Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 19-20

एक लेवी आणि त्याची उपपत्नी

19 त्या काळी इस्राएल लोकांवर कोणी राजा नव्हता.

एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात अगदी आडबाजूला एक लेवी राहात असे. यहूदातील बेथलहेम नगरातील एक बाई त्याची दासी म्हणून त्याच्याजवळ राहात असे. एकदा त्या दोघांमध्ये काही तरी वादावादी झाली आणि ती त्याला सोडून बेथलहेमला आपल्या वडीलांकडे परत गेली. तिला जाऊन चार महिने झाले. तेव्हा तिची समजूत घालून तिला परत आणावे या उद्देशाने तिचा नवरा तेथे जायला निघाला. एक नोकर आणि दोन गाढवे ही त्याने बरोबर घेतली होती. तिच्या वडीलांच्या घरी तो पोहोंचला त्याला आलेले पाहताच तिचे वडील आनंदाने त्याच्या स्वागताला पुढे आले. त्यांनी या लेवीला आपल्याकडे राहायचा आग्रह केला. तेव्हा त्यांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करत तो तीन दिवस तेथे राहिला.

चौथ्या दिवशी सकाळी लौकर उठून त्याने निघायची तयारी सुरु केली. पण मुलीचे वडील त्याला म्हणाले, “काही तरी खाऊन घ्या आणि मगच निघा.” सासरे जावयांनी एकत्र बसून न्याहारी केली. पुन्हा मुलीचे वडील म्हणाले, “आता आजच्या दिवस राहा, आराम करा. मग दुपारनंतर निघा.” मग दोघांची जेवणे झाली. लेवी जायच्या तयारीत होता पण सासऱ्याच्या आग्रहामुळे पुन्हा त्याला एक रात्र मुक्काम वाढवावा लागला.

पाचव्या दिवशी सकाळी लौकर उठून लेवी जायला निघाला. पण पुन्हा सासरा जावयाला म्हणाला, “न्याहारी करुन घ्या ताजेतवाने व्हा दुपारपर्यंत थांबा.” मग दोघांची जेवणे झाली.

लेवी, त्याची उपपत्नी आणि नोकर आता जायला निघाले. पण तिचे वडील म्हणाले, “आता तर अंधारुन आले आहे. दिवस मावळला. रात्री इथेच राहा आणि सकाळी लौकर उठून आपल्या मार्गाला लागा.”

10 पण लेवीच्या मनातून आता तिथे मुक्काम करायचा नव्हता. आपली गाढवे आणि उपपत्नी यांच्यासह तो निघाला. वाटचाल करत तो यबूस (म्हणजेच यरुशलेम) पर्यंत आला. 11 यबूसरर्यंत ते आले तेव्हा दिवस मावळत आला होता. तेव्हा नोकर आपल्या मालकाला म्हणाला, “आज रात्रीचा मुक्काम आपण या यबूसी लोकांच्या नगरात करु.”

12 पण हा लेवी मालक त्याला म्हणाला, “हे शहर आपल्याला परके आहे. येथील लोक इस्राएल वंशाचे नाहीत. तेव्हा इथे राहायला नको. आपण गिबा येथे जाऊ.” 13 तो पुढे म्हणाला, “चला तर, गिबा किंवा रामा यापैकी एखादे शहर गाठू त्यापैकी एका शहरात रात्र काढू.”

14 आणि ते सगळे पुढे निघाले. गिबात शिरताशिरताच सूर्यास्त होत होता. गिबा हा प्रदेश बन्यामीनच्या हद्दीत येत होता. 15 तेथे मुक्काम करायच्या उद्देशाने ते त्या शहराच्या भर चौकात येऊन उभे राहिले. पण कोणीच त्यांना रात्रीपुरता आसरा द्यायला पुढे आले नाही.

