Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the VOICE. Switch to the VOICE to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 29-31

“दावीद आमच्या बरोबर येत नाही!”

29 पलिष्ट्यांनी आपल्या सर्व सैन्याला अफेक येथे एकत्र आणले. इज्रेल येथे एका झऱ्याजवळ इस्राएलांनी छावणी टाकली. आपल्या शंभर शंभर आणि हजार हजार माणसांच्या समूहा बरोबर पलिष्टी अधिकारी चालले होते. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर पिछाडीला होती.

तेव्हा पलिष्ट्यांच्या सरदारांनी विचारले, “या इब्रींचे येथे काय काम?”

आखीशने त्यांना सांगितले, “हा दावीद हा शौलच्या अधिकाऱ्यांपैकी एक होता. आता माझ्या बरोबर तो बराच काळ आहे. शौलला सोडून तो येथे आल्यापासून त्याच्यात मला काही वावगे आढळले नाही.”

पण त्या सरदारांना आखीशचा फार राग आला. ते म्हणाले, “या दावीदला परत पाठवा. त्याला दिलेल्या नगरात त्याने परत जावे. आमच्या बरोबर तो युध्दावर येता कामा नये. तो इथे राहिला तर शत्रूलाच आपल्या छावणीत घेतल्यासारखे होईल. आपली माणसे मारुन तो त्यांच्या राजाला, शौलला, खूश ठेवील.

‘शौलाने हजार शत्रू मारले,
    तर या दावीदाने लाखोंचा वध केला’

असे एक गाणे गात इस्राएल लोक जल्लोष करतात तोच हा दावीद.”

तेव्हा आखीश दावीदला बोलावून म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू माझ्याशी सचोटीने वागला आहेस. माझ्या सैन्यात तुला भरती करुन घेणे मला आवडले असते. तू मला सामील झाल्यापासून मला तुझ्यात आक्षेपार्ह काही आढळले नाही. पण पलिष्टी अधिकाऱ्यांचे तुझ्याबद्दल चांगले मत नाही. तेव्हा तू शांतपणे माघारी फीर. पलिष्टी अधिकाऱ्यांना काहीही उपद्रव देऊ नको.”

तेव्हा दावीदाने विचारले, “माझे काय चुकले? मी तुमच्याकडे आलो त्या दिवसापासून आजतागायत माझ्यात तुम्हाला काही दोषास्पद आढळले का? माझे स्वामी महाराज यांच्या शत्रूंचा मुकाबला मी का करु नये?”

आखीशने त्याला सांगितले, “मला तू आवडतोस. तू देवाने पाठवलेल्या दूतासारखाच आहेस. पण दावीदाने आमच्या बरोबर युध्दावर येऊ नये असे पलिष्टी सरदारांचे म्हणणे आहे. 10 उद्या सकाळी लौकर उठून तू आणि तुझ्या बरोबरची माणसे परत जा. तुम्हाला दिलेल्या नगरात जा. या सरदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष कर. तू भला माणूस आहेस उद्या उजाडताच निघून जा.”

11 तेव्हा दावीद आपल्या बरोबरच्या लोकांसह पहाटेच पलिष्ट्यांच्या देशात परतला आणि पलिष्ट्यांनी इज्रेलवर चढाई केली.

अमालेक्यांची सिकलागवर स्वारी

30 दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले. अमालेक्यांनी बायका, गावातील तरुण आणि वृध्द लोक यांना कैदी म्हणून नेले होते. त्यांनी कोणाला ठार केले नाही. पण धरुन मात्र नेले.

दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे सिकलाग येथे येऊन पोचतात तो त्यांना शहर जळत असलेले दिसले. त्यांच्या बायका मुलेबाळे यांना नेण्यात आले होते. अमालेक्यांनी सर्वांना उचलून नेले होते. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी खूप आक्रोश केला. आक्रोश करुन करुन त्यांची शक्ती संपुष्टात आली. इज्रेलची अहीनवास आणि कर्मेल येथील नाबालची बायको आबीगईल या दावीदाच्या बायकांनाही नेले होते.

