Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the ESV. Switch to the ESV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 8:18-9:21

18 मग गिदोन, जेवह आणि सलमुन्ना यांना म्हणाला, “तुम्ही ताबोर डोंगरावर काही माणसे मारलीत. ती दिसायला कशी होती?”

जेबह आणि सलमुन्ना म्हणाले, “ती तुझ्याप्रमाणेच चांगली राजबिंडी दिसत होती.”

19 गिदोन म्हणाला, “ती माझी भावंडे होती. माझ्या आईची पोटची मुले. परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना मारले नसते तर मीही आता तुम्हाला मारले नसते”

20 मग गिदोन आपल्या येथेर या ज्येष्ठ पुत्राला म्हणाला, “या राजांना मारुन टाक” पण येथेर पोरसवदा असल्यामुळे घाबरला. त्याला त्यांच्यावर तलवार चालवायचा धीर होईना.

21 तेव्हा ते राजे गिदोनला म्हणाले, “चल पुढे हो आणि तूच आमच्यावर प्रहार कर. तु पुरुष आहेस. तूच हे कृत्य करु शकशील.” तेव्हा गिदोनने त्यांना ठार केले. त्यांच्या उंटांच्या गव्व्यातील चंद्रकोरीच्या आकाराचे दागिने त्याने काढून घेतले.

गिदोन एफोद करतो

22 मग इस्राएल लोक गिदोनला म्हणाले, “तू आम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडवले आहेस तेव्हा आता तू आमच्यावर राज्य कर. तू तुझा मुलगा, तुझा नातू यांनीही आमच्यावर राज्य करावे.”

23 पण गिदोन त्यांना म्हणाला, “खुद्द परमेश्वरच सत्ताधीश आहे. मी किंवा माझा मुलगा तुमच्यावर राज्य करणार नाही.”

24 इस्राएल लोकांनी ज्या अनेकांचा पराभव केला त्यात इश्माएलीही होते. हे इश्माएली पुरुष सोन्याची कुंडले घालत. गिदोन इश्माएलींना म्हणाला, “तुम्ही जी लूट मिळवली आहे त्यातून तुमच्यापैकी प्रत्येकाने मला अशी सोन्याची कुंडले करुन द्या.”

25 त्याला इस्राएल लोक आनंदाने कबूल झाले त्यांनी जमिनीवर एक अंगरखा पसरला. त्यावर प्रत्येकाने कुंडले टाकले. 26 नंतर त्या सर्वांचे वजन केले ते त्रेचाळीस पौंड भरले. इस्राएल लोकांनी गिदोनला दिलेल्या इतर भेटवस्तू वेगळ्याच त्यांचे वजन यात धरलेले नाही. चंद्रकोरी, लोलक या आकारांची भूषणे मिद्यानी राजांच्या अंगावरील जांभळी वस्त्रे,उंटांच्या गळ्यातील साखळ्या अशा विविध भेटीही त्यांनी दिल्या.

27 या सोन्यातून गिदोनने एफोद बनवला तो त्याने आपल्या अफ्रा या गावी ठेवला. सर्व इस्राएल लोक त्याची पूजा करु लागले. परमेश्वरावरची त्यांची निष्ठा ढळून ते एफोदच्या नादी लागले. गिदोन आणि त्याचे कुटुंब यांना हा एफोद सापव्व्याप्रमाणे ठरुन त्यांना पापाचरणासाठी प्रवृत्त करायला कारणीभूत झाला.

गिदोनचा मृत्यू

28 मिद्यान अशाप्रकारे इस्राएलांचा अंकित झाला. त्यांनी पुन्हा डोके वर काढले नाही. गिदोन जिवंत असेपर्यंत, पुढे चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदत होती.

29 योवाशपुत्र यरुब्बाल गिदोन आपल्या घरी परतला. 30 त्याला सत्तर मुलगे होते. कारण त्याला अनेक बायका होत्या. 31 शखेम शहरात त्याला एक उपपत्नी होती. तिच्यापासून त्याला अबीमलेख नावाचा मुलगा झाला.

32 पुढे गिदोन बराच वृध्द होऊन मरण पावला. योवाशच्या कबरीत त्याला पुरण्यात आले. अबियेजर लोक राहतात त्या अफ्रा या गावात ही कबर आहे. 33 गिदोनच्या मृत्यूनंतर लगेचच इस्राएल लोक पुन्हा बआलच्या मागे लागले त्यांनी बआल-बरीथ याला परमेश्वर मानले. 34 भोवतालच्या सर्व शत्रूपासून परमेश्वराने त्यांना वाचवले असले तरी देखील इस्राएल लोकांना आपल्या परमेश्वराचा विसर पडला. 35 यरुब्बाल (गिदोन) याने त्यांच्यासाठी इतके केले तरीसुध्दा त्याच्या कुटुंबीयांशी इस्राएल लोक एकनिष्ठ राहिले नाहीत.

अबीमलेखची कारकीर्द

यरुब्बाल (गिदोन) याचा अबीमलेख हा मुलगा. शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि मामांना व सर्व नातेवाईकांना म्हणाला, “शखेम नगरातील वडीलधाऱ्यांना विचारा की, ‘यरुब्बालच्या सत्तर मुलांच्या सत्तेखाली राहणे चांगले की एकाच माणसाच्या आधिपत्याखाली असणे चांगले? मी तुमचा नातेवाईक आहे हे लक्षात ठेवा.’”

