Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 17-18

मीखाची मूर्तिपूजा

17 एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नामक एक माणूस राहात होता. तो एकदा आपल्या आईला म्हणाला, “तुझ्याजवळचे अठ्ठावीस पौंड रुपे कोणी तरी चोरले होते. आठवते ना? तू त्याला शापही दिला होतास. खंर तर ते मीच घेतले होते. माझ्याकडे ते आहे.”

त्याची आई त्याला म्हणाली, “मुला, परमेश्वर तुझे भले करो.”

मीखाने ते सर्व रुपे आपल्या आईला परत केले ती म्हणाली, “हे मी आता परमेश्वरालाच अर्पण करते. मी ते तुझ्या हवाली करते. तू देवाची एक मूर्ती करुन ती या चांदीने मढव तेव्हा आता हे रुपे तूच घे.”

पण त्याने ते न घेता आईलाच परत केले. तेव्हा तिने त्यातील पाच पौंड रुपे सोनाराला दिले. सोनाराने एक मूर्ती घडवून ती चांदीने मढवली. मूर्तीची प्रतिष्ठापना मीखाच्या घरात करण्यात आली. त्याच्याकडे देवघर होते. त्याने एफोद आणि आणखी काही मूर्ती केल्या. आपल्या एका मुलाला पुरोहित म्हणून नेमले. (त्याकाळी इस्राएलांवर राजा नव्हता तेव्हा प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल तसे करीत असे.)

बेथलहेम येथे यहूदा कुळामध्ये एक तरुण लेवी होता. इतरत्र स्थायिक होण्याच्या विचाराने त्याने बेथलहेम सोडले. असाच प्रवास करत करत तो मीखाच्या घरी येऊन पोहोंचला. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील मीखाच्या घरी तो आल्यावर

मीखाने त्याला विचारले, “बाबा रे, तू कोण? कोठून आलास?”

या तरुणाने उत्तर दिले, “मी यहूदा बेथलहेम येथील लेवी आहे. मी कोठेतरी आसरा शोधतोय”

10 मीखा त्याला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औस रुपे तसेच अन्नवस्त्रही देईन.”

त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले. 11 मीखाबरोबर राहण्यास त्याने होकार देला. मीखाच्या पोटच्या मुलापैकीच तो एक होऊन गेला. 12 मीखाने त्याच्यावर पौरोहित्य सोपवले. तेव्हा तो त्याप्रमाणे मीखाच्या घरी राहू लागला. 13 मीखा म्हणाला, “लेवी कुळातील माणूसच माझ्याकडे पुरोहित म्हणून असल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील.”

दान लोकांचा लईश नगरावर ताबा

18 त्याकाळी इस्राएलवर कोणी राजा नव्हता. त्या सुमारास दान वंशातील लोक वस्ती करण्याच्या उद्देशाने जागा पाहात होते. त्यांना अजून स्वतःची अशी भूमी नव्हती. इतर इस्राएलांप्रमाणे त्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.

तेव्हा दानवंशजांनी जागा हेरण्यासाठी पाच शूर माणसे निवडली ती सरा आणि अष्टावोल या प्रांतातली होती. सर्व कुळांचे प्रतिनिधित्व ती करत होती. जागा पाहण्याचा आदेश मिळाल्यावर चांगल्या जागेच्या शोधार्थ हे पाचजण निघाले.

एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात आल्यावर मीखाच्या घराजवळ त्यांनी रात्रीपुरता मुक्काम केला. मीखाच्या घरापाशी ते आले तेव्हा त्यांना एका तरुण लेवी माणसाचा आवाज ऐकू आला. आवाज ओळखून ते घरापाशी थांबले. त्यानी लेवीला विचारले, “तू इथे कसा आलास? कोणी आणले तुला इथे? इथे तू काय करतोस?”

मीखाने जे जे केले ते त्याने या लोकांना सांगितले तो म्हणाला, “मला त्याने वेतन देऊन नेमले आहे. मी त्याचा पुरोहित आहे.”

