Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 24-25

दावीदाने शौलला लज्जित केले

24 शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग करुन त्यांना घालवल्यावर लोक त्याला म्हणाले, “दावीद एन गेदीजवळच्या वाळवंटात आहे.”

तेव्हा शौलने सर्व इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यांना घेऊन तो दावीदाच्या शोधार्थ निघाला. रानबकऱ्याच्या खडकाजवळ त्यांनी टेहेळणी केली. रस्त्यालगतच्या मेंढवाड्याजवळ शौल आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दीशेकरता गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक गुहेत पार आतल्या बाजूला होते. ते लोक दावीदला म्हणाले, “परमेश्वराने वर्तवलेला हाच तो दिवस. तो म्हणाला होता, ‘मी शत्रूला तुमच्या ताब्यात देईन मग तुम्ही त्याचे काहीही करा.’”

दावीद मग हळूच सरकत शौलजवळ पोचला. शौलच्या अंगरख्याचा एक तुकडा त्याने हळूच कापून घेतला. शौलने दावीदला पाहिले नाही. दावीदला नंतर आपल्या कृत्याबद्दल फार वाईट वाटले. तो आपल्या सोबत्यांना म्हणाला, “माझ्या धन्याच्या विरुद्ध अशी गोष्टी परमेश्वराने माझ्या हातून पुन्हा होऊ देऊ नये. शौल हा परमेश्वराने निवडलेला राजा आहे. त्या अभिषिक्त राजाच्या विरुद्ध मी असे काही करता कामा नये.” आपल्या माणसांना थोपवण्यासाठी, त्यांनी शौलाला इजा करु नये म्हणून तो असे म्हणाला.

शौल गुहेतून बाहेर पडून चालायला लागला. दावीद गुहेतून बाहेर आला आणि त्याने शौलाला साद घातली, “महाराज, माझे स्वामी!”

शौलाने मागे वळून पाहिले. दावीदाने मान लववून त्याला अभिवादन केले. शौलला तो म्हणाला, “दावीद आपला घात करील असे लोक म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देता? 10 मी तुमच्या केसाला धक्का लावणार नाही. आता तुम्हीच पाहा. आज गुहेत परमेश्वराने तुम्हाला माझ्या समक्ष आणले होते. पण मी तुमची गय केली. तुमचा वध केला नाही. ‘हे माझे धनी आहेत शौल हा परमेश्वराचा अभिषिक्त राजा आहे. त्याला मी धक्का लावणार नाही’ असे मी म्हणालो. 11 हा तुकडा पाहा तुमच्या अंगरख्याचा हा तुकडा मी कापून घेतला. मी तुमचा जीव घेऊ शकलो असतो पण मी तसे केले नाही. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्याविरुद्ध माझे कसलेही कारस्थान चाललेले नाही हे कृपया घ्यानात घ्या. मी तुमचे काहीही वाकडे केलेले नाही. पण तुम्ही मात्र माझा जीव घेण्यास सारखे टपलेले आहात. 12 परमेश्वरानेच याचा न्याय करावा. माझ्याशी तुम्ही असे वागलात याचे परमेश्वराने शासन खुशाल करावे. पण मी तुमच्या विरुद्ध लढणार नाही. 13 एक जुनी म्हण आहे:

‘वाईट लोकांपासून वाईटच निपजते.’

“माझ्या हातून काहीच वाईट झालेले नाही. मी दुष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही. 14 तुम्ही कोणाचा पाठलाग करत आहात? कोणाविरुद्ध इस्राएलचा हा राजा युद्धासाठी सज्ज आहे? तुम्ही ज्याचा पाठलाग करताय तो तुमच्या वाईटावर नाही. हा तर निळळ मेलेल्या कुत्र्याचा किंवा पिसवेचा पाठलाग झाला. 15 परमेश्वरालाच या गोष्टीचा न्याय करु द्या. आपल्या दोघांमध्ये निवाडा करु द्या. मला पठिंबा देवून माझेच खरे असल्याचे तो दाखवील. माझे तुमच्यापासून रक्षण करील.”

