Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 2:10-3:31

10 जुन्या पिढीतील सर्व मृत्यू पावल्यानंतर नवीन पिढी पुढे आली. त्यांना परमेश्वराविषयी आणि परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी काय केले याविषयी काहीही माहिती नव्हती. 11 तेव्हा या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशी दृष्कृत्ये केली आणि बआल या दैवताच्या भजनी लागले. हे निंद्य कृत्य करताना त्यांना परमेश्वराने पाहिले. 12 परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणले होते. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराची उपासना केली होती. पण आता या इस्राएल लोकांनी परमेश्वराचे अनुसरण करण्याचे सोडून दिले होते. आणि त्यांच्या अवती भोवतीच्या लोकांच्या खोट्या दैवतांची पूजा करायला सुरुवात केली होती. याचा परमेश्वराला संताप आला. 13 इस्राएल लोकांनी आता परमेश्वराला सोडून बआल आणि अष्टारोथ यांची उपासना करायला सुरुवात केली.

14 परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रू चाल करुन येऊ लागला व त्यांना लुटू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रूंकडून ते पराभूत होऊ लागले. इस्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना. 15 लढाईत त्यांना नेहमी अपयश येऊ लागले. परमेश्वराची साथ आता त्यांना नसल्यामुळे ते पराजित होऊ लागले. त्यांच्या भोवती राहणाऱ्या लोकांच्या दैवतांची सेवा केल्यास इस्राएल लोकांना पराभव पत्करावा लागेल हे परमेश्वराने आधीच बजावले होते.

16 तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक केली. हे नेते इस्राएलांचा ताबा घेणाऱ्या शत्रुंपासून त्यांची सुटका करीत. 17 इस्राएल लोक या न्यायाधीशांनाही जुमानीतनासे झाले. आपल्या परमेश्वराशी इस्राएल लोक निष्ठावंत राहिले नाहीत ते इतर दैवतांच्या भजनी लागले. [a] पूर्वी या इस्राएल लोकांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळत असत. पण आता त्यांच्या वागणुकीत बदल झाला आणि परमेश्वराने सांगितलेला मार्ग त्यांनी सोडून दिला.

18 अनेकदा शत्रु इस्राएलांचा जाच करत. अशावेळी ते मदतीलाठी परमेश्वराचा धावा करीत आणि तेव्हा त्यांची दया येऊन परमेश्वर त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला पाठवी. परमेश्वर या न्यायाधीशांच्या बरोबर होता. म्हणून इस्राएल लोकांचे दरवेळी शत्रूंपासून रक्षण झाले. 19 पण प्रत्येक न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा पुन्हा पापाकडे झुकत आणि अन्य दैवतांची उपासना करत आणि त्यांची सेवा करत असत. त्यांच्या पूर्वजांपेक्षाही ते अधिक वाईट वागत असत. त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे आपल्या दुर्वतनात फरक करायला त्यांनी नकार दिला.

20 तेव्हा परमेश्वराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला व तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही. 21 तेव्हा मी यापुढे त्यांच्या शत्रूंचा पराभव करुन इस्राएल लोकांचा मार्ग मोकळा करत जाणार नाही. यहोशवा वारला तेव्हा जी राष्ट्रे या भूमीत होती त्यांना मी येथेच राहू देईन. 22 इस्राएल लोकांच्या कसोटीसाठी मी या राष्ट्रांचा वापर करीन. आपल्या पूर्वजांप्रमाणे आताचे इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळतात का ते बघू.” 23 तेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्या त्या ठिकाणी राहू दिले. त्यांना तो देश लगेच सोडून जायची बळजबरी केली नाही. त्यांचा पराभव करायला परमेश्वराने यहोशवाच्या सैन्याला साहाय्य केले नाही.

