Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 24

यहोशवाचा अखेरचा निरोप

24 यहोशवाने इस्राएल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्राएलीं पैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली.

मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो. फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते. पण मी, परमेश्वराने, तुमचा पूर्वज अब्राहाम याला नदीपलीकडल्या प्रदेशातून बाहेर काढले. कनान देशात त्याला बराच प्रवास घडवला आणि त्याला बरीच मुलेबाळे दिली. त्याला मी इसहाक हा त्याचा पुत्र दिला. मग याकोब आणि एसाव हे दोन पुत्र इसहाकाला दिले. सेईर डोंगरा भोवतालची जमीन मी एसावला दिली. याकोब आणि त्याची मुलेबाळे येथे राहिली नाहीत. ती मंडळी मिसर देशात गेली.

“मग मी मोशे आणि अहरोन यांना मिसरला पाठवले. त्यांच्यामार्फत मला माझ्या लोकांना मिसरमधून बाहेर काढायचे होते. त्यासाठी मी मिसरमधील लोकांना भयंकर त्रासदायक गोष्टींनी पिडले. आणि तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. अशाप्रकारे तेथून सुटका झाल्यावर ते समुद्रापर्यंत आले तरी मिसरमधील लोक त्यांचा पाठलाग करत होते. रथ, घोडेस्वार यांच्यासह त्यांनी पाठलाग केला. तेव्हा त्यांनी माझा म्हणजे परमेश्वराचा धावा केला. म्हणून मी मिसरमधील लोकांना अनेक संकटांनी हैराण केले. समुद्राला त्यांना आच्छादून टाकायला लावले आणि त्यांना त्याने बुडवले. मिसरच्या सैन्याची मी काय स्थिती केली ती तुम्ही डोव्व्यांनी पाहिलीच आहे.

“त्यानंतर तुम्ही बरेच दिवस वाळवंटात काढलेत. मग मी तुम्हाला यार्देन नदीच्या पूर्वेकडील अमोरी लोकांच्या प्रदेशात आणले. त्यांनी तुमच्याशी युध्द केले पण मी तुमच्यामार्फत त्यांचा पराभव केला. त्यांचा संहार करायचे सामर्ध्य मी तुम्हाला दिले. मग तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.

“त्यानंतर मवाबाचा राजा आणि सिप्पोरचा मुलगा बालाक याने इस्राएल लोकां विरुद्ध लढण्याची तयारी केली. त्याने बौराचा मुलगा बलाम याला बोलावणे पाठवून तुम्हाला शाप द्यायला सांगितले. 10 पण मी परमेश्वराने, बलामाचे म्हणणे ऐकायचे नाकारले. तेव्हा बलामाने तुम्हाला आशीर्वादच दिला. आणि मी तुमचे रक्षण करून तुम्हाला संकटातून बाहेर काढले.

11 “मग तुम्ही यार्देन नदी पार करुन यरीहो येथे आलात. यरीहा मधील लोकांनी तुमच्याशी लढाई केली. अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी, यबूसी यांनीही लढाई केली. पण माझ्यामुळे तुम्ही त्यांचा पराभव करु शकलात. 12 तुमचे सैन्य चाल करून गेल्यावर मी त्याच्यापुढे गांधील माश्शा पाठवल्या. त्यांनी हैराण होऊन ते लोक चालते झाले. तेव्हा तलवार किंवा धनुष्य न वापरताच तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.

13 “मी परमेश्वराने, तुम्हाला ती जमीन दिली. तुम्हाला ती मिळवायला परिश्रम करावे लागले नाहीत. माझ्यामुळे ती तुम्हाला मिळाली. ती शहरे तुम्ही बांधली नाहीत-ती मी दिली. आता त्या जमिनीवर आणि त्या नगरांमध्ये तुम्ही राहात आहात. द्राक्षमळे आणि जैतून वृक्षांच्या बागा तुम्हाला मिळाल्या पण त्या तुम्हाला लावाव्या लागलेल्या नाहीत.”

14 मग यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही आत्ताच परमेश्वराचे शब्द ऐकलेत. तुम्ही त्याची आदरपूर्वक उपासना केली पाहिजे आणि प्रामाणिक पणाने त्याची सेवा केली पाहिजे. तुमच्या पूर्वजांनी ज्या खोट्या दैवतांची पूजा केली त्यांचा त्याग करा. फरात नदीच्या पलीकडे आणि मिसरमध्ये ते फार पूर्वी घडून गेले. आता फक्त या परमेश्वराचीच सेवा करा.

15 “पण कदाचित् या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहात असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करु.”

