Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the VOICE. Switch to the VOICE to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 1:1-2:11

शौलाच्या निधनाचे वृत्त दावीदाला समजते

अमालेक्यांचा पाडाव करुन दावीद सिकलाग येथे परतला. शौलाच्या मृत्यूनंतर लगेचची ही घटना आहे. दावीदाला सिकलाग येथे येऊन दोन दिवस झाले होते. तिसऱ्या दिवशी तिथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतला होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. सरळ दावीदापाशी येऊन त्याने लोटांगण घातले.

दावीदाने त्याला “तू कोठून आलास?”

म्हणून विचारले. त्याने आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे सांगितले.

तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे!”

तो म्हणाला, “लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात कामी आले. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.”

दावीद त्या तरुणाला म्हणाला, “हे दोघे मेले हे तुला कसे कळले?”

यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते. शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला मी दिसलो. त्याने मला बोलावले आणि मी ओ दिली. त्याने माझी चौकशी केली. मी अमालेकी असल्याचे त्याला सांगितले. तेव्हा शौल म्हणाला, ‘मला जबर दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारुन टाक. एवीतेवी मी मरणाच्या दारातच उभा आहे.’ 10 त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”

11 हे ऐकून दावीदाला इतके दु:ख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतीच्या लोकांनीही त्याचे अनुसरण केले. 12 दु:खाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळ पर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक मृत्यु मुखी पडले या बद्दल त्यांनी शोक केला.

दावीद त्या अमालेक्याच्या वधाचा हुकूम सोडतो

13 शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाशी दावीद बोलला. त्याला दावीदाने विचारले, “तू कुठला?”

त्याने सांगितले. “मी अमालेकी असून एका परदेशी माणसाचा मुलगा आहे.”

14 दावीदाने त्याला विचारले, “देवाने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?”

15-16 पुढे दावीद त्याला म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस. तू अपराधी आहेस याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” दावीदाने मग आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.

शौल आणि योनाथानला उद्देशून दावीदाचे शोकगीत

17 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक शोकपूर्ण गीत म्हटले. 18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.

19 “हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले पाहा,
    हे शूर कसे धारातीर्थी पडले!
20 ही बातमी गथ मध्ये सांगू नका
    अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करु नका.
नाहीतर पलिष्ट्यांच्या त्या मुली (शहरे) आनंदित होतील.
    नाहीतर (सुंता न केलेल्या) त्या परकीयांच्या मुलींना (शहरांना) आनंद होईल.

21 “गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस
    किंवा दव न पडो!
तिथल्या शेतातून यज्ञात अर्पण
    करण्यापुरतेही काही न उगवो!
कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला
    शौलाची ढाल तेलपाण्यावाचून तशीच पडली
22 योनाथानच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले
    शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले.
रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांना वधिले,
    बलदंडांची हत्या केली.

23 “शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले.
    एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही
    त्यांची ताटातूट केली नाही.
गरुडांहून ते वेगवान्
    आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा.
    किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हाला दिली
    वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.

25 “युध्दात शूर पुरुष कामी आले गिलबोवाच्या
    डोंगरावर योनाथानला मरण आले.
26 बंधो. योनाथान, मी अतिशय दु:खी
    असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे.
तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला.
    स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते
27 या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले
    त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”

दावीद आणि त्याचे लोक हेब्रोनला जातात

दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?”

तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा.”

दावीदाने विचारले, “कुठे जाऊ?”

देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”

तेव्हा दावीद आपल्या दोन्ही बायकांसह हेब्रोनला गेला. (इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन बायका) आपल्या बरोबरच्या लोकांनाही दावीदाने त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या गावांमध्ये या सर्वांनी वस्ती केली.

यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करुन यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. मग त्याला ते म्हणाले, “याबेश गिलादच्या लोकांनी शौलचा दफनविधी केला.”

तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविथी करुन तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. देव तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे. आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी मला राज्याभिषेक केला आहे.”

ईश-बोशेथ राजा बनतो

नेरचा मुला अबनेर हा शौलचा सेनापती होता. इकडे तो शौलचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला. आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन आणि सर्व इस्राएल [a] यांच्यावर राजा म्हणून नेमले.

