Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 1:1-2:9

यहूदाची कनान्यांवर चढाई

यहोशवा वारला. त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराची प्रार्थना केली. ते म्हणाले, “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यापैकी कोणत्या वंशाच्या लोकांनी प्रथम चढाई करावी?”

परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “यहूदाच्या वंशातील लोकांनी प्रथम जावे. हा प्रदेश ताब्यात घेण्यास मी त्यांना मदत करीन.”

यहूदाच्या लोकांनी शिमोनच्या वंशातील आपल्या बांधवांकडे मदतीची मागणी केली. ते म्हणाले, “परमेश्वराने आपल्या सर्वांना जमिनीत हिस्सा द्यायचे अभिवचन दिले आहे. आमची जमीन ताब्यात घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली तर तुमची जमीन ताब्यात घ्यायला आम्ही तुमच्या मदतीला येऊ.” तेव्हा शिमोनचे लोक या लढाईत यहूदी लोकांना साथ द्यायला तयार झाले.

परमेश्वराच्या मदतीने यहूदाच्या लोकांनी कनानी आणि परिज्जी यांचा पराभव केला. बेजेक नगरात यहूदाच्या लोकांनी दहा हजार माणसे मारली. बेजेकचा राजा त्यांच्या हाती आला. त्याच्याशी ते लढले. तसेच कनानी व परिज्जी यांना पराभूत केले.

बजेकच्या राजाने पळून जायचा प्रयत्न केला. पण यहूदाच्या लोकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्या हातापायाचे अंगठे तोडले. तेव्हा तो राजा म्हणाला, “मी आत्तापर्यंत सत्तर राजांच्या हातापायांचे अंगठे कापले आहेत. मी ताटाबाहेर टाकलेले अन्न त्यांना वेचून खावे लागत होते. त्या राजांबरोबर मी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल परमेश्वराने मला परतफेड केली आहे.” यहूदाच्या लोकांनी मग त्या बेजेकच्या राजाला यरुशलेम येथे नेले. तेथेच तो मरण पावला.

यहूदाच्या लोकांनी यरुशलेमचाही युध्दात पाडाव केला. ते ताब्यात घेतले. तलवारींचा वापर करुन त्यांनी तेथील लोकांना कापून काढले. नंतर शहराला आग लावली. यहूदाचे लोक पुढे डोंगराळ प्रदेशात, नेगेबमध्ये तसेच पश्चिमेकडील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या आणखी काही कनानी लोकांवर चढाई करुन गेले.

10 मग हेब्रोन (म्हणजेच पूर्वीचे किर्याथ-आर्बा) या शहरात राहणाऱ्या कनानी लोकांशी यहूद्यांनी लढाई केली. शेशय, अहीमन आणि तलमय या तिघांना यहूद्यांनी पराभूत केले.

कालेब आणि त्याची मुलगी

11 येथून निघून यहूदाचे लोक पुढे दबीर येथे राहणाऱ्यांवर चाल करुन गेले (दबीरचे नाव पूर्वी किर्याथ-सेफर असे होते.) 12 यहूदाच्या लोकांनी उठाव करण्यापूर्वी कालेब त्यांना म्हणाला, “किर्याथ सेफरचा पाडाव व्हावा अशी माझी इच्छा आहे. जो कोणी युध्दात हे नगर घेईल त्याला मी माझी मुलगीअखसा देईन. ती त्याची पत्नी होईल.”

13 कालेबला कनाज नावाचा धाकटा भाऊ होता. त्याचा मुलगा अथनिएल. अथनिएलने किर्याथ-सेफर नगर काबीज केले. तेव्हा कालेबने अथनिएलशी अखसाचा विवाह करुन दिला.

14 ती अथनिएल जवळ राहायला गेली. अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी थोडी जमीन मागायला सांगितले. ती आपल्या वडीलांकडे गेली. ती जेव्हा गाढवावरुन उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले, “काय झाले?”

15 अखसा वडीलांना म्हणाली, “मला आशीर्वाद द्या. मला तुम्ही नेगेबमधील कोरडे वाळवंट असलेली जमीन दिली आहे. तेव्हा पाणी असलेली अशी काही जमीन मला द्या.” तेव्हा कालेबने तिला हवेतसे वरच्या व खालच्या बाजूचे झरेही दिले.

