Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the EHV. Switch to the EHV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 22-23

दावीदाची भटकंती

22 दावीद मग गथहून निघाला तो अदुल्लाम गुहेत पोचला. दावीदाच्या भावांनी आणि नातलगांनी हे ऐकले तेव्हा ते त्याला तिथे भेटायला गेले. वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत सापडलेले, कर्जबाजारी झालेले. आयुष्याला त्रासलेले असे बरेच जण दावीदकडे आले. त्याच्या भोवती अशी चारशे माणसे जमली. त्यांचा तो नेता होता.

अदुल्लामहून तो मवाबातील मिस्पा येथे गेला. मवाबच्या राजाला तो म्हणाला, “परमेश्वराने माझे काय करायचे ठरवले हे मला कळेपर्यंत कृपया माझ्या आईवडिलांना तुमच्या आश्रयाने राहू द्या.” एवढे बोलून आपल्या आईवडिलांना त्याने तिथे सोडले आणि स्वतः किल्ल्याकडे परतला.

पण गाद हा संदेष्टा दावीदला म्हणाला, “इथे राहू नको. यहूदा प्रांतात जा.” तेव्हा दावीद निघाला आणि हरेथ नामक वनात आला.

अहीमलेखच्या कुटुंबियांचा शौलकडून वध

दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांचा इतरांना पत्ता लागला आहे हे शौलला कळले. तो गिबा येथे एका टेकडीवर झाडाखाली बसला होता. हातात भाला होता. सर्व अधिकारी त्याच्या भोवती उभे होते. शौल त्यांना उद्देशून म्हणाला, “बन्यामीन लोकहो, ऐका हा इशायपुत्र दावीद तुम्हाला शेत आणि द्राक्षमळे देईल असे तुम्हाला वाटते का? तो तुम्हाला बढत्या देऊन शंभरांवर, हजारांवर अधिकारी नेमील असे तुम्ही समजता का? माझ्याविरुद्ध तुम्ही कटकारस्थाने रचत आहात. योनाथान बद्दल तुमच्या पैकी एकानेही मला विश्वासात घेतले नाही. या इशायच्या मुलाबरोबर त्याचा करार झालेला आहे हे कोणी मला सांगितले नाही. तुमच्या पैकी कोणी माझी काळजी घेत नाही. योनाथानने दावीदला प्रोत्साहन दिले हे तुमच्यापैकी कोणीही मला कळू दिले नाही. लपून राहून माझ्यावर हल्ला करायला योनाथानने दावीदला, माझ्या सेवकाला सांगितले. दावीदाचे सध्या तेच चालले आहे.”

अदोमी दवेग तेव्हा तिथेच होता. तो म्हणाला, “मी दावीदला नोब येथे पाहिले. अहिटूबचा मुलगा अहीमलेख याला भेटायला तो आला होता. 10 अहीमलेखने दावीदासाठी परमेश्वरापुढे प्रार्थना केली, दावीदला खायला दिले. शिवाय त्याला गल्याथ या पलिष्ट्याची तलवार सुध्दा दिली.”

11 हे ऐकून शौलाने या याजकाला आपल्यापुढे हजर करायची आज्ञा दिली. त्याच्या सर्व नातेवाईकांनाही आणायला सांगितले. अहीमलेखचे नातेवाईक नोब येथे पुरोहित होते. ते सर्व जण राजासमोर आले. 12 शौल अहीमलेखाला म्हणाला, “अहीटूबच्या मुला, आता ऐक.”

अहीमलेख म्हणाला, “आज्ञा. सरकार.”

13 शौल अहीमलेखला म्हणाला, “तू आणि इशायचा मुलगा दावीद यांनी माझ्याविरुध्द कट का केलात? दावीदला तू भाकर दिलीस व तलवारही पुरवलीस. त्याच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केलीस आणि आता दावीद हल्ला करायला सज्ज आहे.”