16 एक म्हातारा माणूस तेव्हा शेतावरुन शहराकडे परतत होता. एफ्राइमच्या डोंगराळ भागात त्याचे घर होते. पण सध्या तो गिबा येथे राहात होता. (गिबा मधील लोक बन्यामीनच्या वंशातील होते.) 17 या वाटसरुंना पाहून त्याने विचारले, “तुम्ही कोण? कुठुन आलात? कोठे निघालात?”

18 तेव्हा लेवीने उत्तर दिले, “मी यहूदा मधील बेथलहेमला गेलो होतो. आता मी परत माझ्या घराकडे चाललो आहे. पण आज रात्री कोणीही आम्हाला राहायला बोलावले नाही. एफ्राईमच्या डोंगराळ भागात अगदी एका टोकाला मी राहातो. यहूदा बेथलहेमला गेलो होतो. आता घरी निघालो आहे. 19 गाढवासाठी दाणावैरण, तसेच आम्हा तिघांपुरते खायचे प्यायचे जिन्नस आमच्या जवळ आहेत. तशी आम्हाला कशाची जरुरी नाही.”

20 यावर तो म्हातारा माणूस म्हणाला, “माझ्या घरी तुम्ही खुशाल मुक्कामाला येऊ शकता. काही लागले सवरले तर मी तुम्हाला देईन. पण या चौकात मात्र रात्रीचे राहू नका.” 21 आणि त्याने त्या सर्वांना आपल्या घरी नेले. गाढवांना वैरण दिले. या तिघांनी हातपाय धुतले आणि थोडेफार खाऊन घेतले.

22 हे सगळे मजेत गप्पागोष्टी करत बसले आहेत तितक्यात गावातल्या काही वाह्यात गुंडांनी घराभोवती गर्दी केली. दार वाजवायला सुरुवात केली. म्हाताऱ्या घरमालकावर ते ओरडू लागले. “तुझ्याकडच्या पाहुण्याला बाहेर काढ. लैंगिक मौजमजेसाठी तो आम्हाला हवा आहे.” असा एकच ओरडा त्यांनी चालवला.

23 म्हाताऱ्याने बाहेर येऊन गुंडांना विनवले, “अरे बाबांनो असे भलते सलते करु नका. तो आज माझा पाहूणा आहे. असले दुष्ट पाप करु नका. 24 घरात माझी मुलगी आहे ती अजून कुमारी आहे. मी तिला व ह्या माणसाच्या उपपत्नीला बाहेर काढून तुमच्या स्वाधीन करतो. त्यांचे तुम्हाला काय हवे ते करा, परंतु या माणसाबरोबर असले भयंकर पाप करु नका.”

25 पण ती माणसे काही केल्या ऐकेनात. शेवटी लेवीने आपल्या उपपत्नीला बाहेर काढले आणि त्यांच्या हवाली केले. त्या गुंडांनी रात्रभर तिला छळले. तिच्यावर बलात्कार केला आणि पहाटे तिला तिथे टाकून निघून गेले. 26 पहाटे ती कशीबशी त्या घरात आपल्या धन्याजवळ आली आणि पुढच्या दाराशीच पडली उजाडेपर्यंत ती तशीच तिथे होती.

27 सकाळी लेवी जायच्या तयारीसाठी म्हणून लवकर उठला. बाहेर पडायला म्हणून त्याने दार उघडले तर बाहेर ती पडली होती. तिचा हात उंबरठ्यावर पडला होता. ती त्याच्या दारात पडलेली त्याची उपपत्नी होती. 28 “चल ऊठ, आता जायचे आहे” असे तो तिला म्हणाला. पण ती कुठून उत्तर देणार? ती केव्हाच गतप्राण झाली होती.

त्याने तिला गाढवावर लादले आणि तो घरी निघाला. 29 घरी पोहोंचल्यावर सुरीने त्याने तिचे बारा तुकडे केले इस्राएलच्या सर्व प्रदेशात त्याने ते पाठवून दिले. 30 जो तो हे पाहून म्हणाला, “इस्राएलमध्ये कधीच असे घडले नव्हते. मिसर सोडल्यापासून आजतागायत असे झालेले कधीच आम्ही पाहिले नाही. तेव्हा यावर नीट विचार करुन, व चर्चा करुन. काय करायचे ते सांगा.”

