Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 12-13

शमुवेलचे राजाबद्दल लोकांसमोर भाषण

12 शमुवेल सर्व इस्राएलांना उद्देशून म्हणाला, “मी सर्व काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले आहे. तुमच्यावर राजा नेमला आहे. तो आता तुमचे नेतृत्व करील. मी आता म्हातारा झालो, थकलो पण माझी मुल तुमच्या बरोबर आहेत. मी अगदी लहान असल्यापासून तुमचे नेतृत्व केले. हा मी इथे आहे. माझ्या हातून काही चुकलेले असेल तर ते परमेश्वराला आणि तुम्ही निवडलेल्या राजाला सांगा. मी कोणाचा बैल किंवा गाढव चोरले आहे का? कोणाला दुखवले किंवा फसवले का? कोणाकडून मी कधी पैसाच काय पण जोडा तरी लाच म्हणून घेतला का? तसे असेल तर मी त्याची भरपाई करीन.”

यावर सर्व इस्राएलांनी उत्तर दिले, “नाही, तुमच्या हातून कोणतेही कुकर्म झालेले नाही. तुम्ही कधी आम्हाला फसवले नाहीत की लाच घेतली नाहीत.”

तेव्हा शमुवेल सर्वाना म्हणाला, “आज या घटनेला परमेश्वर आणि त्याने निवडलेला राजा साक्षी आहेत. तुमचे म्हणणे त्यांनी ऐकले आहे. माझ्याहातून काहीही वावगे घडले नसल्याचे तुमचे मत त्यांना माहीत आहे.” तेव्हा लोक एकमताने म्हणाले, “होय! परमेश्वर त्याला साक्षी आहे.”

मग शमुवेल म्हणाला, “काय काय घडले ते परमेश्वराला माहीत आहे. मोशे आणि अहरोन यांना त्यानेच नेमले. तुमच्या पूर्वजांनाही त्यानेच मिसरमधून सोडवले. आता सर्वजण येथे शांत उभे राहा म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी कोणकोणती सत्कृत्ये केली ती मी तुम्हाला सांगतो.

“याकोब मिसरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्या वंशजांचे जिणे कठीण केले तेव्हा त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली. म्हणून परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना पाठवले. त्यानी मग त्या तुमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले आणि या ठिकाणी आणले.

“पण तुमचे पूर्वज आपला स्वामी जो परमेश्वर त्याला विसरले. तेव्हा परमेश्वराने त्यांना सीसराचे गुलाम बनू दिले. सीसरा हा हासोर येथील सैन्याचा सेनापती होता. त्यानंतर परमेश्वराने त्यांना पलिष्टी आणि मवाबचा राजा यांचे गुलाम बनवले. हे सर्व तुमच्या पूर्वजांबरोबर घडले. 10 तेव्हा तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली. ते म्हणाले, ‘आमच्या हातून पातक घडले. परमेश्वराला सोडून बाल, अष्टारोथ या भलत्या दैवतांची आम्ही भक्ती केली. पण आता आमची शत्रूच्या तावडीतून सुटका कर म्हणजे आम्ही फक्त तुझीच सेवा करु.’

11 “तेव्हा मग परमेश्वराने यरुबाबेल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुवेल यांना पाठवून शत्रूंपासून तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थता लाभली. 12 पण मग अम्मोन्यांचा राजा नाहाश याला तुमच्यावर चाल करुन येताना तुम्ही पाहिले आणि तुम्हाला संरक्षणासाठी राजा असाव असे वाटले. प्रत्यक्ष परमेश्वर तुमचा देव राजा असतानाही तुम्हाला असे वाटले. 13 तेव्हा तोही तुम्हाला मिळाला. परमेश्वरानेच त्याची निवड केली. 14 परमेश्वर तुमचे सतत रक्षण करील पण तुम्ही मात्र त्यासाठी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत; सन्मानपूर्वक परमेश्वराची सेवा करा. त्याच्या आज्ञेविरुध्द जाऊन कोणाशी लढू नका. तुम्ही व तुमचा राजा यांनी परमेश्वर देवालाच मानावे. असे वागल्याने परमेश्वर तुमचे रक्षण करील. 15 पण त्याचा अवमान केलात, त्याच्या आज्ञेविरुध्द बंड केलेत तर तो तुमच्याकडे पाठ फिरवील. तुमचा व तुमच्या राजाचा नाश करील.