तेव्हा ते त्याला म्हणाले, “परमेश्वराजवळ तू आमच्यासाठी काहीतरी माग वस्ती करण्यास योग्य अशी जागा शोधण्यात आम्हाला यश येईल का, हे जाणण्याची आम्हांला इच्छा आहे.”

तो पुरोहित त्या पाच जणांना म्हणाला, “तुम्ही शांततेने जा. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल.”

तेव्हा ते पाचजण तेथून निघाले. लईश या नगराशी ते आले. येथील लोकांचे जीवन सिदोनी लोकांसारखे आहे. ते निश्चिंत आहेत. सुखा समाधानात आहेत हे त्यांनी पाहिले. सर्व गोष्टींची तिथे सुबत्ता होती. शत्रूचा उपद्रव नव्हता. सादोन पासून हा भाग लांब होता. तसेच अरामी लोकांशीही त्यांचा काही संबंध नव्हता.

हे पाहून हे पाचजण सरा आणि अष्टावोल या आपल्या शहरांमध्ये परतले. तेथील भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्हांला काय आढळले?”

ते म्हणाले, “आम्ही एक जागा हेरुन ठेवली आहे. ती फार सोयीची आहे. आता वेळ न दवडता आपण त्यांच्यावर हल्ला करु. जाऊन तिथला ताबा मिळवू. 10 तेथे जागा भरपूर आहे, अन्नधान्य मुबलक आहे. तेथे गेल्यावर तुमच्या ते लक्षात येईलच. शिवाय, हल्ल्याची लोकांना कल्पनाही नसल्याने ते निर्धास्त आहेत. खरोखर परमेश्वराने ही जमीन आपल्याला दिली आहे.”

11 तेव्हा सरा आणि अष्टावोल येथून हल्लयाच्या तयारीने दान वंशातील सहाशे जण निघाले. 12 लईशच्या वाटेवर असताना त्यांनी यहूदातील किर्याथ-यारीम येथे तळ ठोकला. म्हणूनच किर्याथ-यारीमच्या पश्चिमेकडील या भागाला अजूनही महाने दान म्हणजेच दान लोकांची छावणी म्हणून ओळखले जाते. 13 येथून पुढे ते प्रवास करत एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापाशी येऊन पोचले.

14 यापूर्वी येऊन लईश भोवतालचा प्रदेश पाहून गेलेले ते पाच जण आपल्या बरोबरच्या बाकीच्या लोकांना म्हणाले. “इथल्या एका घरात एफ्रोद आहे. शिवाय काही मूर्ती, एक कोरीव आणि चांदीची मूर्ती एवढे सगळे आहे. काय करायचे माहीत आहे ना? जाऊन आपल्या ताब्यात घ्यायचे” 15 आणि ते पाचजण मीखाच्या घराशी थांबले. तेथे तो तरुण लेवी होताच त्यांनी “तू कसा आहेस?” म्हणून विचारले 16 बाकीची दान वंशातील सहाशे हत्यारबंद माणसे वेशीजवळ उभी होती. 17-18 हे पाच जण घरात घुसले. त्यांनी सर्व कोरीव मूर्ती, घरातील बाकीच्या मूर्ती आणि चांदीची मूर्ती, एफोद हे सर्व लुटले तेव्हा तो लेवी पुरोहित बाहेर त्या सहाशे जणांच्या जमावाबरोबर होता. तो म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहात?”

19 ते पाच जण म्हणाले, “गप्प राहा, एक शब्दही काढू नकोस. आमच्या बरोबर चल. आमच्यातील वडीलधारा आणि याजक हो. आता तूच निवड कर, फक्त एका माणसाचा पुरोहित होऊन राहाणे बरे की, इस्राएलांच्या एका आख्ख्या वंशाचे याजक होणे बरे?”

