Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 9:22-10:18

अबीमलेखची शखेमशी लढाई

22 अबीमलेखने इस्राएल लोकांवर तीन वर्षे राज्य केले. 23-24 अबीमलेखने यरुब्बालाच्या सत्तर मुलांची म्हणजे आपल्याच भावंडांची हत्या केली होती. या दुष्कृत्यात त्याला शखेमच्या अधिकाऱ्यांची साथ होती. तेव्हा अबीमलेख आणि हे अधिकारी यांच्यात परमेश्वराने वैमनस्य निर्माण केले. अबीमलेख विरुद्ध या अधिकाऱ्यांनी कपट कारस्थान करायला सुरुवात केली. 25 आता त्यांना अबीमलेख आवडेनासा झाला होता. त्यांनी वाटमारी करायला डोंगरांवर माणसे ठेवली. या लूटमारीच्या बातम्या अबीमलेखपर्यंत येऊन पोचल्या.

26 याच सुमाराला एबेदचा मुलगा गाल आपल्या भाऊ बंदांसह शखेम शहरी राहायला आला. तेव्हा शखेमच्या वडीलधाऱ्यांनी गालवर विश्वाेस टाकून राहायचे ठरवले.

27 एक दिवस शखेममधील लोक द्राक्ष खुडणीसाठी मव्व्यामध्ये गेले. त्यांनी द्राक्षरस काढला आणि त्यांच्या दैवतांच्या देवळात उत्सव केला. खाद्यपेयांची मेजवानी केली आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले.

28 तेव्हा एबेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे? तो कोण समजतो स्वतःला? यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर? जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे ना?आपण अबीमलेखला जुमानता कामा नये. आपण आपल्याच लोकांचे हमोरच्या लोकांचे ऐकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष.) 29 तुम्ही मला या लोकांचा सेनापती नेमले तर मी अबीमलेखला नेस्तनाबूत करीन. ‘आपल्या सैन्याची जमवाजमव कर आणि युध्दाला सज्ज हो’ असे मी त्याला आव्हान देईन.”

30 जबूल शखेम नगराचा अधिकारी होता त्याने हे ऐकले आणि तो संतापला. 31 त्याने अरुमा येथे दूत पाठवून अबीमलेखला हे वर्तमान पोचवले. तो संदेश असा:

“एबेदाचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊबंद शखेम शहरात येऊन राहिले आहेत. ते तुला त्रास देण्यासाठी कारस्थान करत आहेत. त्यांनी सगव्व्या शहरवासियांना तुझ्याविरुद्ध फितवले आहे. 32 तेव्हा तू आणि तुझी माणसे रातोरात येऊन नगराच्या बाहेर शेतात लपून राहा. 33 सकाळी सूर्य वर येताच शहरावर हल्ला चढवा. गाल आणि त्याची माणसे तुझा प्रतिकार करायला येतील तेव्हा त्यांचा चांगला समाचार घ्या.”

34 तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैनिक रात्रीच निघून नगराकडे आले. चार तुकड्या करुन ते सैन्य शखेम बाहेर दबा धरून बसले. 35 इकडे एबेद पुत्र गाल बाहेर पडून नगराच्या वेशीपाशी उभा राहिला तेव्हा अबीमलेख आणि त्याचे सैन्य दबा धरुन बसले होते ते एकदम बाहेर आले.

36 गालने ते पाहिले व तो जबूलला म्हणाला, “ते पाहा डोंगरमाथ्यावरुन लोक उतरत आहेत.”

जबूल त्याला म्हणाला, “तू पाहातोस त्या डोंगराच्या सावल्या आहेत त्या तुला माणसांसारख्या वाटत आहेत.”