16 केनी लोकांनी खजुरीच्या झाडांचे नगर (म्हणजेच यरीहो) सोडले. ते यहूदा लोकांना सामील झाले. ते यहूदाच्या वाळवंटात तेथील लोकांबरोबर राहू लागले. अराद नगराजवळ नेगेबमध्थे हे ठिकाण आहे. (केनी हे मोशेच्या सासऱ्याच्या वंशातील लोक होते.)

17 काही कनानी लोक सफात नगरात राहात होते. तेव्हा यहूदा आणि शिमोनच्या लोकांनी या कनान्यांवर हल्ला केला. त्यांनी ते नगर पूर्णपणे उध्वस्त केले आणि त्या नगराचे नाव हर्मा ठेवले.

18 मग गज्जा व त्याभोवतालची खेडी तसेच अष्कलोन व एक्रोन ही नगरे व त्यांच्या भोवतालची खेडी हा सर्व प्रदेश यहूद्यांनी काबीज केला.

19 या लढाईत परमेश्वर यहूद्यांच्या बाजूचा होता. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील जमीन घेतली पण खोऱ्यांमधील जमीन घेण्यास ते असमर्थ ठरले. कारण तेथील लोकांकडे लोखंडी रथ होते.

20 हेब्रोन जवळची जमीन कालेबला द्यायची असे मोशेने वचन दिले होते. त्याप्रमाणे ती जमीन कालेबच्या वंशजांना मिळाली. अनाकच्या तिन्ही मुलांना कालेबच्या लोकांनी तेथून हद्दपार केले.

21 बन्यामीनचे वंशज यबूसी लोकांना यरुशलेममधून हुसकावून लावू शकले नाहीत. त्यामुळे आजतागायत ते यरुशलेममध्ये बन्यामीनी लोकां बरोबर राहात आहेत.

योसेफचे वंशज बेथेल ताब्यात घेतात

22-23 योसेफच्या वंशातील लोक बेथेल नगरावर हल्ला करायला चाल करुन गेले. (बेथेलचे नांव पूर्वी लूज असे होते.) योसेफच्या लोकांना परमेश्वराची साथ होती. योसेफच्या लोकांनी आधी काही हेर बेथेलला पाठवले. बेथेलचा पाडाव करण्याच्या दृष्टीने त्यांनी टेहेळणी केली. 24 ती करत असताना त्यांना एक माणूस नगराबाहेर येताना दिसला. त्याला ते म्हणाले, “आम्हाला या नगरात जायची गुप्त वाट दाखव आम्ही या नगरावर हल्ला करणार आहोत. तू आम्हाला एवढी मदत केलीस तर आम्ही तुला धक्का लावणार नाही.”

25 तेव्हा त्या माणसाने हेरांना एक गुप्त वाट दाखवली. योसेफच्या लोकांनी बेथेलमधील लोकांना तलवारीने कापून काढले. पण या माणसाला कोणतीही इजा पोचू दिली नाही. तसेच त्याच्या कुटुंबियांनाही त्रास दिला नाही. त्या सर्वांना त्यांनी कोठेही निघून जायला मोकळीक दिली. 26 तेव्हा तो माणूस त्याच्या कुटुंबासह हित्ती लोकांच्या प्रदेशात गेला व तेथे त्याने एक नगर उभे केले. त्याने त्या नगराचे नाव लूज असे ठेवले आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.

इतर वंशाच्या लोकांची कनान्यांशी लढाई

27 बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ही नगरे आणि त्यांच्या भोवतालची खेडी यातही कनानी लोक राहात होते. मनश्शेच्या वंशातील लोक या सर्वांना नगर सोडून द्यायला भाग पाडू शकले नाहीत. आणि त्यामुळे कनानी लोक तिथेच राहिले. त्यानी आपला प्रदेश सोडायचे नाकारले. 28 पुढे इस्राएल लोक समर्थ बनले तेव्हा त्यांनी या लोकांना आपले गुलाम म्हणून काम करायला लावले. पण कनानी लोकांना शहर सोडून जायला ते भाग पाडू शकले नाहीत.

