याच्याशी मी सौजन्याने वागेन.” दावीदाने मग हानूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनासाठी आपल्या सेवकांना पाठवले.

तेव्हा ते सेवक अम्मोन्यांच्या प्रांतात आले. पण अम्मोनी अधिकारी हानूनला, आपल्या धन्याला म्हणाले. “तुमच्या सांत्वनासाठी माणसे पाठवून दावीद तुमच्या वडीलांचा मान राखतोय, असे तुम्हाला वाटते का? उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकांना पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरुद्ध उठाव करायचा बेत आहे.”

तेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करुन त्यांना त्याने परत पाठवले.

लोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप शरमिंदे झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, “तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा. मग यरुशलेम येथे या.”

अम्मोन्यांवर चढाई

आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने धेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबचे बारा हजार सैनिक घेतले.

दावीदाने हे ऐकले तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले. अम्मोनी बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले. नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला. सोबा आणि रहोब येथील अरामी, तसेच माकाचे व तोबचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.

अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योध्द्यांची निवड केली. त्यांना अराम्यांच्या विरुद्ध लढायला सज्ज केले. 10 मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही माणसांना करुन अम्मोन्यांचा सामना करायला सांगितले. 11 यवाब अबीशयला म्हणाला, “अरीमी मला भारी पडत आहेत असे दिसले तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन. 12 हिंमत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करु. परमेश्वर त्याला योग्य वाटेल तसे करील.”

13 यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरुन पळ काढला. 14 अराम्यांनी पलायन केलेले पाहताच अम्मोनीही अबीशय समोरुन पळून गेले आणि आपल्या नगरात परतले.

अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरुशलेमला परतला.

पुन्हा युध्द करण्याचा अराम्यांचा निर्णय

15 इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले) 16 हदरेजरने (फरात) नदीच्या पलीकडे राहाणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येते आले. हदरेजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.

17 हे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करुन ते हेलाम येथे गेले.

तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला. 18 पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरुन पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.

19 हदरेजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलांशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अम्मोन्यांनी धास्ती घेतली.

दावीद बथशेबाला भेटतो

11 वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला.

दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला. संध्याकाळी तो आपल्या पलंगावरुन उठला आणि राजमहालाच्या छतावरुन फिरु लागला. तिथून त्याला एक बाई स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती. तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली. सेवकाने सांगितले, “ती अलीयमची मुलगी बथशेबा उरीया हित्ती याची ती पत्नी.”

तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला. नंतर स्नान करुन शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली. पण बथशेबा गर्भवती राहिली. दावीदाला तिने निरोप पाठवला. तिने सांगितले, “मी गरोदर आहे.”

दावीद पाप लपवायचा प्रयत्न करतो

दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा.

तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदकडे पाठवले. उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले. मग म्हणाला, “घरी जा आणि आराम कर.”

उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवकवर्गा प्रमाणेच तो तिथे झोपला. 10 उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले.

तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, “तू लांबून प्रवास करुन आला आहेस तू घरी का गेला नाहीस?”

11 उरीया दावीदाला म्हणाला, “पवित्र करारकोश, इस्राएलचे सैनिक आणि यहूदा हे राहूट्यांमध्ये राहात आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशा वेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणे-पिणे, बायकोच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.”

12 दावीद उरीयाला म्हाणाला, “आजच्या दिवस इथे राहा. उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो.”

उरीयाने त्या दिवशी यरुशलेममध्येच मुक्काम केला. 13 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्याला भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने जेवणखाण केले. दावीदाने त्याला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले. पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळी तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.

दावीदाचा उरीयाला मारण्याचा कट

14 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले. 15 त्या पत्रात दावीदाने लिहिले होते. “आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल तेथे उरीयाला पाठव. त्याला एकट्याला तेथे सोडा म्हणजे तो युध्दात कामी येईल.”

16 यवाबाने नगराची टेहेळणी करुन सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले आणि उरीयाला तेथे नेमले. 17 राब्बा नगरातील लोक यवाब विरुद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली. उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.