14 अहीमलेख म्हणाला, “दावीद अतिशय भरवशाचा आहे. तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याच्याइतका विश्वासू कोणी नाही. तो तुमचा जावईही आहे. तुमच्या अंगरक्षकांचा तो प्रमुख आहे. तुमचे कुटुंबीय त्याला मान देतात. 15 त्याच्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करायची ही पहिलीच वेळ नव्हे. मला किंवा माझ्या नातेवाईकांना बोल लावू नका. आम्ही तुमचे सेवक आहोत. काय चालले आहे याची आम्हाला अजिबात कल्पना नाही.”

16 पण राजा त्याला म्हणाला, “तू आणि तुझे नातेवाईक यांना मृत्युदंड दिला पाहिजे.” 17 राजाने मग आपल्या जवळच्या रक्षकांना हुकूम केला, “परमेश्वराच्या याजकांना ठार करा. त्यांनी दावीदाची बाजू घेतली म्हणून त्यांना ही सजा आहे. दावीदाच्या पलायनाची त्यांना खबर असून त्यांनी मला तसे कळवले नाही.”

पण राजाच्या सेवकांनी परमेश्वराच्या याजकांवर शस्त्र उगारायला नकार दिला. 18 तेव्हा शौल राजाने दवेगला आज्ञा केली, “याजकांना तू ठार कर.” तेव्हा अदोमी दवेगाने ती आज्ञा अंमलात आणली. दवेगने त्यादिवशी पंच्याऐंशी याजकांना जिवे मारले. 19 नोब ही याजकांची नगरी होती. दवेगने तेथील सर्वांना ठार केले. पुरुष बायका, मुले, तान्ही बाळे, इतकेच नव्हे तर गायीगुरे, गाढवे, मेंढरे सुद्धा त्याने तलवारीने कापून काढली.

20 पण त्यातून अब्याथार हा अहीमलेखचा मुलगा निसटला. अहीमलेख हा अहीटूबचा मुलगा. अब्याथार पळून जाऊन दावीदाला मिळाला. 21 परमेश्वराच्या याजकांना शौलने ठार केल्याचे त्याने दावीदला सांगितले. 22 तेव्हा दावीद अब्याथारला म्हणाला, “मी नोब येथे त्यादिवशी त्या अदोमी दवेगला पाहिले होते. तो शौलला ही खबर देईल हेही मला माहीत होते. तुझ्या वडीलांच्या कुटुंबाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. 23 शौल तुझ्या जिवावर उठला आहे तसा माझ्याही जीवावर उठला आहे. माझ्याजवळ राहा. भिऊ नको. माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.”

कईला येथे दावीद

23 लोकांनी दावीदला सांगितले, पलिष्टी कईला विरुद्ध लढत आहेत. तेथील खळ्यावरचे धान्य ते लुटून नेत आहेत.

दावीदाने परमेश्वराला विचारले, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु का?”

परमेश्वराने सांगितले, “जरुर पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाचे रक्षण कर.”

पण दावीद बरोबरचे लोक त्याला म्हणाले, “जरी आपण यहूदात आहोत. तरी किती भीतीच्या वातावरणात आपण इथे आहोत. मग प्रत्यक्ष पालिष्टी सैन्याजवळ गेल्यावर आपले काय होईल?”

दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, परमेश्वराने पुन्हा सांगितले, “कईला येथे जा. पलिष्ट्यांचा पाडाव करायला मी तुम्हाला मदत करतो.” तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर कईला येथे गेला. त्यांनी पलिष्ट्यांशी युध्द केले. पलिष्ट्यांचा पराभव करुन त्यांची गुरे पळवली. अशाप्रकारे कईलाच्या लोकांचे त्यांनी रक्षण केले. (अब्याथार दावीदाकडे पळून आला तेव्हा त्याने आपल्याबरोबर एफोद आणाला होता.)

दावीद कईला येथे असल्याचे लोकांनी शौलला सांगिते. शौल म्हणाला, “परमेश्वरानेच दावीदला माझ्या हाती दिले आहे. दावीद आता चांगला अडकला आहे. दरवाजे आणि अडसर असलेल्या नगरात तो आता कोंडला गेला आहे.” शौलने मग युध्दासाठी आपल्या सैन्याला पुकारले. दावीदला आणि त्याच्या लोकांना घेरण्यासाठी ते कईलाला जायला निघाले.