16 मग लोकांनी उत्तर दिले, “हाच आमचा परमेश्वर त्याच्या सेवेत खंड पडणार नाही आम्ही इतर दैवतांची पूजा करण्यासाठी आपल्या परमेश्वराला सोडणार नाही. 17 आमच्या पूर्वजांना याच परमेश्वर देवाने मिसरमधून बाहेर आणले. ते आम्ही जाणतो. तेथे आम्ही दास होतो. पण परमेश्वराने तेथे आमच्यासाठी चमत्कार घडवले. आम्हाला तेथून बाहेर आणले. एवढेच नव्हे तर इतर प्रदेशांतून आम्ही प्रवास करताना त्यानेच आमचे रक्षण केले. 18 तेथील रहिवाश्यांना पराभूत करायला त्यानेच आम्हाला साहाय्य केले. आता आम्ही आहोत त्या भूमीवरील अमोरी लोकांचा पराभव करायलाही परमेश्वराचीच आम्हाला मदत झाली. तेव्हा आम्ही याच परमेश्वराची सेवा करणार. तोच आमचा देव आहे.”

19 त्यावर यहोशवा म्हणाला, “हे खरे नाही. सतत या परमेश्वराची सेवा करत राहणे तुम्हाला जमणार नाही. हा परमेश्वर देव पवित्र आहे. आपल्या लोकांनी इतर दैवतांची पूजा करण्याचा त्याला तिरस्कार वाटतो. तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलीत तर तो तुम्हाला क्षमा करणार नाही. 20 तुम्ही या परमेश्वराचा त्याग करुन इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. परमेश्वर तुमचा नाश करील. आजवर त्याने तुमचे भले केले आहे पण त्याच्या विरुद्ध गेलात तर तो तुमचा नाश करील.”

21 तेव्हा लोक यहोशवाला म्हणाले, “नाही! आम्ही या परमेश्वराचीच सेवा करु.”

22 यहोशवा त्यांना म्हणाला, “एकदा प्रत्येकाने स्वतःकडे आणि येथे जमलेल्या लोकांकडे पाहावे. या परमेश्वराचीच सेवा करायचे ठरवले आहे याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनात खात्री आहे का? तुम्ही सर्वजण याला साक्षी आहात का?”

लोक उत्तरले, “होय निःसंशय! आम्ही सर्वांनी याच परमेश्वराची सेवा करायचे ठरवले आहे.”

23 तेव्हा यहोशवाने त्यांना सांगितले, “तर मग तुमच्यापैकी कोणाजवळ खोटे दैवत असतील तर ते टाकून द्या. इस्राएलांच्याच परमेश्वर देवावर मनोभावे निष्ठा ठेवा.”

24 लोक यहोशवाला म्हणाले, “आम्ही या परमेश्वर देवालाच मानतो. आम्ही त्याचेच फक्त ऐकू.”

25 मग यहोशवाने त्या दिवशी शखेम या नगतरात लोकांशी करार केला. त्यांनी पाळायचे नियम सांगितले. 26 त्याने ही वचने परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिली. मग एक मोठा दगड निवडून तो परमेश्वराच्या निवासस्थाना जवळच्या एला वृक्षाखाली उभा केला. हा दगड या कराराची साक्ष होय.

27 मग यहोशवा सर्वांना उद्देशून म्हणाला, “आज आपण जे बोललो ते सर्व या दगडामुळे तुमच्या लक्षात राहील. परमेश्वर आज आमच्याशी बोलला तेव्हा हा दगड येथेच होता. तेव्हा आजच्या घटनेचे स्मरण म्हणून हा दगड राहिल. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. तुम्ही परमेश्वर देवाकडे पाठ फिरवायला लागलात तर हा तुम्हाला थोपवील.”

28 एवढे झाल्यावर यहोशवाने लोकांना घरी परतायला सांगितले. तेव्हा सर्वजण आपापल्या ठिकाणी परत गेले.

यहोशवाचा मृत्यू

29 यानंतर नूनाचा पूत्र यहोशवा मरण पावला. त्याचे वय तेव्हा एकशेदहा वर्षे होते. 30 तिम्नथ सेरह या आपल्या वतनाच्या गावी त्याचे दफन करण्यात आले. गाश डोंगराच्या उत्तरेला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात हे ठिकाण आहे.

31 यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतरही इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराने इस्राएलासाठी काय केले हे पाहिलेली वडीलधारी माणसे जिवंत असताना लोक परमेश्वराची उपासना करत राहिले.

योसेफ घरी परततो

32 इस्राएल लोकांनी मिसरमधून बाहेर पडताना योसेफच्या अस्थी बरोबर बाळगल्या होत्या. त्या त्यांनी शखेम येथे पुरल्या. शखेम नावाच्या माणसाचे वडील हमोर याच्या मुलाबाळांकडून याकोबने हा भूभाग शंभर रौप्यमुद्रांना विकत घेतला होता. हा प्रदेश योसेफच्या मुलाबाळांच्या मालकीचा झाला.

33 अहरोनाचा मुलगा एलाजार हाही मरण पावला. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गिबा येथे त्याचे दफन करण्यात आले. एलाजारचा पुत्र फिनहास याला गिबा हा प्रदेश मिळाला.

