Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 13-14

शमशोनचा जन्म

13 इस्राएल लोकांनी दुष्कृत्ये करायला सुरुवात केली आहे असे पुन्हा परमेश्वराच्या लक्षात आले. तेव्हा त्याने चाळीस वर्षे पलिष्ट्यांच्या हातात सत्ता दिली.

सरा नगरामध्ये मानोहा नावाचा एक माणूस होता. तो दान वंशातील होता. त्याच्या बायकोला मूलबाल होत नव्हते. एकदा परमेश्वराच्या दूताने तिला दर्शन देले. तो तिला म्हणाला, “तुला आजतागायत मूल झाले नाही पण आता तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल. मात्र द्राक्षारस किवा मद्य पिऊ नको. तसेच कोणताही अशुद्ध पदार्य खाऊ नकोस. कारण तू गर्भवती राहून पुत्राला जन्म देशील. तो परमेश्वराचा असेल. तो नाजीर होईल. त्यांचे जावळ काढू नको. जन्माला येण्याअगोदर पासूनच परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी असेल. पलिष्ट्यांपासून तो इस्राएलांचे रक्षण करील.”

तिने आपल्या नवऱ्याला सर्व काही सांगितले. ती म्हणाली, “देवाकडून एक माणूस माझ्याकडे आला होता. त्याचे रूप देवाच्या देवदूताप्रमाणे भिती आणि आदर निर्माण करणारे होते. त्याला पाहून मी भयभीत झाले. त्याचा ठावठिकाणा मी विचारला नाही. त्यानेही त्याचे नाव सांगितले नाही. पण तो मला म्हणाला, ‘तुला दिवस राहातील आणि मुलगा होईल. मद्य किंवा द्राक्षारस पिऊ नको. तसेच कोणतेही अशुध्द अन्न खाऊ नको. कारण हा मुलगा जन्माला यायच्या आधीपासून मरेपर्यंत देवाचा नाजीर असणार आहे.’”

हे ऐकून मानोहाने परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला. “हे परमेश्वरा, त्या दूताला परत आमच्याकडे पाठव या जन्माला येणाऱ्या मुलाचे संगोपन आम्ही कसे करावे हे आम्हाला त्याच्याकडून पुन्हा ऐकू दे.”

परमेश्वराने मानोहाची ही विनवणी ऐकली. परमेश्वराचा दूत पुन्हा तिच्याकडे आला. ती शेतात बसली होती आणि तिचा नवरा तिच्याजवळ पास नव्हता. 10 “तो पुन्हा आलाय त्यादिवशी आलेला माणूस आज परत येथे आला आहे” असे सांगत ती धावतच नवऱ्याला बोलवायला गेली.

11 मानोहा उठून बायकोच्या मागोमाग गेला. त्या माणसाजवळ आल्यावर त्याला म्हणाला, “पूर्वी माझ्या बायकोशी बोलून गेलास तो तूच का?”

दूत म्हणाला, “हो, तोच मी”

12 तेव्हा मानोहा म्हणाला, “आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून येवो त्या मुलाचा जीवनक्रम कसा असेल? तो काय काय करील? आम्हाला सर्व काही सांग.”

13 तेव्हा मानोहाला तो परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुझ्या बायकोला मी जे सांगितले त्याप्रमाणे तिने वागावे. 14 द्राक्षवेलाचा कोणताही भाग तिने खाऊ नये. द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये. अशुध्द अन्नाचे सेवन करु नये माझ्या आज्ञा कसोशीने पाळाव्यात.”

15 मानोहा त्यावर परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “तुम्ही थोडावेळ आमच्यात राहा तुमच्या पाहुणचारासाठी आम्ही करडू शिजवतो.”

16 परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुम्ही मला ठेवून घेतलेत तरी मी तुमचे काही खाणार नाही. पण तुम्हाला काही करायचेच असेल तर परमेश्वरासाठी होमार्पण करा.” (हा खरच परमेश्वराचा दूत आहे याची मानोहाला कल्पना नव्हती.)

