Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 6

मिद्यानचे इस्राएल लोकांशी युध्द

नंतर पुन्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराने निषिध्द म्हणून सांगितलेल्या गोष्टी केल्या. तेव्हा परमेश्वराने मिद्यानच्या लोकांच्या अंमलाखाली त्यांना सलग सात वर्षे ठेवले.

मिद्यानचे लोक बलशाली होतेच, पण इस्राएल लोकांशी क्रौर्यानेही वागत. तेव्हा इस्राएल लोकांनी लपून बसण्यासाठी डोंगरांमध्ये गुहा केल्या. गुहांमध्ये आणि दुर्गम अशा ठिकाणी ते अन्नधान्य ठेवत. कारण मिद्यानी आणि पूर्वेकडील अमालेकी वारंवार त्यांच्या पिकांची नासधूस करत. ते या प्रदेशात तळ देत आणि इस्राएल लोकांनी पेरलेल्या पिकांचा नाश करत. थेट गज्जा पर्यंतच्या जमिनीतील उत्पन्नाची वाट लावली. त्यामुळे इस्राएल लोकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही. शेव्व्यामेंढ्या, गुरेढोरे, गाढवे देखील त्यांना राहिली नाहीत. आपला कुटुंब कबिला आणि जनावरे यांच्या सकट मिद्यानी लोकांनी येऊन तेथे तळ ठोकला. टोळधाडीसारखे ते घुसले. ते लोक व त्यांचे उंट यांची संख्या अक्षरश: अगणित होती. त्यांनी या प्रदेशात येऊन त्यांची नासधूस करायला सुरुवात केली. त्यामुळे इस्राएल लोक कंगाल झाले. त्यांनी मदतीसाठी परमेश्वराच्या नावाने आक्रोश करायला सुरुवात केली.

मिद्यानी लोकांच्या छळणुकीमुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने एका संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवले. तो संदेष्टा इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे. ‘मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. तेथून मी तुम्हाला सोडवून बाहेर आणले. मिसरच्या समर्थ लोकांपासून तुमची सुटका केली. नंतर कनानी लोकांनी तुम्हाला जाच केला. पुन्हा मी तुम्हाला वाचवले. त्यांना मी तो देश सोडायला लावला, आणि त्यांची भूमी तुम्हाला दिली.’ 10 मग मी तुम्हाला सांगितले, ‘मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही अमोरी लोकांच्या देशात राहाल पण त्यांच्या दैवतांची उपासना करु नका.’ पण तुम्ही माझे ऐकले नाही.”

परमेश्वराच्या दूताची गिदोनशी भेट

11 याच सुमाराला गिदोन नावाच्या माणसाकडे परमेश्वराचा दूत आला. आणि अफ्रा येथे योवाशच्या मालकीच्या ओक वृक्षाखाली बसला. योवाश अबियेजरच्या कुळातील होता. गिदोन योवाशचा मुलगा होता. गिदोन द्राक्षकुंडात गव्हाची झोडणी करत होता. परमेश्वराचा दूत गिदोनच्या शेजारी बसला. गिदोन मिद्यानांपासून गहू लपवून ठेवत होता. 12 त्याला दर्शन देऊन परमेश्वराचा दूत म्हणाला, “हे वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”

13 तेव्हा गिदोन म्हणाला, “परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर मग आमच्यावर ही वेळ का यावी? आमच्या पूर्वजांसाठी त्याने मोठे चमत्कार केले असे ऐकले आहे. परमेश्वराने आमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले असे ते सांगतात. पण परमेश्वराने तर आमची साथ सोडली आहे. मिद्यानी लोकांच्या तावडीत आम्ही सापडलो आहोत.”

14 मग परमेश्वर गिदोनकडे वळला व म्हणाला, “तुझ्या शक्तीचा वापर कर मिद्यानी लोकांपासून इस्राएल लोकांची सोडवणूक कर. त्यांना वाचवण्यासाठी मी तुला पाठवत आहे.”

15 पण गिदोन उत्तरादाखल म्हणाला, “मला क्षमा कर कारण मी इस्राएल लोकांना कसा काय वाचवू शकणार? मनश्शेच्या वंशात सगळ्यात दुबळे माझे कूळ आहे आणि मी घरातला सर्वात धाकटा.”