29 एफ्राईमच्या वंशजांच्या बाबतीतही असेच घडले. गेजेर मध्ये कनानी राहात होते. त्यांना एफ्राईमचे वंशज देशातून बाहेर काढू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी लोक एफ्राईम लोकांबरोबर गेजेरमध्ये राहू लागले.

30 हीच गोष्ट जबुलूनच्या वंशजांच्या बाबतीतही घडली. कित्रोन आणि नहलोल या शहरांमध्ये ही काही कनानी राहात होते. त्यांना जबुलूनचे लोक बाहेर घालवू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी जबुलून लोकांबरोबरच राहिले. जबुलून लोकांनी त्यांना आपल्या कामांसाठी गुलाम केले.

31 आशेर लोकांच्या बाबतीतही हेच झाले. अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब या नगरांमधील लोकांना आशेर यांनी बाहेर काढले नाही. 32 कनान्यांना त्यांनी सक्तीने देश सोडायला लावला नाही. तेव्हा कनानी त्यांच्या बरोबरच राहिले.

33 नफतालींच्या बाबतीत हेच झाले. बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथ येथील लोकांना त्यांनी जबरदस्तीने बाहेर घालवले नाही. नफताली त्या नगरांमधील लोकांबरोबर राहू लागले. तेथील कनानी लोक नफतालींचे गुलाम झाले.

34 अमोरी लोकांनी दानच्या वंशजांना डोंगराळ भागातच राहाणे भाग पाडले. त्यांना तेथेच राहावे लागले कारण अमोरी त्यांना खाली खोऱ्यात उतरुन वस्ती करु देईनात. 35 अमोरी लोकांनी हेरेस, अयालोन व शालबीम या डोंगरांमध्ये राहायचे ठरवले. पुढे योसेफचे वंशज जसे आणखी समर्य बनले तसे त्यांनी अमोऱ्यांना आपले दास म्हणून कामाला जुंपले. 36 अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीम खिंडीपासून सेलापर्यंत व सेलावरुन पुढे डोंगराळ प्रदेशापर्यंत होती.

बोखीम येथे परमेश्वराचा दूत

परमेश्वराचा दूत गिलगाल नगरातून बोखीम या नगरात आला. इस्राएल लोकांना त्याने परमेश्वराचा संदेश सांगितला. संदेश असा होता; “मी तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशापर्यंत तुम्हाला आणले. तुमच्याशी केलेला करार मी मोडणार नाही असे मी तुम्हाला सांगितले होते. त्यामुळे तुम्ही त्या प्रदेशात राहणाऱ्यां लोकांशी करार करू नका. त्यांच्या वेद्यां उध्वस्त करा असे मी तुम्हाला स्पष्ट सांगितले होते, पण तुम्ही माझे ऐकले नाही.”

“म्हणून मी म्हणतो, ‘आता या लोकांना त्यांचा देश सोडून जायला मी भाग पाडणार नाही. तुमच्यापुढे ते समस्या निर्माण करतील. त्यांचा पाश तुमच्याभोवती पडेल. त्यांच्या खोट्या देवता जाळ्यांप्रमाणे तुम्हाला अडकवून टाकतील.’”

देवदूताने परमेश्वराचा हा संदेश इस्राएल लोकांना ऐकवल्यावर ते आक्रोश करु लागले. म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्यांनी बोखीम असे ठेवले. बोखीम येथे त्यांनी परमेश्वरासाठी यज्ञ केले.

आज्ञाभंग आणि पराभव

मग यहोशवाने सर्वाना घरी जायला सांगितले. तेव्हा सर्व वंशांचे लोक आपापल्या वतनाचा ताबा घ्यायाला परतले. यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मृत्यूनंतर. वडीलधारी मंडळी जिवंत असे पर्यंत इस्राएलचे लोक परमेश्वराची उपासना करत होते. या वृध्द मंडळीनी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या होत्या. परमेश्वराचा सेवक नूनपुत्र यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन वाराला. इस्राएल लोकांनी त्याचे दफन केले. तिम्नाथ-हेरेस येथे, गाश डोंगराच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याला मिळालेल्या जमिनीत त्याला त्यांनी पुरले.