17 मानोहाने त्याला विचारले, “तुमचे नाव काय? तुमच्या म्हणण्याप्रमणे सर्व घडून आल्यावर आम्ही तुमचा सन्मान करु.”

18 परमेश्वराचा दूत म्हणाला “माझे नाव कशाला विचारता? ते अति आश्चर्यकारक [a] आहे. तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.”

19 मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला तो बली आणि धान्यार्पण परमेश्वराला व आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या त्या माणसाला अर्पण केले. 20 मग जे जे घडले ते मानोहा व त्याची पत्नी यांनी पाहिले वेदीवरुन ज्वाळा आकाशाकडे झेपावत असताना त्यातूनच तो परमेश्वरदूत स्वर्गस्थ झाला.

हे पाहताच उभयतांनी जमिनीवर लोटांगण घातले. 21 तो परमेश्वराचाच दूत असल्याची मानोहाची खात्री पटली. पुन्हा मानोहा आणि त्याची पत्नी यांना त्याने दर्शन दिले नाही. 22 मानोहा बायकोला म्हणाला, “आपण आता खात्रीने मरणार. कारण आपण प्रत्यक्ष देवाला पाहिले आहे.”

23 पण ती नवऱ्याला म्हणाली, “आपण मरावे असे परमेश्वराच्या मनात नाही. तसे असते तर त्याने आपले होमार्पण, धान्यार्पण स्वीकारले नसते. आपल्याला जे दिसले ते दाखवले नसते किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या”

24 यथावकाश तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मोठा होऊ लागला. त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला. 25 सरा आणि अष्टावोल या नगरांमधल्या महने-दान नगरात तो असताना परमेश्वराच्या आत्म्याने शमशोनमध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली.

शमशोनचा विवाह

14 शमशोन तिम्ना येथे गेला असताना तिथे त्याने एक पलिष्टी तरुणी पाहिली. घरी परतल्यावर तो आपल्या आईवडीलांना म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.”

पण त्याचे आईवडील त्याला म्हणाले, “आपल्या नातेवाइकांच्या आणि इस्राएल लोकांच्या मुलीमध्ये तुझी पत्नी होण्यासारखी स्त्री नाही का? पलिष्ट्यांमधील मुलीशीच कशाला तुला लग्न करायला हवे? त्या लोकांची सुंताही झालेली नसते.”

पण शमशोन म्हणाला, “तीच मुलगी मला हवी मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.” (परमेश्वराच्या मनात तसेच आहे हे शमशोनच्या आईवडीलांना ठाऊक नव्हते. पलिष्टी तेव्हा इस्राएलींवर सत्ता गाजवत होते. त्यांच्या विरुद्ध काहीतरी करायची संधी परमेश्वर पाहात होता.)

शमशोन आपल्या आईवडीलांबरोबर तिम्ना येथे गेला. शहराजवळच्या द्राक्षमव्व्यापर्यंत ते पोहोंचले. तिथे अचानक एका तरुण सिंहाने शमशोनवर झेप घेतली. त्या क्षणी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि करडू फाडावे तसे त्याने लीलया त्या सिंहाला नुसत्या हातांनी फाडून काढले. मात्र आपल्या या कृत्याचा त्याने आईवडीलांना सुगावा लागू दिला नाही.

शमशोनने पुढे जाऊन त्या पलिष्टी तरुणीची भेट घेतली. तिच्याशी बोलणे केले. त्याला ती फार आवडली. काही दिवसांनी तो तिच्याशी लग्न करायला परत जात असताना, त्या तरुण सिंहाचे कलेवर पाहायला वळला. त्याला त्याच्यावर मधमाश्यांनी पोळे केलेले दिसले. त्यात थोडा मधही होता. तो हाताने काढून घेऊन वाटेने खात खात तो गेला. त्यातील थोडा त्याने घरी पोहोंचल्यावर आपल्या आईवडीलांनाही दिला. त्यांनीही तो चाखला. पण तो मध त्याने मृत सिंहाच्या शरीरावरुन काढून घेतला आहे हे त्याने त्याना सांगितले नाही.