इस्राएल आणि बन्यामी यांच्यामध्ये युध्द

20 तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते. इस्राएलाच्या सर्व वंशातील वडिलधाऱ्या मंडळीनी या सभेत आपापल्या जागा घेतल्या. चार लाखांचे सैन्य तलवारी घेऊन सज्ज होते. इस्राएल लोक मिस्पा येथे जमा झाल्याची बातमी बन्यामीन लोकांच्या कानावर आली. आता ही भयंकर घटना घडली कशी याची इस्राएलांनी विचारणा सुरु केली.

तेव्हा त्या अत्याचाराला बळी पडलेल्या बाईचा नवरा सर्व हकीकत सांगू लागला. तो म्हणाला, “बन्यामीनांच्या अखत्यारीतील गिबा येथे मी आणि माझी उपपत्नी रात्रीच्या मुक्कामासाठी राहिलो. रात्री तेथील लोकांनी आम्ही उतरलो होतो त्या घराला गराडा घातला. त्यांना माझा जीव घ्यायचा होता. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ती मेली. तेव्हा तिला येथपर्यंत आणून मी तिचे तुकडे केले आणि तुम्हाला ते सर्व प्रांतात एकेक पाठवून दिले. बन्यामीनी लोकांनी किती अघोर पाप केले आहे हे कळावे म्हणून आपल्या वाटणीच्या बारा भागात ते मी पाठवले. तेव्हा इस्राएलच्या लोकहो, तुम्हीच सांगा. आता आपण कोणते पाऊल उचलायचे ते ठरवा.”

तेव्हा सर्व जण एकदिलाने उठून उभे राहिले आणि एकमुखाने म्हणाले, “आता मागे फिरणे नाही. या कृत्याचा बदला घेतल्याखेरीज कोणीही घराचे तोंड पाहणार नाही. आता असे करु गिबातील लोकांना धडा शिकवण्यासाठी आधी चिठ्ठ्या टाकून परमेश्वराचा कौल घेऊ. 10 मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषामागे दहा. हजारामागे शंभर आणि दहा हजारातून हजारजण निवडू. ते सैन्याला रसद पोचवतील. आपले सैन्य बन्यामीनांच्या गिबा शहरावर तुटून पडेल. या बेशरम कृत्याबद्दल त्यांचे पारिपत्य करील.”

11 याबद्दल एकमत होऊन सर्व इस्राएल लोक गिबा शहरापाशी जमा झाले. आपण काय करायला निघालो आहोत याबद्दल त्यांचे एकमत होते. 12 त्यांनी बन्यामीन लोकांकडे संदेश पाठवला की तुमच्यापैकी काही जण या अधम, लाजिरवाण्या कृत्याला जबाबदार आहेत. 13 तेव्हा त्यांना गिबा शहरातून बाहेर काढून आमच्या हवाली. करा.

ते लोक आम्हाला द्या म्हणजे आम्ही त्यांना ठार मारु, इस्राएलींमधून ही कीड नाहीशी केली पाहिजे. 14 पण इस्राएल मधील आपल्या भाऊबंदांच्या या दूताचे म्हणणे बन्यामीनांनी ऐकले नाही. 15 आणि बन्यामीनच्या वंशातील लोकांनी आपली शहरे सोडली आणि ते गिबा शहराकडे इस्राएलींशी लढण्यासाठी गेले. 16 बन्यामीनांकडे युध्दाचे खास प्रशिक्षण घेतलेले सव्वीस हजारांचे सैन्य होते. शिवाय गिबाचे सातशै सैनिक होते.

17 याखेरीज सातशे निवडक डावखुरे सैनिक होते. त्यांचे वैशिष्ट्य असे की गोफणीने अचूक नेमबाजी करण्यात त्यांचा हात धरणारे कुणी नव्हते. 18 बन्यामीन वगळता, इस्राएल लोकांच्या सर्व टोळ्यांनी चार लाख लढवय्ये जमा केले त्या चार लाखांपैकी प्रत्येकाकडे तलवारी होत्या त्यातील प्रत्येक जण प्रशिक्षित सैनिक होता.

