Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 26-28

दावीद आणि अबीशय शौलाच्या छावणीवर

26 जीफचे रहिवासी गिबा येथे शौलाला भेटायला गेले. त्याला ते म्हणाले, “यशीमोन जवळच्या हकीला डोंगरात दावीद लपून बसलेला आहे.”

शौल जीफच्या वाळवंटात गेला. त्याच्याबरोबर तेव्हा इस्राएलचे निवडक तीन हजाराचे सैन्य होते. दावीदचा त्या सर्वांनी जीफच्या वाळवंटात शोध घेतला. यशीमोन समोरच्या मार्गावर हकीला डोंगरावरच शौलाने तळ ठोकला.

दावीद वाळवंटातच होता. त्याला शौलाच्या या पाठलागाचे वृत्त समजले. तेव्हा त्याने काही हेर नेमले. त्यांच्याकडून त्याला शौल हकीला येथे आल्याचे समजले. तेव्हा शौलच्या तळावरच तो गेला. शौल आणि अबनेर त्याला झोपलेले आढळले. (नेरचा मुलगा अबनेर हा शौलच्या सैन्याचा प्रमुख होता.) शौल मध्यभागी झोपलेला असून बाकी सर्वजण त्याच्याभोवती झोपलेले होते.

दावीद हित्ती, अहीमलेख, आणि सरुवेचा मुलगा अहीशय यांच्याशी बोलला. (अबीशय हा यवाबचा भाऊ). या दोघांना दावीदाने विचारले, “माझ्याबरोबर शौलाच्या तळावर यायला कोण तयार आहे”

अबीशय म्हणाला, “मी येतो.”

रात्र झाली दावीद आणि अबीशय छावणीवर पोचले. शौल मध्यभागी झोपलेला होता. त्याचा भाला उशाकडे जमिनीत रोवलेला होता. अबनेर आणि इतर सैनिक भोवताली झोपलेले होते. अबीशय दावीदला म्हणाला, “आज परमेश्वराने शुत्रला तुमच्या हवाली केले आहे. शौलच्याच भाल्याने मला त्याचा वध करु द्या. एकच वार मी करीन.”

पण दावीद त्याला म्हणाला, “त्याला ठार करु नको. परमेश्वराच्या अभिष्किक्त राजावर हल्ला करणाऱ्याला देव प्रायश्र्चित करील. 10 परमेश्वराच्या जीविताची शपथ, तोच शौलाला शासन करील. शौलाला नैसर्गिक मृत्यू येईल किंवा युध्दात मरण येईल. 11 पण परमेश्वराने निवडलेल्या राजाला मारायची वेळ परमेश्वर माझ्यावर आणणार नाही. तू फक्त त्याच्या उशाजवळचा भाला आणि पाण्याचा तांब्या उचल आणि मग आपण जाऊ”

12 तेवढा भाला आणि पाण्याचा तांब्या घेऊन दावीद आणि अबीशय छावणीबाहेर पडले. घडलेली गोष्ट कोणालाही समजली नाही. कोणी पाहिले नाही. कोणी जागे झाले नाही. परमेश्वरामुळेच सर्वजण गाढ झोपेच्या अमलाखाली होते.

दावीद शौलला पुन्हा शरमिंदे करतो

13 दावीद नंतर खोरे ओलांडून पलीकडे गेला. शौलच्या छावणी समोरच्या डोंगर माथ्यावर तो उभा राहिला. दावीद आणि शौल यांच्या छावण्यांमध्ये बरेच अंतर होते. 14 दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरला हाका मारल्या. “अबनेर, ओ दे” असा पुकारा केला.

अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”

15 दावीद म्हणाला, “तू मर्द आहेस ना? इस्राएल मध्ये तुझ्या तोडीचा दुसरा कोणी आहे का? मग तू आपल्या धन्याचे रक्षण कसे केले नाहीस? एक सामान्य माणूस तुमच्या छावणीत शिरतो, धन्याला, राजाला मारायला येतो. 16 आणि तुम्ही गाफील राहण्याची चूक करता. परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मृत्युदंडाला पात्र आहात. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला, तुमच्या स्वामीला तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. शौलाच्या उशालगतचा भाला आणि पाण्याचा तांब्या याचा शोध घ्या बरे! कुठे आहेत या वस्तू?”

17 शौलला दावीदचा आवाज ओळखू आला. तो म्हणाला, “दावीद मुला, तुझाच का हा आवाज?”

दावीद म्हणाला, “स्वामी मीच बोलतोय.” 18 तो पुढे म्हणाला, “धनी, तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मी काय केले? माझा अपराध कोणता? 19 राजेसाहेब, माझे ऐका. तुमच्या माझ्यावरील क्रोधाचे कारण परमेश्वर असेल तर तो माझ्या अर्पणाचा स्वीकार करील. पण माणसांनी तुम्हाला माझ्याविरुद्ध भडकवले असेल तर परमेश्वर त्यांचा सत्यानाश करो. या लोकांमुळेच मला परमेश्वराने दिलेल्या भूमीतून काढता पाय घ्यावा लागला. ‘दुसऱ्या कुठल्या परमेश्वराची उपासना कर, इथून चालता हो’ असे यांनीच मला सांगितले. 20 आता मरताना तरी परमेश्वराचे सान्निध्य मला लाभू द्या. इस्राएलचा राजा तर जणू क्षुल्लक पिसवेच्या शिकारीला निघालाय. डोंगरात तितराची पारध करतोय!” [a]

21 यावर शौल म्हणाला, “मी पापी आहे. तू परत ये. दावीद, माझ्या मुला, माझ्या जिवाचे तुला मोल वाटते हे तू तुझ्या कृतीतून आज दाखवले आहेस तेव्हा आता तुला मी उपद्रव देणार नाही. मी अविचाराने वागलो. फार मोठी चूक केली.”

22 दावीद त्याला म्हणाला, “हा राजाचा भाला इथे आहे. तुमच्यापैकी एखाद्या सेवकाने येऊन घेऊन जावा. 23 आपल्या करणीचे फळ परमेश्वर आपल्याला देतो. आपल्या योग्य वागण्याचे बक्षीस मिळते, तसंच चुकीचीही शिक्षा भोगावी लागाते. तुझा पराभव करायची संधी आज मला परमेश्वराने दिली होती. पण परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला मी इजा पोचू दिली नाही. 24 तुझ्या आयुष्याचे मला किती महत्व वाटते ते मी आज दाखवले. तसाच माझा जीव परमेश्वराला मोलाचा वाटतो हे तो दाखवून देईल. तो माझी संकटातून मुक्तता करील.”

25 तेव्हा दावीदला शौल म्हणाला, “देव तुझे कल्याण करो. दावीद, माझ्या मुला, तुझ्या हातून मोठी कार्ये होतील आणि तू यशस्वी होशील.”

मग दावीद आपल्या मार्गाने गेला आणि शौल स्वगृही आला.

दावीद पलिष्ट्यांचा आश्रय घेतो

27 पण दावीद मनात म्हणाला, “कधीतरी शौल मला पकडेल आणि ठार मारेल. त्यापेक्षा पलिष्ट्यांच्या भूमीत आश्रय घेणे उत्तम. तेव्हाच इस्राएलमध्ये माझा शोध घ्यायचे शौल थांबवेल. माझी त्याच्या तावडीतून सुटका होईल.”

मग दावीद आपल्या बरोबरच्या सहाशे माणसांना घेऊन इस्राएल सोडून गेला. मवोखचा मुलगा आखीश याच्याकडे ते सगळे आले. आखीश गथचा राजा होता. दावीद मग आपल्या बरोबरचे लोक आणि त्यांचा परिवार यांच्यासह गथ येथे आखीशच्या राज्यात राहिला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलची अबीगईल या दावीदाच्या दोन बायकाही त्याच्यासह होत्या. अबीगईल म्हणजे नाबालची विधवा. दावीद गथ येथे पळून गेला असल्याचे लोकांकडून शौलला कळले. तेव्हा त्याने दावीदचा पाठलाग सोडून दिला.