10 मग शमशोनचे वडील त्या पलिष्टी मुलीला पाहायला गेले. तेव्हा वराने मेजवानी द्यायची पध्दत होती त्याप्रमाणे शमशोनने मेजवानी दिली. 11 पलिष्टी लोकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या दिमतीला तीस माणसे पाठवली.

12 त्यांना शमशोन म्हणाला, “मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही मेजवानी सात दिवस चालणार आहे. मी तुम्हाला एक कोडे घालतो, त्याचे उत्तर त्या कालावधीत शोधून काढा तुम्हाला या कोड्याचा अर्थ सांगता आला तर मी तुम्हाला तीस सुती अंगरखे आणि तीस पोशाख देईन. 13 मात्र तुम्ही हरलात तर तीस सुती अंगरखे आणि तीस पोषाख तुम्ही मला द्यायचे.” तेव्हा ती तीस माणसे म्हणाली, “ठीक आहे सांग तर तुझे कोडे.”

14 शमशोन ने कोडे घातले ते असे:

“भक्षकातून भक्ष्य निघाले आणि
    उग्रामधून मधुर निघाले तर ते काय?”

त्या तीस जणांनी तीन दिवस उत्तर शोधायचा प्रयत्न केला, पण त्यांना काही अर्थ उमगेना.

15 तेव्हा चौथ्या दिवशी [b] ते सगळे शमशोनच्या बायकोकडे आले. तिला म्हणाले, “आमची फजिती करायला इथे बोलावून घेतले आहे काय? काहीतरी युक्ती लढवून तू आपल्या नवऱ्याकडून या कोड्याचा अर्थ काढून घे. तसे केले नाहीस तर तुला आणि तुझ्या वडीलांच्या घरतील सर्वांना आम्ही घरादारासकट जाळून टाकू.”

16 तेव्हा शमशोनची बायको रडत शमशोनकडे गेली आणि त्याला म्हणाली, “तुझे माझ्यावर प्रेम नाही. तू माझा तिरस्कार करतोस. माझ्या लोकांना कोडे घालून त्याचे उत्तर मात्र तू मला सांगत नाहीस.”

शमशोनने उत्तर दिले, “मी माझ्या आईवडीलांनाही उत्तर सांगितलेले नाही, ते मी तुला का सांगावे?”

17 मेजवानीच्या काळात पुढील सातही दिवस तिने आक्रोश केला तेव्हा अखेर सातव्या दिवशी त्याने तिला कोड्याचा अर्थ सांगितला. तिने त्याचा पिच्छाच पुरवला म्हणून त्याला सर्व सांगावे लागले. मग ती आपल्या माणसात परतली आणि त्यांना तिने उत्तर सांगितले.

18 सातव्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अशाप्रकारे पलिष्ट्यांना उत्तर मिळाले. ते शामशोनकडे येऊन म्हणाले.

“मधापेक्षा मधुर ते काय?
    सिंहापेक्षा उग्र ते काय?”

तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला.

“तुम्ही माझी कालवड नांगराला जुंपली नसती तर
    तुम्हाला हे कोडे कधीच उलगडले नसते.”

19 मग शमशोन खूप संतापला. परमेश्वराचा आत्मा प्रचंड सामर्थ्यानिशी त्याच्यात संचारला. आणि अष्कलोनवर चालून जाऊन त्याने तीस पलिष्ट्यांचा वध केला. मृतांचे कपडे आणि मालमत्ता त्याने काढून घेतली. ते सर्व त्याने ज्यांनी कोडे उलगडले त्या सर्वांना देऊन टाकले. मग तो आपल्या वडीलांच्या घरी परतला. 20 बायकोला मात्र त्याने आपल्याबरोबर घेतले नाही. विवाह सोहळ्यातील एका माणसाला देऊन टाकण्यात आले.