19 हे इस्राएल लोक बेथेल येथे गेले बन्यामीनांवर आपल्यापैकी कोणी आधी हल्ला करावा याबाबत त्यांनी परमेश्वराचा कौल घेतला. 20 दुसऱ्या दिवशी पहाटे इस्राएलांनी गिबा समोर तळ ठोकला. 21 सर्व तयारीनिशी बन्यामीनांवर हल्ला करायला ते गिबा नगराशी चालून गेले. 22 बन्यामीनांचे सैन्य त्यांच्यावर हल्ला करायला बाहेर पडले. लढाईच्या पहिल्या दिवशी त्यांनी इस्राएलांच्या बावीस हजार जणांना ठार केले.

23-24 यावर इस्राएल लोकांनी संध्याकाळ होईपर्यंत परमेश्वराची करुणा भाकली. आपल्याच बांधवांवर पुन्हा हल्ला करावा का, अशी त्यानी विचारणा केली.

परमेश्वराने त्यांना पुन्हा निर्धाराने चालून जाण्यास सांगितले तेव्हा एकमेकांना धीर देत आदल्या दिवसाप्रमाणेच ते बन्यामीनांवर चाल करुन गेले. 25 लढाईच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली. 26 बन्यामीनांनी इस्राएलांचा हल्ला परतवला आणि त्यांनी आणखी अठरा हजार माणसांना ठार मारले. युध्दात कामी आलेले सर्व सैनिक चांगले तरवारबहाद्दर होते. 27 पुन्हा सर्व इस्राएल लोक बेथेल येथे आले. तेथे बसून त्यांनी रडकुंडूला येऊन परमेश्वरापुढे गाऱ्हाणे मांडले. दिवसभर त्यांच्यापैकी कोणीही अन्न घेतले नाही. परमेश्वाला यज्ञार्पणे आणि शांति अर्पणे वाहिली.

28 इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्न विचारला (त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश बेथेल येथे होता)

29 अहरोन पुत्र एलाजार याचा मुलगा फिनहास हा तेव्हा याजक होता. इस्राएलांनी विचारले. “बन्यामीन आमचे बांधवच आहेत. पुन्हा आम्ही त्यांच्यावर चाल करुन जावे की ही लढाई संपुष्टात आणावी?” परमेश्वराने सांगितले, “चाल करुन जा. उद्या मी तुमच्या हातून त्यांचा पराभव करवतो.” 30 मग इस्राएलांनी काही जणांना गिबा शहराभोवती विखरुन दबा धरुन बसायला सांगितले. अशी मांडणी केल्यावर तिसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच ते गिबावर हल्ला करायला चाल करुन गेले. 31 बन्यामीनांचे सैन्यही गिबा शहराबाहेर पडून इस्राएलींसमोर युध्दाला सामोरे आले. यावर इस्राएल लोकांनी एकाएकी लढाईतून पाठ फिरवली आणि ते पळ काढू लागले. बन्यामीन त्यांचा पाठलाग करत त्यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या मागे गेले. या युक्तीने इस्राएल लोकांनी बन्यामीन सैन्याला आपल्या शहरापासून पार दूरवर पळवत नेले.

बन्यामीनांनी पूर्वी प्रमाणेच या हल्लात इस्राएलाचे सैन्य कापून काढायला सुरुवात केली. रस्त्यात, शेतात अशी जवळपास तीस माणसे त्यांनी ठार केली. येथून एक रस्ता बेथेल शहराकडे आणि एक गिबाकडे जात होता. 32 पूर्वीप्रमाणेच आपला जय होत आहे असे बन्यामीनांना वाटले.