16 “आता स्तब्ध उभे राहा आणि परमेश्वराचे महान कृत्य आपल्या डोळ्यांदेखत पाहा. 17 सध्या गव्हाच्या कापणीचे दिवस [a] आहेत. मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याने ढगांच्या गडाडाटासह पाऊस पाडावा अशी मी विनंती करतो. तेव्हा, राजाची मागणी करुन आपण परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कृत्य केले आहे हे तुम्हाला कळेल.” 18 आणि शमुवेलने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे लोकांनी परमेश्वराची आणि शमुवेलची धास्ती घेतली.

19 ते शमुवेलला म्हणाले, “आम्हा दासांच्या वतीने तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आम्हाला मरु देऊ नका. आमच्या हातून अनेक पातके घडली आहेत. राजाची मागणी करुन तर आम्ही त्यात आणखी भरच घातली आहे.”

20 शमुवेल त्यांना म्हणाला, “तुमच्या हातून पापे घडली आहेत हे खरे, पण घाबरुन जाऊ नका. परमेश्वराला अनुसरायचे सोडू नका. मनोभावे त्याची सेवा करा. 21 मूर्ती म्हणजे निरर्थक वस्तू, निव्वळ पुतळे, तेव्हा त्यांची पूजा करु नका. मूर्ती तुमचे रक्षण करत नाहीत की मदतीला येत नाहीत त्या व्यर्थ होत.

22 “पण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करत नाही. उलट त्याने मोठ्या प्रेमाने तुम्हाला आपले मानले आहे. तेव्हा त्याच्या मोठ्या नावाखातर तो तुम्हाला सोडून देणार नाही. 23 आणि माझे म्हणाल, तर मी तुमच्या वतीने नेहमीच प्रार्थना करत राहीन. तसे मी केले नाही तर परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप ठरेल. चांगले आयुष्य जगायचा योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवत राहीन. 24 पण तुम्ही परमेश्वराला मानले पाहिजे. मनापासून त्याचीच सेवा केली पाहिजे. त्याने तुमच्यासाठी जे चमत्कार केले ते आठवले पाहिजेत. 25 पण तुम्ही आडमुठेपणा आणि दुष्टपणा दाखवलात तर मात्र केरसुणीने केर झटकावा तसा, तुम्हाला तुमच्या राजासह परमेश्वर नष्ट करुन टाकील.”

शौलाची पहिली चूक

13 आता शौलाला राजा होऊन वर्ष झाले होते. इस्राएलवरील त्याच्या सत्तेला दोन वर्षे झाल्यावर [b] त्याने इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यामीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.

गिबा येथील छावणीतील पलिष्ट्यांच्या योनाथानने पराभव केला. ते पलिष्ट्यांच्या सेनापतीच्या कानावर गेले. ते म्हणाले, “इब्री लोकांनी बंड केले आहे.”

शौल म्हणाला, “नेमके काय घडले ते इब्रींना ऐकू द्या” आणि त्याने आपल्या लोकांना इस्राएलभर रणशिंग फुंकून ही बातमी सांगायला सांगितली. सर्व इस्राएलांच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ट्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ट्यांना आता इस्राएलांबद्दल द्वेष वाटतो.”

सर्व इस्राएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला. इस्राएलांशी सामना करायला पलिष्टे ही सिध्द झाले. पलिष्ट्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथ [c] आणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-ओवनच्या पूर्वेला मिखमाश येथे तळ दिला.

आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ट्यांच्या कचाट्यांत सापडलो आहोत हे इस्राएलांच्या लक्षात आले. ते गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला. काही तर यार्देन नदी पलीकडे गाद, गिलाद या प्रांतात पळाले. शौल या वेळी गिलगाल येथेच होता. त्याच्या सैन्याचा भीतीने थरकाप उडाला होता.

