Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 21 - रूथ 1

उरलेल्या बन्यामीन पुरुषांच्या लग्नाचा प्रश्न

21 आपल्यापैकी कोणीही बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी इस्राएल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती.

इस्राएल लोक मग बेथेल येथे गेले. संध्याकाळपर्यंत ते तिथे परमेश्वरासमोर बसून राहिले. दु:खाने ते मोठमोठ्याने ओरडत होते. ते म्हणाले, “परमेश्वरा. तूच आमचा इस्राएलांचा परमेश्वर आहेस. आमच्यावर हे भयंकर संकट का ओढवावे? आज आमच्यातला एक वंश का बरे नष्ट व्हावा?”

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक वेदी बांधली आणि यज्ञार्पणे, शांति अर्पणे केली. या मेळाव्याला हजर नाही असा इस्राएलांपैकी कुठला वंश आहे का अशी चौकशी त्यांनी सुरु केली. मिस्पा येथे या मेळाव्याला जे कोणी येणार नाहीत अशांचा वध केला जाईल अशी गंभीर प्रतिज्ञा त्यांनी केली होती म्हणून त्यांनी कसोशीने हा शोध सुरु केला.

आपल्या बन्यामीन बांधवांबद्दल त्यांना पुन्हा एकदा वाईट वाटले. ते म्हणाले, “इस्राएलांचा एक वंश आज जवळपास नष्ट झाला आहे. बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी आपण परमेश्वरासमोर प्रतिज्ञा केली आहे. मग उरलेल्या बन्यामीन पुरुषांची लग्रे व्हायची कशी?”

पुढे ते म्हणाले, “मिस्पा येथे आज इस्राएलाच्या कोणत्या वंशाची गैरहजेरी आहे? येथे जमलेल्यात एक कोणीतरी दिसत नाहीत एवढे खरे!” मग त्यांच्या लक्षात आले की याबेश-गिलाद या शहरातून कोणीही आलेले नाही. त्यांनी सर्वांची मोजदाद करुन याबेश-गिलाद मधून कोणीही न आल्याची खात्री करुन घेतली. 10 आणि इस्राएल लोकांनी बाराहजारांचे सैन्य याबेश-गिलादवर पाठवले. त्यांनी सैन्याला हुकूम केला, “तेथे जा आणि प्रत्येकाला तलवारीने कापून काढा अगदी बायका मुलांना सुध्दा सोडू नका. 11 हे तुम्ही केलेच पाहिजे. त्यांच्यातील कोणीही पुरुष शिल्लक राहता कामा नये आणि अविवाहित कुमारिका वगळता सर्व स्त्रियांनाही ठार करा.” सैनिकांनी या आदेशाची अमलबजावणी केली. 12 या बाराहजार सैनिकांना याबेश-गिलादमध्ये चारशे तरुण कुमारिका आढळल्या त्यांना त्यांनी कनानातील शिलो येथील छावणीत आणले.

13 मग इस्राएल लोकांनी रिम्मोन खडकाजवळ राहात असलेल्या बन्यामीन लोकांना निरोप पाठवून शांतीचा संदेश दिला. 14 त्यामुळे ते इस्राएलमध्ये परत आले. इस्राएल लोकांनी याबेश-गिलादमधील मुलींशी त्यांची लग्ने लावून दिली. पण तरीही मुली कमीच पडल्या.

15 इतर वंशांपासून परमेश्वराने त्यांना अशाप्रकारे वेगळे केले म्हणून इस्राएल लोकांना या बन्यामीनांविषयी फारच वाईट वाटले. 16 इस्राएलच्या वडिलधाऱ्यांना वाटले, “बन्यामीनांच्या सर्व स्त्रिया तर मारल्या गेल्या मग आता या मागे राहिलेल्या काही बन्यामीनांची लग्ने व्हायची कशी? 17 त्यांचा वंश पुढे चालू राहिला पाहिजे. त्यांचे संसार पुढे चालू राहिले नाहीत तर हा इस्राएल लोकांचा वंशच खुंटेल. 18 पण आपण तर आपल्या मुलींची लग्ने त्यांच्याशी लावून देऊ शकत नाही ‘जो कोणी आपली मुलगी बन्यामीनाला देईल तो शापित असो’ अशी आपण शपथ वाहिली आहे. 19 यातून एक मार्ग आहे. शिलो नगरात दरवर्षी परमेश्वराचा उत्सव असतो. तो आता आलाच आहे.” (शिलोह हे नगर बेथेलच्या उत्तरेला, बेथेलहून शखेमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला आणि लबोनाच्या दक्षिणेला वसलेले आहे.)