37 पण गाल पुन्हा म्हणाला, “ती पाहा तिकडून काही माणसे प्रदेशाची नाभी नानक जागा उतरुन येत आहेत. आणि जादूगाराच्या वृक्षाजवळही कोणाचे तरी डोके मी पाहिले आहे.” 38 तेव्हा जबूल गालला म्हणाला, “मग आता तुझे बढाया मारणे कुठे गेले? ‘अबीमलेख कोण? आम्ही त्याचे का ऐकावे’ असे तू म्हणत होतास नाही का? त्यांना तू हसण्यावारी नेलेस. आता आणि त्यांचा सामना कर.”

39 तेव्हा गाल शखेमच्या लोकांचे नेतृत्व करुन लढाईला बाहेर पडला. 40 अबीमलेखच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. ते मागे आपल्या नगराच्या वेशीच्या दिशेने पळत सुटले. गालची पुष्कळ माणसे तर तेथे पोहोंचायच्या आधीच मारली गेली.

41 तेव्हा अबीमलेख अरूमा या नगराला परतला. जबूलने गाल आणि त्याचे भाऊबंद यांना शखेम सोडून जायला भाग पाडले.

42 दुसऱ्या दिवशी शखेमचे लोक आपापल्या शेतीवाडीवर कामाला गेले असे अबीमलेखला कळले. 43 त्याने आपल्या सैन्याच्या तीन तुकडचा केल्या. शखेमच्या लोकांवर त्याला गनिमी काव्याने हल्ला करायचा होता म्हणून त्याने आपल्या सैन्याला शेतात दबा धरून बसायला सांगितले. लोक गावातून शेतावर जायला निघतात तोच त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. 44 अबीमलेख एका तुकडी बरोबर शखेमच्या वेशीपाशी गेला. राहिलेल्या दोन तुकड्यांनी शेतातील लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार केले. 45 दिवसभर लढाई चालली. अबीमलेखच्या सैन्याने शखेम शहरावर ताबा मिळवला, तेथील लोकांना ठार मारले. मग त्याने शहराची पूर्ण नासधूस करुन त्यावर मीठ पसरले.

46 शखेमच्या गढीमध्ये काही माणसे अजूनही होती. त्यांनी हे ऐकले तेव्हा एल-बरीथ परमेश्वराच्या मंदिराच्या सर्वात सुरक्षित खोलीमध्ये ती एकत्र जमली.

47 हे ही अबीमलेखच्या कानावर आले. 48 तेव्हा तो आपल्या माणसांना घेऊन सलमोन डोंगरावर गेला. तेथे त्याने कुऱ्हाडीने झाडांच्या काही फांद्या छाटल्या. त्या फांद्या खांद्यावर घेतल्या. बरोबरच्या लोकांनाही त्याने वेळ न दवडता तसेच करायला सांगितले. 49 तेव्हा त्यांनीही फांद्या तोडून घेतल्या व अबीमलेखच्या पाठोपाठ ते चालू लागले. एल-बरीथच्या तळघरासमोर त्या रचून ठेवल्या मग त्यांनी त्या ढिगाला आग लावली. त्या आगीत आतील सर्व माणसे जळून खाक झाली. शखेमच्या मनोऱ्याजवळ राहाणारी बायकापुरुष मिळून जवळ जवळ हजार माणसे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

अबीमलेखचा मृत्यू

50 नंतर अबीमलेख आपल्या बरोबरच्या लोकांसह तेबेस या नगरी गेला. तेही नगर त्यांनी काबीज केले. 51 पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती. तिच्यात नगरातील बायका, पुरुष, अधिकारी आश्रयाला गेले. आत जाताच त्यांनी दरवाजा पक्का बंद केला. मग ते गढीच्या छतावर चढून बसले. 52 अबीमलेख व त्याची माणसे हल्ला करायला गढीपर्यंत आली. त्यांना गढीला आग लावायची होती. 53 पण अबीमलेख गढीच्या दरवाजाशी थांबलेला असताना, वर चढून बसलेल्या एका बाईने त्याच्या डोक्यावर जाते टाकले. अबिमलेखच्या डोक्याला त्यामुळे भयंकर मार लागला. 54 अबीमलेख आपल्या सशस्त्र नोकराला तेवढ्यात म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला ठार कर ‘एका बाईने अबीमलेखला मारले’ असे लोकांनी म्हणता कामा नये म्हणून तुझ्या हातून मला मरण येऊ दे.” तेव्हा त्याची शस्त्रे वाहून नेणाऱ्या सेवकाने त्याला तलवारीने भोसकले व अबीमलेख मरण पावला. 55 ते पाहिल्यावर इस्राएल लोक आपापल्या घरी परतले.

