Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 4-6

शौलाच्या घराण्यावर संकटे

हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व लोक भयभीत झाले. तेव्हा दोन माणसे ईश-बोशेथला भेटायला आले. ते दोघे सेनानायक असून रेखाब आणि बाना ही त्यांची नावे. हे रिम्मोनचे मुलगे (रिम्मोन हा बैरोथचा बैरोथ नगर बन्यामिन वंशाचे, म्हणून हे ही बन्यामिनी होत. पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे.)

शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्याला घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.

बैरोथच्या रिम्मोनची मुले. रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता. 6-7 गहू घेण्याच्या मिषाने रेखाब आणि बाना घरात घुसले. आपल्या शयनगृहात तेव्हा ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करुन या दोघांनी त्याला ठार मारले. त्याचे शिर धडावेगळे करुन ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत. ते हेब्रोन येथे पोचले. आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले.

रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शिक्षा केली.”

पण दावीद त्या दोघांना म्हणाला, “देवाशपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटांतून सोडवले आहे. 10 यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्याला वाटले या बातमीबद्दल मी त्याला बक्षीस देईन पण मी त्याला धरून सिकलाग येथे ठार केले. 11 तुम्हालाही आता ठार करुन या भूमीवरुन नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या माणसाला तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.”

12 असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.

इस्राएल लोक दावीदाला राजा करतात

इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीद पाशी एकत्र आले आणि त्याला म्हणाले, “आपण इस्राएल लोकांना एकाच कुटुंबातले, एकाच रकतामांसाचे आहोत. शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तूच युध्दात आमचे नेतृत्व करत होतास, इस्राएलांना युध्दावरून तूच परत आणत होतास. खुद्द परमेश्वर तुला म्हणाला, ‘माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.’”

मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

दावीद राज्य करायला लागला तेव्हा तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले. हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरुशलेम मधून राज्य केले.

दावीद यरुशलेम नगर जिंकतो

राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात [a] प्रवेश करु शकणार नाहीस. आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हाला थोपवतील.” (दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले. तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीद नगर असे त्याचे नाव पडले.)

दावीद त्यादिवशी आपल्या लोकांना म्हणाला, “यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा.” यावरूनच, “आंधळे पांगळे यांना या घरात येता यायचे नाही” अशी म्हण पडली.

दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव “दावीदनगर” असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या. 10 सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक समर्थ होत गेला.

11 सोरेचा राजा हीराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले. गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले. 12 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे हे ही त्याला उमगले.

13 हेब्रोनहून आता दावीद यरुशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि बायका होत्या. यरुशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला. 14 त्याच्या या यरुशलेम येथे जन्मलेल्या मुलांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन, 15 इभार, अलीशवा, नेफग, याफीय, 16 अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.

दावीदाचे पालिष्ठ्यांशी युध्द

17 दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्याला शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरुशलेम येथील किल्ल्यात आला. 18 पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.

19 दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करु का? तुझे साहाय्य मला लाभेल का?”

परमेश्वर उत्तरला, “होय, पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”

20 तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घुसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूंवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव “बाल परासीम” म्हणजेच खिंडार पाडणारा प्रभू असे ठेवले. 21 पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ति त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या माणसांनी त्या तेथून हलवल्या.

22 पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.

23 दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर. 24 तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हाला झाडाच्या शेंड्यांवरुन ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वराच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”

25 दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गेबापासून गेजेरपर्यंत त्यांचा पाठलाग त्यांना घालवून दिले.

देवाचा करारकोश यरुशलेममध्ये आणतात

दावीदाने पुन्हा इस्राएलमधून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले. त्यासह तो पवित्र करार कोश यरुशलेमला आणण्यासाठी यहूदातील बाला येथे गेला. देवाची उपासना करायची असली म्हणजे हा कोश जेथे असेल तेथे लोकांना जावे लागे. हा पवित्र करार कोश म्हणजे देवाचे सिंहासन आहे. करुब देवदूतांच्या प्रतिकृती त्यावर होत्या. त्यावर परमेश्वर राजासारखा बसलेला होता. अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा पवित्र कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे मुलगे उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.

अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून हा पवित्र कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो पवित्र कोशापुढे चालू लागला.

