Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 11-12

11 इफ्ताह हा खंबीर लढवय्या असून तो गिलाद वंशातील होता. पण तो एका वेश्येचा मुलगा होता. याच्या वडीलांचे नाव गिलाद. गिलादच्या बायकोला खूप मुले झाली. ही मुले मोठी झाल्यावर त्यांना इफ्ताह आवडेनासा झाला त्यांनी त्याला आपले गाव सोडायला लावले. ते म्हणाले, “तुला आमच्या वडीलांच्या मिळकतीतील हिस्सा मिळणार नाही. तू दुसऱ्या बाई पासून झालेला आहेस.” भावांच्या या वर्तणुकीमुळे त्याला दूर जावे लागले. तो टोब देशात जाऊन राहिला. तेव्हा तेथील काही रांगडी माणसेही त्याला येऊन मिळाली.

काही काळानंतर अम्मोनी लोकांची इस्राएल लोकांबरोबर लढाई झाली. यावेळी गिलादमधील वडीलधारे नेते इफ्ताह कडे आले. टोब सोडून त्याने गिलाद मध्ये परत यावे असे त्यांना वाटत होते.

म्हणून ते त्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा सामना करायला तू आमचे नेतृत्व कर.”

पण इफ्ताह त्यांना म्हणाला, “तुम्हीच तर मला माझ्या वडीलांचे घर सोडायला लावलेत. तुम्ही माझा तिरस्कार करता. आता अडचणीत आल्यावर माझ्याकडे का येता?”

त्यावर ही वडीलधारी मंडळी म्हणाली, “अडचण आहे म्हणून तर आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आता कृपा करुन अम्मोन्यांच्या विरुद्ध उठाव करायला आमच्या बरोबर चल. गिलादातील सर्वांचा तू सेनापती होशील.”

तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “या लढ्यासाठी माझी तुम्हाला गरज आहे हे ठीक आहे. पण परमेश्वराच्या मदतीने मी जिंकलो तर मी तुमचा नेता होईन.”

10 तेव्हा गिलादचे अधिकारी पुरुष इफ्ताहाला म्हणाले, “आमचे सर्व बोलणे परमेश्वर ऐकत आहे. तू आम्हाला जे जे करायला सांगशील ते ते आम्ही करु आम्ही हा शब्द दिला आहे.”

11 तेव्हा इफ्ताह त्यांच्या बरोबर गेला. त्यांचा तो नेता आणि सेनापती बनला. मिस्पा नगरात परमेश्वरासमोर इफ्ताहने आपल्या सर्व शब्दांची उजळणी केली.

अम्मोनी राजाला इफ्ताहचा संदेश

12 इफ्ताहने अम्मोनी लोकांच्या राजाकडे दूतानकरवी संदेश पाठवला तो असा: “अम्मोनी लोक आणि इस्राएल लोक यांच्यामध्ये कोणताही तंटा बखेडा नसताना तू आमच्यावर चढाई का करतोस?”

13 त्यावर त्या राजाने इफ्ताहच्या दूतांना सांगितले. “इस्राएल लोक मिसरमधून आले तेव्हा त्यांनी आमचा प्रदेश बळकावला. आर्णोन नदीपासून थेट याब्बोक आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला. म्हणून आम्ही लढत आहोत. त्यांना आमची भूमी सलोख्याने परत करायला सांगा.”

14 हा निरोप दूतांनी इफ्ताहाकडे येऊन सांगितला. [a] तो ऐकल्यावर इफ्ताहने पुन्हा अम्मोनी राजाला संदेश पाठवला. 15 संदेश असा होता:

“इफ्ताहचे म्हणणे असे. मवाब किंवा अम्मोनी लोकांची भूमी लोकांनी बळकावलेली नाही. 16 मिसरमधून बाहेर पडल्यावर इस्राएल लोक प्रथम वाळवंटात गेले तेथून ते लाल समुद्राकडे गेले त्यानंतर ते कादेश येथे आले. 17 त्यानी अदोमच्या राजाकडे संदेश पाठवला. संदेश घेऊन जाणाऱ्या दूतांनी त्या देशामधून जाऊ देण्याची राजाला विनंती केली. पण अदोमच्या राजाने ती मानली नाही. तेव्हा असाच संदेश आम्ही मवाबच्या राजालाही पाठवला. त्यानेही ते झिडकारले. तेव्हा इस्राएल लोक कादेश येथे राहिले.

18 “अदोम आणि मवाब या देशांना वळसा घालून इस्राएल लोक वाळवंटामधून गेले. मवाबच्या पूर्वेकडे त्यांनी अर्णोन नदीच्या पलीकडच्या तीरावर तळ ठोकला. त्यांनी मवाबची सीमा ओलांडली नाही. (अर्णोन नदी हीच मवाबची सीमा.)

