Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the EHV. Switch to the EHV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 14

योनाथानचा पलिष्ट्यांवर हल्ला

14 त्या दिवशी शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण खिंडीपलीकडील पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ. आपल्या वडीलांना मात्र त्याने हे सांगितले नाही.”

शौल तेव्हा गिबाच्या सीमेपाशी मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली बसला होता. जवळच धान्याचे खळे होते. शौल सोबत सहाशे माणसे होती. त्यातील एकाचे नाव अहीया. शिलो येथे एली म्हणून परमेश्वराचा याजक होता. त्याच्या जागी आता हा होता. अहीयाने एफोद घातला होता. ईखाबोदचा भाऊ अहीदूब याचा हा मुलगा. ईखाबोद फिनहासचा आणि फिनहास एलीचा मुलगा. योनाथान निघून गेला हे लोकांना माहीत नव्हते.

खिंडीच्या दोन्ही बाजूला मोठमोठे सुळके होते. योनाथानने त्यांच्या मधून पलिष्ट्यांच्या ठाण्यावर जायचे ठरवले. एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसऱ्याचे सेने असे होते. एक सुळका उत्तरेला मिखमाशच्या दिशेने तर दुसरा दक्षिणेला गिबाकडे वळलेला होता. योनाथान आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “चल त्या परकीयांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आपल्या हातून त्यांचा पराभव करील. सैन्य कमी की जास्त याचा परमेश्वराला काय फरक पडतो?”

तेव्हा तो सेवक म्हणाला, “तुम्ही म्हणाल तसे करु. मी आपल्याबरोबरच आहे.”

योनाथान म्हणाला, “चल तर! ही खिंड ओलांडून त्यांच्या पहारेकऱ्यांपर्यंत जाऊ. त्यांना आपल्याला पाहू दे. ‘आहात तिथेच थांबा, आम्ही तेथे येतो’ असे ते म्हणाले तर आपण तिथेच थांबू. आपण पुढे जायचे नाही. 10 पण त्यांनी पुढे यायला सांगितले तर मात्र पुढे व्हायचे. तसे झाले तर ती देवाची खूण समजायची. याचा अर्थ असा की त्यांचा पराभव करण्याची परमेश्वराने आपणास मुभा दिली आहे.”

11 हे दोघे, पलिष्टी सैनिकांच्या नजरेच्या टप्प्यात आले. ते सैनिक म्हणाले, “पाहा, ते बिळात लपून राहिलेले इब्री आता बाहेर पडत आहेत.” 12 त्या छावणीतील पलिष्ट्यांनी या दोघांना “वर या म्हणजे चांगला धडा शिकवतो” असे धमकावले.

योनाथान आपल्या सेवकाला म्हणाला, “चल माझ्या मागोमाग. परमेश्वर आता आपल्या हातून पलिष्ट्यांना नेस्तनाबूत करील.”

13-14 योनाथान मग हाता पायांनी आधार घेत घेत तो कडा चढून गेला. त्याचा सेवक त्याच्या पाठोपाठ होताच. दोघांनी मिळून पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यांनी त्या एक बिघा जमिनीवर पहिल्या चढाईत वीसजणांना ठार केले. समोरुन येणाऱ्यांवर योनाथानने हल्ला केला आणि त्यात जखमी झालेल्यांना योनाथानच्या सेवकाने मागोमाग येऊन ठार केले.

15 तेव्हा छावणीत, शेतात, किल्ल्यावर पसरलेल्या सर्व पलिष्ट्यांमध्ये घबराट पसरली. चांगल्या शूर सैनिकांनीही धास्ती घेतली. त्यांच्या पायाखालची भूमी कंपायमान झाली आणि पलिष्टी भयभीत झाले.

16 इकडे बन्यामीनच्या भूमीतील गिबा येथे असलेल्या शौलच्या रक्षकांनी पलिष्ट्यांना सैरावैरा पळताना पाहिले. 17 शौल आपल्या रक्षकांना म्हणाला, “आपली माणसे मोजा. कोण छावणी सोडून गेले ते पाहू.”

