Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 8-9

इस्राएलींची राजासाठी मागणी

शमुवेल खूप म्हातारा झाला तेव्हा त्याने आपल्या मुलांना इस्राएलचे न्यायाधिश म्हणून नेमले. मोठ्या मुलाचे नाव योएल आणि दुसऱ्याचे नाव अबीया. बैर-शीबा येथे राहून ते काम करु लागले. पण ते त्यांच्या वडिलांसारखे वागले नाही. पैशाच्या लोभाने लाच खाऊन ते न्यानिवाड्यात फेरफार करीत. लोकांना फसवीत. तेव्हा इस्राएलची सर्व वडील धारी मंडळी एकत्र जमून रामा येथे शमुवेलला भेटायला गेली. शमुवेलला ते लोक म्हणाले, “तुम्ही तर वृध्द झालात. तुमच्या मुलांचे वागणे बरोबर नाही. ती तुमच्यासारखी नाहीत. तेव्हा इतर राष्ट्राप्रमाणेच आमच्यावर ही राज्यकारभार करण्यासाठी राजा नेमा.”

आपल्यावर शासन करण्यासाठी त्यांनी राजाची मागणी करावी हे शमुवेलला ठीक वाटले नाही. तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याला म्हणाला, “लोक म्हणतात तसे कर. त्यांनी काही तुला नाकारलेले नाही. त्यांनी माझा धिक्कार केला आहे. त्यांना मी राजा म्हणून नको आहे. हे त्यांचे वागणे नेहमीचेच आहे. मी त्यांना मिसरमधून बाहेर आणले पण मला सोडून ते इतर दैवतांच्या मागे लागले. आता ते तुझ्याशीही तसेच वागत आहेत. त्यांचे ऐक आणि त्यांना हवे तसे कर. पण त्या आधी त्यांना इशारा दे. राजाचा कारभार कसा असतो, तो कशी सत्ता गाजवतो ते त्यांना सांग.”

10 लोकांनी राजा मागितला, तेव्हा, शमुवेलने, परमेश्वराने सांगितले ते सर्व त्यांना ऐकवले. 11 तो म्हणाला, “राजा आपली सत्ता कशी गाजवेल ते ऐका. तुमच्या मुलांना तो तुमच्यापासून हिरावून घेईल. त्यांना बळजबरीने सैन्यात दाखल करील. रथावर, घोड्यांवर स्वार व्हायला लावून तो त्यांना युद्धाला जुंपील. तुमची मुले राजाच्या रथा पुढे रक्षक म्हणून धावतील.

12 “काहीजण हजाराहजारावर तर काही पन्नास-पन्नास सैनिकांवर नायक म्हणून नेमली जातील. काही मुलं शेतीच्या कामात राबतील तर काहींना शस्त्रास्त्रे, रथाचे भाग बनविणे या कामाला लावले जाईल.

13 “राजा तुमच्या मुलींनाही कामाला लावील. अत्तरे करणे, स्वयंपाकपाणी, भटारखान्यात राबणे ही कामे त्यांच्याकडून करुन घेईल.

14 “तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे, जैतुनांच्या बागा तुमच्या कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकाऱ्यांच्या हवाली करील. 15 धान्यातील आणि द्राक्षांतील एकदशांश हिस्सा तुमच्या कडून घेऊन राजा आपल्या अधिकांऱ्याना आणि नोकरांना देईल.

16 “तुमचे नोकर, दासी, दुभती जनावरे, गाढवे तुमच्याकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेईल. 17 तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशांश हिस्साही घेईल.

“तुम्ही त्याचे दास व्हाल. 18 तुमच्यावर अशी वेळ आली की मग असा राजा निवडल्याबद्दल परमेश्वराकडे गाऱ्हाणे न्याल. पण तेव्हा परमेश्वर तुमचे ऐकणार नाही.”

19 पण लोक शमुवेलाचे ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले, “आम्हाला राजा हवाच आहे. 20 मग आम्ही इतर राष्ट्रांच्या बरोबरीला येऊ. तो आमचे नेतृत्व करील. आमच्यासाठी लढाया करील.”

21 शमुवेलने लोकांचे ऐकून घेतले आणि परमेश्वराला त्यांचे म्हणणे जसेच्या तसे सांगितले. 22 परमेश्वर म्हणाला, “तू त्याचे ऐकायलाच हवेस. त्यांच्यावर राजा नेम.”

मग शमुवेल इस्राएली लोकांना म्हणाला, “ठीक तर! तुम्हाला राजा मिळेल. आता सर्वजण आपापल्या गावी परत जा.”