दावीद आखीशला म्हणाला, “माझ्यावर तुझी मेहेरनजर असेल तर या मुलखातील एखाद्या ठिकाणी मला राहायला जागा दे. मी केवळ एक सेवक आहे. मी असेच कुठेतरी राहायला पाहिजे, तुझ्याबरोबर इथे राजधानीच्या शहरी नव्हे.”

तेव्हा आखीशने त्याला सिकलाग हे नगर वस्तीला दिले. ते तेव्हापासून आजतागायत यहूदांच्या राजांच्या ताब्यात आहे. दावीद त्या पलिष्ट्यांच्या मुलखात एक वर्ष चार महिने राहिला.

दावीद आखीशाला फसवतो

शूर जवळच्या तेलेमपासून पार मिसरर्यंत जे अमालेकी आणि गशूरी लोक राहात त्यांच्यावर दावीदाने आपल्या माणसांसह हल्ले केले. त्यांचा पराभव करुन त्यांना लुटले. त्या भागातील सर्वांना दावीदाने नेस्तनाबूत केले. त्यांची मेंढरे, गाई गुरे, गाढवे, उंट, कापड चोपड लुटून आखीशच्या स्वाधीने केले. पण त्याने या लोकांपैकी कोणालाही जिवंत ठेवले नाही.

10 हे दावीदाने अनेकदा केले. कोणत्या लढाईवरुन ही लूट आणली असे आखीशने दरवेळी विचारल्यावर दावीद प्रत्येक वेळी सांगत असे, “यहूदाच्या दक्षिण भागावर हल्ला केला.” किंवा “यहरमेलीच्या दक्षिण प्रांतात लढाई केली” किंवा “केनीच्या दक्षिण प्रदेशावर चढाई केली” [b] 11 पराभूतांपैकी कोणालाही त्याने गथला जिवंत येऊ दिले नाही. दावीदला वाटायचे, “त्यांच्यापैकी कोणी इथे आले तर प्रत्यक्षात काय आहे ते आखीशला कळायचे.”

पलिष्ट्यांच्या भूमीत असेपर्यंत दावीदाने असेच केले. 12 दावीदाने आखीशचा विश्वास संपादन केला. आखीश मनात म्हणाला, “इस्राएलचे लोक आता दावीदचा द्वेष करतात. त्याच्याशी त्यांचा उभा दावा आहे. तेव्हा दावीद आता चिरकाल माझीच सेवा करील.”

पलिष्टी युध्दाला सज्ज

28 तेव्हा पुढे पलिष्ट्यांनी इस्राएलवर स्वारी करायला सैन्याची जमवाजमव केली. आखीश दावीदला म्हणाला, “इस्राएलशी युद्ध करायला तू आणि तुझे लोक यांना माझ्या बाजूला असले पाहिजे हे लक्षात ठेव.”

दावीद म्हणाला, “निश्चितच माझी कामगिरी पाहालच तुम्ही.”

आखीश म्हणाला, “उत्तम. मी तुला माझा अंगरक्षक म्हणून नेमतो. तू माझ्या संरक्षणाची काळजी घेशील.”

शौल आणि एन-दोर येथील एक बाई

शमुवेल मरण पावला होता. सर्व इस्राएलांनी निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्याच्या गावी रामा येथे शमुवेलचे दफन केले होते.

शौलने मांत्रिक आणि दैवज्ञ यांना इस्राएल मधून घालवून दिले होते.