तेव्हा देवदाराच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत कोशापुढे चालू लागले. ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. पण परमेश्वराचा त्याच्यावर कोप होऊन उज्जाला मरण आले. पवित्र कोशाला स्पर्श करुन त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा करार कोशाशेजारीच उज्जा गतप्राण झाला. या घटनेमुळे दावीद फार खिन्न झाला आणि त्याने या जागेचे नाव “पेरेस-उज्जा” म्हणजेच “उज्जाला शासन” असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.

मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला. तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?” 10 परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती आणि त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन गथच्या ओबेद-अदोम याच्या घरी ठेवला. 11 तिथे तो कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.

12 पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद अदोमच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कारण पवित्र करार कोश तेथेच आहे.” तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता. 13 कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचा बळी दिला. 14 सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नाच करत होता.

15 दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. 16 शौलाची मुलगी मीखल हे सर्व खिडकीतून पाहात होती. कोश नगरात आणत असताना दावीद त्यापुढे नाचत. उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला खेद वाटला. दावीद स्वतःचे हसे करुन घेत आहे असे तिला वाटले.

17 या करार कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यात योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली.

18 हे झाल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या वतीने आशीर्वाद दिले. 19 शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषांस त्याने भाकरीचा तुकडा, किसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.

मीखलचा दावीदावरील राग

20 दावीद मग घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्याला गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला मान राखला नाही. नोकरा चाकरांमोर, दासी समोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले कपडे काढलेत.”

21 तेव्हा दावीद तिला म्हणाला, “तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना वगळून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार. 22 मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल अभिमान वाटतो.”

23 शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.

योहान 13:31-14:14

येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो

31 तो गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे. 32 देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील.”

33 “माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही, तसेच मी तुम्हांलाही आता सांगतो.

34 “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा. 35 तुमची एकमेकांवर प्रिति असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

पेत्र येशूला नाकारिल(A)

36 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात?”

येशूने उत्तर दिले, “जेथे मी जातो तेथे तुझ्याने येता येणार नाही. पण नंतर तू माझ्यामागे येशील.”

37 पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याने आताच तुमच्या मागे का येता येणार नाही? मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे.”

38 मग येशूने उत्तर दिले, “तू खरोखर आपला जीव मजसाठी देशील? मी खरे सांगतो. तू मला तीन वेळा नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

येशू शिष्यांचे समाधान करतो

14 “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”

थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”

येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”

फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.”

येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस? 10 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. 11 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.

12 “मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो. 13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14 जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.

स्तोत्रसंहिता 119:17-32

गीमेल

17 माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन.
    आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.
18 परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे.
    आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.
19 मी या देशात परका आहे.
    परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.
20 तू घेतलेल्या निर्णयांचा
    मला सतत अभ्यास करावासा वाटतो.
21 परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस.
    त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
22 मला शरम वाटू देऊ नकोस.
    मला लाज आणू नकोस.
    मी तुझा करार पाळला आहे.
23 नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात.
    पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे
    आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.
24 तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे.
    तो मला चांगला उपदेश करतो.

दालेथ

25 मी लवकरच मरणार आहे.
    परमेश्वरा, आज्ञा कर आणि मला जगू दे.
26 मी तुला माझ्या आयुष्या बद्दल सांगितले
    आणि तू मला उत्तर दिलेस.
    आता मला तुझे नियम शिकव.
27 परमेश्वरा, तुझे नियम समजून घेण्यासाठी मला मदत कर.
    तू ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत त्या मला अभ्यासू दे.
28 मी खिन्न आणि दमलेलो आहे.
    आज्ञा कर आणि मला परत बलवान बनव.
29 परमेश्वरा, मला खोटं जगू देऊ नकोस.
    मला तुझ्या शिकवणीने मार्गदर्शन कर.
30 परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले.
    मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो.
31 मी तुझ्या कराराशी चिकटून राहातो.
    परमेश्वरा, माझी निराशा करु नकोस.
32 मी तुझ्या आज्ञांचे आनंदाने पालन करीन.
    परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला आनंदित करतात.

नीतिसूत्रे 15:31-32

31 जो माणूस त्याचे चुकते आहे असे सांगितल्यावर ऐकतो तो शहाणा असतो.

32 जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर तो स्वतःलाच इजा करुन घेतो. तू चुकतो आहेस असे सांगितलेले जो ऐकून घेतो तो अधिकाधिक गोष्टी समजू शकतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center