16 तेव्हा परमेश्वर गिदेनला म्हणाला, “मी तुझ्या बरोबर आहे तू मिद्यानी लोकांचा पराभव करू शकशील आपण एकाच माणसाशी लढत आहोत असे तुला वाटेल.”

17 गिदोन परमेश्वराला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असली तर तू खरोखरच परमेश्वर असल्याची मला खात्री पटवून दे. 18 आणि कृपा करून येथेच थांब. तुला अर्पण करायला मी भेट घेऊन येतो. तोपर्यंत येथून निघून जाऊ नको.”

तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी थांबतो.”

19 मग गिदोन गेला आणि त्याने एक करडू शिजवले. शिवाय, वीस पौंड पीठ घेऊन त्याच्या बेखमीर भाकरी केल्या मग शिजवलेले मांस एका टोपलीत आणि त्याचा रस्सा एका पातेल्यात घेतला. मग बेखमीर भाकरींसह ते सर्व अन्न ओक वृक्षाखाली येऊन परमेश्वराला दिले.

20 परमेश्वराचा दूत तेव्हा गिदोनला म्हणाला, “ते मांस आणि बेखमीर भाकरी त्या खडकावर ठेव आणि त्यावर रस्सा ओत.” गिदोनने त्याप्रमाणे केले.

21 परमेश्वराचा दूताच्या हातात एक काठी होती. तिच्या टोकाने त्याने मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला. तत्क्षणी खडकातून अग्नी प्रकट झाला. मांस व भाकरी जळून भस्मसात झाले आणि परमेश्वराचा दूत अदृश्य झाला.

22 तेव्हा गिदोनच्या लक्षात आले की इतका वेळ आपण परमेश्वराच्या दूताशी बोलत होतो. तेव्हा तो चित्कारला, “सर्व शक्तिमान परमेश्वरा! मी परमेश्वराच्या दूताला समोरासमोर पाहिले!”

23 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “शांत हो! घाबरु नकोस. तू मरणार नाहीस.”

24 त्याठिकाणी गिदोनने परमेश्वराच्या उपासनेसाठी वेदी बांधली. तिचे नाव “परमेश्वर म्हणजे शांती” असे ठेवेले अफ्रा येथे ही वेदी अजूनही आहे. अफ्रा म्हणजे अबियेजेर कुटुंबाचे वसतिस्थान आहे.

गिदोन बाल दैवताची वेदी उध्वस्त करतो

25 त्याच रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला. तो म्हणाला, “तू तुझ्या वडीलांचा, सात वर्षाचा पूर्ण वाढलेला बैल घे. तुझ्या वडीलांनी बआल या खोट्या दैवताची वेदी बांधली आहे. तिच्या शेजारी लाकडी स्तंभही आहे. अशेरा या देवीच्या सन्मानार्थ तो आहे. बैलाकरवी तू तुझ्या वडीलांच्या मालकीची ती वेदी नष्ट कर आणि अशेरा स्तंभाची मोडतोड कर. 26 मग परमेश्वर देवासाठी योग्य अशा वेदीची उंचवट्यावर उभारणी कर. त्या वेदीवर या बैलाचा बळी देऊन त्याला जाळ. या यज्ञापर्णासाठी अशेरा स्तंभाच्या लाकडांचा वापर कर.”

27 तेव्हा आपल्या दहा सेवकांच्या मदतीने गिदोनने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने ते केले खरे पण घरातील आणि नगरातील माणसे बघतील या भीतीने हे काम त्याने दिवसाढवळ्या न करता रात्री केले.

28 सकाळी लोक उठून बघतात तर बआलची वेदी उध्वस्त झोलेली! वेदीच्या शेजारचा अशेरा स्तंभ मोडून पडलेला. गिदोनने बांधलेली वेदी आणि तिच्यावर अर्पण केलेल्या बैलालाही त्यांनी पाहिले.

29 नगरातील लोक मग एकमेकांना विचारू लागले. “आपली वेदी कोणी पाडली? आपला अशेरा स्तंभ कोणी मोडला? या नवीन वेदीवर बैलाचे यज्ञार्पण कोणी केले?” असे अनेक प्रश्न ते आपले कुतूहल शमवायला विचारु लागले.

कोणीतरी त्यांना सांगितले, “योवाशचा मुलगा गिदोन याने हे केले आहे.”

