Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 15-16

शमशोन पलिष्ट्यांना भस्म करतो

15 गव्हाच्या कापणीच्या हंगामात शमशोन आपल्या बायकोच्या भेटीला निघाला. एक करडूही त्याने भेटीदाखल घेतले. माझ्या पत्नीच्या दालनात मी जातो असे तो म्हणाला.

पण तिच्या वडीलांनी त्याला आत जायला मज्जाव केला. ते त्याला म्हणाले, “तुला तर ती नकोशी झाली आहे असे मला वाटले. म्हणून तुमच्या विवाहातील सोबत्याशी मी तिचे लग्न लावून दिले. तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा देखणी आहे. तेव्हा तू तिच्याशी लग्न कर.”

पण शमशोन म्हणाला, “आता पलिष्ट्यांचे नुकसान करायला मला चांगले निमित्त मिळाले आहे. मला आता त्याबद्दल कोणी दोष देणार नाही.”

मग बाहेर पडून त्याने तीनशे कोल्हे धरले दोन दोन कोल्ह्यांच्या शेपट्या एकत्र बांधून तिथे एक एक मशाल बांधली. त्याने त्या मशाली पेटवून दिल्या आणि सर्व कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या धान्याच्या उभ्या पिकात धावायला सोडले. त्यामुळे शेतातील कापणी झालेले, न झालेले असे सर्व पीक भस्मसात झाले. एवढेच नव्हे तर द्राक्षाचे आणि जैतुनाचे मळेही बेचिराख झाले.

“कोणी केले हे सगळे?” पलिष्टी विचारु लागले.

कोणी तरी म्हणाले. “तिम्ना येथील एकाचा जावई शमशोन हा या सगळ्याच्या पाठीमागे आहे. कारण त्याच्या सासऱ्याने आपली मुलगी शमशोन ऐवजी त्यांच्या विवाहातील सोबत्याला दिली.” हे ऐकल्यावर पलिष्ट्यांनी शमशोनची बायको आणि तिचे वडील यांना जिवंत जाळले.

तेव्हा शमशोन पलिष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी वाईट वागलात. आता मी ही तुमच्याशी वाईट वागेन त्यानंतरच मी थांबेन.”

शमशोनने मग पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यात अनेक जण ठार झाले. त्यानंतर शमशोन एटाम खडकांमधील गुहेत राहिला.

इकडे पलिष्टी लोक यहूदात गेले आणि लेही या ठिकाणी त्यांनी तळ दिला. तेथून त्यांनी युध्दाची तयारी सुरु केली. 10 तेव्हा यहूद्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलात काय?”

ते म्हणाले, “आम्ही शमशोनला ताब्यात घ्यायला आलो आहोत. त्याला आम्हाला कैद करायचे आहे. त्याने आमच्या लोकांशी केलेल्या वर्तणुकीची सजा त्याला द्यायची आहे.”

11 हे ऐकल्यावर तीन हजार यहूदी एटाम खडकातील गुहेपाशी शमशोनला भेटायला गेले. ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आपल्यावर पलिष्ट्यांचे राज्य आहे हे तुला समजत नाही का?”

शमशोन म्हणाला, “ते माझ्याशी जसे वागले तशीच त्यांना मी शिक्षा दिली आहे.”

12 त्यावर ते लोक शमशोनला म्हणाले, “आम्ही तुझ्या मुसक्या बांधून तुला पलिष्ट्यांच्या स्वाधीन करायला आलो आहोत.”

शमशोन म्हणाला, “तुम्ही स्वतः मला इजा करणार नाही एवढा शब्द तुम्ही मला द्या.”

13 यहूदी म्हणाले, “मान्य आहे, आम्ही फक्त तुला बांधून पलिष्ट्यांच्या हवाली करतो तुझ्या जिवाला धक्का लावणार नाही.” त्याप्रमाणे त्यांनी शमशोनला दोन नवीन दोरखंडांनी बांधून गुहेतून वर आणले.