योहान 1:29-51

येशू देवाचा कोकरा

29 दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा. 30 याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’ 31 तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते. परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा [a] करीत आलो यासाठी की, येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्राएलाला (यहूदी लोकांना) कळावे.”

32-34 नंतर योहान म्हणाला, “ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, ‘आत्मा खाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल. तोच मनुष्य पवित्र आत्म्याने [b] बाप्तिस्मा करील.’ योहान म्हणाला, हे होताना मी पाहिले आहे. स्वर्गातून पवीत्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला. आत्मा कबुतरासारखा दिसत होता. आणि तो त्याच्यावर (येशूवर) येऊन स्थिरावला. म्हणून मी लोकांना सांगतो: ‘तो (येशू) देवाचा पुत्र आहे.’”

येशूचे पहिले शिष्य

35 दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला. योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते. 36 योहानाने येशूला जाताना पाहिले, योहान म्हणाला, “पाहा हा देवाचा कोकरा!” [c]

37 योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले, म्हणून ते योहानाचे शिष्य येशूच्या मागे गेले. 38 येशूने मागे वळून पाहिले तो दोघेजण आपल्यामागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले, “तुम्हांला काय पाहिजे?”

ते दोघे म्हणाले, “गुरूजी (रब्बी), तुम्ही कोठे राहता?”

39 येशूने उतर दिले, “माझ्याबरोबर या म्हणजे तुम्हांला दिसेल.” तेव्हा ते दोघेजण येशूबरोबर गेले. येशू राहत होता ती जागा त्यांनी पाहिली. ते त्या दिवशी येशूबरोबर तेथे राहिले. त्यावेळी सुमारे दुपारचे चार वाजले होते.

40 येशूविषयी योहानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले. त्यांच्यापैकी एकाचे नाव अंद्रिया होते. अंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ. 41 अंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की, आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. अंद्रिया शिमोनाला म्हणाला, “आम्हांला मशीहा सापडला आहे.”

42 शिमोनाला घेऊन अंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा [d] म्हणतील.”

43 दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” 44 जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता. 45 फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”

46 परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?”

फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.”

47 येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले, येशू म्हणाला, “हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.”

48 “तुम्ही मला कसे ओळखता?” नथनेलाने विचारले.

येशूने उत्तर दिले, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच.”

49 मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.”

50 येशू नथनेलला म्हणाला, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले, असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील!” 51 येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.” [e]

स्तोत्रसंहिता 102

दु:खी माणसाची प्रार्थना तो अगदी दुबळा असतो आणि त्याला त्याची कैफियत परमेश्वरासमोर मांडायची असते तेव्हाचे स्तोत्र.

102 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि
    माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस.
    माझ्याकडे लक्ष दे.
    मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे.
    हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
माझी शक्ती निघून गेली आहे.
    मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे.
    मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे.
    जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
मी झोपू शकत नाही.
    मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात.
    ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे.
    माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस.
    तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.

11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे.
    मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
    तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
    तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
    त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
    देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
    पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
    देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
18 पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव
    आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
19 परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील.
    परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.
20 आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल.
    ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.
21 नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील.
    ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
22 सगळी राष्ट्रे एकत्र येतील राज्ये
    परमेश्वराची एकत्र सेवा करतील.

23 मला माझ्या शक्तीने दगा दिला.
    माझे आयुष्य कमी झाले.
24 म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस.
    देवा, तू कायमचाच जगणार आहेस!
25 तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस.
    तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.
26 जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील.
    ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि
    कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
27 पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस.
    तू सर्वकाळ राहाशील.
28 आज आम्ही तुझे सेवक आहोत.
    आमची मुले इथे राहातील
    आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”

नीतिसूत्रे 14:15-16

15 मूर्ख जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो. पण शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करतो.

16 शहाणा माणूस परमेश्वराचा आदर करतो आणि वाईटापासून दूर राहतो. पण मूर्ख विचार न करता गोष्टी करतो. तो लक्षपूर्वक गोष्टी करत नाही.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center