लूक 21:1-28

खरे दान(A)

21 येशूने वर पाहिले व श्रीमंत लोकांना दानपेटीत दाने टाकताना न्याहाळले. त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. (मी असे म्हणतो) कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”

मंदिराचा नाश(B)

शिष्यातील काही जण मंदिराविषयी असे बोलत होते की, ते सुंदर पाषाणांनी आणि नवसाच्या अर्पणांनी सुशोभित केले आहे.

येशू म्हणाला, “या गोष्टी तुम्ही पाहताना असे दिवस येतील की, एकावर एक असा एकही दगड ठेवला जाणार नाही. ते सर्व पाडले जातील.”

त्यांनी त्याला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”

आणि तो म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो ‘मी आहे’ असे म्हणतील. आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे.’ त्यांच्यामागे जाऊ नका! जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”

10 मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. 11 मोठे भूंकप होतील, दुष्काळ पडतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील. आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.

12 “परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हांला अटक करतील. ते तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हांस सभास्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हांला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. 13 यामुळे तुम्हांला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. 14 आपला स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी काळजी करायची नाही अशी मनाची तयारी करा, 15 कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही. 16 परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हांपैकी काही जणांना ठार मारतील. 17 माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील. 18 परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही. 19 आपल्या सहनशीलतेने तुम्ही जिवाचे रक्षण कराल.

यरुशलेमेचा नाश(C)

20 “जेव्हा तुम्ही यरुशलेमाला सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हांला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे. 21 जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. 22 ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. 23 त्या दिवसांत ज्या गरोदरस्त्रिया आहेत, व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल. मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल. 24 ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.

भिऊ नका(D)

25 “सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील. 26 भीतीमुळे लोक बेशुद्ध होतील आणि जगात काय घडणार आहे ह्या धास्तीमुळे व भीतिमुळे लोक दुर्बल होतील. आकाशातील सामर्थ्ये डळमळीत होतील. 27 नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने मेघात येताना पाहतील. 28 मग या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा. आणि तुमचे मस्तक वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”

स्तोत्रसंहिता 89:38-52

38 पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास
    आणि तू त्याला एकटे सोडून दिलेस.
39 तू तुझा करार पाळला नाहीस.
    तू राजाचा मुकुट धुळीत फेकून दिलास.
40 तू राजाच्या नगरातील भिंती पाडल्यास.
    तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
41 लोक जाता जाता त्याच्या वस्तू चोरतात.
    त्याचे शेजारी त्याला हसतात.
42 तू राजाच्या सर्व शत्रूंना आनंदी केलेस.
    तू त्याच्या शत्रूंना युध्द जिंकू दिलेस.
43 देवा, तू त्यांना स्वःतचे रक्षण करायला मदत केलीस.
    तू तुझ्या राजाला युध्द जिंकायला मदत केली नाहीस.
44 तू त्याला युध्द जिंकू दिले नाहीस.
    तू त्याचे सिंहासन जमिनीवर फेकलेस.
45 तू त्याचे आयुष्य कमी केलेस.
    तू त्याला शरम आणलीस.

46 परमेश्वरा, हे किती काळ चालणार आहे?
    तू आमच्याकडे सदैव दुर्लक्ष करणार आहेस का?
    तुझा राग अग्नीसारखा सदैव धुमसत राहाणार आहे का?
47 माझे आयुष्य किती लहान आहे ते लक्षात ठेव
    तू आम्हाला छोटे आयुष्य जगण्यासाठी व नंतर मरुन जाण्यासाठी निर्माण केलेस.
48 कोणीही माणूस जगून कधीही मरणार नाही असे होणार नाही.
    कोणीही थडगे चुकवू शकणार नाही.

49 देवा, तू पूर्वी दाखवलेले प्रेम कुठे आहे?
    तू दावीदाला त्याच्या कुटुंबाशी इमान राखण्याचे वचन दिले होतेस.
50-51 प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान केला होता ते लक्षात ठेवा.
परमेश्वरा, तुझ्या शत्रूंनी केलेल्या सर्व अपमानांना मला तोंड द्यावे लागले.
    त्या लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला.

52 परमेश्वराला सदैव दुवा द्या.
    आमेन आमेन.

नीतिसूत्रे 13:20-23

20 शहाण्या लोकांशी मैत्री करा म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल. पण जर तुम्ही मूर्खांशी मैत्री केली तर तुम्ही संकटात सापडाल.

21 पापी जिथे जातील तिथे संकटे त्यांचा पाठलाग करतात. पण चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात.

22 चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल.

23 गरीब माणसाकडे खूप धान्य पिकवणारी चांगली जमीन असू शकते. पण तो वाईट निर्णय घेतो आणि उपाशी राहातो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center