20 याने त्या लेवी तरुणाला आनंद झाला. त्याने तो एफोद, मूर्ती इत्यादी सर्व घेतले आणि दान वंशातील लोकांबरोबर निघाला.

21 मग ही सहाशे दान माणसे, या लेवी तरुणाबरोबर निघाली. मीखाचे घर मागे टाकून ते आपल्या वाटेने गेले. लहान मुले. गुरेढोरे. सामानसुमान असा सर्व लवाजमा त्यांनी आपल्या पुढे ठेवला होता.

22 तेबरेच पुढे गेल्यावर इकडे मीखाच्या जवळ राहणारे सर्व लोक एकत्र आले. त्यांनी दान लोकांचा पाठलाग केला व त्यांना गाठले. 23 मीखाचे लोक दान लोकांच्या नावाने गर्जना करत होते. ते ऐकून दान लोक मागे वळून मीखाला म्हणाले, “काय गडबड आहे? तुम्ही का ओरडताय?”

24 मीखा म्हणाला, “तुम्ही माझ्या मूर्ती पळवल्यात. मी त्या स्वतः घडवल्या आहेत. माझ्या पुरोहितालाही तुम्ही घेऊन चालला आहात. माझे आता काय राहिले? ‘काय गडबड आहे?’ असे वर आणखी मलाच विचारता?”

25 दान लोकांनी सांगितले, “तू वाद न घातलेला बरा. आमच्या पैकी काही फार रागीष्ट आहेत. तू ओरडलास तर ते तुझ्यावर हल्ला करतील. तू आणि तुझे कुटुंबीय उगीचच जिवाला मुकाल.”

26 एवढे बोलून दान लोक परत फिरले आणि आपल्या मार्गाला लागले. हे लोक आपल्याला भरी आहेत हे लक्षात घेऊन मीखाही घरी परतला.

27 अशाप्रकारे मीखाच्या मूर्ती, पुरोहित हे सर्व मिळवून ते लईश येथे पोहोंचले. त्यांनी लईश येथील रहिवाश्यांवर हल्ला चढवला. सर्वत्र शांतता नांदत असताना हल्ला होईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. लोकांना तरवारीने कापून काढून दान लोकांनी शहराला आग लावली. 28 लईश येथील लोकांच्या मदतीला धावून येणारे कोणी नव्हते. सिदोन शहरापासून ते फार लांब होते तेव्हा तेथील लोकांना मदतीसाठी तेथे येणे शक्य नव्हते आणि अरामी लोकांशी त्यांचा कुठला करार झालेला नसल्याने तेही आले नाहीत. बेथ-रहोबच्या ताब्यात असलेल्या खोऱ्यात लईश हे शहर होते. दान लोकांनी तेथे नवे शहर वसवले आणि तेथे ते राहू लागले. 29 पूर्वीचे लईश हे नाव बदलून त्यांनी त्याला दान हे नाव दिले. इस्राएलाचा एक वंशज दान हा त्यांचा पूर्वज होता, त्याच्यावरुन हे नाव मिळाले.

30 दान लोकांनी या मूर्तीची दान शहरात स्थापना केली. गेर्षोमचा मुलगा योनाथन याला याजक म्हणून नेमले. गेर्षेम हा मोशेचा मुलगा. इस्राएल लोकांचा पाडाव होऊन त्यांनी बाबिलोनला बंदी म्हणून नेईपर्यंत योनाथन व त्याची मुले दान वंशजांचे याजक म्हणून पौरोहित्य करत होती. 31 मंदिर शिलोह येथे असेपर्यंत दानचे लोक मीखाने केलेल्या मूर्तीची पूजाअर्चा करत होते.

योहान 3:1-21

येशू आणि निकदेम

निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परूशी लोकांपैकी एक असून तो यहूदी लोकांचा एक महत्त्वाचा पुढारी होता. एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, “रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हांला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत.”

येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही.”

निकदेम म्हणाला. “जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही! म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही!”

