Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 2:22-4

एली आपल्या नीच मुलांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी

22 एली आता म्हतारा होत चालला. शिलोह येथे येणाऱ्या इस्राएलींशी होणारे आपल्या मुलांचे वर्तन पुन्हा पुन्हा त्याच्या कानावर येऊ लागले. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवेत असलेल्या बायकांशी त्यांनी कसा अतिप्रसंग केला हेही त्याने ऐकले.

23 तेव्हा तो मुलांना म्हणाला, “तुमचे प्रताप माझ्या कानावर आले आहेत. अशी नीच कृत्ये तुम्ही का करता? 24 मुलांनो, असे करत जाऊ नका. परमेश्वराचे लोक तुमच्याविषयी फार वाईट बोलत आहेत. 25 एका माणसाने दुसऱ्या माणसाचा काही अपराध केला तर परमेश्वर एकवेळ त्याच्या मदतीला येईल. पण परमेश्वराविरुध्दच पातक केले तर त्याच्या मदतीला कोण धावून येणार?”

पण एलीच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तेव्हा परमेश्वराने या मुलांना मारायचे ठरवले.

26 शमुवेल मोठा होत चालला. परमेश्वर आणि लोक त्याच्यावर प्रसन्न होते.

एलीच्या घराण्याविषयी अरिष्ट सूचक भविष्य

27 एकदा परमेश्वराचा संदेष्टा एलीकडे आला आणि म्हणाला, “परमेश्वराने हा निरोप दिला आहे: ‘तुझे पूर्वज फारोच्या घराण्यात दास होते. तेव्हा मी त्यांच्या पुढे प्रगट झालो. 28 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधून तुमच्याच घराण्याची मी माझे याजक होण्यासाठी म्हणून निवड केली. वेदीवर यज्ञबली अर्पण करावा, धूप जाळावा, एफोद घालावा म्हणून मी तुम्हाला निवडले. इस्राएलचे लोक यज्ञ करतात त्यातील मांस मी तुम्हाला घेऊ दिले. 29 तेव्हा तुम्ही त्या यज्ञाचा आणि देणग्यांचा आदर ठेवत नाही हे कसे? माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांचाच मान ठेवतोस? इस्राएल लोक मला जे मांस वाहतात, त्यातील उत्कृष्ट भाग स्वतःसाठी घेऊन तू पुष्ट झाला आहेस.’

30 “तुझे घराणेच निरंतर त्याची सेवा करील असे इस्राएलचा देव जो परमेश्वर याने म्हटले होते खरे. पण आता त्याचे म्हणणे असे आहे की, ‘इथून पुढे असे होणार नाही. माझा आदर ठेवतात त्यांचा मी मान राखीन. पण जे अनादर करतात त्यांच्यावर संकटे कोसळतील. 31 तुझ्या सर्व वंशजांचा संहार करायची वेळ येऊन ठेपली आहे. तुझ्या घराण्यातील कोणीही आता दीर्घायुषी होणार नाही.. 32 इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल. [a] तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही. 33 माझ्या वेदीजवळ याजक म्हणून सेवा करायला फक्त एकाला मी शिल्लक ठेवीन. त्याला दीर्घायुष्य लाभेल. तो जराजर्जर होईपर्यंत जगेल. तुझे वंशज मात्र तलवारीला बळी पडतील. 34 हे सर्व खरेच घडणार आहे याची प्रचीती मी तुला दाखवीन. तुझे दोनही मुलगे हफनी आणि फिनहास, एकाच दिवशी मरतील. 35 मी एका विश्वासू याजकाची माझ्यासाठी निवड करीन. तो माझे ऐकेल आणि माझ्या मनाप्रमाणे काम करील. या याजकाच्या घराण्याला मी स्थिरस्थावर करीन. मी निवडलेल्या राजापुढे तो सेवेत राहील. 36 मग तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नतमस्तक होतील. किरकोळ रक्कम किंवा भाकरतुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदातील एखादे काम मला द्या.”’”

परमेश्वराची शमुवेलला हाक

लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.

एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता. तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे.” एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.”

पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.”

शमुवेल झोपायला गेला. पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले.

एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”

परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.

परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.

परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.’”

तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला. 10 परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली.

शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”

11 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल. 12 एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे. 13 त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे. 14 आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”

15 रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.

16 पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले.

तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.

17 एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”

18 तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले.

एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”

19 शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही. 20 परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दान पासून बैर शेबापर्यंत सर्व इस्राएलमध्ये शमुवेलची ख्याती पसरली. 21 शिलोह येथे परमेश्वर त्याला दर्शन देत राहिला. म्हणजेच आपल्या वचनाच्याद्वारे तो शमुवेलसमोर प्रगट झाला.