56 अशाप्रकारे, अबीमलेखला त्याच्या दृष्कृत्यांबद्दल परमेश्वराने सजा केली. आपल्या सत्तर भांवाना ठार करुन त्याने आपल्या वडीलांचा घोर अपराध केला होता. 57 शखेमच्या लोकांनाही त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल परमेश्वराने शिक्षा केली. एकंदरीत योथामचा शाप खरा ठरला. (गिदोन यरुब्बालचा योथाम हा सर्वात धाकटा मुलगा.)

सातवा न्यायाधीश तोला

10 अबीमलेखच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांच्या रक्षणासाठी देवाने तोला या न्यायाधीशाची योजना केली. तोला हा पुवाचा मुलगा आणि पुवा दोदोचा. तोला इस्साखारच्या वंशातील होता व एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर या नगरात राहात असे. तोलाने तेवीस वर्षे इस्राएल लोकांमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्याला शामीरमध्ये पुरण्यात आले.

पुढचा न्यायाधीश याईर

तोलानंतर देवाने याईरची नेमणूक केली. तो गिलाद भागात राहणारा होता. त्याने बावीस वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. याला तीस मुलगे होते आणि ते तीस गाढवांवर [a] बसून गिलादमधील तीस गावांचा कारभार पाहात असत. या गावाना अजूनही याईरची गावे म्हणून ओळखले जाते. याईरच्या मृत्यूनंतर त्याचे कामोन नगरात दफन करण्यात आले.

अम्मोनी लोकांची इस्राएल लोकांबरोबर लढाई

इस्राएल लोकांनी परमेश्वराला अमान्य असलेल्या गोष्टी पुन्हा करायला सुरूवात केली. बआल, अष्टारोथ, या दैवतांची तसेच अरामी, सीदोनी, मवाबी, अम्मोनी तसेच पलिष्टी या लोकांच्या दैवतांची त्यांनी उपासना करायला सुरुवात केली. आपल्या परमेश्वरापासून ते दूर गेले, त्याची सेवा करणे त्यांनी थांबवले.

तेव्हा परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. त्याने अम्मोनी आणि पलिष्टी या लोकांच्या हातून त्यांचा पराभव करवला. त्याच वर्षी गिलादांच्या प्रदेशात, यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या इस्राएल लोकांचा त्या लोकांनी संहार केला. हा प्रदेश अमोरी लोकांचा होता. या भागातील इस्राएल लोकांना अठरा वर्षे हाल अपेष्टा काढाव्या लागल्या. अम्मोनी लोक मग यार्देनच्या पलीकडे गेले यहूदा, बन्यामीन आणि एफ्राईम यांच्या वंशजांशी त्यांनी लढाया केल्या. अम्मोनी लोकांमुळे इस्राएल लोकांना फार त्रास भोगावा लागला.

10 तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. ते म्हणाले, “परमेश्वरा, आम्ही दुष्कृत्य केले आहे. देवाला सोडून आम्ही बआल या भलत्या दैवताची उपासना केली आहे.”