इस्राएल पळ काढत होते. पण ती त्यांची एक चाल होती. बन्यामीनांना शहरापासून लांब रस्त्यावर यायला लावायचे असा त्यांचा डाव होता. प्रथम यहूदाने जावे असे परमेश्वराने सांगितले. 33 असे करत ते बआल-तामार येथे थांबले. गिबाच्या पश्चिमेला काही इस्राएल लपून राहिले होते. त्यांनी गिबावर हल्ला केला. 34 इस्राएलच्या दहाहजाराच्या निवडक सैन्याने गिबावर चढाई केली. तेथे चांगलेच तुंबळ युध्द झाले. या भीषण हल्ल्याची बन्यामीनांना आधी जराही चाहूल लागली नव्हती.

35 परमेश्वराने इस्राएलांकडून बन्यामीनाचा पाडाव करवला. त्यादिवशी बन्यामीनांचे पंचवीस हजार एकशे सैनिक लढाईत कामी आले. ते सर्व चांगले खंदे लढवय्ये होते. 36 तेव्हा आपण हरलो आहोत हे बन्यामीनांच्या लक्षात आले.

इस्राएल लोकांचे सैन्य आता मागे हटले. कारण गनिमी काव्याने छापा घालण्यावर त्यांची भिस्त होती. त्यांची माणसे गिबा येथे लपून बसली होती. 37 दडून राहिलेले लोक गिबात घुसले आणि त्यांनी शहरातील एकूण एक सर्वाना तलवारीने कापून काढले. 38 हे काम झाल्यावर मोठ्ठा धूर करायचा असे त्यांचे ठरले होते. धुराचा लोट पाहून काम फत्ते झाल्याचे बाकी इस्राएलांना कळेल असा संकेत ठरला होता.

39-41 बन्यामीनांनी इस्राएलांच्या तीस सैनिकांना मारले तेव्हा त्यांना वाटले आपली दरवेळेप्रमाणेच जीत होत आहे. पण मग त्यांनी शहरातून धूराचा लोट येताना पाहिले. मागे पाहतात तर सर्व शहरात आग लागलेली. इस्राएल सैन्याने पळ थांबवला. पाठ फिरवून ते युघ्दाला भिडले. बन्यामीनी लोक घाबरले भंयकर संकटाची आत्ता कुठे त्यांना कल्पना आली.

42 त्यांनी इस्राएलांच्या तावडीतून सुटका करुन घेऊन पळ काढला. वाळवंटाच्या दिशेने ते पळू लागले पण लढाईतून त्यांची सुटका होईना. आता शहरांतून इस्राएल लोक बाहेर पडले आणि त्यांचा धुव्वा उडवला. 43 बन्यामीनांना वेढा घालून त्यांना कोंडीत पकडले. अशाप्रकारे सर्व बाजूंनी हैराण करुन, गिबाच्या पूर्वेला त्यांना पुर्ण नेस्तनाबूत करुन टाकले. 44 बन्यामीनांचे अठरा हजार खंदे योध्दे या लढाईत मरण पावले.

45 जे वाचले त्यांतील काही रिम्मोन खडकाकडे पळून गेले. पण या वाटेवर इस्राएल लोकांनी त्यांचे पाच हजार सैनिक टिपले. गिदोमपर्यंत त्यांनी पाठलाग चालूच ठेवला. या ठिकाणी आणखी दोन हजार जणांना ठार मारले.

46 या दिवशी बन्यामीनांची पंचवीस हजार माणसे मारली गेली. लढाईत त्यांनी शौर्य गाजवले. 47 पण बन्यामीनांची सहाशे माणसे वाळवंटात निसटून गेली. ती पळ काढून रिम्मोन खडकापर्यंत पोचली आणि तिथे त्यांनी चार महिने तळ देला. 48 इस्राएल लोकांनी बन्यामीनाच्या प्रदेशात फिरुन तेथील प्रत्येक गावातील एकूणएक लोकांना ठार केले. सर्व शहरे भस्मसात केली.