14 शमशोन लेही या ठिकाणी आला तेव्हा पलिष्टी लोक त्याला सामोरे आले. ते आनंदाने आरोळ्या मारत होते त्याच वेळी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा प्रचंड सामर्थ्यानिशी संचार झाला. तेव्हा शमशोनचे दोरखंड जसे काही वाखाच्या जळलेल्या दोरीप्रमाणे कुचकामी झाले आणि त्यामुळे ते त्याच्या दंडांवरून आपोआप गळून पडले. 15 तेव्हा शमशोनला तिथे एका मृत गाढवाचे जबड्याचे हाड सापडले. त्याच्या साहाय्याने त्याने एक हजार पलिष्टी लोकांना ठार केले.

16 तेव्हा शमशोन म्हणाला.

“गाढवाच्या जबड्याच्या हाडाने
    मारली मी माणसे हजार!
गाढवाच्या जबड्याच्या हाडाने
    रचली मी त्यांची उंच रास.” [a]

17 बोलणे संपल्यावर शमशोनने ते हाड तेथेच खाली टाकले. म्हणून त्या जागेचे नाव पडले, “रामथ-लेही” म्हणजेच जबड्याच्या हाडाची टेकडी.

18 शमशोन तहानेने व्याकुळ झाला. तेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला. तो म्हणाला, “तुझा मी दास आहे. हा एवढा मोठा विजय तू मला मिळवून दिलास तेव्हा आता मला तहानेने तू खचितच मरु देणार नाहीस? ज्यांची सुंताही झालेली नाही अशा लोकांच्या तावडीत मी सापडू नये.”

19 तेव्हा देवाने लेहीत खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले शमशोन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला. पुन्हा त्याच्या अंगात जोर आला. त्या झऱ्याचे नाव त्याने एन-हक्कोरे म्हणजे “धावा करणाऱ्याचा झरा” असे ठेवले. लेही शहरात हा झरा अजूनही आहे.

20 पलिष्ट्यांच्या अमदानीत शमशोन वीस वर्षे इस्राएलचा न्यायाधीश होता.

गज्जा नगरात शमशोन

16 एक दिवस शमशोन गज्जा या नगरात गेला. तेथे त्याने एका वेश्येला पाहिले. ती रात्र त्याने तिच्याकडे घालवली. कोणीतरी हे पाहून शमशोन आला असल्याचे गज्जाच्या लोकांना सांगितले. तेव्हा ते त्याला मारायला निघाले. त्या ठिकाणाला वेढा घालून ते शमशोनची वाट पाहात दबा धरुन बसले. शहराच्या वेशीपाशी त्यांनी पूर्ण रात्र काढली गप्प राहून रात्र भर त्यांनी आपला सुगावा लागू दिला नाही. ते एकमेकांना म्हणाले, “उजाडताच आपण त्याला मारु”

पण शमशोन त्या वेश्येकडे मध्यरात्रीपर्यंतच राहिला. अर्ध्या रात्रीच तो उठला. वेशीचे दरवाजे त्याने खिळखिळे केले. ते दरवाजे, त्यांच्या चौकटी आणि अडसर हे सगळे त्याने उचकटून काढले, खांद्यावर टाकले आणि हे सगळे घेऊन तो हेब्रोन जवळच्या डोंगरमाथ्यावर गेला.

शमशोन आणि दलीला

पुढे शमशोन दलीला नामक स्त्रीच्या प्रेमात पडला. ती सोरेक खोऱ्यातील होती.

पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.”

मग दलीला शमशोनला म्हणाली, “तुझ्या सामर्थ्याचे रहस्य तरी काय? तुला ठाणबंद करुन हतबल करायचे तरी कसे एखाद्याने?”

शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या न वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांधले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.”