20 तेव्हा आपल्याला सुचलेली युक्ती वडिलधाऱ्यांनी बन्यामीन लोकांना सांगितली. ते म्हणाले, “तुम्ही द्राक्षमळ्यात लपून बसा. 21 या उत्सवात शिलोहच्या तरुण मुली नृत्य करायला येतील. तिकडे लक्ष ठेवा त्या आल्या की बाहेर पडा आणि यातील एकेकीला पळवा मग आपल्या प्रांतात जाऊन त्यांच्याशी लग्न करा. 22 यामुलींचे बाप किंवा भाऊ आमच्याकडे तक्रारी घेऊन येतील पण आम्ही म्हणू. ‘बन्यामीनांविषयी सहानुभूती बाळगा. करु द्या त्यांना लग्न. त्यांनी मुली नेल्या खऱ्या पण युध्द तर केले नाही आपल्याशी. शिवाय यात आपली शपथ मोडायचे पापही लागत नाही. कारण मुलींना त्यांनी आपणहून नेले. आम्ही मुली देणार नाही अशी तुमची प्रतिज्ञा होती. तिला धक्कालागलेला नाही. तुम्ही कोठे आपल्या मुलींची त्यांच्याशी लग्ने लावून दिलीत? बन्यामीनांनीच त्यांना तुमच्यातून उचलून नेले. तेव्हा तुमची शपथ मोडलेली नाही.’”

23 बन्यामीनांनी तात्काळ तसे केले. मुलींचे नृत्य चाललेले असताना प्रत्येकाने स्वतःसाठी एकेक मुलगी घेतली आणि आपल्या प्रांतात परतले. त्यांच्याशी लग्न केले. आपल्या प्रदेशात त्यांनी नगरे वसवली आणि तेथे ते राहू लागले. 24 मग इस्राएल लोकही आपापल्या प्रदेशात, कुळात, घरोघरी परतले.

25 त्या काळी त्यांच्यावर कोणी राजा राज्य करत नव्हता. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल ते तो करी.

यहूदामध्ये दुष्काळ

फारपूर्वी शास्त्यांच्या अमदानीत एकदा दुष्काळ पडला आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. तेव्हा अलीमलेख नावाचा गृहस्थ आपली बायको आणि दोन मुले यांच्यासह यहूदा बेथलेहेम सोडून मवाब या डोंगराळ प्रांतात राहायला आला. त्याच्या बायकोचे नाव नामी आणि मुलांची नावे महलोन आणि खिल्योन अशी होती. हे लोक बेथलेहेम यहूदातील एफ्राथा कुळातील होते. मवाबात येऊन ते राहू लागले.

पुढे अलीमलेख वारला आणि त्याची बायको नामी व दोन मुले मागे राहिली. नामीच्या मुलांनी मवाबातील दोन मुलींशी लग्ने केली. एकाच्या बायकोचे नाव होते अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ. जवळपास दहा वर्ष ते तिथे राहिले. आणि महलोन व खिल्योन दोघेही मरण पावले.नामी तिचा नवरा आणि मुलं यांच्यावाचून एकटीच राहिली.

नामी स्वगृही परततात

यहूदात आता दुष्काळ राहिलेला नाही परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे, आणि त्याने त्यांना अन्न पुरवलेले आहे असे मवाबात नामीच्या कानालर आले. तेव्हा तिने घरी परत जायचे ठरवले तिच्या सुनाही तिच्याबरोबर जायला तयार झाल्या. तेव्हा त्या ज्या ठिकाणी राहात होत्या ते ठिकाण सोडून त्या यहूदाला परत जायला निघाल्या.