19 “नंतर इस्राएल लोकांनी अमोऱ्यांवा राजा सीहोन याच्याकडे दूत पाठवले. सीहोन हा हेशबोनचा राजा. दूत सीहोनला म्हणाले, ‘आम्हा इस्राएल लोकांना तुझ्या भूमीतून जाऊ दे आम्हाला आमच्या प्रदेशात पोहोंचायचे आहे.’ 20 पण अमोऱ्यांचा राजा सीहोन इस्राएल लोकांना आपल्या हद्दीतून जाऊ देईना. उलट त्याने आपले सैन्य गोळा केले आणि याहस येथे तळ दिला. इस्राएल लोकांशी अमोऱ्यांनी युध्द केले. 21 यावेळी इस्राएलच्या परमेश्वर देवाने सीहोन आणि त्याचे सैन्य यांचा पराभव करायला इस्राएल लोकांना मदत केली. त्यांमुळे अमोऱ्यांची भूमी ही इस्राएल लोकांची मालमत्ता बनली. 22 अर्णोन नदीपासून याब्बोक नदीपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देन नदीपर्यंत अमोऱ्यांचा सर्व प्रदेश इस्राएल लोकांच्या ताब्यात आला.

23 “इस्राएलच्या परमेश्वर देवाने अमोऱ्यांना आपला प्रदेश सोडून द्यायला भाग पाडले आणि तो प्रदेश इस्राएल लोकांना दिला. आता इस्राएल लोकांना तो प्रदेश सोडायला लावणे तुला जमेल असे तुला वाटते? 24 कमोश या तुमच्या देवाने दिलेल्या भूमीत तुम्ही खुशाल राहू शकता. म्हणजे आमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीत आम्ही राहू. 25 मवाबचा राजा सिप्पोर पुत्र बालाक याच्या पेक्षा तू चांगला आहेस का? तो कोठे वाद घालत बसला? तो कधी इस्राएल लोकांशी युध्द करायला सरसावला का? 26 हेशबोन शहरआणि त्याच्या आसपासची गावे यात इस्राएल लोक गेली तीनशे वर्षे राहात आहेत. अरोएर आणि त्याच्या भोवतालची गावे, अर्णोन नदीच्या काठावरची गावे या सर्व ठिकाणी इस्राएल लोक गेली तीनशे वर्षे आहेत. त्या काळात तुम्ही कधी ती परत मिळवायचा प्रयत्न का केला नाहीत? 27 इस्राएल लोकांनी तुमचे कधी वाकडे केले नाही पण तुम्ही मात्र त्यांच्यावर अन्याय करत आहात. आता, इस्राएल लोकांची बाजू न्यायाची आहे की अम्मोनी लोकांची याचा निर्णय खुद्द तो न्यायाधीश परमेश्वरच करो!”

28 पण इफ्ताहच्या या संदेशाकडे अम्मोनी लोकांच्या राजाने सरळसरळ दुर्लक्ष केले.

इफ्ताहचे नवस

29 मग परमेश्वराचा आत्मा इफ्ताहमध्ये संचारला. इफ्ताह गिलाद आणि मनश्शे यांच्या प्रदेशातून गिलादमधील मिस्पा नगरात आला. तेथून तो अम्मोनी लोकांच्या प्रदेशात घुसला.

30 इफ्ताह परमेश्वराला नवस बोलला तो म्हणाला, “तू जर मला अम्मोन्यांचा पराभव करु दिलास तर, 31 विजयी झाल्यावर मी परत येईन तेव्हा माझ्या घरातून जो कोणी मला सामोरा येईल त्याला मी तुला होमबली म्हणून अर्पण करीन”

32 मग इफ्ताहने अम्मोन्यांवर हल्ला चढवला. त्यांचा पराभव करण्यात त्याला परमेश्वराचे साहाय्य झाले. 33 अरोएर नगरापासून मिन्नीथ नगरापर्यंत वीस नगरे त्याने काबीज केली. आबेल करामीम येथपर्यंत त्याने अम्मोन्यांचा बीमोड केला. इस्राएल लोकांनी अम्मोन्यांचा पराभव केला. अम्मोन्यांचा हा पराभव प्रचंड होता.