18 नंतर यवाबाने युध्दातील हकिकतींचे साद्यंतवृत्त दावीदाला पाठवले. 19 युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले. 20 यवाब सेवकाला म्हणाला, “कदाचित राजा संतापून म्हणेल, ‘यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरुन शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे. 21 तेबेसमध्ये यरुब्बेशेथचा मुलगा अबीमलेख याला एका बाईने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरुन जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला?’ राजा दावीद असे काही म्हणाला तर त्याला हे ही म्हणावे, ‘उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यात मारला गेला.’”

22 निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगयला सांगितले ते सर्व कथन केले. 23 तो म्हणाला, “अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला. आम्ही त्यांचा सामना करुन त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले. 24 मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला. त्यात काही जण ठार झाले. उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला.”

25 दावीद त्या निरोप्याला म्हणाला, “यवाबाला सांग, ‘निराश होऊ नको, हिंमत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा. तुम्ही जिंकाल.’ यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे.”

दावीदाचा बथशेबाशी विवाह

26 उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले. तिने पतिनिधनाबद्दल शोक केला. 27 काही काळाने तिचे दु:ख ओसरल्यावर दावीदाने सेवकांकरवी तिला आपल्याकडे आणवले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या मुलाला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वराला पसंत पडले नाही.

योहान 15

येशू द्राक्षवेल आहे

15 मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. जे वचन मी तुम्हांला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावचून त्याच्याने फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांला फळ देता येणार नाही.

“मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हांस मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.

“जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. 10 ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. 11 माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. 12 जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे. 13 आपल्या मित्रासाठी मरावे, यापेक्षा कोणाचीही प्रीति मोठी नाही. 14 मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात. 15 आता मी तुम्हांला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हांला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हांला कळविल्या आहेत.

16 “तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि नेमले आहे. यासाठी की, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांस द्यावे 17 तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.

येशू त्याच्या अनुयायांना सूचना देतो

18 “जर जग तुमचा द्वेष करते, तर लक्षात ठेवा की, पहिल्यांदा जगाने माझासुध्दा द्वेष केलेला आहे. 19 तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर, जशी ते स्वतःवर करतात तशी प्रीति केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने, आणि तुमची जगातून निवड केल्याने, जग तुमचा द्वेष करते.

20 “जे शब्द तुम्हांला सांगितले ते लक्षात ठेवा. कोणताही नोकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. त्यांनी जर माझी छळणूक केली तर ते तुमचीही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमचीसुद्या पाळतील. 21 माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशाप्रकारे वागतील, कारण ज्याने मला पाठविले, त्याला ते ओळखत नाहीत. 22 जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापाबद्धल दोषी ठरले नसते. आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही.

23 “जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24 मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत. मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या, तर पापाबद्धल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला. 25 परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले: ‘कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला.’ [a]

26 “पित्यापासून मी साहाय्यकर्ता पाठवीन, साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तो पित्यापासून येतो. जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो. 27 आणि तुम्हीसुद्या माझ्याविषयी लोकांना सांगाल. कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात.

स्तोत्रसंहिता 119:49-64

जायिन

49 परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.
    ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
50 मी पीडित होतो, दु:खी होतो.
    आणि तू माझे सांत्वन केलेस.
    तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
51 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझा सतत अपमान केला.
    पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो.
    परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
53 दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे
    सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
54 घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
55 परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव
    आणि तुझी शिकवण आठवते.
56 असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.

हेथ

57 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळणे हेच माझे कर्तव्य आहे,
    असा निर्णय मी घेतला आहे.
58 परमेश्वरा, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे.
    वचन दिल्याप्रमाणे तू माझ्याशी दयाळूपणे वाग.
59 मी माझ्या आयुष्याचा अगदी काळजी पूर्वक विचार केला
    आणि मी तुझ्या कराराकडे परत आलो.
60 अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.
61 वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्गार काढले.
    पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही.
62 मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल
    तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
63 जो कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे.
    जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे.
64 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम पृथ्वी व्यापून टाकते.
    मला तुझे नियम शिकव.

नीतिसूत्रे 16:1-3

16 लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो.

माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो.

तुम्ही जे जे करता त्या सगळ्याच्या मदतीसाठी परमेश्वराकडे वळा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center