तेव्हा नामीने आपल्या सुनांना सांगितले, “तुम्ही आपल्या माहेरी परत जा. मला आणि माझ्या मुलांना तुम्ही प्रेम दिलेत. तुम्ही जशा आमच्याशी दयाळू आणि प्रेमळ राहिलात तसाच परमेश्वर ही तुमच्याशी राहो. परमेश्वर कृपेने तुम्हाला नवरा, सुखाचे घरदार मिळो” एवढे म्हणून नामीने त्यांचे चुंबन घेतले आणि तिघींना रडू कोसळले.

10 “आम्हाला तुमच्याबरोबर आणि तुमच्याच लोकात यायचे आहे” असे त्या दोघी नामीला म्हणू लागल्या.

11 पण नामी त्यांना म्हणाली, “नाही मुलींनो तुम्ही आपापल्या घरी जा. माझ्याबरोबर येऊन तरी काय फायदा? मी ही अशी. माझ्या पोटी आणखी मुलगे नाहीत.नाहीतर तुम्ही त्यांच्याशी लग्न केले असते. 12 तेव्हा तुम्ही परत गेलेले बरे. पुन्हा लग्न करायचेही माझे वय राहिले नाही आणि अजून माझे लग्न झाले तरी त्याचा तुम्हाला काय उपयोग? मला अगदी या घटकेला दिवस राहून दोन मुले झाली तरी काय फायदा? 13 ते वाढून लग्नाचे होई पर्यंत तुम्हाला थांबावे लागेल. पतिप्राप्तीसाठी मी तुम्हाला एवढे थांबवून ठेवू शकत नाही. माझ्या मनाला त्यामुळे फार यातना होतील. आधीच मी खूप सोसले आहे. परमेश्वराने माझी खूप परीक्षा पाहिली आहे.”

14 पुन्हा एकदा त्यांना रडू फुटले, मग अर्पाने चुंबन घेऊन नामीचा निरोप घेतला. पण रूथ मात्र तिला बिलगली.

15 नामी तिला म्हणाली, “तुझी जाऊ बघ कशी आपल्या लोकांत, आपल्या देवाकडे गेली, तूही तसेच केले पाहिजेस.”

16 पण रूथ हटून बसली आणि म्हणाली, “तुम्हाला सोडून जायची माझ्यावर जबरदस्ती करू नका. मला माहेरी जायला लावू नका.मी तुमच्याबरोबर येईन. जिथे तुम्ही जाल तिथे मी येईन. जिथे तुम्ही पथारी टाकाल तिथेच मीही पडेन. तुमचे लोक ते माझे लोक. तुमचा देव तो माझा देव. 17 तुम्ही जिथे मराल, तिथेच मी ही मरेन. जिथे तुम्हाला तिथेच मला पुरावे. हा शब्द मी पाळला नाही तर परमेश्वराने मला खुशाल शिक्षा करावी. आता आपली ताटातूट फक्त मरणानेच.” [a]

घरी परततात

18 रूथचा आपल्या बरोबरच यायचा निर्धार आहे हे पाहिल्यावर नामीने तिचे मन वळवायचा प्रयत्न सोडून दिला. 19 त्या दोघी मजल दरमजल करत बेथलेहेमपर्यंत आल्या. त्यांना पाहून बेथलेहेममधील लोकांना एकदम भरून आले. “ही नामी की काय” असे ते म्हणू लागले.

20 पण नामी म्हणाली, “मला नामी (आनंदी) का म्हणता? ‘मारा’(म्हणजे कष्टी दु:खी)म्हणा. सर्वशक्तिमान देवाने मला फार दु:ख दिले आहे. 21 येथून मी गेले तेव्हा सर्व काही माझ्याकडे पुष्कळ होते.आता परमेश्वराने मला रिकाम्या हाताने परत आणले आहे. परमेश्वरानेच मला दु:खी केले. तेव्हा मला ‘आनंदी’ कशाला म्हणता? सर्वशक्तिमान देवाने मला फार वाईट दिवस दाखवले.”