34 इफ्ताह मिस्पा येथे परतला. तो घरी पोचतो तो त्याची मुलगी त्याला सामोरी आली. त्याची ही एकुलती एक मुलगी खंजिरी घेऊन नृत्य करत पुढे आली. इफ्ताहचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिच्याखेरीज त्याला दुसरे मूलबाळ नव्हते. 35 तिलाच प्रथम आलेली पाहताच दु:खावेगाने तो अंगावरची वस्त्रे फाडू लागला. तो म्हणाला, “मुली, सत्यानाश झाला. मला तू दु:खाच्या खाईत लोटले आहेस. मी तर परमेश्वराला नवस बोललो आहे आणि मला आता माझा शब्द फिरवता येणार नाही.”

36 तेव्हा ती त्याला म्हणाली, “बाबा, तुम्ही नवस बोलला आहात तर तो फेडायलाच हवा. कबूल केलेत त्याप्रमाणे आता वागा. परमेश्वराने ही अम्मोन्यांचा पराभव करायला तुम्हाला साहाय्य केलेच की नाही?”

37 पुढे ती आपल्या वडीलांना म्हणाली, “पण माझ्यासाठी एक करा. दोन महिने मला एकटीला राहू द्या. डोंगरांमध्ये मी राहीन. आता माझे लग्न होणार नाही की मला मुलेबाळे होणार नाहीत. तेव्हा मला आणि माझ्या सख्यांना गव्व्यात गळे घालून शोक करू द्या.”

38 इफ्ताह म्हणाला, “खुशाल तसे कर” त्याने दोन महिन्यांसाठी तिची रवानगी केली. ती आणि तिच्या मैत्रिणी डोंगरांमध्ये राहिल्या. कुमारिका म्हणूनच तिला मरण येणार म्हणून त्यांनी शोक केला.

39 दोन माहिने असे गेल्यावर ती आपल्या बापाकडे परत आली. इफ्ताहने परमेश्वराला नवस बोलल्याप्रमाणे सर्व काही केले. इफ्ताहची मुलगी कुमारिकाच राहिली. तेव्हा इस्राएलामध्ये एक प्रथा पडून गेली. 40 गिलादमधील इफ्ताहच्या मुलीचे सर्व इस्राएल स्त्रिया स्मरण ठेवतात दरवर्षी चार दिवस त्या तिच्या प्रीत्यर्थ शोक करतात.

इफ्ताहचे नवस आणि एफ्राईम

12 एफ्राईमच्या लोकांनी सैन्याची जमवाजमव केली आणि नदी ओलांडून ते साफोन येथे गेले. ते इफ्ताहला म्हणाले, “अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तू आम्हाला मदतीसाठी का बोलावले नाहीस? आता आम्ही तुझ्यासकट तुझ्या घराला आग लावतो.”

इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोक आपल्याला वरचेवर त्रास देत होते. म्हणून मी माझ्या सैन्यासह त्यांच्यावर चालून गेलो. तेव्हा मी तुम्हाला बोलावले होते पण तुम्ही कुमक पाठवली नाही. तुमची मदत मिळण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मी माझा जीव धोक्यात घातला. नदी उतरुन मी अम्मोन्यांशी लढायला गेलो. त्यांना नेस्तनाबूत करण्यात परमेश्वराचे मला साहाय्य झाले. आता तुम्ही आज माझ्याशी लढायला का आला आहात?”

मग इफ्ताहने गिलादमधील लोकांना एकत्र केले. त्यांनी एफ्राईमशी युध्द केले. ते युध्दात उतरले कारण एफ्राईम लोकांनी गिलादांचा अपमान केला होता. ते म्हणाले होते, “गिलादांनो, तुम्ही म्हणजे एफ्राईमांनी जीवदान दिलेले पळपुटे आहात. तुम्हाला स्वतःचा प्रदेश सुध्दा नाही. तुमच्यातील काही भाग एफ्राईमांचा तर काही मनश्शेचा आहे.” गिलादांनी एफ्राईमांचा पराभव केला.

एफ्राईम देशाकडे जाणारे यार्देन नदीचे उतार गिलादांनी ताब्यात घेतले. कोणीही जिवंत राहिलेला एफ्राईम माणूस आला आणि नदी ओलांडून जाऊ देण्याची विनंती करायला लागला की गिलाद विचारत, “तू एफ्राईमचा आहेस का?” तो म्हणे, “नाही” मग ते त्याला “शिब्बोलेथ” हा शब्द उच्चारायला सांगत. एफ्राईम लोकांना तो नीट म्हणता येत नसे. तो म्हणे, “सिब्बोलेथ” तेव्हा हा माणूस एफ्राईम असलेयाचे त्यांच्या ध्यानात येई. नदीच्या उतारापाशी त्याला मारून टाकत. अशाप्रकारे त्यांनी बेचाळीस हजार एफ्राईम माणसे मारली.