16 दावीदचे बोलून झाले तेव्हा शौलने विचारले, “दावीद, माझ्या मुला, तुच हे बोलतो आहेस का?” शौलला रडू फुटले. तो हमसाहमशी रडला.

17 तो पुढे म्हणाला, “तुझे खरे आहे. माझे चुकले. तू माझ्याशी नेहमी चांगलाच वागलास. पण मी मात्र वाईट वागलो. 18 तू काय चांगले केलेस ते आत्ता सांगितलेस. परमेश्वराने तुझ्यासमोर मला आणूनही तू मला मारले नाहीस. 19 मी तुझा शत्रू नव्हे हे यावरुन दिसतेच. शत्रू आपल्या तावडीत सापडल्यावर त्याला कोणी असे जाऊ देत नाही. शत्रूशी कोणी असे चांगले वागत नाही. आज तू माझ्याशी ज्या चांगुलपणाने वागलास त्याचे तुला देव चांगले फळ देईल. 20 तू आता राजा होणार आहेस हे मला माहीत आहे. तू इस्राएलवर राज्य करशील. 21 आता मला एक वचन दे. परमेश्वराची शपथ घेऊन तू माझ्या मुलाबाळांना मारणार नाहीस असे कबूल कर. माझी नावनिशाणी नाहीशी करणार नाहीस असे कबूल कर.”

22 तेव्हा दावीदाने त्याला तसे वचन दिले. शौलाच्या कुटुंबाचा संहार न करण्याचे कबूल केले. तेव्हा शौल घरी परतला. दावीद आणि त्याची माणसे गडावर परतली.

दावीद आणि मूर्ख नाबाल

25 शमुवेल मरण पावला. तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून दुखवटा व्यक्त केला. शमुवेलचे दफन त्यांनी रामा येथील त्याच्या घराजवळ केले.

नंतर दावीद पारानच्या वाळवंटाकडे गेला. मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंढरे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंढरांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला. हा कालेब वंशातला असून त्याचे नाव नाबाल होते. त्याची बायको अबीगाईल. ती हुशार तसेच सुंदर होती. पण नाबाल मात्र नीच आणि दुष्ट होता.

नाबाल त्याचे लोकर कातरण्याचे काम करत होता तेव्हा दावीद वाळवंटात होता. त्याला काही नाबालची गोष्टी कळली. तेव्हा दावीदाने दहा तरुणांना त्याच्याशी बोलायला पाठवले. तो म्हणाला, “कर्मेलला जा. नाबालला भेटा आणि माझ्यातर्फे त्याला नमस्कार सांगा.” दावीदाने याखेरीज नाबालसाठी निरोपही दिला. तो असा, “तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे कुशल आहेना? तुझे सर्व व्यवस्थित चालले आहेना? तुझ्याकडे लोकर कातरण्याचे काम चालले आहे असे मी ऐकले. तुझ्याकडचे धनगर नुकतेच इथे आले होते. त्यांना आमच्याकडून काहीही उपद्रव झालेला नाही. कर्मेल येथे ते असताना त्यांच्याकडून आम्ही काही घेतलेले नाही. तू त्यांनाही विचार तेही हेच सांगतील. मी पाठवलेल्या या तरुणांवर लोभ असू दे. तुझ्या या भरभराटीच्या काळात आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तेव्हा या तरुणांना तू तथाशक्ती काही तरी द्यावेस. माझ्यासाठी, तुझा या मित्र दावीदासाठी म्हणून एवढे कर.”

दावीदाच्या सांगण्याप्रमाणे ते तरुण नाबाल कडे गेले. त्यांनी दावीदचा निरोप नाबालला सांगितला. 10 पण नाबाल त्यांच्याशी अतिशय क्षुद्रपणे वागला. तो म्हणाला, “कोण हा दावीद? हा इशायचा मुलगा कोण? आजकाल बरेच दास आपल्या मालकांकडून पळून जातात. 11 भाकर आणि पाणी माझ्याकडे आहे. तसेच या लोकर कातरणाऱ्या माझ्या नोकरांसाठी काही मांस आहे. पण असल्या अनोळखी लोकांना मी काहीही देणार नाही.”