पलिष्ट्यांनी युद्धाच्या तयारीने शूनेम येथे तळ दिला. शौलने सर्व इस्राएलांना एकत्र आणून गिलबोवा येथे तळ दिला. पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याची छाती धडधडू लागली. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली पण परमेश्वराने त्याला उत्तर दिले नाही. स्वप्न, संदेष्टे किंवा उरीम यापैकी कोणत्याही माध्यामातून देव त्याच्याशी बोलला नाही. शेवटी शौल आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, एखाद्या भूतविद्याप्रवीण बाईला गाठा. तिलाच या युध्दाविषयी प्रश्न विचारतो.

ते अधिकारी म्हणाले, “अशी एक बाई एन-दोन येथे आहे.”

आपणच शौल आहोत हे ओळखू देऊ नये म्हणून वेष पालटून शौल दोन सेवकांना सोबतीला घेऊन रात्रीच त्या बाईकडे गेला. तिला म्हणाला, “पुढे काय होणार हे मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा आपल्या भूतविद्येचा प्रयोग करुन, मी ज्याचे नाव घेईन त्याला इथे हजर कर.”

तेव्हा ती बाई शौलला म्हणाली, “शौलने काय केले माहीत आहेना? त्याने सर्व भूताविद्याप्रवीण आणि भविष्यवादी लोकांना इस्राएलमधून हद्दपार केले आहे. मलाही त्यात अडकवून मारायचा तुझा विचार दिसतो.”

10 शौलने परमेश्वराची शपथ घेऊन तिला वचन दिले की परमेश्वर जिवंतअसेतो तुला शिक्षा होणार नाही.

11 तेव्हा कोणाला समोर आणू असे तिने त्याला विचारले.

शौल म्हणाला, शमुवेलला आण.

12 आणि तसे झाले. शमुवेलला पाहताच ती मोठ्याने किंचाळली. शौलला ती म्हणाली, “तू मला फसवलेस तू शौल आहेस.”

13 तेव्हा राजा म्हणाला, “घाबरु नकोस. तुला काय दिसते ते सांग.”

ती म्हणाली, “मला एक आत्मा भूमीतून वर येताना दिसतोय.”

14 शौलने विचारले, “तो दिसायला कोणासारखा आहे?”

ती म्हणाली, “एक विशिष्ट प्रकारचा अंगरखा घातलेला एक वृध्द आहे.” तो शमुवेलच असल्याचे शौलाच्या लक्षात आले. जमिनीपर्यंत वाकून त्याने त्याला अभिवादन केले. 15 शमुवेल शौलला म्हणाला, “मला तू त्रास का दिलास? मला का उठवलेस?”

शौल म्हणाला, “मी अडचणीत सापडलो आहे. पलिष्टी माझ्यावर हल्ला करायला आले आहेत. परमेश्वराने माझी साथ सोडली आहे. त्याच्याकडून मला प्रतिसाद मिळत नाही. स्वप्न किंवा संदेष्टे यांच्यामार्फत मला उत्तरे मिळत नाहीत. म्हणून मी तुला बोलावले. मी काय करु ते तू सांग.”

16 शमुवेल म्हणाला, “परमेश्वराने तुझा त्याग केला आहे. तो आता दावीद या तुझ्या शेजाऱ्याच्या बाजूचा आहे. तेव्हा मला का त्रास देतोस? 17 परमेश्वराने माझ्या द्वारे जे जे सांगितले होते तेच तो आता करत आहे. तुझ्या हातातून राज्य खेचून घेऊन ते तो तुझ्या लगतच्या दुसऱ्यांच्या हाती सोपवत आहे हा शेजारी म्हणजे दावीद. 18 तू परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. परमेश्वराचा क्रोध किती आहे ते दाखवायला तू अमालेक्यांचा नाश करायाला हवा होतास, तसा तू केला नाहीस. म्हणून परमेश्वर आज तुझ्याशी असे वागत आहे. 19 पलिष्ट्यांच्या हातून प्रभु तुझा आणि इस्राएल सैन्याचा पराभव करील आणि उद्या तू आणि तुझी मुले इथे माझ्याबरोबर असाल.”