30 तेव्हा नगरवासी योवाशकडे येऊन त्याला म्हणाले, “तुझ्या मुलाला बाहेर आण. त्याने बआल वेदीची आणि तिच्या शेजारच्या अशेरा स्तंभाची मोडतोड केलेली आहे. तेव्हा त्याला मृत्युदंड दिलाच पाहिजे.”

31 तेव्हा भोवतालच्या जमावाला योवाश म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेणार का? त्याला तारणार का? जो बआलाची बाजू घेईल त्याला सकाळपर्यंत मृत्युदंड दिला जावा. बआल जर खरा देव असेल तर जेव्हा लोक वेदीची मोडतोड करायचा प्रयत्न करतील तेव्हा स्वतःचे रक्षण त्याने स्वतःच करुन दाखवावे.” 32 योवाश पुढे म्हणाला, “जर गिदोनने बआलच्या वेदीचा विध्वंस केला आहे तर बआलाच त्याच्याशी वाद करु द्या.” त्या दिवसापासून योवाशने गिदोनला नवे नाव दिले ते म्हणजे यरुब्बाल.

गिदोनकडून मिद्यानी लोक पराभूत होतात

33 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर लोक एकत्र येऊन इस्राएल लोकांविरुध्द लढण्यास सज्ज झाले. यार्देन पलीकडे जाऊन त्यांनी एज्रीलच्या खोऱ्यात तळ दिला. 34 गिदोनच्या ठायी परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि गिदोन सामर्थ्यवान बनला. अबियेजर कुटुंबातील लोकांना आपल्या मागोमाग येण्याचे आवाहन करण्यासाठी त्याने रणशिंग फुंकले. 35 मनश्शेच्या वंशातील सर्व लोकांकडे त्याने दूत रवाना केले. दूतांनी त्या लोकांना शस्त्रास्त्रे घेऊन युध्दासाठी सज्ज राहायला सांगितले. आशेर, जबुलून आणि नफताली यांच्या कडेही गिदोनने आपल्या दूतांकरवी असाच निरोप पाठवला. तेव्हा तेही सर्व लोक गिदोनला येऊन मिळाले.

36 मग गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्या हातून तू इस्राएल लोकांना वाचवणार आहेस, याची मला साक्ष पटव. 37 मी आता खव्व्यात कातरलेली लोकर ठेवतो. सर्व जमीन कोरडी राहून फक्त लोकरीवर दव पडलेले आढळले तर मला समजेल की इस्राएल लोकांचा बचाव करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे तू माझा उपयोग करणार आहेस.”

38 आणि नेमके तसेच घडले. गिदोन दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठला आणि त्याने लोकर दाबून पाहिली तर त्यातून वाटीभर पाणी निघाले.

39 ते पाहून गिदोन परमेश्वराला म्हणाला, “माझ्यावर रागवू नको. मला आणखी एक गोष्ट विचारू दे. लोकरीद्वारे मला आणखी एकदा तुझी परीक्षा घ्यायची आहे. ह्या वेळी आजूबाजूची जमीन दवाने भिजलेली असताना लोकर मात्र कोरडी राहू दे.”

40 परमेश्वराने त्या रात्री तसेच करुन दाखवले. फक्त लोकर तेवढी कोरडी राहून भोवतालची जमीन दवाने ओली झाली होती.

लूक 22:54-23:12

मी येशूला ओळखतो असे म्हणण्याची पेत्राला भीति वाटते(A)

54 त्यांनी त्याला अटक केली व ते त्याला मुख्य याजकाच्या घरी घेऊन गेले. पण पेत्र दुरुन त्यांच्या मागे चालला. 55 त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला, आणि त्याच्याभोवती बसले. पेत्रही त्यांच्यात बसला. 56 एका दासीने तेथे त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”

57 पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्याला ओळखत नाही!” 58 थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्याला पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!”

पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!”

59 नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालीलाचा आहे.”

60 परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!”

तो बोलत असताना त्याच क्षणी कोंबडा आरवला. 61 आणि प्रभुने वळून पेत्राकडे पाहिले. पेत्राला प्रभूने उच्चारलेले वाक्य आठवले. “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्याला आठवले. 62 मग तो बाहेर गेला आणि अतिदु:खाने रडला.