12 हे एकून ते सगळे दावीदकडे परत आले आणि नाबाल बोलला ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. 13 तेव्हा दावीद त्यांना म्हणाला, “आता तलवारी हाती घ्या” आणि दावीदसकट या सर्वांनी शस्त्र उचलले. जवळजवळ चारशे जण दावीद बरोबर होते. दोनशे माणसे तेथेच सामानसुमानाजवळ राहिली.

अबीगईल हे संकट टाळते

14 नाबालच्या एका सेवकाने अबीगईलला ही खबर दिली. तो म्हणाला, “दावीदाने आपल्या धन्याकडे काही तरुणांना भेटायला पाठवले होते. पण नाबाल त्यांच्याशी क्षुद्रपणे वागला. 15 त्या माणसांची वागणूक मात्र चांगली होती. मेंढरांबरोबर आम्ही उघड्यावर होतो. दावीदची माणसेही तेथेच वावरत होती. पण त्यांनी आमचे काहीही वाकडे केले नाही. आमची कुठलीही गोष्ट चोरीला गेली नाही. 16 दावीदाच्या लोकांनी आमचे दिवस रात्र रक्षण केले. जणू त्यांनी आमच्या भोवती तटच उभारला होता. आम्ही मेंढरांमागे असतांना त्यांचे आम्हाला संरक्षण होते. 17 आता तुम्हीच विचार करून काय ते ठरवा. नाबालचे कृत्य अविचारीपणाचे आहे. त्या मुळे आमच्या धन्यावर आणि त्याचा कुटुंबावर संकट ओढवणार आहे.”

18 अबीगईलने तेव्या वेळ न गमावता दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे धान्य, द्राक्षाचे शंभर घड, आणि सुक्या अंजिराच्या दोनसे ढेपा एवढे सामान गाढवांवर लादले। 19 आपल्या नोकरांना तिने संगितले, “तुम्ही हे घेउन पुढे व्हा. मी आलेच.” नवऱ्याला तिने ही गोष्ट सांगितली नाही.

20 आपल्या गाढवावर बसून ती डोंगराच्या दुसऱ्या बाजूकडून जायला लागली. तेव्हा तिला समोरून दावीद आणि त्याचा बरोबरची माणसे येताना दिसली.

21 ती भेटायच्या आधी दावीद म्हणत होता, “मी वाळवंटात नाबालच्या मालमत्तेचे रक्षण केले. त्याची मेंढरे चुकू दिली नाहीत. मी काहीही अपेक्षा न ठेवता हे केले. त्याच्याशी चांगले वागूनही तो आता असे वाईट वागत आहे. 22 आता मात्र त्याच्या कुटुंबातील एकजण जरी उद्यापर्पंत शिल्लक राहिला तरी देव मला शिक्षा करील.”

23 तेवढ्यात अबीगईल तेथे पोचली. दावीदला पाहताच ती लगबगीने गाढवावरुन उतरली. दावीदला तिने वाकून आभिवादन केले. 24 त्याच्या पायाशी लोळण घेत ती त्याला म्हणाली, “कृपया मला बोलू द्या. मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जे झाले त्याबद्दल दोष माझा आहे. 25 तुमच्या माणसांना मी पाहिले नाही. त्या नीच नाबालकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे. त्याच्या नावाचा अर्थच नीच असा आहे आणि तो खरोखर तसाच आहे. 26 निर्दोष लोकांची हत्या तुमच्याहातून होण्यापासून परमेश्वराने तुम्हाला वाचवले आहे. परमेश्वर जिवंत असेपर्यंत तुम्ही येथे असेपर्यंत, तुमच्या वाईटावर असलेले लोक, तुमचे शत्रु यांची गत नाबाल प्रमाणेच होईल असे वाटते. 27 मी आत्ता तुमच्यासाठी हे भेट म्हणून आणले आहे. तुमच्या बरोबरच्या लोकांना हे सर्व द्या. 28 माझ्याहातून घडलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. परमेश्वर तुमच्या घराण्यावर कृपादृष्टी ठेवील. तुमच्या घराण्यातील खुप लोक राज्य करतील. तुम्ही परमेश्वराच्या वतीने युद्ध करता म्हणून परमेश्वर हे घडवून आणील. तुमच्या हयातीत तुमच्या बद्दल लोकांच्या मनात कधीही किंतू उदभवणार नाही. 29 कोणी तुमच्या जिवावर उठले तर परमेश्वर तुमचे रक्षण करील. पण गोफणीतीले धोंड्याप्रमाणे त्या मारेकऱ्याचा मात्र जीव घेईल. 30 परमेश्वराने तुमच्या भल्याचे आश्वासन दिले आहे आणि त्याचे वचन तो प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर तुम्हाला इस्राएलचा प्रमुख म्हणून नेमेल. 31 निर्दोष लोकांच्या हत्येचे पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्ही असा सूड उगवणार नाही. तुमची भरभराट होईल तेव्हा माझी आठवण असू द्या.”