20 हे ऐकून शौलने जमिनीवर लोळण घेतली. शमुवेलच्या भाकिताने त्याला कापरे भरले. त्याआधी दिवसभर आणि रात्र भर त्याने काही खाल्ले नव्हते म्हणून त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते.

21 तेव्हा ती बाई शौलजवळ आली. तो घाबरल्याचे तिने पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “पाहा, मी तुझ्या सेवेत आहे. तुझे म्हणणे मी ऐकले आहे. मला जे करायला सांगितले ते मी जीव धोक्यात घालून केले आहे. 22 आता कृपा करुन माझे ऐक. मी खायला देते ते खा तरच तुला वाटचाल करायला तरतरी येईल.”

23 पण शौलने खायचा आग्रह निग्रहाने धुडकावून लावला.

शेवटी शौल बरोबरच्या सेवकांनीही तिच्याच सारखी त्याला खायची विनंती केली. तेव्हा अखेर शौलने त्यांचे म्हणणे मानले. जमिनीवरुन उठून तो पलंगावर बसला. 24 एक चांगले धष्टपुष्ट वासरु त्या बाईकडे होते ते तिने पटकन् मारले. मग पीठ मळून त्याची खमीर विरहित भाकर भाजली. 25 शौल आणि त्याचे सेवक यांना खायला दिले. त्या सर्वांनी ते खाऊन त्याच रात्री तिचा निरोप घेतला.

योहान 11:1-54

लाजराचा मृत्यू

11 लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या. ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता. त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.

पण येशूने हे ऐकून म्हटले, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे.” येशू मार्था, मरीया व लाजर यांच्यावर प्रीति करीत असे. म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला. नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”

शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी आपणांस दगडमार करु पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?”

येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो. 10 पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”

11 या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे. पण मी त्याला झोपेतून जागे करावयास जात आहे.”

12 तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “प्रभु, तो झोपी गेला असेल तर बरा होईल.” 13 पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.

14 तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, “लाजर मेला आहे. 15 आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आपण त्याच्याकडे जाऊ या.”

16 तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”

बेथानीत येशू

17 येशू आल्यावर त्याला समजले की, लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे. 18 बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते. 19 आणि पुष्कळसे यहुदी मार्था, मरीयेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासठी आले होते.

20 जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली. 21 “प्रभु” मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता, 22 पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”

23 येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”

24 मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.”

25 येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल. 26 आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो. तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?”

27 “होय प्रभु.” ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला असा देवाचा पुत्र आहेस.”

येशू रडतो

28 आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.” 29 जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली. 30 आता तोपर्यंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता. 31 तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून, ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले. 32 मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”

33 मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला. 34 तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?”

ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”

35 येशू रडला.

36 तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”

37 पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”

येशू लाजराला जिवंत करतो

38 मग येशू पुन्हा अंतःकरणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता. 39 येशूने म्हटले, “हा दगड काढा.”

मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.

40 येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

41 मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो. 42 आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा.” 43 असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.” 44 मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते.

येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”

यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)

45 जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 46 पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितले. 47 तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, “हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. 48 आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”

49 तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाची व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही! 50 तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”

51 तो हे स्वतः होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. 52 केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.

53 म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली. 54 यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.

स्तोत्रसंहिता 117

117 सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा.
    सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि
    देव आपल्याशी सदैव खरा वागतो.

परमेश्वराचा जयजयकार करा!

नीतिसूत्रे 15:22-23

22 जर एखाद्याला पुरेशी माहिती मिळाली नाही तर त्याच्या योजना कोसळतील. पण जर एखाद्याने शहाण्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तो यशस्वी होईल.

23 चांगले उत्तर दिल्यावर माणूस आनंदी होतो. आणि योग्य वेळी योग्य शब्द फारच चांगला असतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center