शमुवेलने गिलगाल येथे भेटतो असे शौलाला सांगितले होते. त्याप्रमाणे शौलाने सात दिवस त्याची वाट पाहिली. पण शमुवेल पोचला नाही. तेव्हा सैन्य शौलला सोडून जायला लागले. तेव्हा शौल म्हणाला, “होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून द्या.” ती आणल्यावर शौलाने यज्ञार्पणे केली. 10 त्याचे हे आटोपते आहे तोच शमुवेल तेथे पोचला. शौल त्याला भेटायला पुढे झाला.

11 शमुवेलने विचारले, “तू काय केलेस?”

शौल म्हणाला, “माझे सैन्य पांगले. तुम्हीही दिलेल्या वेळेत आला नाहीत. पलिष्ट्यांची सेना मिखमाश येथे जमली. 12 तेव्हा मी विचार केला, पलिष्टी इथे गिलगाल मध्ये येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर अजून परमेश्वराला मदतीचे आवाहनही केले नाही. तेव्हा मी हे होमार्पण करण्याचे घाडस केले आहे.”

13 शमुवेल म्हणाला, “तुझा हा मूर्खपणा आहे. परमेश्वर तुझा देव याची आज्ञा तू पाळली नाहीस. त्याचे म्हणणे ऐकले असतेस तर इस्राएलवर तुझ्या वंशाचे राज्य निरंतर राहिले असते. 14 पण आता तुझे राज्य सतत राहाणार नाही. परमेश्वराला त्याचा शब्द मानणारा माणूस हवा आहे आणि तसा तो मिळाला आहे. तो आता नवा नेता बनेल. तू परमेश्वराची अवज्ञा केलीस म्हणून त्याने नवीन अधिपती नेमला आहे.” आणि शमुवेल गिलगाल सोडून चालता झाला.

मिखमाश येथे युद्ध

15 शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यामीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली. 16 आपला मुलगा योनाथान आणि हे सैन्य यांसह तो गिबा येथे राहिला. मिखमाश येथे पलिष्ट्यांचा तळ होता. 17 त्यांनी त्या भागातील इस्राएल रहिवाश्यांना धडा शिकवायचे ठरवले आणि निवडक सैन्याने हल्ला सुरु केला. पलिष्ट्यांच्या सैन्याच्या तीन तुकडया होत्या. पहिली तुकडी उत्तरेला अफ्राच्या वाटेने शुवाल जवळ गेली. 18 दुसरी बेथ-होरोनच्या वाटेने आग्न्नेय दिशेला गेली आणि तिसरी टोळी वाळवंटाच्या दिशेला असलेल्या सबोईम दरी कडील वाटेने गेली.

19 इस्राएलमध्ये लोहार नव्हते. त्यामुळे त्यांना लोखंडाच्या वस्तू करता येत नसत. पलिष्ट्यांनीही त्यांना ही विद्या शिकवली नाही कारण ते लोखंडी भाले, तलवारी करतील ही त्यांना धास्ती होती. 20 पलिष्टी फक्त त्यांना धार लावून देत असत. तेव्हा इस्राएलांना फाळ, कुदळी, कुऱ्हाडी यांना धार लावायची असेल तेव्हा ते पलिष्ट्यांकडे जात. 21 फाळ आणि कुदळीला धार लावण्यासाठी पलिष्टी लोहार 1/3 औंस रुपे घेत तर कुऱ्हाडी, दाताळे, अरी, पराण्या यांना धार लावायचा आकार 1/6 औंस रुपे एवढा होता. 22 अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.

23 पलिष्टी सैन्याच्या एका तुकडीने मिखमाशची खिंड रोखून धरली होती.

योहान 7:1-30

येशू आणि त्याचे भाऊ

यानंतर येशू गालील प्रांतात फिरला. येशूला यहूदीया प्रांतातूल प्रवास करायला नको होता, कारण तेथील काही यहूदी लोकांना येशूला जिवे मारायचे होते. यहूदी लोकांचा मंडपाचा सण [a] जवळ आला होता. म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले, “तू येथून सणासाठी यहूदीयात जा. म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील. लोकांना माहिती व्हावी असे एखाद्याला वाटत असेल तर त्याने तो करतो ती कामे लपवू नयेत. तू जगाला प्रगट हो. तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे.” येशूच्या भावांनीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.