शौल आपल्या वडीलांच्या गाढवांच्या शोधात

अबीएलचा मुलगा कीश हा बन्यामीन घराण्यातील एक ख्यातनाम गृहस्थ होता. अबीएलचे वडील सरोर, सरोरचे वडील बखोरथ आणि बखोरथचे वडील अफीया अशी ही परंपरा होती. कीशाला शौल नावाचा मुलगा होता. हा देखणा आणि तरुण असून देखणेपणात आणि उंचीच्या बाबतीत इस्राएलात त्याच्याशी बरोबरी करणारे कोणीही नव्हते. प्रत्येक इस्राएल मनुष्य त्याच्या खांद्याला लागे.

एकदा कीशाची गाढवे वाट चुकली. तेव्हा कीश शौलाला म्हणाला, “नोकारांपैकी कोणाला तरी बरोबर घेऊन गाढवांचा शोध घे.” शौल त्याप्रमाणे आपल्या वडीलांच्या गाढवांच्या शोधार्थ निघाला. एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश, शलीशाच्या भोवतालचा प्रांत पालथा घातला तरी त्याला आणि त्याच्या नोकराला गाढवे सापडेनात. तेव्हा ते शालीम प्रांतात गेले. पण तिथेही शोध लागला नाही. म्हणून पुढे ते बन्यामीन प्रदेशातून हिंडले. पण गाढवे मिळाली नाहीतच.

शेवटी ते दोघे सूफ या नगराशी आले. तेव्हा शौल आपल्या नोकराला म्हणाला, “आता आपण परतीच्या वाटेला लागलेले बरे. कारण गाढवांचा विचार सोडून देऊन वडील आता आपल्याच चिंतेत पडतील.”

पण नोकर म्हणाला, “या गावात एक परमेश्वराचा माणूस संदेष्टा आहे. लोक त्याला मानतात. तो बोललेले खरे ठरते. तेव्हा आपण या गावात जाऊ. कदाचित् तो आपल्याला पुढचा मार्ग दाखवील.”

शौल म्हणाला, “तर मग आपण जाऊच या पण त्याला द्यायचे काय? त्याला देण्यासारखे तर आपल्याजवळ काहीच नाही. आपल्याजवळचे फराळाचे सुध्दा संपले. मग त्याला काय देणार?”

तेव्हा पुन्हा नोकाराने सांगितले, “माझ्याकडे थोडे पैसे [a] आहेत तेच आपण त्या परमेश्वराच्या माणसाला देऊ. मग तो आपल्याला पुढची वाट दाखवेल.”

9-11 शौंल नोकराला म्हणाला, “ठीक आहे, चल जाऊ.” आणि ते तिकडे निघाले. चढूण जात असताना वाटेत त्यांना पाण्याला चाललेल्या काही तरुण मुली भेटल्या. त्यांना त्यांनी संदेष्ट्याचा पत्ता विचारला.

12 तेव्हा त्या म्हणाल्या, “तो आत्ताच पुढे गेला आहे. लवकर पुढे जा. तो आजच या गावी आला आहे कारण लोक उच्च स्थानी शांत्यर्पण करणार आहेत. 13 पुढे गेल्यावर तुम्हाला तो दिसेल. घाई केलीत तर भोजनासाठी तो भक्ती स्थळापाशी पोचायच्या अगादेर तुम्ही त्याला भेटू शकाल. तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तिथे पोहोंचे पर्यंत लोक जेवायला सुरुवात करत नाहीत. म्हणून लौकर जा.” पूर्वी कोणी असे परमेश्वराला प्रश्न विचारायला निघाले, “चला, संदेष्ट्याकडे जाऊ” असे म्हणत असत. कारण तेव्हा परमेश्वराच्या माणसाला संदेष्टा म्हणत.

14 तेव्हा शौल आणि त्याचा नोकर वर नगराच्या दिशेने जाऊ लागले. नगरात शिरतात तो त्यांना शमुवेल त्यांच्या दिशेने येताना दिसला. तो त्या यज्ञाच्या ठिकाणी जायला निघालाच होता.

15 आदल्या दिवशी परमेश्वराने शमुवेलला सांगितले होते, 16 “उद्या यावेळी मी तुझ्याकडे बन्यामीन घराण्यातील एकाला पाठवीन. त्याला तू अभिषेकपूर्वक इस्राएलवर राजा म्हणून नेम. पलिष्ट्यांपासून तो माझ्या लोकांना वाचवील. लोकांचे गाऱ्हाणे माझ्याकडे आले आहे. ते मी ऐकून घेतले आहे.”