10 हा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा चाळीस वर्षाचा होता. त्याने दोन वर्षे कारभार पाहिला. पण यहूदा वंशाचा पाठिंबा दावीदाला होता. 11 दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदांच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले.

योहान 12:20-50

येशू जीवन आणि मरण याविषयी बोलतो

20 आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते. 21 ते फिलिप्पाकडे आले, जो गालीलातील बेथसैदा येथील होता, त्यांनी विनंति केली, “महाराज, येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे.” 22 फिलिप्प अंद्रियाकडे हे सांगण्यास गेला; नंतर अंद्रिया व फिलिप्प यांनी येशूला सांगितले.

23 येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. 24 मी तुम्हांला खरे सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही, तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो. 25 जो आपल्या जिवावर प्रीति करतो तो त्याला गमावेल पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखील. 26 जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे. जेथे मी असेन तेथे माझे सेवकही असतील. जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील.”

येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो

27 “माझे अंतःकरण व्याकूळ झाले आहे. आणि मी आता काय सांगू? ‘पित्या माझी या घटकेपासून सुटका कर?’ केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो. 28 पित्या, तुझे गौरव कर!”

तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करीन.”

29 जो जमाव तेथे होता त्याने हे ऐकले व म्हटले, “गडगडाट झाला.”

दुसरे म्हणाले, “देवदूत त्याच्याशी बोलला.”

30 येशू म्हणाला, “हा आवाज तुमच्यासाठी होता. माझ्यासाठी नव्हे. 31 या जगाचा न्याय होण्याची आता वेळ आली आहे. या जगाच्या राजकुमारला हाकलून देण्यात येईल. 32 परंतु मी, जेव्हा पृथ्वीपासून वर उचलला जाईन, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढीन.” 33 त्याने हे यासाठी म्हटले की कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार आहे हे त्याला दाखवायचे होते.

34 जमाव म्हणाला, “ख्रिस्त सर्वकाळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?”

35 मग येशू त्यांना म्हणाला. “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला. यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करु नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. 36 तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हांला प्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला, मग तो निघून गेला. आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला.

यहूदी येशूवर विश्वास ठेवण्याचे नाकारतात

37 येशूने इतके चमत्कार त्यांच्यासमोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेवीनात. 38 यासाठी की, यशया संदेष्ट्याचे वचन पूर्ण व्हावे:

“प्रभु, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे.
    आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे?” (A)

39 या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही, जसे यशया एके ठिकाणी म्हणतो,

40 “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
    व अंतःकरणाने समजू नये,
फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले
    आणि त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.” (B)

41 यशया असे म्हणाला, कारण त्याने त्याचे गौरव पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला.

42 तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परुश्यांमुळे त्यांनी हे पत्करले नाही. 43 कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले.

येशूची शिकवण लोकांचा न्याय करील

44 तेव्हा येशू मोठ्याने बोलला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो. 45 आणि जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. 46 मी प्रकाश असा जगात आलो आहे. यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये.

47 “आणि जो कोणी माझी वचने ऐकून पाळीत नाही, त्याचा न्याय मी ठरवीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी आलो नाही, तर जगाच्या तारणासाठी आलो आहे. 48 जो माझा स्वीकार करीत नाही व माझ्या वचनाप्रमाणे वागत नाही त्याचा न्याय करणारा कोणी एक आहे, जे वचन मी बोललो तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील. 49 कारण मी स्वतःहून बोललो असे नाही तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले, त्यानेच मला आज्ञा केली आहे. 50 आणि त्याची आज्ञा अनंतकाळचे जीवन आहे. हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो ते जसे पित्याने मला सांगितले तसेच बोलतो.”

स्तोत्रसंहिता 118:19-29

19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा.
    मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि
    केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
    तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.

22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता
    तो कोनाशिला झाला.
23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे
    आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे.
    आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.

25 लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा.
    परमेश्वराने आपला उध्दार केला. [a]
26 परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा.”
    याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.
27 परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो.
    बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.”

28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो.
    तुझी स्तुती करतो.
29 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
    त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.

नीतिसूत्रे 15:27-28

27 जर एखाद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.

28 चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center