22 अशा प्रकारे सातूच्या पिकाच्या हंगामाच्या सुरूवातीला नामी आणि तिची मवाबातील सून रूथ या दोघी मवाबातून बेथलेहेम यहूदा येथे परतल्या.

योहान 4:4-42

गालीलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जावे लागले.

शोमरोनातील सूखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे. याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तेंव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी [a] स्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.” हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते.

ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. [b] )

10 येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”

11 ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. 12 आमचा पिता (पूर्वज) याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हांला दिली. ते स्वतः या विहीरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहीरीचे पाणी पीत असत.”

13 येशू म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. 14 परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”

15 ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, “ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही. आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.”

16 येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”

17 ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.”

येशू तिला म्हणाला, “हे तू बरोबर सांगितलेस की, तुला नवरा नाही. 18 खरे तर तुझे पाच पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.”

19 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला आता कळले की, तुम्ही एक संदेष्टा आहात. 20 आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत. परंतु तुम्ही यहूदी लोक म्हणता की, यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहीजे.”

21 येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. 22 जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते. 23 असा काळ येत आहे की, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे. आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. 24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”

25 ती स्त्री म्हणाली, “मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हांला प्रत्थेक गोष्ट समाजावून सांगेल.”

26 येशू म्हणाला, “ती व्यक्ति तुझ्याशी आता बोलत आहे. मीच तो मशीहा आहे.”

27 तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले. येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु “तुम्हांला काय पाहिजे?” अगर “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.

28 मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले, 29 “एका मनुष्याने मी आतापर्यंत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले. त्याला भेटायला चला. कदाचित तो ख्रिस्त असेल.” 30 मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले.

31 ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”

32 परंतु येशूने उत्तर दिले. “माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हांला काहीच माहिती नाही.”

33 म्हणून शिष्य एकमेकांना विचारु लागले, “येशूला कोणीतरी अगोदरच काही खावयास आणून दिले काय?”

34 येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय. 35 जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, ‘पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत.’ परंतु मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा. लोकांकडे पाहा. पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत. 36 आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे. 37 ‘एक पेरणी करतो तर दुसरा कापणी’ असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे. 38 ज्या पीकासाठी तुम्ही मेहनत केली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हांस पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हांस मिळतो.”

39 त्या गावातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरुन त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते, “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.” 40 शोमरोनी लोक येशूकडे आले. त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे दोने दिवास राहिला. 41 आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला.

42 ते लोक त्या स्त्रीला म्हणाले, “पहिल्यांदा तू जे आम्हांला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला. परंतु आता आम्ही स्वतःच त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हांला कळले की, खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.”

स्तोत्रसंहिता 105:1-15

105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
    राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
    तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
    तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
    मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
    आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
    तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
परमेश्वर आपला देव आहे.
    परमेश्वर सर्व जगावर [a] राज्य करतो.
परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा.
    हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
देवाने अब्राहामा बरोबर करार केला.
    देवाने इसहाकाला वचन दिले.
10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला.
    देवाने इस्राएल बरोबर करार केला.
    तो सदैव राहील.
11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन.
    ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
12 अब्राहामाचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले.
    ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात,
    एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते.
14 पण देवाने लोकांना त्यांना वाईट वागणूक देऊ दिली नाही.
    देवाने राजांना त्यांना दुख: न देण्याची ताकीद दिली.
15 देव म्हणाला, “मी निवडलेल्या माणसांना दुख: देऊ नका.
    माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”

नीतिसूत्रे 14:24-25

24 शहाण्यांना संपत्तीचे बक्षीस मिळते. पण मूर्खांना मूर्खपणाचे बक्षीस मिळते.

25 जो माणूस खरे सांगतो तो इतरांना मदत करतो. जो खोटे बोलतो तो इतरांना दु:ख देतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center