परमेश्वराने इतर राष्ट्रातील त्या लोकांना इस्राएलींचा प्रदेश सोडण्यास भाग पाडले नाही. परमेश्वराला इस्राएल लोकांची परिक्षा घ्यायची होती. या पिढीतील इस्राएल लोकांनी कनानातील देश काबीज करण्यासाठी लढाईत भाग घेतला नव्हता. तेव्हा त्या राष्ट्रांमधील लोकांना परमेश्वराने तेथेच राहू दिले. (कधी युद्ध माहीत नसलेल्या या इस्राएल लोकांना धडा शिकवण्यासाठी परमेश्वराने असे केले.) तेथे राहू दिलेल्या राष्ट्रांची नावे अशी. पलिष्ठ्यांचे पाच राजे, सर्व कनानी लोक, सीदोनी, व बआल-हर्मोनच्या डोंगरापासून ते लेबो हमाथपर्यंतच्या लबानोन डोंगरावर राहणारे हिव्वी. या योगे इस्राएल लोकांची परीक्षा पाहावी आणि मोशेमार्फत त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही हे पाहावे म्हणून परमेश्वराने असे केले.

कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या लोकांबरोबर इस्राएल लोक राहिले. इस्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्ने केली. तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इस्राएल लोक उपासना करु लागले.

पहिला न्यायाधीश अथनिएल

इस्राएल लोक दुर्वर्तन करत आहेत हे परमेश्वराने पाहिले. ते त्यांचा देव परमेश्वर ह्याला विसरले आणि बआल हे दैवत व अशेरा देवी यांची उपासना करु लागले. त्यामुळे परमेश्वर इस्राएल लोकांवर संतप्त झाला. मेसोपटेमियाचा राजा कुशन-रिशाथईम याचे करवी परमेश्वराने इस्राएल लोकांचा पराभव होऊ दिला व त्याची सत्ता त्यांच्यावर आणली. इस्राएल लोक आठ वर्षे त्याच्या अंमलाखाली होते. तेव्हा इस्राएल लोकांनी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने अथनिएलला त्यांच्या रक्षणासाठी पाठवले. कालेबचा धाकटा भाऊ कनाज याचा अथनिएल मुलगा होता. त्यांने इस्राएल लोकांचे रक्षण केले. 10 अथनिएलावर परमेश्वराचा आत्मा आला आणि तो इस्राएल लोकांचा न्यायाधीश झाला. त्याने इस्राएली सैन्याला लढाईस नेले. परमेश्वराच्या मदतीने अथनिएल ने कुशन-रिशाथईमचा पराभव केला. 11 आणि कनाजपुत्र अथनिएलच्या मृत्यूपर्यंत चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता होती.

दुसरा न्यायाधीश एहूद

12 पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे आचरण करु लागले. ते परमेश्वराने पाहिले. तेव्हा मवाबचा राजा एग्लोन याला इस्राएल लोकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य परमेश्वराने दिले. 13 अम्मोनी आणि अमालेकी लोकांची मदत त्याला मिळाली. त्यांनी इस्राएल लोकांवर एकत्रित हल्ला केला. एग्लोनच्या सैन्याने इस्राएलवर विजय मिळवला व त्यांना यरीहो हे खजुरीच्या झाडांचे नगर सोडायला भाग पाडले. 14 पुढे एग्लोन या मवाबच्या राजाने इस्राएलींवर अठरा वर्षे राज्य केले.

15 त्यांनी पुन्हा परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने एहूदला लोकांच्या रक्षणासाठी पाठवले. एहूद हा डावरा असून, बन्यामीनच्या वंशातील गेरा याचा मुलगा होता. इस्राएल लोकांनी एहूदला नजराणा घेऊन एग्लोनकडे पाठवले. 16 एहूदने एक अठरा इंच [b] लांबीची दुधारी तलवार बनवून घेतली आणि ती उजव्या मांडीवर कपड्याखाली झाकली जाईल अशी बांधली.

17 मग मवाबचा राजा एग्लोन याच्याकडे तो नजरणा घेऊन गेला. (एग्लोन हा अतिशय लठ्ठ होता.) 18 एहूदने एग्लोनला नजराणा दिला व तो बरोबर घेऊन आलेल्यांना त्याने पाठवून दिले. 19 त्यांनी राजवाडा सोडला जेव्हा एहूद गिलगालमधील मुर्तीजवळ आला तेव्हा तो मागे फिरला आणि राजाला भेटण्यासाठी परत गेला. एहूद राजा एग्लोनला म्हणाला, “हे राजा, मी तुझ्यासाठी एक गुप्त संदेश आणला आहे.”