लूक 21:29-22:13

माझी वचने सर्वकाळ टिकतील(A)

29 नंतर त्याने त्यांस एक बोधकथा सांगितली: “अंजिराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडांकडे पाहा. 30 त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. 31 त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.

32 “मी तुम्हांस खरे सांगतो की, ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. 33 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.

सर्वदा तयार राहा

34 “सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल. 35 खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जिवंतांवर येईल. 36 सर्व समयी जागृत राहा. होणाऱ्या सर्व गोष्टींपासून जिवंत राहण्यासाठी आणि विश्वासाने मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहणे शक्य व्हावे यासाठी प्रार्थना करा.”

37 दर दिवशी तो मंदिरात शिक्षण देत असे. परंतु रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर जात असे. 38 सर्व लोक मंदिरात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे जात.

यहूदी पुढारी येशूला ठार मारावयास टपतात(B)

22 नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो समय जवळ येत होता. आणि मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल हे बघत होते. कारण त्यांना लोकांची भीति वाटत होती.

यहूदा येशूचा शत्रु होतो(C)

नंतर सैतान यहूदामध्ये, ज्याला इस्कर्योत म्हणत, व जो बारा जणांपैकी एक होता, त्याच्यात शिरला. यहूदा मुख्य याजक व मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि येशूला त्यांच्या हाती कसे धरुन देता येईल याविषयी त्याने बोलणी केली. त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचे मान्य केले. म्हणून त्याने संमति दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधि शोधू लागला.

वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी(D)

बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठविले की, “जा आणि आपणांसाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.”

पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही ते कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”

10 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा. 11 आणि घरमालकांस सांगा, ‘गुरुजींनी तुम्हांला विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ 12 तो मनुष्य तुम्हांला माडीवरील सजविलेली खोली दाखवील. तेथे तयारी करा.”

13 तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.

स्तोत्रसंहिता 90-91

भाग चौथा

(स्तोत्रसंहिता 90-106)

देवाचा माणूस मोशे याची प्रार्थना

90 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि
    पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा,
    तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.

तूच लोकांना या जगात आणतोस आणि
    तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
तुझ्यासाठी हजारो वर्षे
    म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे.
    सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो.
आम्ही गवतासारखे आहोत.
    गवत सकाळी उगवते आणि
    संध्याकाळी ते वाळते व मरणाला टेकते.
देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो.
    आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते.
तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे.
    देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस.
तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे
    आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते.
10 आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि
    जरा सशक्त असलो तर 80 वर्षे.
आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे
    आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.
11 देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही.
    परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.
12 आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे
    ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.
13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत
    ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल.
    आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस.
    आता आम्हांला सुखी कर.
16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु
    शकतोस ते त्यांना बघू दे.
17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर.
    आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.

91 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता.
    तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला,
    माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून
    आणि भयानक रोगांपासून वाचवेल.
तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता.
    पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा
    तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल
    आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक
    आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.
तुम्ही 1,000 शत्रूंचा पराभव कराल,
    तुमचा उजवा हात 10,000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल.
    तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत.
तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी
    त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल.
का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता.
    परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे.
10 तुमचे काहीही वाईट होणार नाही.
    तुमच्या घरात रोगराई असणार नाही.
11 देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल
    आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
12 तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून
    ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील.
13 तुमच्याजवळ सिंहावरुन आणि
    विषारी सापांवरुन चालण्याची शक्ती असेल.
14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन.
    जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो.
    ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन.
    मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.
    आणि त्यांना वाचवीन.”

नीतिसूत्रे 13:24-25

24 जर एखाद्याचे आपल्या मुलांवर खरोखच प्रेम असेल तर तो त्यांचे चुकल्यावर त्यांना काठीने मारायलाही कमी करणार नाही. ते चुकीने वागल्यावर तो त्यांना शिस्त लावेल. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला योग्य वेळी काळजीपूर्वक शिकवाल.

25 चांगल्या लोकांना समाधान होईपर्यंत खायला मिळेल. चांगल्या लोकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टी खरोखरच मिळतील. पण दुष्ट लोकांचे पोट रिकामेच राहील. दुष्ट लोकांना महत्वाच्या गोष्टींशिवाय राहावे लागेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center