मोजणीतून योनाथान आणि त्याचा सेवक गेल्याचे लक्षात आले.

18 शौल अहीयाला म्हणाला, “परमेश्वराचा पवित्रकरारकोश आण” (त्यावेळी देवाचा हा पवित्र करारकोश इस्राएलांजवळ होता.) 19 अहीयाशी बोलत आसताना शौल परमेश्वर काही सल्ला देईल म्हणून वाट पाहात होता. इकडे पलिष्ट्यांच्या ठाण्यावरील गलबला व गोंधळ वाढत चालला. शौलचा धीर सुटत चालला. शेवटी तो याजक अहीया याला म्हणाला, “आता प्रार्थना पुरे. तु थांब.”

20 शौलने सैन्य जमा केले आणि तो युद्धाला भिडला. पलिष्ट्यांची आता दाणादाण उडाली. इतकी की ते आपापसातच लढू लागले. 21 पूर्वी पलिष्ट्यांचे सेवक असलेले काही इब्री सध्या पलिष्ट्यांच्या छावणीत होते. ते आता शौल आणि योनाथान यांना जाऊन मिळाले. 22 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात दडून राहिलेल्या इस्राएलांनी पलिष्ट्यांच्या पलायनाची बातमी ऐकली. तेव्हा तेही युद्धात उतरले आणि त्यांनी पलिष्ट्यांचा पाठलाग सुरु केला.

23 अशाप्रकारे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलांचा बचाव केला. युद्ध बेथ-आवेन कडे सरकले. जवळ जवळ दहा हजाराचे सर्व सैन्य शौलच्या पाठीशी होते. एफ्राईमच्या डोंगराळ परदेशातील सर्व नगरांमध्ये युद्ध पसरले.

शौलची दुसरी चूक

24 पण शौलच्या हातून त्या दिवशी मोठी चूक झाली. सर्व इस्राएल लोक दमले भागलेले आणि भुकेले होते. शौलने त्यांच्याकडून सक्तीने एक शपथ घेतली होती. “संध्याकाळ व्हायच्या आत आणि शत्रूचा पाडाव करण्यापूर्वी कोणी काही खाल्ले तर त्याला शासन होईल.” अशा त्या शपथेमुळे कोणीही अन्नग्रहण केले नव्हते.

25-26 लढत लढत लोक रानात शिरले. तिथे त्यांना जमिनीवर मधाचे पोळे दिसले पण ते पाहूनही लोकांनी त्यातील मधाला हात लावला नाही कारण शपथेचा धाक त्यांच्या मनात होता. 27 आपल्या वडीलांनी सर्वाना बळजबरीने अशी शपथ घ्यायाला लावली आहे याबद्दल योनाथानला काहीच माहीत नव्हते. तेव्हा त्याने आपल्या हातातील काठी पोळ्यात खुपसली आणि मध काढला. थोडा मध खाल्यावर त्याला चांगली तरतरी आली.

28 एक सैनिक योनाथानला म्हणाला, “तुमच्या वडीलांनी लोकांना शपथ घालून बजावले आहे की आज कोणी काही खाल्ले तर त्याला शाप लागेल. म्हणून लोकांनी काही खाल्लेले नाही. ते भुकेने व्याकुळ झाले आहेत.”

29 योनाथान म्हणाला, “माझ्या वडीलांनी देशावर खूप संकटे आणली आहेत. थोडासा मध खाताच मला पाहा कसे ताजेतवाने वाटू लागले! 30 लोकांनीही शत्रूच्या लूटीतून थोडे खाल्ले असते तर बरे झाले असते. आपण यापेक्षा जास्त पलिष्ट्यांना गारद करु शकलो असतो.”

31 मिखामाशापासून अयालोन पर्यंत पलिष्ट्यांचा पाडाव करता करता इस्राएल लोक फार थकून गेले होते. ते भुकेलेही होते. 32 त्यांनी पलिष्ट्यांची मेंढरे गुरे, वासरे लुटून आणली होती. आता ते भुकेने इतके कासावीस झाले होते की त्यांनी ती गुरे तिथेच जमिनीवर मारुन खाल्ली. त्यांचे रक्तसुद्धा चाटले.