राजाने त्याला गप्प बसायची खूण करुन सर्व नोकरचाकरांना दालनाच्या बाहेर जायला सांगितले. 20 एहूद राजाच्या अगदी जवळ गेला. एग्लोन आता आपल्या राजवाड्याच्या दालनात अगदी एकटा होता.

तेव्हा एहूद म्हणाला, “तुला देवाकडून एक संदेश आहे.” राजा सिंहासनावरुन उठला आता तो एहूदच्या अगदी निकट होता. 21 राजा उठल्याबरोबर उजव्या मांडीवर बांधलेली तलवार एहूदने डाव्या हाताने उपसली आणि राजाच्या पोटात खुपसली. 22 तलवारीचे पाते थेट मुठीपर्यंत राजाच्या शरीरात घुसले. राजाच्या अंगातील चरबीने पाते बरबटले. तेव्हा एहूदने ती तशीच तेथे राहू दिली.

23 मग तो बाहेर पडला आणि दालनाचे दरवाजे बंद करुन त्याने त्यांना कुलूप लावले. 24 एहूद बाहेर पडल्याबरोबर सेवक आत शिरले. पाहतात तो दरवाजे बंद केलेले. ते पाहून, राजा स्वच्छतागृहात असेल असे त्यांना वाटले. 25 ते तसेच बाहेर बराच वेळ थांबले. शेवटी त्यांना काळजी वाटायला लागली. किल्ली आणून त्यांनी कुलूप उघडून दार उघडले. आत शिरतात तर जमिनीवर त्यांना राजाचा मृतदेह पसरलेला दिसला.

26 नोकर राजाच्या दालनाबाहेर वाट पाहात होते तेवढ्या वेळात एहूद निसटून जाऊ शकला. मूर्तीवरुन पुढे जाऊन तो सेईराकडे निघाला. 27 तो सेईरा येथे पोचला तेव्हा लगेच त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. इस्राएल लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते खाली उतरले, एहूद त्यांच्या पुढे निघाला. 28 तो म्हणाला, “माझ्या मागोमाग या, आपला शत्रू मवाब याला पराभूत करायला परमेश्वराने आपल्याला मदत केली आहे.”

तेव्हा इस्राएल लोक त्याच्या पाठोपाठ निघाले. यार्देन नदी सहजगत्या पार करुन जिथून मवाब प्रदेशात जाता येते अशा सर्व जागांचा त्यांनी ताबा घेतला. कोणालाही त्यांनी यार्देन पार करु दिली नाही. 29 मवाबांपैकी जवळजवळ दहाहजार शूर आणि कणखर लोकांना इस्राएल लोकांनी ठार केले. एकही मवाब व्यक्ती पळून जाऊ शकला नाही. 30 त्या दिवसापासून इस्राएल लोकांचे मवाबांवर राज्य सुरु झाले. पुढे ऐंशी वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदली.

तिसरा न्यायाधीश शमगार

31 एहूदनंतर आणखी एक जण इस्राएल लोकांच्या रक्षणाला आला तो म्हणजे अनाथचा मुलगा शमगार, त्याने बैलाच्या आरीने पलिष्ट्यांपैकी सहाशे जणांना मारले.

लूक 22:14-34

प्रभु भोजन(A)

14 वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला. 15 तो त्यांना म्हणाला, “मी दु:ख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती. 16 कारण मी तुम्हांस सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.”

17 नंतर त्याने पेला घेतला आणि उपकार मानले. तो म्हणाला, “हे घ्या, आणि आपसात वाटून घ्या. 18 कारण मी तुम्हांस सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षफळांचा रस घेणार नाही.”

19 नंतर त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. त्याने ती मोडली आणि त्यांना दिली व म्हणाला, “हे माझे शरीर आहे जे तुम्हांसाठी दिले आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.” 20 त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.” [a]

येशू विरुद्ध कोण जाईल?

21 “परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे. 22 कारण मनुष्याचा पुत्र जसे निश्चित केले आहे, त्याप्रमाणे मरावयास जाईल. परंतु ज्याने त्याचा विश्वासघात केला आहे, त्याचा धिक्कार असो.”