शौलची आपल्याविरुध्द मसलत चाललेली आहे हे दावीदला कळले. तेव्हा दावीदाने अब्याथार याजकाला एफोद आणण्यास सांगितले.

10 मग दावीदाने प्रार्थना केली, “परमेश्वरा, इस्राएलच्या देवा! कईला येथे येऊन माझ्यामुळे संपूर्ण नगराचा विध्वंस करायचा शौलाचा बेत आहे असे मी ऐकले. 11 खरोखरच शौल येथे येईल का? येथील लोक मला शौलाच्या हवाली करतील का? इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सेवकाला नीट सांग.”

परमेश्वराने शौल येणार असल्याचे सांगितले

12 पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाचे लोक मला आणि माझ्या साथीदारांना शौलच्या ताब्यात देतील का?” परमेश्वराने याचेही होय असे उत्तर दिले.

13 तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबर आलेली सुमारे सहाशे माणसे यांनी कईला सोडले. ते गावोगाव भटकंत राहिले, दावीद निसटल्याचे शौलला कळले. त्यामुळे तो तेथे आलाच नाही.

दावीदाचा शौलकडून पाठलाग

14 दावीद मग वाळवंटातील गढ्या, किल्ले यांच्या आश्रयाने राहू लागला. झीफच्या वाळवंटातील डोंगराळ भागातही तो राहिला. शौल दावीदाचा माग काढायचा प्रयत्न करत होता. पण परमेश्वराने दावीदला त्याच्या हाती लागू दिले नाही.

15 झीफच्या वाळवंटात होरेश येथे असताना शौल आपल्या पाठलागावर येत आहे हे पाहून दावीद घाबरला. 16 शौलचा मुलगा योनाथान दावीदला होरेश येथे भेटायला गेला. त्याने दावीदची परमेश्वरावरची श्रद्धा आणखी दृढ केली. 17 योनाथान दावीदला म्हणाला, “घाबरु नको. माझ्या वडीलांकडून तुला दुखापत होणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील. मी तुझ्या खालोखाल असेन. माझ्या वडीलांनाही हे माहीत आहे.”

18 मग त्या दोघांनी परमेश्वरासमोर करार केला. तिथून योनाथान आपल्या घरी गेला. दावीद होरेश येथेच राहिला

झीफचे लोक शौलाला दाविदा बद्दल सांगतात

19 झीफचे लोक गिबा येथे शौल कडे येऊन म्हणाले, “दावीद आमच्या भागात लपून बसलेला आहे. यशीमोनच्या दक्षिणेला हकीला पर्वतावरील होरेशच्या गढीत तो आहे. 20 हे राजा तू आता केव्हाही तिकडे ये, दावीदला तुझ्या हवाली करणे हे आमचे कर्तव्यच आहे.”

21 शौल त्यांना म्हणाला, “या मदतीबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. 22 आता त्याच्या बद्दल अधिक माहिती काढा. तो कुठे आहे, त्याला कोणीकोणी पाहिले आहे याचा पत्ता लावा. शौलने विचार केला, ‘दावीद फार धूर्त आहे, तो माझ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत आहे.’ 23 पुढे तो म्हणाला, त्याच्या दबा धरुन बसायच्या सर्व जागा हेरुन ठेवा आणि मग इथे येऊन मला सगळ्याची खबर द्या. मी मग तुमच्याबरोबर येईन. त्या भागात दावीद असेल तर त्याला शोधून काढीन. मग यहूदातील घराघरात शोधायची वेळ आली तरी बेहत्तर.”

24 झीफचे लोक मग परत गेले. शौल तेथे नंतर गेला.

दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यशीमोनच्या दक्षिणेला मावोनच्या वाळवंटात होते. 25 शौल आणि त्याची माणसे दावीदचा मागोवा काढत निघाली. पण लोकांनी त्याबद्दल दावीदला सावध केले. तेव्हा तो मावोनच्या वाळवंटातील खडका कडे गेला. शौलला तो मावोनच्या वाळवंटात असल्याचे कळले म्हणून शौल तिकडे गेला.