इस्राएलभर शमुवेलचे नाव झाले. एली आता फार वृध्द झाला होता. त्याच्या मुलांचे दुर्वर्तन चालूच होते.

इस्राएलाचा पलिष्ट्यांकडून पराभव

याच सुमारास सर्व पलिष्टी इस्राएल लोकांविरुध्द एकत्र आले. इस्राएल लोक त्यांच्याशी लढण्यास निघाले. त्यांचा तळ एबन एजर येथे तर पलिष्ट्यांचा अफेक येथे होता. पलिष्टी इस्राएल लोकांवर चालून जायला सज्ज झाले. अशाप्रकारे युद्धाला तोंड लागले.

पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांचा पराभव केला. त्यांचे चार हजार सैनिक मारले. इस्राएली सैनिक आपल्या तळावर परतले तेव्हा वडीलधाऱ्यांनी त्यांना विचारले, “परमेश्वराने का बरे पलिष्ट्यांमार्फत आपला पराभव करवला? आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रू पासून आपले संरक्षण करील.”

मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते.

सैन्याच्या तळावर जेव्हा परमेश्वराच्या कराराचा कोश आणला तेव्हा सर्व इस्राएल लोकांमध्ये एकच जल्लोष झाला. या जयघोषाने भूमीही दणाणली. पलिष्ट्यांपर्यंत हा आवाज पोहोंचला तेव्हा इब्रींच्या छावणीत हा जल्लोष कसला म्हणून ते विचारात पडले.

परमेश्वराच्या पवित्र कराराचा कोश छावणीत आणला गेल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. ते म्हणू लागले, “त्यांच्या तळावर परमेश्वर आला आहे. आता आपले कसे होणार? असे यापूर्वी कधी झालेले नाही. या शक्तिमान परमेश्वरापासून आता आपल्याला कोण वाचवील, याची धास्ती पडली आहे. मिसरच्या लोकांना नाना तऱ्हेच्या पीडांनी हैराण केले ते याच परमेश्वराने. पण पलिष्ट्यांनो, धीर धरा. मर्दासारखे लढा. पूर्वी हेच इस्राएल लोक आपले गुलाम होते. तेव्हा शौर्य दाखवा, नाहीतर तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल.”

10 तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले. 11 पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला आणि हफनी आणि फिनहास या एलीच्या मुलांचा वध केला.

12 त्या दिवशी एक बन्यामीन माणूस युद्धातून धावत निघाला. दु:खाने तो कपडे फाडत होता. डोक्यात धूळ घालून घेत होता. 13 तो शिलोह येथे पोहोंचला तेव्हा एली वेशीजवळ आपल्या आसनावर बसला होता. त्याला कराराच्या कोशाची काळजी वाटत होती म्हणून तो वाट पाहात होता. त्याचवेळी या बन्यामीनाने तेथे येऊन सर्व वृत्तांत सांगितला. लोक तो ऐकून आकांत करु लागले. 14-15 एली आता अठ्ठ्याण्णव वर्षांचा झाला होता. आंधळा झाल्यामुळे त्याला काय घडतेय हे दिसत नव्हते. पण त्याला हा आक्रोश ऐकू येत होता. तेव्हा त्याने त्याबद्दल विचारले.

तेव्हा त्या बन्यामीन माणसाने एलीजवळ जाऊन सर्व सांगितले 16 तो म्हणाला, “मी नुकताच तेथून आलो आहे मी आज युद्धातून पळून आलो आहे.”

एलीने त्याला सर्व हकीकत सांगायला सांगितले.

17 तेव्हा तो म्हणाला, “इस्राएलींनी पळ काढला आहे. इस्राएली सैन्यातील अनेक सैनिक प्राणाला मुकले. तुमची दोन्ही मुले मेली आहेत. आणि परमेश्वराचा पवित्र करारकोश पलिष्ट्यांनी ताब्यात घेतला आहे.”

18 करारकोशाचे वृत्त समजताच वेशीजवळ आसनावर बसलेला एली तिथेच मागच्यामागे पडला आणि त्याची मान मोडली. तो वृध्द आणि स्थूल झाला होता. तात्काळ त्याचा प्राण गेला. वीस वर्षे तो इस्राएलचा शास्ता होता.