योहान 3:22-4:3

येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान

22 त्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहूदीया प्रांतात गेले. तेथे येशू आपल्या शिष्यांसह राहिला आणि लोकांचे बाप्तिस्मे केले. 23 योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. एनोन गाव शालिमनगराजवळ आहे. तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे. बाप्तिस्मा करून घेण्यासाठी लोक तेथे येत असत. 24 (योहान तुरुंगात जाण्याच्या अगोदर हे घडले.)

25 योहानाच्या काही शिष्यांचा दुसऱ्या यहूदी लोकांशी वादविवाद झाला. नियमशास्रात सांगितलेल्या शुद्धीकरणाच्या विधीविषयी ते वाद घालीत होते. 26 म्हणून ते शिष्य योहानाकडे आले व म्हणाले, रब्बी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य तुमच्याबरोबर होता तो आठवतो? तुम्ही त्याच्याविषयी साक्ष देखील दिली. तो मनुष्य लोकांना बाप्तिस्मा देत आहे, व पुष्कळजण त्याच्याकडे जात आहेत.

27 योहानाने उतर दिले, “देव जे देतो तेच माणसाला मिळते. 28 मी हे सांगताना तुम्ही स्वतःच ऐकले आहे की, ‘मी ख्रिस्त नाही. त्याच्याकरित मार्ग तयार करण्यासाठी देवाने ज्याला पुढे पाठविले तो मी आहे’. 29 ज्याला वधू असते तो वर असतो, वराला मदत करणारा वराचा मित्र वराची वाट पाहतो आणि वेगळया आवाजामुळे त्याच्या येण्याची चाहूल लागते काय, ते कान देऊन ऐकतो. वराची वाणी आली म्हणजे त्याच्या मित्राला आनंद होतो. तसाच आनंद मला वाटत आहे. आणि माझ्या आनंदाची वेळ आता आलेली आहे. 30 तो महान व्हावा आणि मी लहान व्हावे हे योग्यच आहे.”

स्वर्गातून येणारा

31 “जो (येशू) वरुन येतो तो इतर सर्वांहून थोर आहे. जो मनुष्य या जगापासून आला आहे तो जगाचा आहे. तो जगातल्याच गोष्टीविषयी बोलतो, परंतु जो स्वर्गातून आला तो (येशू) इतर लोकांहून थोर आहे. 32 त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो. परंतु तो सांगातो त्या गोष्टी कोणी स्वीकारीत नाहीत. 33 तो (येशू) जे सांगतो ते मान्य करणारा माणूस, देव सत्य आहे याचा पुरावाच देतो. 34 देवाने त्याला (येशूला) पाठविले. आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो. 35 पिता पुत्रावर प्रीति करतो, पित्याने सर्व गोष्टींवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे. 36 जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळते, पंरतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही त्याला अनंतकाळचे जीवन कधीही मिळणार नाही. उलट देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”

येशू शोमरोनी स्त्रीशी बोलतो

परुश्यांनी हे ऐकले की, येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करुन घेत आहे. (परंतु खरे पहता, येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, तर त्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत.) परुश्यांनी आपणांविषयी ऐकले आहे हे येशूला समजले. म्हणून येशू यहूदीयातून निघून परत गालील प्रांतात गेला.

स्तोत्रसंहिता 104:24-35

24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
    तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे!
    आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात.
तिथे लहान मोठे प्राणी आहेत.
    मोजता न येण्याइतके.
26 समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान,
    तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.

27 देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत.
    तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.
28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस.
    तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात.
    त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात.
    ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात
    आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.

31 परमेश्वराचे वैभव सदैव राहो!
    परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.
32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते.
    त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.

33 मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन.
    मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते.
    मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
    दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.

माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
    परमेश्वराची स्तुती कर.

नीतिसूत्रे 14:22-23

22 जो दुष्ट गोष्टींच्या योजना आखतो तो चूक करतो. पण जो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याजवळ प्रेम करणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतात.

23 जर तुम्ही कष्ट केलेत तर तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुमच्या जवळ असतील. पण जर तुम्ही काही न करता फक्त बोलतच राहिलात तर तुम्ही गरीबच राहाल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center