32 तेव्हा दावीद अबीगईलला म्हणाला, “परमेश्वराचे, इस्राएलच्या परमेश्वराचे आभार मान. मला भेटायला पाठवल्या बद्दल परमेश्वराची स्तुतीकर. 33 तुझ्या निर्णयाबद्दल देव तुझे भले करो. आज निरपराध लोकांच्या हत्येपासून तू मला वाचवलेस. 34 खरोखर परमेश्वराची शपथ, तू लगबगीने आत्ता मला भेटायला आली नसतीस तर उद्या सकाळपर्यंत नाबालच्या कुटुंबातील एकही जण वाचला नसता.”

35 दावीदाने मग तिच्या भेटी स्वीकारल्या. तो तिला म्हणाला, “तू आता निर्धास्तपणे जा. तुझी विनंती मी ऐकली आहे. मी त्या प्रमाणे वागीन.”

नाबालचा मृत्यु

36 अबीगईल नाबालकडे गेली. तो घरीच होता. राजाच्या इतमामात खात पीत होता. मद्याच्या नशेत झिंगला होता व मजेत होता. तेव्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती त्याच्याशी या विषयावर काहीच बोलली नाही. 37 सकाळी नशा उतरल्यावर तो पूर्ण भानावर आला. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला सर्व काही सांगितले. हे ऐकून त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो दगडासारखा कड़क बनला. 38 जवळपास दहा दिवसानंतर परमेश्वराने त्याला मृत्युमुखी लोटले.

39 नाबालच्या मृत्युची बातमी दावीदाने ऐकली. तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वर धन्य होय. नाबालने माझा अपमान करायचा प्रयत्न केला. पण परमेश्वानेच मला वाचवले. माझ्या हातून अपराध घडणार होता. पण नाबालच्या चुकीबद्दल परमेश्वराने त्याला मृत्युदंड दिला.”

दावीदाने मग अबीगईलकडे निरोप पाठवला. तिला आपली पत्नी होण्याविषयी विनंती केली. 40 दावीदाचे सेवक कर्मेल येथे गेले आणि तिला म्हणाले, “दावीदाने आम्हाला पाठवले आहे. तू त्याच्याशी लग्न करवेस अशी त्याची इच्छा आहे.” 41 तिने नतमस्तक होऊन अभिवादन केले. ती म्हणाली, “मी तुमची दासी आहे. तुमच्या सेवेला तत्पर आहे. माझ्या धन्याच्या सेवकांचेही चरण धुण्यास माझी तयारी आहे.” [a]

42 मग ती तात्काळ गाढवावर बसून, त्या सेवकांबरोबर दावीदकडे निघाली. आल्याबरोबर तिने पाच दासी घेतल्या. दावीदची ती पत्नी झाली. 43 इज्रेल येथील अहीनवाम ही सुध्दा दावीदची बायको होती. तेव्हा अबीगईल आणि अहीनवाम अशा त्याच्या दोन बायका झाल्या. 44 शौलची मुलगी मीखल हिच्याशीही त्याचे लग्न झाले होते, पण शौलने आपल्या मुलीला माहेरी आणून तिचे पालती याच्याशी लग्न लावले. हा पालती गल्लीम येथील असून लइश याचा मुलगा होता.