आपल्या सर्व मुलाबाळांना कैदी म्हणून धरुन नेलेले पाहून सर्व सैन्याला दु:ख आणि संतापाने घेरले. दावीदला दगडांनी ठेचून मारावे असा विचार लोक बोलून दाखवू लागले. त्यामुळे दावीद फार व्याथित झाला. पण तो परमेश्वरावर भरवंसा ठेवून खंबीर राहिला. अब्याथार या याजकाला त्याने आपला एफोद आणण्यास सांगितले.

दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “आमच्या कुटुंबियांना धरुन नेणाऱ्या शत्रूंचा पाठलाग करु का? शत्रू आमच्या तावडीत सापडेल का?”

यावर परमेश्वराने सांगितले, “अवश्य त्यांच्या पाठलागावर जाऊन त्यांना पकड. आपल्या घरच्यांची तू सोडवणूक करशील.”

दावीद व त्याचे लोक यांना मिसरी गुलाम भेटतो

9-10 दावीदाने मग आपल्याबरोबर सहाशे जणांना घेतले आणि ते सर्व बसोर नदीजवळ पोचले. त्यांच्यापैकी दोनशेजण इतके थकले की त्यांना पुढे जाववेना. ते तिथेच राहिले. तेव्हा उरलेली चारशे माणसे दावीद बरोबर पुढे अमालेक्यांच्या पाठलागावर गेली.

11 त्यांना एका शेतात एक मिसरी आढळला. त्याला त्यांनी दावीदकडे नेले. त्याला खाऊ पिऊ घातले. 12 अंजिराच्या ढेपेचा एक तुकडा आणि द्राक्षाचे दोन घड त्यांनी त्याला दिले. तेव्हा त्याला बरे वाटू लागले. तीन दिवस आणि रात्री त्याच्या पोटात अन्न पाणी गेले नव्हते.

13 दावीदाने त्याला विचारले, “तुझा मालक कोण? तू आलास कुठून?”

तो मिसरी म्हणाला, “मी मिसरी असून एका अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपूर्वी मी आजारी पडलो तेव्हा माझ्या धन्याने मला सोडून दिले. 14 करेथी राहतात त्या नेगेव प्रदेशावर, यहूदा प्रांतावर व कालेब लोकांच्या दक्षिण भागावर आम्ही हल्ले केले होते. सिकलागही आम्ही जाळले.”

15 दावीद त्याला म्हणाला, “आमच्या बायकामुलांना तुम्ही नेलेत तिथे मला घेऊन जाशील का?”

तेव्हा तो मिसरी दास म्हणाला, “तुम्ही परमेश्वरापुढे शपथ घेतलीत तर मी तुम्हाला मदत करीन. पण तुम्ही मला मारणार नाही किंवा माझ्या धन्याकडे देणार नाही असे मला वचन द्या.”

दावीद अमालेक्यांचा पराभव करतो

16 त्या मिसरी माणसाने दावीदला अमालेक्यांच्या तळापर्यंत नेले. तेथे ते लोक खात पित आणि मौजमजा करत इतस्ततः पसरले होते. पलिष्टी आणि यहूदा प्रांतातून आणलेल्या लुटीचा ते मनसोक्त उपभोग घेत होते. 17 दावीदाने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना मारले. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांच्यात लढाई झाली. अमालेक्यांपैकी चारशे तरुण आपापल्या उंटांवर स्वार होऊन पळून गेले. ते वगळता कोणीही वाचले नाही.

18 आपल्या दोन बायकांसकट अमलेक्यांनी जे जे पळवले होते ते सर्व दावीदाने परत मिळवले. 19 कोणीही गहाळ झाले नाही. मुलं, वृध्द, माणसं, मुलगे, मुली सर्व मौल्यवान वस्तू ज्याच्या त्याला मिळाल्या. अमालेक्यांच्या लूटीतील सर्व काही दावीदाने परत आणले. 20 त्यांची सर्व शेरडे मेंढरे आणि गुरे दावीदाने आणली. दावीदाच्या माणसांनी त्यांना पुढे घातले आणि ते म्हणाले, “हे दावीदाने मिळवलेले बक्षीस आहे.”