तेव्हा पलिष्टी अधिकाऱ्यांनी दलीलाला सात नव्या प्रत्यंचा आणून दिल्या. त्या अजून पुरत्या वाळल्या देखील नव्हत्या. दलीलाने त्यांनी शमशोनला जखडून टाकले. शेजारच्या खोलीत काही माणसे लपून बसली होती. दलीला शमशोनला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक आता तुला ताब्यात घेणार आहेत.” पण शमशोनने त्या प्रत्यंचा सहजगत्या तोडून टाकल्या जळलेल्या सुतळीची राख पडावी इतक्या सहजपणे त्या गळून पडल्या. अशाप्रकारे पलिष्ट्यांना काही शमशोनच्या सामर्थ्याचे रहस्य समजले नाही.

10 तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “तू माझ्याशी खोटे बोललास. मला फसवलेस, खरे काय ते मला सांग तुला कसे बांधून घालता येईल?”

11 शमशोन म्हणाला, “नव्या, कधीही उपयोगात न आणलेल्या दोरखंडानी मला जखडायला हवे. तसे केले तर मी अगदीच हतबल होऊन जाईन.”

12 तेव्हा दलीलाने नवेकोरे दोरखंड आणून त्याला बांधले. दुसऱ्या खोलीत काही जण लपलेले होतेच. दलीला मोठ्याने म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला पकडायला आले आहेत!” पण याही वेळी शमशोनने ते दोरखंड सुतळीसारखे तटकन तोडून टाकले.

13 यावर ती त्याला म्हणाली, “बघ, पुन्हा तू खोटे बोललास! मला बावळट ठरवलेस. आता तरी सांग तुला जखडून टाकायची युक्ती.”

शमशोनने सांगितले, “माझ्या केसांचे सात पेड करुन ते मागाच्या ताण्यावर करकचून आवळले तरच ते शक्य आहे.”

शमशोनला झोप लागल्यावर दलीलाने हातमाग वापरुन त्याच्या डोक्यावरील सात पेड विणून तिने 14 तंबूची खुंटी ठोकून माग जमिनीवर पक्का रोवला. मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुझा ताबा घ्यायला सज्ज आहेत.” त्यावर शमशोनने खुंटी, माग हे सगळे सहजगत्या उपटून टाकले.

15 तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुपित तू फोडायला तयार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रचंड सामर्थ्याचे गुपित तू अजूनही मला सांगितलेले नाहीस.” 16 तिने मग त्याच्या मागे लकडाच लावला. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे मरण बरे असे त्याला वाटू लागले. 17 शेवटी त्याने तिला सर्व काही सांगून टाकले. तो म्हणाला, “आजतागायत कधीही माझे केस कापलेले नाहीत. माझ्या जन्माआधीच मला परमेश्वराला वाहिलेले आहे. तेव्हा आता माझे मुंडन केले तर माझा शक्तिपात होईल व मी चार चौघांसारखा सामान्य होईन.”

18 आता त्याने खरंच आपले मन मोकळे केले आहे हे दलीलाच्या लक्षात आले. म्हणून पलिष्टी अधिकाऱ्यांना तिने निरोप पाठवला, “आता शमशोनने आपले रहस्य मला नक्की सांगितले आहे.” तेव्हा ते आले. येताना तिला वचन केलेले पैसेही घेऊन आले.

19 आपल्या मांडीवर पडल्या पडल्या शमशोनला झोप लागली आहे याची खात्री पटल्यावर तिने एकाला बोलावले. त्याच्या कडून शमशोनच्या डोक्यावरील सात बटांचे तिने मुंडन करवले. अशा रितीने तिने त्याला अगदी हतबल करुन टाकले. शमशोन गलितगात्र आणि पराभवास योग्य झाला. त्याची शक्ती त्याला सोडून गेली. 20 मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला जेरबंद करायला आले आहेत.” तेव्हा तो जागा झाला. त्याला वाटले, “पूर्वीप्रमाणेच याही वेळी मी माझी सुटका करुन घेऊ शकेन.” पण परमेश्वर आपल्याला सोडून गेला आहे याची त्याला कल्पना नव्हती.

21 मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर धान्य दळायला लावले. 22 परंतु शमशोनचे केस पुन्हा वाढू लागले.