26 शौल डोंगराच्या एका बाजूला तर दावीद आणि त्याची माणसे त्याच डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून निसटून जाण्याच्या घाईत होता. शौल आणि त्याचे सैनिक दावीदला पकडण्यासाठी डोंगराला वेढा घालत होते.

27 तेवढ्यात एक निरोप्या शौलकडे आला. “पलिष्टी आपल्यावर हल्ला करायला आले आहेत. ताबडतोब चला” असा त्याने निरोप आणला.

28 तेव्हा शौलने दावीदचा पाठलाग थांबवून पलिष्ट्यांकडे कूच केले. म्हणून त्या खडकाला “निसटून जाण्याचा खडक” (सेला हम्मालकोथ) असे नाव पडले. 29 दावीद मग मावोनचे वाळवंट सोडून एन गेदीच्या गडावर राहिला.

योहान 10:1-21

मेंढपाळ आणि त्याची मेंढरे

10 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो, तेव्हा त्याने दाराचाच उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारु आहे. तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मेंढरांची काळजी घेणारा दारातूनच आत जातो, तो मेंढपाळ आहे. दारावरचा पहारेकरी मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात, मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाका मारतो, आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो. आपली सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्यांच्या पुढे पुढे चालतो. (त्यांचे नेतृत्व करतो). मेंढरे त्याच्या मागोमाग जातात. कारण ती त्याचा आवाज ओळखतात. अनोळखी माणसांच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत. ती त्या माणसापासून दूर पळून जातील. कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो.”

येशूने लोकांना हा दाखला सांगितला. परंतु तो काय सांगत आहे हे लोकांना समजले नाही.

येशू उत्तम मेंढपाळ आहे

म्हणून येशू पुन्हा म्हणाला. “मी तुम्हांला खरे सांगतो. मी मेंढरांचे दार आहे. माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटारु होते. मेंढरांनी त्यांचे आवाज ऐकले नाहीत. मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. 10 चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे.

11 “मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो. 12 ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो. मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणार माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करुन त्यांची दाणादाण करतो. 13 मजूर पळून जातो कारण तो रोजंदारीवरचा कामगार असतो, तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही.

14-15 “मी मेंढरांची (लोकांची) काळजी घेणारा मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो. आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात. या मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. 16 माझी दुसरीही मेंढरे आहेत ती येथे या कळपात नाहीत. त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे. ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्यकाळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. 17 मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीति करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो. 18 तो कोणी माझ्यापासून घेत नाही. मी माझा स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे. आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.”

19 येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे यहूदी लोकांचे आपापसात एकमत होईना. 20 यहूदी लोकांपैकी पुष्कळजण म्हणाले, “याला भूत लागले आहे. म्हणून याचे डोके ठिकाणावर नाही. त्याचे का ऐकावे?”

21 परंतु दुसरे काही जण म्हणाले, “हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरविलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळीच नाही!”

स्तोत्रसंहिता 115

115 परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको.
    सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि
    आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
आमचा देव कुठे आहे,
    याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
देव स्वर्गात आहे
    आणि त्याला हवे ते तो करतो.
त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत.
    कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही.
    त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही,
    त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही.
    त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही
    आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात
    ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.

इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
    परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10 अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव.
    परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11 परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा.
    परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.

12 परमेश्वर आमची आठवण ठेवतो.
    परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल.
परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल.
    परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13 परमेश्वर त्याच्या लहान आणि
    मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.

14 परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल.
    अशी मी आशा करतो.
15 परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली
    आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
16 स्वर्ग परमेश्वराचा आहे.
    पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
17 मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
    जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18 पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो
    आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू.

परमेश्वराची स्तुती करा.

नीतिसूत्रे 15:18-19

18 लवकर रागावणारे लोक संकटे आणतात. पण संयमी माणूस शांतता आणतो.

19 आळशी माणसाला सगळीकडे संकटे मिळतील पण इमानदार माणसासाठी आयुष्य सोपे असेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center