सर्वांचे वाटे समान

21 जे दमले भागलेले लोक दावीद बरोबर पुढे जाऊ शकले नाहीत आणि बसोर नदीपाशीच थांबले होते तेथे, त्या दोनशे जणांकडे दावीद आला. दावीद आणि त्याचे सैन्य येताना पाहून ते त्यांना सामोरे आले. त्यांनी दावीदाच्या सैन्याचे आगत स्वागत केले. दावीदाने त्यांचे क्षेम कुशल विचारले. 22 दावीद बरोबर गेलेल्यांमध्ये काही विघ्नसंतोषी माणसे होती. ती म्हणाली, “ही दोनशे माणसे आपल्या बरोबर पुढे आली नाहीत. तेव्हा त्यांना आपल्या लुटीतील हिस्सा मिळाणार नाही. त्यांची बायका मुले तेवढी ज्याची त्याने घ्यावीत.”

23 दावीद त्यांना म्हणाला, “नाही, असे वागू नका. परमेश्वराने आपल्याला काय दिले त्याचा विचार करा. परमेश्वरामुळे शत्रूचा पारभव आपण करु शकलो. 24 तुम्ही म्हणता ते कोणी ऐकणार नाही. जे इथे सामानसुमानाजवळ थांबले ते आणि युध्दावर आले ते अशा सर्वांना सारखाच वाटा मिळेल. वाटण्या समान होतील.” 25 तेव्हापासून इस्राएलसाठी हीच वहिवाट पडली; हाच नियम झाला. आजतागायत तो चालू आहे.

26 दावीद सिकलाग येथे आला. त्याने अमालेक्यांकडून आणलेल्या लुटीतील काही वस्तू आपले मित्र, यहूदातील वडीलधारी मंडळी यांना पाठवल्या. त्याने सांगितले, “परमेश्वराच्या शत्रूकडून आणलेल्या लुटीतीला ही भेट”

27 बेथेल, दक्षिणेकडील रामोथ, यत्तोर, 28 अरोएर, सिफमोथ, एष्टमो, 29 राखाल, येरहमेलीतील नगरे तसेच केनीची नगरे, 30 हर्मा, कोर आशान, अथाख, 31 आणि हेब्रोन अशा ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या साथीदारांसह फिरत असे तेथील वडीलधाऱ्यांनाही त्याने या लुटीतील वस्तू पाठवल्या.

शौलाचा मृत्यू

31 पलिष्ट्यांची इस्राएलांशी लढाई झाली तेव्हा इस्राएलांनी शत्रूंपासून पळ काढला. बरेच इस्राएल लोक गिलबोवा डोंगरात मारले गेले. शौल आणि त्याची मुले यांच्याशी पलिष्टी निकराने लढले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलाच्या मुलांचा पलिष्ट्यांनी वध केला.

युद्ध शौलाच्या हाताबाहेर जाऊ लागले. तिरंदाजांनी शौलावर बाणांचा वर्षाव केला आणि शौल चांगलाच घायाळ झाला. तो आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “तुझी तलवार उचल आणि माझ्यावर चालव. नाहीतर हे परकीय मला भोसकून माझी टिंगल टवाळी करतील.” पण त्या शस्त्रवाहकाने भेदरुन या गोष्टीला नकार दिला. तेव्हा शौलाने आपली तलवार उपसली व स्वतःला भोसकले.

शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहून आपली तलवार काढली आणि आत्महत्या केली. शौला बरोबरच त्याने देह ठेवला. अशा प्रकारे त्या दिवशी शौल, त्याची तीन मुले आणि त्याचा शस्त्रवाहक असे सर्व एकदम मृत्युमुखी पडले.

शौलच्या मरणाचा पलिष्ट्यांना आनंद

खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या इस्राएली लोकांनी, इस्राएली सैन्याला पळ काढताना पाहिले. शौल आणि त्याची मुले मरण पावल्याचे त्यांना आढळले. तेव्हा त्यांनी ही आपापली गावे सोडून पलायन केले. त्या ठिकाणी मग पलिष्ट्यांनी वस्ती केली.

दुसऱ्या दिवशी हे पलिष्टी मृतांच्या अंगावरील चीजवस्तू लुबाडायला आले. त्यांना शौल आणि त्याची तीन मुले गिलबोवा डोंगरात मरुन पडलेली आढळली. पलिष्ट्यांनी शौलचे मुंडके कापले आणि चिलखत, शस्त्रे पळवली सर्व देशभरच्या लोकांना आणि देवळांमधून त्यांनी हे वर्तमान कळवले. 10 शौलची शस्त्रे त्यांना अष्टारोथच्या देवळात ठेवली आणि त्याचा मृतदेह बेथ-शानच्या गावकुसावर टांगला.