11 परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मिसरी, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी अशा वेगवेगव्व्या लोकांकडून जेव्हा जेव्हा तुम्हाला जाच झाला तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याकडे गाऱ्हाणे आणलेत. मी तुमची सुटका करत गेलो. 12 सीदोनी, अमालेकी, मिद्यानी यांनीही तुम्हाला छळले तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. तेव्हा ही मी तुम्हाला वाचवले. 13 पण मला सोडून तुम्ही भलत्या दैवतांच्या पाठीमागे लागलात. तेव्हा आता पुन्हा मी तुमच्या मदतीला येणार नाही. 14 त्या दैवतांची उपासना करायला तुम्हाला आवडते, तेव्हा आता त्यांनाच बोलवा आणि मदतीसाठी विनंती करा. त्यांनाच तुमचे संकटातून रक्षण करु द्या.”

15 पण इस्राएल लोकांनी परमेश्वराची विनवणी केली. ते म्हणाले, “आमचे चुकले आम्हाला हवी ती शिक्षा दे, पण आता आम्हाला वाचव.” 16 मग इस्राएल लोकांनी त्या परक्या दैवतांचा त्याग केला. परमेश्वराकडे ते पुन्हा एकदा वळले. त्यांचे हाल पाहून परमेश्वराला त्यांची दया आली.

इफ्ताहताहची नेता म्हणून निवड

17 अम्मोनी लोक युध्दासाठी एकत्र जमले. गिलाद प्रदेशात त्यांची छावणी होती. इस्राएल लोकही एकत्र आले. मिस्या येथे त्यांनी तळ दिला. 18 गिलाद प्रदेशातील लोकांचे नेते म्हणाले, “अम्मोनी लोकांवरील हल्ल्याचे जो कोणी नेतृत्व करील तो गिलाद प्रदेशातील आम्हा लोकांचा मुख्य होईल.”

लूक 24:13-53

अम्माऊसच्या वाटेवर(A)

13 त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. 14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. 15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. 16 पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?”

चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले. 18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणाला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”

19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?”

ते त्याला म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला. 20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले. 21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील.

“आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. 22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हांला थक्क केले आहे: आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. 23 त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टांत घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. 24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.”

25 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?” 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.

28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. 29 परंतु जास्त आग्रह करुन ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.

30 जेव्हा तो त्यांच्याबोरबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. 31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. 32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंतःकरणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”

33 मग ते लगेच उठले, व यरुशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. 34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”

35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्याला सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.

येशू त्याच्या अनुयायांना दर्शन देतो(B)

36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”

37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत. 38 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? 39 माझे हात व पाय पाहा. तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भुताला नसते.”

40 असे बोलून त्याने त्यांस आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना. 41 ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?” 42 खरे त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला. 43 त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.

44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”

45 नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी उठावे. 47 आणि यरुशलेमापासून सुरुवात करुन सर्व राष्ट्रांस माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठवीन. पापक्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करावी. 48 या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात. 49 आता मी तुम्हांला माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठविन. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने भरले जात नाही तोपर्यंत तुम्ही या शहरातच राहा.”

येशू परत स्वर्गात जातो(C)

50 नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करुन आशीर्वाद दिला. 51 तो त्यांना आशीर्वाद देत असतानाच तो त्यांना सोडून गेला. आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले. 52 नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेमाला परतले. 53 आणि देवाची सतत स्तुति करीत ते मंदिरात राहिले.

स्तोत्रसंहिता 100

धन्यवाद स्तोत्र.

100 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा.
    परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या.
    त्यानेच आपल्याला निर्माण केले.
आपण त्याची माणसे आहोत.
    आपण त्याची मेंढरे आहोत.
त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या.
    त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या.
त्याला मान द्या.
    त्याच्या नावाचा जयजयकार करा.
परमेश्वर चांगला आहे.
    त्याचे प्रेम चिरंजीव आहे.
    आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.

नीतिसूत्रे 14:11-12

11 वाईट माणसाच्या घराचा नाश होईल. पण चांगल्या माणसाचे घर सदैव राहील.

12 लोकांना वाटत असते हाच मार्ग बरोबर आहे. पण तो मार्ग फक्त मरणाकडे नेतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center