लोक येशूचा उपहास करतात(B)

63 येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्याला मारायला सुरुवात केली. 64 त्यांनी त्याचे डोळे बांधले, व त्याला प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?” 65 आणि ते त्याचा अपमान करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.

यहूदी पुढांऱ्यांसमोर येशू(C)

66 दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यात दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक, व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली. आणि ते त्याला त्यांच्या सभेत घेऊन गेले. 67 ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हांला सांग.”

येशू त्यांना म्हणाला, “जरी मी तुम्हांला सागितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. 68 आणि जरी मी तुम्हांला प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. 69 पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.”

70 ते सर्व म्हणाले, “तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय?” त्याने त्यांना उत्तर दिले, “मी आहे असे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.”

71 मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”

राज्यापाल पिलात येशूला प्रश्न विचारतो(D)

23 मग त्यांचा सर्व समुदाय उठला, व त्यांनी त्याला (येशूला) पिलाताकडे नेले. व ते त्याच्यावर आरोप करु लागले. ते म्हणाले, “आम्ही या माणसाला लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”

मग पिलाताने येशूला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”

येशू म्हणाला, “मी आहे हे तू म्हणतोस ते बरोबर आहे.”

मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, “या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.”

पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीयातील सर्व लोकांना तो आपल्या शिकवणीने भडकावीत आहे, त्याने गालीलापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.”

पिलात येशूला हेरोदाकडे पाठवितो

पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालीलाचा आहे काय?” जेव्हा त्याला समजले की, येशू हेरोदाच्या अंमलाखाली येतो. तेव्हा त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले. तो त्या दिवसांत यरुशलेमामध्येच होता.

हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्याला फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते, व त्याला असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. 10 मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे होते. ते त्याच्याविरुद्ध जोरदारपणे आरोप करीत होते. 11 हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्याला पिलाताकडे परत पाठविले. 12 त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले. त्यापूर्वी ते एकमेकांचे वैरी होते.

स्तोत्रसंहिता 95-96

95 चला, परमेश्वराची स्तुती करु या.
    जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या.
    त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
का? कारण परमेश्वर मोठा देव आहे,
    इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
सगळ्यांत खोल दऱ्या आणि
    सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.
महासागरही त्याचाच आहे-त्यानेच तो निर्मिर्ण केला.
    देवाने स्वःतच्या हाताने वाळवंट निर्माण केले.
चला, आपण त्याची वाकून उपासना करु या.
    ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.
तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे.
    आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेंढरे होऊ.

देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात
    जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली,
    त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
10 मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो
    आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे.
    त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
11 म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की
    ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”

96 परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा.
    सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे.
परमेश्वराला गाणे गा.
    त्याच्या नावाचा जयजयकार करा.
चांगली बात्तमी सांगा.
    तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा.
लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे.
    देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा.
परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे.
    तो इतर “देवांपेक्षा” भयंकर आहे.
इतर देशांतले “देव” केवळ पुतळे आहेत.
    पण परमेश्वराने मात्र स्वर्ग निर्माण केला.
त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते.
    देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.
कुटुंबानो आणि राष्ट्रांनो,
    परमेश्वरासाठी स्तुतीपर आणि गौरवपर गीते गा.
परमेश्वराच्या नावाचा जयजयकार करा.
    तुमची अर्पणे घेऊन मंदिरात जा.
परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा.
    पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस परमेश्वराची उपासना करो.
10     सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही.
परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल.
11 स्वर्गांनो, सुखी राहा!
    पृथ्वीमाते आनंदोत्सव कर.
    समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा.
12 शेते आणि त्यात उगवणारे सर्व सुखी व्हा.
    जंगलातल्या वृक्षांनो गा आणि सुखी व्हा.
13 परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा.
    परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.

नीतिसूत्रे 14:5-6

सत्यवादी माणूस खोटे बोलत नाही. तो चांगला साक्षीदार असतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते तो कधीच खरे सांगत नाही. तो वाईट साक्षीदार असतो.

जे लोक देवाची थट्टा करतात ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते कधीच मिळत नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते खरोखर शहाणे आहेत. त्यांच्याजवळ ज्ञान सहजपणे येते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center