येशू आपल्या भावांना म्हणाला. “माझी योग्य वेळ अजून आलेली नाही. पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल. जग तुमचा द्वेष करु शकत नाही. परंतु जग माझा द्वेष करते. कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगतो. तेव्हा तुम्ही सणासाठी जा. मी आत्ताच सणाला येणार नाही. माझी योग्य वेळ अजून आली नाही.” हे सांगितल्यानंतर येशू गालीलातच राहिला.

10 म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले. ते गेल्यावर मग येशूही गेला. परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही. 11 सणाच्या काळात यहूदी लोक येशूचा शोध करीत होते. यहूदी म्हणाले, “तो मनुष्य कोठे आहे?”

12 लोकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झालेला होता. त्यांतील अनेक लोक येशूविषयी आपसांत बोलत होते. काही म्हणाले, “तो चांगला मनुष्य आहे.” परंतु दुसरे काहीजण म्हणाले, “नाही, तो लोकांना ठकवितो.” 13 परंतु लोकांपैकी कोणीच येशूविषयी उघडपणे बोलायला धजत नव्हते. लोकांना यहूदी पुढाऱ्यांची भीति वाटत होती.

येशू यरुशलेमात शिक्षण देतो

14 अर्धाअधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली. 15 यहूदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “हा माणूस शाळेत कधी शिकला नाही. हे एकढे तो कोठून शिकला?”

16 येशूने उत्तर दिले, “मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत. माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे. 17 जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की, माझी शिकवण माझी स्वतःची नाही. 18 जो कोणी स्वतःच्या कल्पना शिकवितो, तो स्वतःला मानसन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो. त्याचे काहीच खोटे नसते. 19 मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले. खरे ना? परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही का बरे मला जिवे मारायला पाहता?”

20 लोकांनी उत्तर दिले, “तुम्हांला भूत लागले आहे. आम्ही काही तुम्हांला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.”

21 येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात. 22 मोशेने तुम्हांला सुंतेचा नियम दिला. परंतु खरे पाहता सुंता मोशेपासून आलेली नाही. ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. म्हणून कधी कधी शब्बाथ दिवशीही तुम्ही मुलांची सुंता करता. 23 याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बाथ दिवशीही बालकाची सुंता करता येते. मग मी शब्बाथ दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता? 24 वरवर पाहून न्याय करु नका. तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करुन योग्य प्रकारे न्याय करा.”

येशू हाच ख्रिस्त आहे काय? लोकांना पडलेला प्रश्न

25 मग यरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले, “याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत. 26 परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे. आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल. 27 परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाच कळणार नाही.”

28 अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हांला माहीत आहे. परंतु मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही. 29 पण मी त्याला ओळखतो. मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले.”

30 येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरु शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती.

स्तोत्रसंहिता 108

दावीदाचे एक स्तुतिगीत.

108 देवा, मी तयार आहे.
    मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
वीणांनो आणि सतारींनो,
    आपण सुर्याला जाग आणू या.
परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु.
    आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे.
    तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
देवा, स्वर्गाच्याही वर उंच जा.
    सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
    आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.

देव त्याच्या मंदिरात बोलला,
    “मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन.
    मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
गिलाद आणि मनश्शे माझी असतील.
    एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल.
    यहुदा माझा राजदंड असेल.
मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल.
    अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल.
    मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद करीन.”

10 मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल?
    मला अदोमशी लढायला कोण नेईल?
11 देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस.
    पण तू आम्हाला सोडून गेलास.
    तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
12 देवा, आम्हाला आमच्या शत्रूंचा पराभव करायला मदत कर.
    लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
13 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो.
    देव आमच्या शत्रूंचा पराभव करु शकतो.

नीतिसूत्रे 15:4

दयेचे मायेचे शब्द म्हणजे जणू जीवनवृक्ष. पण खोट्या शब्दांमुळे माणसाची उमेद खचते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center