33 तेव्हा एक जण शौलला म्हणाला, “पाहा, हा परमेश्वराच्या दृष्टीने अपराध आहे. ही माणसे तर रक्तासकट मांस खात आहेत.”

शौल म्हणाला, “तुम्ही पाप केले आहे. आता एक मोठा दगड लोटून येथे आणा.” 34 पुढे तो म्हणाला, “जा, त्या लोकांना जाऊन सांगा की प्रत्येकाने बैल मेंढरे माझ्यासमोर आणावी आणि मगच त्यांनी ती इथे कापावी. असे पाप करु नका. रक्ताने भरलेले मांस खाऊ नका.”

मग सर्वानी आपापली जनावरे तेथे आणली आणि मारली. 35 तेव्हा शौलने स्वतःहून परमेश्वरासाठी वेदी बांधली.

36 तो म्हणाला, “आज रात्री आपण पलिष्ट्यांवर हल्ला करु. त्यांचे सर्व हिरावून घेऊन त्या सर्वाना कापून काढू.”

सर्व सैन्याने त्याच्या म्हणण्याला साथ दिली.

पण याजक म्हणाला, “आपण परमेश्वराचा कौल मागू.”

37 म्हणून शौलने परमेश्वराला विचारले, “आम्ही आज पलिष्ट्यांवर चालून जाऊ का? तू आम्हाला त्यांचा पराभव करु देशील का?” पण त्यादिवशी परमेश्वराने शौलला उत्तर दिले नाही.

38 तेव्हा शौल म्हणाला, “सर्व अधिकाऱ्यांना, लोकनायकांना माझ्यासमोर बोलवा. आज कोणाच्या हातून पाप घडले आहे ते पाहू. 39 इस्राएलला तारणाऱ्या परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतो की अगदी माझा पोटचा मुलगा योनाथान याच्याहातून अपराध घडला असेल तरी त्याला देहान्त शासन होईल.” यावर कोणीही चकार शब्द ही काढला नाही.

40 मग शौल सर्व इस्राएलांना म्हणाला, “तुम्ही सर्व एका बाजूला उभे राहा. मी आणि माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होतो.”

सर्वानी ते मानले.

41 मग शौलाने प्रार्थना केली, “इस्राएलच्या परमेश्वरा, देवा, आज तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस? मी किंवा माझा मुलगा योनाथान याच्या हातून पाप घडले असेल तर उरीम टाक आणि लोकांच्या हातून पाप घडले असेल तर थुम्मीम टाक”

शौल आणि योनाथानच्या नावाने दान पडले आणि लोक सुटले. 42 शौल म्हणाला, “पुन्हा त्या टाका व दाखवा की मी व माझा मुलगा योनाथान पैकी कोण दोषी आहे.” मग योनाथान पकडला गेला.

43 शौल त्याला म्हणाला, “तू काय केलेस ते सांग.”

योनाथान म्हणाला, “कोठीच्या टोकावर मावेल एवढाच मध तेवढा मी चाखला त्यासाठी मी प्राणार्पण करायला हवे का?”

44 शौल म्हणाला, “माझा शब्द पाळला गेला नाही तर शासन करायला मी परमेश्वराला सांगितले आहे. तेव्हा तुला मेलेच पाहिजे.”

45 पण सर्व सैनिक शौलला म्हणाल, “योनाथानने आज इस्राएलकडे विजय खेचून आणला आहे. तेव्हा त्याने मेलेच पाहिजे का? खचितच नाही. आम्ही परमेश्वरापुढे शपथ घेऊन सांगतो की त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पलिष्ट्यांविरुद्ध लढायला परमेश्वराने योनाथानला मदत केली आहे.” अशाप्रकारे लोकांनी योनाथानला वाचवले. त्याला मृत्यूची सजा झाली नाही.

46 शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग केला नाही. पलिष्टी आपल्या जागी परतले.