योहान 10:22-42

येशूच्या विरोधात यहूदी पुढारी

22 यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण [a] जवळ आला. तो हिवाळा होता. 23 येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीत [b]होता. 24 यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. “किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!”

25 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला आधीच सांगितले. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो, ती कामे सुध्दा मी कोण आहे याची साक्ष देतात. 26 पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत. 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात. 28 मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही. 29 माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही. 30 माझा पिता आणि मी एक आहोत.”

31 तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडें उचलले. 32 परंतु येशू त्यांना म्हणाला, “पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जिवे मारीत आहात?”

33 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हांला मारीत नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वतःला देवासारखेच आहोत असे मानता! आणि म्हणून आम्ही तुम्हांला धोंडमार करुन ठार करीत आहोत!”

34 येशूने उत्तर दिले, “तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे; ‘मी म्हणालो, तुम्ही देव आहात’ [c] 35 ज्या लोकांना देवाने त्याची आज्ञा वचने दिली त्यांच्याविषयी ते सांगते. पवित्र शास्त्रात त्या लोकांना देवाने असे म्हटले आणि पवित्र शास्त्र नेहमीच खरे आहे. 36 त्याच्या कामासाठी देवाने मला निवडले. देवाने मला जगात पाठविले. मी देवाचा पुत्र आहे. आणि तुम्ही म्हणता, मी बोलतो त्या गोष्टी देवाविरूद्ध आहेत, 37 जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. 38 परंतु माझा पिता करतो तीच कृत्ये जर मी करतो, तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा. मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की, पिता माइयामध्ये आहे, आणि मी पित्यामध्ये आहे.”

39 यहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला. परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला.

40 मग येशू यार्देन नदी ओलांडून माघारी गेला. येशु जेथे योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे तेथे गेला. येशू तेथेच राहिला. 41 आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. लोक म्हणाले, “योहानाने कधी चमत्कार केला नाही. परंतु योहानाने या मनुष्याविषयी जे सांगितले ते खरे आहे.” 42 आणि त्याठिकाणी अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.

स्तोत्रसंहिता 116

116 परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो
    ते मला खूप आवडते.
मी त्याला मदतीसाठी हाक मारतो
    आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
मी जवळ जवळ मेलो होतो.
    मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते.
माझ्या भोवती थडगे आवळले जात होते.
    मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो.
नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले.
    मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
परमेश्वर खूप चांगला आणि कृपाळू आहे.
    देव दयाळू आहे.
परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो.
    मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उध्दार केला.
माझ्या आत्म्या शांत हो!
    परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे.
देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस
    तू माझे अश्रू थोपविलेस.
    तू मला पतनापासून वाचविलेस.
मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची
    सेवा करणे चालूच ठेवीन.

10 “माझा सत्यानाश झाला”
    असे मी म्हणालो तरी मी विश्वास ठेवणे चालूच ठेवले.
11 मी घाबरलो होतो तेव्हा सुध्दा मी म्हणालो होतो,
    सगळे लोक खोटारडे आहेत.

12 मी परमेश्वराला काय देऊ शकतो?
    माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.
13 त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन
    आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
14 मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन.
    आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.

15 परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो.
    परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
16 मी तुझा सेवक आहे.
    मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे.
    परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
17 मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन.
    मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन.
    आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.

19 मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन.

परमेश्वराचा जयजयकार करा.

नीतिसूत्रे 15:20-21

20 शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख माणूस त्याच्या आईला लाज आणतो.

21 मूर्ख गोष्टी करण्यात मूर्खाला आनंद मिळतो. पण चांगला माणूस योग्य गोष्टी काळजीपूर्वक करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center