23 पलिष्ट्यांचे अधिकारी मोठा आनंदोत्सव साजरा करायला एकदा एकत्र जमले. आपला देव दागोन याच्या प्रीत्यर्थ ते मोठा यज्ञ करणार होते. कारण त्यांना वाटत होते की शमशोन या शत्रूचा पाडाव करायला त्यांच्या ह्या दैवताने त्यांना मदत केली होती. 24 शमशोनची दशा पाहून ते त्यांच्या दैवताची स्तुती करु लागले. ते म्हणाले.

“याने आमच्या देशाचा नाश केला
    आमची पुष्कळ माणसे मारली
परंतु आमच्या देवाच्या मदतीनेच
    आम्ही त्याला ताब्यात घेऊ शकलो.”

25 उत्सवाच्या ठिकाणी मौजमजा करण्यात लोक दंग होते. ते म्हणाले, “शमशोनला समोर आणा. त्याची थोडी चेष्टा करु.” तेव्हा शमशोनला तुरुंगातून बाहेर काढले आणि लोक आपली करमणूक करुन घेऊ लागले. देवळातील खांबांमध्ये त्यांनी त्याला उभे केले होते. 26 एका सेवकाने शमशोनचे हात घटृ धरुन ठेवले होते. शमशोन त्याला म्हणाला, “या देवळाला आधार देणाऱ्या दोन खांबामध्ये मला उभे कर. म्हणजे मला हातानी चाचपडून पाहता येईल. त्यांना रेलून मला उभे राहता येईल.”

27 देवळात बायका-पुरुष सगळ्यांची एकच गर्दी उसळली होती. पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे हजर होते. शिवाय छपरावर तीन एक हजार माणसे होती. सर्वजण शमशोनची गंमत पाहण्यात दंग होते. 28 तेव्हा शमशोनने देवाचा धावा केला. तो म्हणाला, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी आठवण कर एकदा, फक्त एकदाच माझी शक्ती मला परत दे. माझे डोळे फोडल्याबद्दल शिक्षा म्हणून एकदाच या पलिष्ट्यांना मला धडा शिकवू दे.” 29 एवढे म्हणून देवळाच्या मधोमध असलेले ते दोन खांब शमशोनने धरले. पूर्ण देवळाचा डोलारा या दोन स्तंभांवर उभा होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्या स्तंभांना त्याने जोराचा रेटा दिला. 30 “या पलिष्ट्यांच्या बरोबरच माझीही अखेर होईल.” एवढे म्हणून त्याने जबरदस्त ताकद लावली. त्याबरोबर पूर्ण देऊळ जमीनदोस्त झाले. अधिकाऱ्यांसह सर्व माणसे त्याखाली सापडली. जिवंतपणी मारली त्यापेक्षा कितीतरीपट माणसे शमशोनने अशाप्रकारे मरता मरता मारली.

31 शमशोनचे भाऊ बंद आणि घरातील सर्व परिवार तेथे जमा झाला. त्याचा मृतदेह त्यांनी घेतला आणि त्याच्या वडीलांच्या कबरीतच त्याचाही अंत्यसंस्कार केला. सरा आणि अष्टावोल यांच्या दरम्यान हे कबरस्थान आहे. शमशोनाने वीस वर्षे इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.

योहान 2

काना येथील लग्न

दोन दिवसांनी गलीलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते. लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता. सगळा द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”

येशूने उतर दिले, “आई, तू मला यात का गुंतवितेस? माझी वेळ अजून आलेली नाही.”

येशूची आई नोकरांना म्हणाली, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.”

त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते, यहूदी लोक विशेष विधीप्रसंगी धुण्यासाठी [a] पाणि ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात वीस ते तीस बादल्या पाणी मावत असे.

येशू नोकरांना म्हणाला, “हे रांजण पाण्याने भरा.” मग नोकरांनी ते रांजण काठोकाठ भरले.

मग येशू नोकरांना म्हणाला, “आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजनप्रमुखाकडे न्या.”