येशूने उत्तर दिले. “मी तुम्हांला खरे सांगतो: मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो. परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हांला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका. वाऱ्याला वहायला पाहिजे तिकडे तो वाहतो, वारा वाहताना तुम्हांला त्याचा आवाज ऐकू येतो. परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्थेक माणसाचे असेच असते.”

निकदेम म्हणाला, “हे सारे कसे शक्य आहे?”

10 येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय? 11 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. आम्हांला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविष्यी आम्ही सांगतो. परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानीत नाही. 12 मी तुम्हांला जगातील गोष्टीविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हांला स्वर्गातील गोष्टीविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही! 13 मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला.”

14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. [a] मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे. 15 अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते.”

16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. 18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. 19 ज्या वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते. 20 वाईट कृत्ये करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो. तो प्रकाशाकडे येत नाही. कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्ये तो प्रकाश उघड करील. 21 परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल. [b]

स्तोत्रसंहिता 104:1-24

104 माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
    परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस.
तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
    माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस.
तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
    देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस.
तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि
    वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस
    आणि तुझ्या सेवकांना अग्नीसारखे.
देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेने उभारलेस की
    तिचा कधीही नाश होणार नाही.
तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस,
    पाण्याने डोंगरही झाकले गेले.
परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले.
    देवा, तू पाण्याला दटावलेस आणि ते ओसरले.
पाणी डोंगरावरुन खाली दरीत वाहात गेले
    आणि नंतर ते तू त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले.
तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि
    आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.

10 देवा, तू पाण्याला ओढ्यातून झऱ्यात जायला लावतोस.
    ते डोंगरातल्या झऱ्यातून खाली वाहात जाते.
11 झरे सगळ्या रानटी श्वापदांना पाणी देतात.
    रानगाढवे देखील तिथे पाणी पिण्यासाठी येतात.
12 पानपक्षी तेथे वस्ती करतात.
    ते जवळच्याच झाडांच्या फांद्यांवर बसून गातात.
13 देव डोंगरावर पाऊस पाठवतो.
    देवाने केलेल्या गोष्टी पृथ्वीला जे काही हवे ते सर्व देतात.
14 देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो.
तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो.
    त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.
15 देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो.
    आपली कातडी मऊ करणारे तेल देतो
    आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो.

16 लबानोन मधले मोठे देवदार वूक्ष परमेश्वराचे आहेत.
    परमेश्वराने ती झाडे लावली आणि तो त्यांना लागणारे पाणी देतो.
17 पक्षी त्या झाडांत आपली घरटी बांधतात.
    मोठे करकोचे देवदारूच्या झाडातच राहातात.
18 रानबकऱ्या उंच पर्वतावर राहातात.
    मोठ मोठे खडक कोल्ह्यासारख्या प्राण्याची लपून बसायची जागा आहे.

19 देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास
    आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते.
20 तू काळोखाला रात्र केलेस अशा वेळी रानटी जनावरे बाहेर येतात
    आणि इकडे तिकडे फिरतात.
21 सिंह हल्ला करताना गर्जना करतात.
    जणू काही ते देवाकडे तू देत असलेल्या अन्नाची मागणी करीत आहेत.
22 नंतर सूर्य उगवतो आणि प्राणी
    आपापल्या घरी परत जाऊन विश्रांती घेतात.
23 नंतर लोक त्यांचे काम करायला जातात
    आणि ते संध्याकाळपर्यंत काम करतात.

24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
    तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.

नीतिसूत्रे 14:20-21

20 गरीबाला मित्र नसतात, शेजारीही नसतो. पण श्रीमंताला खूप मित्र असतात.

21 जो शेजाऱ्याला पाण्यात पहातो, तो पाप करतो. जर सुखी व्हायचे असेल तर त्या गरीबांशी दयाळू राहा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center