वैभव गेले

19 एलीची सून, फिनहासची बायको त्यावेळी गरोदर होती. ती प्रसूत व्हायची वेळ येऊन ठेपली होती. कराराचा कोश पळवल्याचे तसेच सासरा व नवरा यांचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या कानावर आले. ते ऐकताच त्या धक्कयाने तिला कळा येऊ लगल्या आणि ती प्रसूत झाली. 20 तिच्या मदतीला आलेल्या बायका म्हणाल्या, “आता काळजी करु नको तुला मुलगा झालाय,”

पण तिने लक्ष दिले नाही की काही उत्तर दिले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, “इस्राएलचे वैभव मावळले.” तिने मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवले आणि ती गतप्राण झाली. 21 करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभव) असे ठेवले. 22 पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र करार कोश हस्तगत केला म्हणून “इस्राएलचे वैभव गेले” असे ती म्हणाली.

योहान 5:24-47

24 “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकालचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही. तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. 25 मी तुम्हांला खरे सांगतो. अशी महत्वाची वेळ येत आहे. ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे. जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. 26 खुद्द पित्यापासून (देवापासून) जीवनाचा लाभ होतो. म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे. 27 आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे. कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे.

28 “तुम्ही याचे आश्चर्य मानू नका. अशी वेळ येत आहे की, सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेत आहेत ते त्याची वाणी ऐकतील. 29 मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली, ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. परंतु ज्या लोकांनी वाइट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील.

30 “मी एकटा काहीच करु शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो.”

येशू यहूदी लोकांशी बोलणे चालू ठेवतो

31 “जर मी स्वतःच माझ्याविषयी लोकांना सांगितले तर लोक त्या गोष्टी मानणार नाहीत. 32 परंतु लोकांना याविषयी सांगणारा दुसरा एक जण आहे. आणि तो माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या आहेत, हे मला माहीत आहे.”

33 “तुम्ही योहानाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हांला सांगितलेच आहे. 34 माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही. परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हांला सांगतो. 35 पेटलेला दिवा प्रकाश देतो, तसाच योहान होता आणि तुम्हांला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला.

36 “परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गोष्टींवरुन हे सिद्ध होते की, पित्याने मला पाठविले आहे. 37 आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वतःही माझ्याविषयी साक्ष दिलेली आहे. परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही, तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही. 38 पित्याची शिकवण तुमच्यामध्ये राहात नाही. कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, 39 तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळते, असे तुम्हांला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते! 40 तरी तुम्ही अनंतकालचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता.”

41 “मला माणसांकडून स्तुति नको. 42 पण मी तुम्हांला ओळखतो- तुम्हांमध्ये देवाविषयी प्रीति नाही हे मला माहीत आहे. 43 मी माझ्या पित्यापासून आलो आहे- मी त्याच्यावतीने बोलतो. परंतु तरीही तुम्ही मला स्वीकारीत नाही. पण जर दुसरा कोणी मनुष्य फक्त स्वतःविषयी सांगत आला, तर मात्र तुम्ही त्याचे मानाल. 44 तुम्हांला एकमेकांकडून स्तुति करवून घ्यायला आवडते. परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुति मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही, मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल? 45 मी पित्यासमोर उभा राहून तुम्हांला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमजे चुकते असे मोशेच तुम्हांला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हांला आशा आहे. 46 जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे, तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल. कारण खुद्द मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. 47 परंतु मोशेने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर मी सांगतो त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकणारच नाही.”

स्तोत्रसंहिता 106:1-12

106 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या.
    देवाचे प्रेम सदैव राहील.
परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही.
    देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात.
    ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात.

परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव.
    मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.
परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी
    ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे.
मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे.
    मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.

आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले.
    आम्ही चुकलो.
    आम्ही दुष्कृत्ये केली.
परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज
    तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत.
ते लाल समुद्राजवळ होते तेव्हा
    आमचे पूर्वज तुझ्याविरुध्द गेले.

परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर,
    देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला.
    देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.
10 देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले.
    देवाने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली.
11 देवाने त्यांच्या शत्रूंना समुद्रात झाकून टाकले.
    शत्रूंपैकी एकही जण सुटू शकला नाही.

12 नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला.
    त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.

नीतिसूत्रे 14:30-31

30 जर एखाद्याच्या मनात शांती असली तर त्याचे शरीर निरोगी असते. पण मत्सर त्याच्या शरीरात आजार निर्माण करतो.

31 जो माणूस गरीबांवर संकटे आणतो तो आपण देवाचा आदर करीत नाही हे दाखवतो. देवानेच दोघांनाही निर्माण केले आहे. पण जर एखादा गरीबांशी कनवाळूपणे वागला तर तो देवाचा आदर करतो हे दिसून येते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center