इफ्ताह सहा वर्षे इस्राएल लोकांचा न्यायाधीश होता. त्याचे निधन झाल्यावर गिलादमधील त्याच्या गावी त्याचे दफन करण्यात आले.

नंतरचा न्यायाधीश इब्सान

मग बेथलहेममधील इब्सान याने न्यायाधीश म्हणून इस्राएल लोकांचे काम पाहिले. त्याला तीस मुलगे आणि तीस मुली होत्या त्याने आपल्या तीसही मुलींना गोत्राबाहेर लग्ने जमवण्यास सांगितले आणि सर्व मुलांसाठी तशाच बाहेरच्या मुली केल्या. इब्सान सात वर्षे न्यायाधीश होता. 10 त्याच्या निधनानंतर बेथलहेममध्थे त्याचे दफन करण्यात आले.

न्यायाधीश एलोन

11 त्यानंतर जबुलून वंशातील एलोन इस्राएलांचा न्यायाधीश झाला. तो त्या जागी दहा वर्षे होता. 12 मग तो वारला तेव्हा जबुलूनमधील अयालोन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्यायाधीश अब्दोन

13 एलोन नंतर हिल्लेलचा मुलगा अब्दोन न्यायाधीश झाला तो पिराथोनचा होता. 14 त्याला चाळीस मुलगे आणि तीस नातू होते. ते सत्तर गाढवांवर स्वार होत. अब्दोन आठ वर्षे इस्राएलांचा न्यायाधीश होता. 15 पुढे त्याच्या मृत्यूनंतर पिराथोन येथे त्याला पुरण्यात आले. एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन हे ठिकाण आहे.

योहान 1:1-28

येशू जगात येतो

जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्द [a] अस्तित्वात होता, तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता. तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो. पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत [b] केले नाही.

योहान [c] नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठविले. तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी) सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला. खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो.

10 शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही. 11 तो जगात आला, जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. 12 काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. 13 ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला.

14 शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा) आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. 15 योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाला, “ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो माझ्या अगोदरपासुन आहे.”

16 शब्द (ख्रिस्त) हा कृपा (दयाळूपणा) व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद मिळाले. 17 मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली. 18 कोणाही मनुष्याने आतापर्यंत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे. [d]

योहान येशूविषयी लोकांना सांगतो(A)

19 यरूशलेम येथील यहूदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवी [e] ह्यांना पाठविले. “तू कोण आहेस?” हे विचारण्यासाठी यहूदी लोकांनी त्यांना पाठविले. 20 योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला, “मी ख्रिस्त [f] नाही.” योहानाने लोकांना तेच सांगितले.

21 यहूदी लोकांनी योहानाला विचारले, “तर मग तू कोण आहेस? तू एलीया [g] आहेस काय?”

योहानाने उत्तर दिले, “नाही, मी एलीया नाही.”

यहूदी लोकांनी विचारले, “तू संदेष्टा आहेस काय?”

योहानाने म्हटले, “नाही, मी संदेष्टा नाही.”

22 यावर यहूदी लोक म्हणाले, “तू कोण आहेस? तुझ्याविषयी आम्हांला सांग. ज्या लोकांनी आम्हांला पाठविले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हांला सांग. तू स्वतःला कोण म्हणवितोस?”

23 योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,

“मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे:
    ‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’” (B)

24 परूशी लोकांनी या यहूदी लोकांना पाठविले होते. 25 हे लोक योहानाला म्हणाले, “तू म्हणतोस की, मी ख्रिस्त नाही; मी एलीया नाही किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?”

26 योहानाने उतर दिले, “मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु तुम्हांला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे. 27 माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याइतकीही माझी लायकी नाही.”

28 यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे.

स्तोत्रसंहिता 101

दाविदाचे गीत

101 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन,
    परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन.
    परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही.
    जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो.
    मी तसे करणार नाही.
मी प्रामाणिक राहीन.
    मी वाईट कृत्ये करणार नाही.
जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणे वाईट गोष्टी बोलत
    असेल तर मी त्या माणसाला थांबवेन.
मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि
    ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.

ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन
    आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन.
    जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही.
    मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन.
    दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.

नीतिसूत्रे 14:13-14

13 माणूस जरी हसत असला तरी तो मनातून दु:खी असू शकतो. आणि हसल्यावरही खिन्नता तिथे तशीच राहाते.

14 दुष्ट माणसांना त्यांनी केलेल्या चुकांबद्दल पूर्ण किंमत मोजावी लागेल. आणि चांगल्या माणसांना चांगल्या कृत्यांबद्दल बक्षीस मिळेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center