मग नोकर ते पाणी घेऊन भोजनप्रमुखाकडे गेले. मग लग्नसमारंभातील भोजनप्रमुखाने ते चाखून पाहिले, तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कोठून आला होता हे माहीत होते. लग्नसमारंभाच्या भोजनप्रमुखाने वराला बोलाविले. 10 तो वराला म्हणाला, “लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात. नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.”

11 स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालीलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला. आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

12 नंतर येशू कफर्णहूम गावी गेला. येशूची आई, भाऊ व त्याचे शिष्य त्याच्यासोबत गेले. ते सर्व काही दिवस कफर्णहूमास राहिले.

येशू मंदिरात जातो(A)

13 यहूदी लोकांचा वल्हांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला. 14 येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती. 15 येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वाना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथेपालथे केले आणि त्यांचे पैसे विस्कटून टाकले. 16 येशू कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!”

17 हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली:

“तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले जाईल” (B)

18 यहूदी लोक येशूला म्हणाले, “एखादा चमत्कार करुन आम्हांला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हांला अधिकार आहे हे सिद्द करा.”

19 येशूने उत्तर दिले, “हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते तीन दिवसांत पुन्हा उभारीन.”

20 यहूदी लोक म्हणाले, “लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली! आणि तुम्ही ते तीन दिवसांत बांधू शकता यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय?”

21 (परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी बोलला. 22 नंतर येशू मेलेल्यांतून पुन्हा उठविला गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला.)

23 वल्हांडण सणासाठी येशू यरुशलेमात होता. पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले. 24 परंतु येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही. कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते. 25 लोकांविषयी कोणी येशूला सांगावे याची त्याला काहीच गरज नव्हती. लोकांच्या मनात काय आहे हे येशू जाणून होता.

स्तोत्रसंहिता 103

दावीदाचे स्तोत्र

103 माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर.
    माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.
माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि
    तो खरोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.
देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर.
    तो आमचे सर्व आजार बरे करतो.
देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि
    तो आम्हांला प्रेम आणि सहानुभूती देतो.
देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो.
    तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो.
परमेश्वर न्यायी आहे. जे लोक इतरांकडून दु:खी झाले आहेत
    त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो.
देवाने मोशेला नियम शिकवले,
    देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करु शकतो त्या त्याने इस्राएलला दाखवल्या.
परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे.
    देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे.
परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही.
    परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहात नाही.
10 आम्ही देवाविरुध्द पाप केले
    पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही.
11 देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम
    हे स्वर्ग पृथ्वीवर जितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे.
12 आणि देवाने आमची पापे
    पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.
13 वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात
    तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो.
14 देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते.
    आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे.
15 आमचे आयुष्य कमी आहे हे देवाला माहीत आहे.
    त्याला माहीत आहे की आम्ही गवताप्रमाणे आहोत.
16 आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे.
    ते फूल लवकर वाढते.
    गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही.
17 परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले
    आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे.
देव त्यांच्या मुलांशी आणि
    मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.
18 जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.
    जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.
19 देवाचे सिंहासन स्वर्गात आहे
    आणि तो सर्वांवर राज्य करतो.
20 देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा.
    देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात.
    तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता.
21 परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा.
    तुम्ही त्याचे सेवक आहात.
    देवाला जे हवे ते तुम्ही करा.
22 परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या.
    देव चराचरावर राज्य करतो. आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.

नीतिसूत्रे 14:17-19

17 जो माणूस चटकन् रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो. शहाणा मनुष्य सहनशील असतो.

18 मूर्खांना त्यांच्या मूर्खपणाबद्दल शिक्षा होते. पण शहाण्यांना ज्ञानाचा लाभ होतो.

19 चांगले लोक वाईटांबरोबर लढताना जिंकतील, वाईटांना त्यांच्यापुढे नतमस्तक होणे भाग पडेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center