23 आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले, “हे करणारा आपणापैकी कोण असावा?”

सेवकासारखे व्हा

24 तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत श्रेष्ठ कोण आहे. 25 पण येशू त्यांना म्हणाला, “विदेश्यांचे राजे त्यांच्या लोकांवर (प्रजेवर) सत्ता गाजवितात. इतर लोकांवर अधिकार असणारी माणसे लोकांनी त्यांना लोकांचे उपकारकर्ते म्हणण्यास भाग पाडतात. (स्वतःला उपकारकर्ते म्हणवून घेतात.) 26 परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे. 27 तेव्हा मोठा कोण: जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हांमध्ये सेवा करणारासारखा आहे.

28 “परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात. 29 ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ति केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो. 30 म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.

तुमचा विश्वास ढळू देऊ नका(B)

31 “शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे. 32 परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना कसून केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”

33 परंतु शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.”

34 पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारीपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”

स्तोत्रसंहिता 92-93

शब्बाथचे स्तुतिगीत.

92 परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते.
    परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते.
तुझ्या प्रेमा बद्दल सकाळी गाणे आणि
    रात्री तुझ्या इमानीपणाबद्दल जयजयकार करणे चांगले असते.
देवा, तुझ्यासाठी दहा तारांच्या वीणेवर
    आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले असते.
परमेश्वरा, तू ज्या गोष्टी केल्यास त्यामुळे तू आम्हाला खरोखरच सुखी केले आहेस,
    आम्ही त्याबद्दल आनंदाने गातो.
परमेश्वरा, तू फारच महान गोष्टी केल्यास
    तुझे विचार समजून घेणे आम्हाला फार जड जाते.
तुझ्याशी तुलना करता माणसे म्हणजे मूर्ख जनावरे आहेत.
    ज्याला काहीही कळू शकत नाही अशा मूर्खासारखे आम्ही आहोत.
वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात.
    ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात,
    त्या गोष्टींचा कायमचा नाश होतो.
परंतु परमेश्वरा, तुला सदैव मान मिळेल.

परमेश्वरा, तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.
    वाईट गोष्टी करणाऱ्या सर्व लोकांचा नाश होईल.
10 पण तू मला बलवान बनवशील.
    मी ताकदवान शिंग असलेल्या मेंढ्यासारखा असेन.
पण तू माझी माझ्या खास कामासाठी निवड केलीस.
    तू तुझे ताजेतवाने करणारे तेल माझ्यावर ओतलेस.
11 मी माझे शत्रू माझ्याभोवती बघतो.
ते भल्या मोठ्या बैलाप्रमाणे माझ्यावर चालकरुन येण्याच्या तयारीत आहेत.
    ते माझ्याबद्दल काय बोलतात ते मी ऐकतो.

12-13 परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खजुराच्या झाडाप्रमाणे असतो.
    चांगला माणूस लबानोनमधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो.
चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात.
    आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झपाट्याने वाढतील.
14 ते जुने झाल्यावरही फळे देत राहातील.
    ते सशक्त हिरव्या झाडासारखे असतील.
15 परमेश्वर चांगला आहे हे प्रत्येकाला दाखवण्यासाठी ती (चांगली माणसे) तेथे आहेत
    तो माझा खडक असून तो काहीही चुकीचे करत नाही.

93 परमेश्वर राजा आहे.
    त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे.
तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे.
    ते कंपित होणार नाही.
देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे.
    देवा, तू सदैव जीवंत आहेस.
परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे.
    आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि
    त्यांचा आवाज खूप मोठा आहे.
    परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. [a]
    तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.

नीतिसूत्रे 14:1-2

14 शहाणी स्त्री तिच्या शहाणपणाचा उपयोग तिचे घर जसे असायला हवे तसे करण्यासाठी करते. पण मूर्ख बाई तिच्या मूर्खपणामुळे घराचा सत्यानाश करते.

जो माणूस योग्य रीतीने जगतो तो परमेश्वराला मान देतो. पण जो माणूस इमानदार नसतो तो परमेश्वराचा तिरस्कार करतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center