शौलाचा इस्राएलच्या शत्रूंशी लढा

47 शौलने सर्व अधिकार आपल्या हाती घेऊन राज्य स्थापित केले. मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राज, पलिष्टी इत्यादी इस्राएलच्या भोवतालच्या सर्व शत्रूशी युद्ध केले. शौल जेथे जेथे गेला तेथे तेथे त्यांने शत्रूंचा पाडाव केला. 48 पराक्रम गाजवला. इस्राएलांची लूट करणाऱ्या सर्व शत्रूंपासून इस्राएलांची सुटका केली. अमालेकांचाही त्याने पराभव केला.

49 योनाथान, इश्वी, आणि मलकीशुवा हे शौलचे मुलगे. शौलच्या मोठ्या मुलीचे नाव मेरब आणि धाकटीचे मीखल. 50 अहीनाम ही त्याची पत्नी. ती अहीमासची मुलगी.

शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता. 51 शौलचे वडील कीश आणि काका नेर. ही अबियेलची मुले.

52 शौलने आयुष्यभर पराक्रम गाजवले. पलिष्ट्यांचा त्याने कडवा प्रतिकार केला. त्याला कुठेही शूर, पराक्रमी माणूस आढळला की त्याला तो सैनिकात भरती करुन घेई आणि अंगरक्षक म्हणून नेमी.

योहान 7:31-53

31 परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले, “आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करुन दाखवील काय? नाही! म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.”

यहुदी लोक येशूला अटक करण्याचा प्रयत्न करतात

32 लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुश्यांनी ऐकले. म्हणून मुख्य याजक आणि परुशी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले. 33 मग येशू म्हणाला, “मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन. नंतर ज्याने मला पाठविले, त्याच्याकडे मी परत जाईन. 34 तुम्ही माझा शोध कराल पण मी तुम्हांला सापडणार नाही.”

35 यहूदी आपापसात म्हणाले, “हा माणूस असा कोठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही? ग्रीक शहरात राहणाऱ्या यहूदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय? 36 हा माणूस म्हणतो, ‘तुम्ही माझा शोध कराल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही.’ तो असेही म्हणतो, ‘जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही.’ याचा अर्थ काय?”

येशू पवित्र आत्याविषयी सांगतो

37 सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठ्याने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38 जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतःकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” असे पवित्र शास्त्र सांगते. 39 येशू आत्म्याविषयी बोलत होता. लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता. कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता. परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता.

लोक येशूविषयी वाद करतात

40 येशूने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या. काही लोक म्हणाले, “हा माणूस खरोखरच संदेष्टा आहे.”

41 दुसरे म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.”

तर दुसरे काहीजण म्हणाले, “ख्रिस्त हा गालील प्रांतातून येणार नाही.” 42 पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “ख्रिस्त दावीद राजाच्या घराण्यातून येईल.” 43 आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “दावीद राजा राहत असे त्या बेथलहेम गावातून ख्रिस्त येईल.” तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना. 44 काहींना येशूला अटक करायचे होते पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही.

यहूदी पुढारी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार देतात

45 मंदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुश्यांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुश्यांनी शिपायांना विचारले, “तुम्ही येशूला का आणले नाही?”

46 मंदिराचे शिपाई म्हणाले, “तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत!”

47 मग परुशी म्हणाले, “म्हणजे येशूने तुम्हांलासुद्धा मूर्ख बनविले! 48 पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही! आम्हा परुश्यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही! 49 परंतु बाहेरच्या लोकांना नियसशास्त्राची माहिती नाही, त्यांच्यावर देवाचा कोप होईल!”

50 परंतु त्या घोळक्यात निकदेम हजर होता. यापूर्वी हा निकदेमच येशूला भेटायला आला होता [a] निकदेम म्हणाला, 51 “एखाद्या माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियसशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही. त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करु शकत नाही.”

52 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तू सुद्धा गालील प्रांतामधील आहेस काय? पवित्र शास्त्र वाचून पाहा! गालीलातून एकही संदेष्टा येणार नाही. हे तुला कळेल.”