17 शौल शमुवेलच्या दृष्टीस पडताक्षणीच परमेश्वर म्हणाला, “हाच तो मी सांगितलेला माणूस. तो माझ्या लोकांवर राज्य करील.”

18 शौलने शमुवेलला वेशीजवळ गाठले आणि तो म्हणाला, “संदेष्ट्यांचे घर कोठे आहे ते कृपा करुन मला सांगाल का?”

19 शमुवेल म्हणाला, “मीच तो, तू पुढे हो आणि भक्तीच्या ठिकाणी जा. तुम्ही दोघेजण आज माझ्याबरोबर भोजन करा. उद्या सकाळी मी तुझी रवानगी करीन. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. 20 आणि तीन दिवसांपूर्वी हरवलेल्या त्या गाढवांची काळजी करु नकोस. ती सापडली आहेत. आता इस्राएलला तुझी गरज आहे. इस्राएलला तू आणि तुमच्या घराण्यातील सर्व हवे आहात.”

21 शौल म्हणाला, “मी बन्यामीन घराण्यातला आहे. आमचे घराणे इस्राएल मधले सर्वात लहान घराणे आहे आणि बन्यामीन घराण्यात आमचे कुटुंब सगळ्यात छोटे आहे. मग इस्राएलला मी कशासाठी हवा आहे बरे?”

22 शमुवेलने मग त्यांना आणि त्याच्या नोकराला भोजनाच्या ठिकाणी नेले. तेथे तीस एक लोकांना भोजनासाठी आणि यज्ञात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. शमुवेलने या दोघांना पंगतीतल्या मानाच्या ठिकाणी बसवले. 23 शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “मांसाचा मी तुला राखून ठेवायला सांगितलेला वाटा आण.”

24 आचाऱ्याने मांडीचा भाग आणून शौलाच्या पुढे ठेवला. शमुवेल म्हणाला, “तुझ्यासाठी मी हा राखून ठेवला आहे. या विशेष प्रसंगासाठी मी तो ठेवला होता. तो तू खा.” तेव्हा शौल शमुवेलच्या पंगतीला बसून जेवला.

25 भोजन आटोपल्यावर ते उपासना स्थळाहून खाली नगरात आले. शमुवेलाने शौलासाठी घराच्या गच्चीत बिछाना घातला. शौल तेथे झोपला.

26 दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे शमुवेलाने शौलाला जोरात हाक मारुन उठवले. तो म्हणाला, “ऊठ आता मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि शमुवेल बरोबर घराच्या बाहेर पडला.

27 शौल त्याचा नोकर आणि शमुवेल गावाच्या सीमेपाशी आले. तेव्हा शमुवेल शौलाला म्हणाला, “तुझ्या नोकराला पुढे व्हायला सांग तुझ्यासाठी परमेश्वराचा संदेश आहे.” तेव्हा नोकर पुढे चालू लागला.

योहान 6:22-42

लोक येशूला शोधतात

22 दुसरा दिवस उजाडला. काही लोक सरोवराच्या दुसऱ्या काठावर राहिले होते. त्या लोकांना

माहीत होते की, येशू शिष्यांबरोबर नावेतून गेलेला नव्हता, त्यांना समजले की, येशूचे शिष्य नावेत बसून निघून गेलेत आणि तेथे असलेली तेवढीच एक नाव होती हेही त्यांना ठाऊक होते. 23 पण मग तिबिर्याहून आणखी काही नावा आल्या. आदल्या दिवशी ज्या ठिकाणी लोकांनी अन्न खाल्ले त्या ठिकाणी त्या नावा येऊन काठाला लागल्या. प्रभू येशूने देवाचे उपकार मानल्यावर लोकांनी भाकरी खाल्ल्या तीच ही जागा होती. 24 आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले. म्हणून लोक नावांमध्ये बसले आणि कफर्णहूमला गेले. त्यांना येशूला शोधायचे होते.

येशू जीवनाची भाकर

25 लोकांना येशू सरोवराच्या दुसऱ्या काठावर भेटला. लोक म्हणाले, “गुरुजी, तुम्ही इकडे कधी आलात?”