अबीमलेखच्या मामांनी शखेम नगरातील अधिकारी मंडळींना हा प्रश्न विचारला. त्यांनीही अबीमलेखला आपला पाठिंबा द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “हा तर आमचा बंधू आहे.” शखेमच्या या अधिकाऱ्यांनी बआल-बेरीथच्या मंदिरातून सत्तर रौप्यमुद्रा अबीमलेखला दिल्या. त्यातून अबीमलेखने काही रिकामटेकडी कसलाही मुलाहिजा नसलेली माणसे आपल्या पदरी बाळगली. ती सतत अबीमलेख बरोबर राहात असत.

अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगळ्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.

मग शखेम आणि मिल्लो येथील नेते एकत्र आले. शखेममधील स्तंभाजवळच्या एका वृक्षाखाली जमून त्यांनी अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित केले.

योथामची कहाणी

हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.

“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेल.

“एक दिवस, आपल्याला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, ‘तू आमचा राजा हो.’

“जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, ‘सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी स्तुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुसता इतर झाडांवर डोलत राहू काय?’

10 “मग ती झाडे अंजीराच्या झाडाकडे गेली व म्हणाली, ‘तू आमचा राजा हो.’

11 “पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, ‘माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडांवर डोलत राहायला जाऊ की काय?’

12 “तेव्हा ती झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, ‘तू आम्हावर राज्य कर.’

13 “पण द्राक्षवेलीने उत्तर दिले, ‘माझ्या द्राक्षरसामुळे माणसे, राजेलोक संतुष्ट होतात. ते करायचे सोडून मी इतर झाडांवर हालत डोलत राहू का?’

14 “शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुडुपाकडे जाऊन म्हणाली, ‘तू ये आणि आम्हावर राज्य कर.’

15 “ते काटेरी झुडूप त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला खरोखरच मला राजा करायचे असेल तर माझ्या सावलीत आश्रयाला या. तसे केले नाहीत तर काटेरी झुडुपातून अग्नि निघून तो लबानोनचे गंधसरु भस्मसात करील.’

16 “आता, अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित करताना तुम्ही पूर्णपणे प्रमाणिक राहिला असलात तर त्याच्या कारकीर्दीत सुखात असा. यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुमचे वर्तन योग्य असेल तर ठीकच आहे. 17 पण माझ्या वडीलांनी तुमच्यासाठी काय केले ते आठवा ते तुमच्यासाठी झुंजले. मिद्यानापासून तुमचे रक्षण करताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. 18 पण आता तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठ फिरवली आहे. तुम्ही माझ्या वडालांच्या सतर मुलांना एकाच वेळी [a] ठार केले आहे. अबीमलेखला तुम्ही शखेमचा राजा केले आहे. तो तुमचा नातेवाईक म्हणून तुम्ही असे केलेत पण तो निव्वळ दासीपुत्र आहे. 19 यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुम्ही खरोखरच प्रमाणिक असाल तर अबीमलेखच्या राज्यात सुखी असा. तो ही तुमच्यावर आंनदाने राज्य करो. 20 पण तुमचे हे वागणे बरोबर नसेल तर मात्र अबीमलेखच्या हातून शखेम आणि मिल्लो यांचा नाश होवो. तसेच अबीमलेखचाही नाश होवो!”

21 एवढे बोलून योथाम बैर या शहराला पळून गेला. अबीमलेखाच्या भीतीने तो तेथेच राहिला.

लूक 23:44-24:12

येशूचा मृत्यू(A)

44 त्यावेळी जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. 45 आणि मंदिरातील पडदा फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. 46 येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे म्हटल्यानंतर तो मेला.

47 जेव्हा रोमी सेवाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”

48 हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. 49 परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालीलाहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.

योसेफ अरिमथाईकर(B)

50-51 तेथे एक योसेफ नावाचा मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद होता. तो चांगला आणि धार्मिक मनुष्य होता.तो सभेच्या निर्णयाशी व कृतीशी सहमत नव्हता. तो यहूदीयातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. 52 हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 53 ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणाला ही ठेवले नव्हते. 54 तो शुक्रवार (तयारीचा दिवस) होता, आणि शब्बाथ सुरु होणार होता.

55 गालीलाहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. 56 नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केले.

शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.

येशू मरणातून उठला आहे(C)

24 आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वतः तयार केलेले मसाले आणले. त्यांना दगड कबरेवरुन लोटलेला आढळला. त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही. यामुळे त्या अवाक्‌ झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले. अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे वळविले. ते दोन पुरुष त्यांना म्हणाले, “जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही; तो उठला आहे! तो गलीलात असताना त्याने तुम्हांला काय सांगितले याची आठवण करा. तो असे म्हणाला की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्याला वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.” नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.

त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. 10 त्या स्त्रिया मरीया मग्दालिया, योहान्न, आणि याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या. 11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 12 पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.

स्तोत्रसंहिता 99

99 परमेश्वर राजा आहे
    म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
    म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
सियोन मधला परमेश्वर महान आहे.
    तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
    देवाचे नाव भीतीदायक आहे.
    देव पवित्र आहे.
बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
    देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
    प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
    त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
    आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
    आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
देव उंच ढगांतून बोलला.
    त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
    आणि देवाने त्यांना नियम दिले.
परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
    तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
    आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
    परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.

नीतिसूत्रे 14:9-10

मूर्ख माणूस त्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी किंमत मोजण्याच्या कल्पनेला हसतो. पण चांगले लोक त्यासाठी क्षमा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात.

10 जर एखादा माणूस दु:खी असला तर फक्त त्यालाच ते दु:ख जाणवत असते. त्याचप्रमाणे जर माणूस आनंदी असला तर तो आनंद जाणवू शकेल असा तो एकटाच असतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center