व्यभिचार करताना पकडलेली स्त्री

53 नंतर ते सर्व यहूदी पुढारी आपापल्या घरी गेले.

स्तोत्रसंहिता 109

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

109 देवा, माझ्या प्रार्थनेला
    तुझे कान बंद करु नकोस.
दुष्ट लोक माझ्याविषयी खोटंनाटं सांगत आहेत.
    ते माझ्याबद्दल असत्य गोष्टी सांगत आहेत.
लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत.
    ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.
मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात म्हणून देवा,
    मी आता तुझी प्रार्थना करतो.
मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या
    पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत.
    मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करत होते.

“माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
    ते चुकले आहेत हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध.
माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे.
    माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
माझ्या शत्रूला लवकर मरु दे.
    त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.
माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ
    आणि त्याच्या बायकोला विधवा कर.
10 त्यांना त्यांचे घर गमावू दे
    आणि त्यांना भिकारी होऊ दे.
11 माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे
    आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
12 माझ्या शत्रूंशी कुणीही दयाळू असू नये असे मला वाटते.
    त्याच्या मुलांना कुणी दया दाखवू नये असे मला वाटते.
13 माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर.
    पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे.
14 परमेश्वराला माझ्या शत्रूच्या वडिलांच्या पापांची आठवण करुन दिली जाईल असे मला वाटते,
    त्याच्या आईची पापे कधीही पुसली जाऊ नयेत असे मला वाटते.
15 परमेश्वराला त्या पापांची सदैव आठवण राहील अशी मी आशा करतो.
    आणि तो लोकांवर माझ्या शत्रूला पूर्णपणे विसरुन जायची शक्ती देईल अशी मी आशा करतो.
16 का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही,
    त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही.
    त्याने गरीब, असहाय्य लोकांचे आयुष्य कष्टी केले.
17 त्या दुष्ट माणसाला दुसऱ्या लोकांचे वाईट कर
    असे सांगायला आवडायचे म्हणून त्या वाईट गोष्टी त्या माणसालाच होऊ दे.
तो दुष्ट माणूस लोकांचे भले होवो
    असे कधीही म्हणाला नाही, म्हणून त्याचेही भले होऊ देऊ नकोस.
18 शाप हेच त्याचे कपडे असू दे.
शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे.
    शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
19 शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडाळण्याचे वस्त्र असू दे,
    आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे.”

20 परमेश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या शत्रूंच्या बाबतीत करील अशी मी आशा करतो.
    जे लोक मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत,
    त्या सर्वांना परमेश्वर या गोष्टी करेल अशी मी आशा करतो.
21 परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस म्हणून
    तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव.
माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव.
22 मी फक्त एक गरीब, असहाय्य माणूस आहे.
    मी खरोखरच दुखी: आहे आणि माझे ह्रदयविदीर्ण झाले आहे.
23 दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपले आहे असे मला वाटते.
    कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्राणे मी आहे असे मला वाटते.
24 मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे.
    माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.
25 वाईट लोक माझा अपमान करतात.
    ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.
26 परमेश्वरा, देवा, मला मदत कर.
    तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
27 नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल.
    तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.
28 ते वाईट लोक मला शाप देतात.
    परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस.
    त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन.
29 माझ्या शत्रूंना लाज आण.
    त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालायला लाव.
30 मी परमेश्वराला धन्यवाद दिले.
    खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
31 का? कारण परमेश्वर असहाय्य लोकांच्या मदतीसाठी उभा राहातो
    जे लोक त्यांना ठार मारायची शिक्षा देतात त्यांच्यापासून देव त्यांना वाचवतो.

नीतिसूत्रे 15:5-7

मूर्ख माणूस त्याच्या वडिलांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लोक शहाण्या माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो.

चांगले लोक पुष्कळ बाबतीत श्रीमंत असतात. पण दुष्टाकडे ज्या गोष्टी असतात त्यामुळे त्याच्यावर संकटे येतात.

शहाणे लोक बोलतात तेव्हा नवीन माहिती मिळते. पण मूर्ख लोक ऐकण्यासारखे काही बोलत नाहीत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center