26 येशूने उत्तर दिले, “तुम्ही माझा शोध का करता? माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का? मी तुम्हांस खरे सांगतो, तुम्ही मला शोधता, कारण तुम्ही भाकरी खाल्या आणि तुमची तृप्ती झाली. 27 ऐहिक अन्न नाश पावते. म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करु नका. परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंतकाळचे जीवन देते, अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा. मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हांला देईल. देव जो पिता याने दाखवून दिले आहे की, तो मनुष्याच्या पुत्राबरोबर आहे.”

28 लोकांनी येशूला विचारले, “आम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे?”

29 येशूने उत्तर दिले, “तुम्ही जे काम करावे अशी देवाची इच्छा आहे, ते हेच की, देवाने ज्याला पाठविले, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”

30 मग लोक येशूला म्हणाले, “देवाने तुम्हांलाच पाठविले आहे हे पटविण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार कराल? तुम्हांला एखादा चमत्कार करताना जर आम्ही पाहिले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. तुम्ही काय कराल? 31 अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला. पावित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायाला दिली.”

32 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो. मोशेने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही. माझा पिता तुम्हांला खरी स्वर्गीय भाकर देतो. 33 देवाची भाकर कोणती? देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो, तोच ती भाकर.”

34 ते लोक येशूला म्हणाले, “महाराज, आम्हांला हीच भाकर नेहमी द्या.”

35 मग येशू म्हणाला. “मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. 36 मी तुम्हांला पूर्वीच सांगितले की, तुम्ही मला पाहिले, तरीही विश्वास ठेवीत नाही. 37 पिता माझे लोक मला देतो. त्यातील प्रत्येकजण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी स्वीकारीन. 38 मी स्वर्गातून खाली आलो, ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मला पाहिजे ते करायला मी आलो नाही. 39 देवाने मला दिलेल्या लोकांपैकी एकालाही मी गमवू नये. परंतु त्या सर्वांना मी शेवटच्या दिवशी जिवंत असे उठवायला हवे. ज्याने मला पाठविले त्याची मी हेच करावे अशी इच्छ आहे. 40 पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनंतकाळचे जीवन आहे. मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन, हेच माझ्या पित्याल हवे.”

41 मग यहुदी लोक येशूविरुद्द कुरकुर करु लागले. कारण “स्वर्गातून खाली आलेली भाकर मी आहे” असे तो म्हणाला. 42 यहूदी लोक म्हणाले, “हा येशू आहे. आपण त्याच्या आईवडिलांना ओळखतो. येशू तर योसेफाचाच पुत्र आहे. ‘मी स्वर्गातून खाली आलो आहे’ असे तो कसे काय म्हणू शकतो?”

स्तोत्रसंहिता 106:32-48

32 मरीबा येथे लोक खूप रागावले
    आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.
33 त्या लोकांनी मोशेला खूप अस्वस्थ केले
    म्हणून मोशे विचार करण्यासाठी न थांबता बोलला.

34 परमेश्वराने लोकांना कनानमध्ये राहाणाऱ्या इतर देशाचा नाश करायला सांगितले.
    पण इस्राएलच्या लोकांनी देवाची आज्ञा पाळली नाही.
35 ते इतर लोकांत मिसळले आणि
    ते लोक जे करीत होते तेच त्यांनीही केले.
36 ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले.
    ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली.
37 देवाच्या माणसांनी स्वःतचीच
    मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली.
38 देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले.
    त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले
    आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले.
39 म्हणून देवाची माणसे त्या इतर माणसांबरोबर अमंगल झाली.
देवाची माणसे त्यांच्या देवाशी प्रामाणिक राहिली नाहीत
    आणि इतर लोकांनी जी कृत्ये केली तीच त्यांनीही केली.
40 देव त्याच्या माणसांवर रागावला.
    देवाला त्यांचा कंटाळा आला.
41 देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले.
    देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले.
42 देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले
    आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.
43 देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले.
    पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले.
    देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
44 पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती
    तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली
आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
45 देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली
    आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.
46 इतर देशांनी त्यांना कैदी बनवले
    पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
47 परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून
    आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू
आणि तुझे गुणगान करु.
48 परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या.
    देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे.
आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन!”

परमेश्वराची स्तुती करा.

नीतिसूत्रे 14:34-35

34 चांगुलपणा देशाला महान बनवतो. पण पाप कुठल्याही लोकांना लाज आणते.

35 राजाजवळ जेव्हा शहाणे नेते असतात तेव्हा राजा आनंदी असतो. पण मूर्ख नेत्यांवर राजा रागावतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center