11 पलिष्ट्यांनी शौलची काय गत केली ते याबेश-गिलाद येथील रहिवाश्यांनी ऐकले. 12 तेव्हा तेथील सैनिक रातोरात तेथून निघून बेथ-शान येथे पोचले. तेथे गावकुसावर टांगलेला शौलचा मृतदेह त्यांनी काढला. शौलच्या मुलांची प्रेते ही काढली. याबेश येथे त्यांनी हे सर्व मृतदेह आणले आणि याबेश येथील सर्वांनी त्यांचे दहन केले. 13 मग त्यांच्या अस्थी काढून याबेश मधील झाडाखाली पुरल्या. सर्व लोकांनी सात दिवस उपास करुन शोक प्रगट केला.

योहान 11:55-12:19

55 तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले. 56 ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?” 57 पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.

येशू आपल्या मित्रांबरोबर बेथानी येथे(A)

12 मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता. तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले.

पण त्याच्या शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला, “हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या तीनशे रुपयाच्या किमतीचे होते.” गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत, ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला.

“तिला एकटे सोडा,” येशूने उत्तर दिले, “मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले. तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.”

लाजराविरुद्ध कट

मग तो तेथे आहे हे यहूदीयांतील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले. 10 तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला मारण्याचा कट केला. 11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवीत होते.

येशू यरुशलेमात प्रवेश करतो(B)

12 दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने ऐकले की येशू यरुशलेमकडे येत आहे. 13 त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास गेले. ते ओरडून जयघोष करीत होते.

“‘होसान्ना!’
    ‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यावदित असो!’ (C)

इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”

14 येशूला एक शिंगरु दिसले त्यावर तो बसला. आणि संदेष्ट्यांनी लिहिल्याप्रमाणे हे झाले. ते असे:

15 “सीयोनेच्या कन्ये, भिऊ नको;
    पहा, तुझा राजा येत आहे;
    गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.” (D)

16 सुरवातीला शिष्यांना या गोष्टी समजल्या नाहीत पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना जाणीव झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यांनी या गोष्टी त्याच्यासाठी केल्या.

17 मग जो जमाव त्याने लाजरला कबरेतून आणलेले व मरणातून उठविलेले पाहत होता तो जमाव सातत्याने त्याच्याविषयी सांगत होता. 18 पुष्कळ लोक त्याला जाऊन भेटले कारण त्याने तो चमत्कार केला होते हे त्यांनी ऐकले होते. 19 म्हणून परुशी एकमेकांस म्हणाले, “पहा, याच्यापुढे आपले काही चालत नाही. सगळे जग त्याच्यामागे चालले आहे!”

स्तोत्रसंहिता 118:1-18

118 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा.
    त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
इस्राएल, म्हण
    “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
याजकांनो, म्हणा,
    “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा,
    “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली.
    परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही.
    लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.
परमेश्वर मला मदत करणारा आहे.
    माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे
    हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे
    हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.

10 बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते.
    परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
11 शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले,
    मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
12 शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते.
    परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला.
    मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

13 माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि
    माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे.
    परमेश्वर मला वाचवतो.
15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता.
    परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत.
    परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.

17 मी जगेन आणि मरणार नाही
    आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
18 परमेश्वराने मला शिक्षा केली
    परंतु त्याने मला मरु दिले नाही.

नीतिसूत्रे 15:24-26

24 शहाण्या माणसाने केलेली गोष्ट यशाकडे नेते आणि त्या गोष्टी त्याला मृत्यूकडे जाण्यापासून वाचवतात.

25 गर्विष्ठ माणसाकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा परमेश्वर नाश करील. पण विधवेकडे असलेल्या गोष्टीचे परमेश्वर रक्षण करतो.

26 परमेश्वराला दुष्ट विचार आवडत नाहीत. पण परमेश्वर मायेच्या शब्दांनी आनंदी होतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center