Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 16-18

एफ्राईम आणि मनश्शे यांचा वाटा

16 योसेफच्या वंशजांच्या वाट्याची जमीन अशी: तिची हद्द यरीहो जवळ यार्देन नदी पासून सुरु होते व यरीहोच्या पूर्वेकडील जलाशयापर्यंत जाते. तेथून ती बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत चढत जाते. मग ती बेथेल (लूज) पासून अर्की लोकांची सीमा अटारोथ येथपर्यंत जाते. मग ती पश्चिमेला वळून यफलेटी लोकांच्या सीमेजवळून लोअर बेथ-होरोन जवळ व तेथून गेजेर कडून भूमध्य समुद्राशी येऊन ठेपते.

योसेफची मुले: मनश्शे व एफ्राईम यांच्या वंशजांना मिळालेली जमीन अशी:

एफ्राईमचा वाटा; अप्पर-बेथ-होरोन जवळच्या अटारोथ अद्दार येथे पूर्वेकडील हद्द सूरु होते. मिखथाथ जवळ पश्चिम हद्द सुरु होते. पूर्वेला ती तानथशिलोजवळ वळून तशीच पुढे पूर्वेकडे यानोहा येथपर्यंत जाते. यानोहापासून अटारोथ व नारा येथपासून खाली येऊन यरीहोला पोचून यार्देन नदीशी थांबते. तप्पूहापासून ही सीमा पश्चिमेला काना ओढ्यापर्यंत जाते व समुद्राशी तिचा शेवट होतो. ही एफ्राईमच्या लोकांना दिलेली जमीन सर्व कुळांना त्यात वाटा मिळाला. एफ्राईमाची हद्दीलगतची बरीचशी गावे तशी मनश्शेच्या हद्दीतील होती. पण एफ्राईम लोकांना ती मिळाली. 10 तथापी, गेजेर मध्ये राहणाऱ्या कनानी लोकांना ते घालवू शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक अजूनही एफ्राईम लोकांमध्येच राहतात. व ते एफ्राईम लोकांचे दास झाले.

17 मनश्शेच्या वंशजांनाही जमिनीत वाटा मिळाला. मनश्शे हा योसेफचा मोठा मुलगा. आणि गिलादचा पुढारी माखीर म्हणजे मनश्शेचा मोठा मुलगा. माखीर हा मोठा लढवय्या होता. तेव्हा गिलाद आणि बाशान हे प्रदेश माखीर कुटुंबाला मिळाले. मनश्शेच्या वंशातील इतर कुळांनाही जमिनीत वाटा मिळाला. अबीयेजेर, हेलेक, अस्त्रियेल, शेखेम, हेफेर व शमीदा हे ते योसेफ पुत्र मनश्शे याच्या वंशातील पुरुष होते. यांच्या कुटुंबांना जमिनीत हिस्से होते.

सलाफहाद हा हेफेरचा पुत्र; आणि हेफेर गिलादचा, गिलाद माखीरचा पुत्र आणि माखीर मनश्शे याचा. सलाफहादला मुलगा नव्हता त्याला पाचही मुलीच होत्या. महला, नोआ, हाग्ला, मिल्का व तिरसा ही त्यांची नावे. या मुली एलाजार हा याजक व नूनाचा पुत्र यहोशवा तसेच पंच यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाल्या, “आम्हाला आमच्या पुरुष नातेवाइकांइतकाच वाटा द्यायला परमेश्वराने मोशेला सांगितले होते.” तेव्हा एलाजारने परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानून त्यांनाही जमिनीत हिस्सा दिला. त्यांच्या वडीलांच्या भावांना मिळाला असता तसाच हिस्सा या मुलींना मिळाला.

अशाप्रकारे मनश्शेच्या वंशाला यार्देन नदीच्या पश्चिमेकडे दहा वाटे मिळाले. शिवाय नदीच्या दुसऱ्या बाजूला गिलाद आणि बाशान हे दोन प्रांत होतेच. मनश्शेच्या मुलींना मुलांप्रमाणेच वाटा मिळाला. मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना गिलाद प्रांत मिळाला.

मनश्शेच्या जमिनी आशेरपासून मिखमथाथपर्यंत पसरलेल्या होत्या. हा भूभाग शखेम जवळचा. त्या सीमा दक्षिणेला एनतप्पूहा भागापर्यंत गेलेली होती. तप्पूहा भोवतालची जमीन मनश्शेची होती, पण खुद्द तप्पूहा गाव त्याच्या अखत्यारीत नव्हते. ते मनश्शेच्या जमिनीच्या सीमेवर असून एफ्राईमाच्या वंशजाचे होते. मनश्शेची हद्द तशीच पुढे दक्षिणेला काना नदीपर्यंत जात होती. हा भाग मनश्शेच्या वंशजांचा असला तरी नगरे एफ्राईमाच्या वंशजांच्या ताब्यात होती. नदीच्या उत्तरेला मनश्शेच्या जमिनीची हद्द असून ती पश्चिमेला भूमध्य समुद्रापर्यंत जात होती. 10 दक्षिणेकडील जमीन एफ्राईमची व उत्तरेकडील मनश्शेची होती. भूमध्य समुद्र ही पश्चिमेकडील सीमा. ही सीमा उत्तरेकडील मनश्शेची होती भूमध्य समुद्र ही परिचमेकडील सीमा. ही सीमा उत्तरेला आशेरच्या जमीनीला आणि पूर्वेला इस्साखारच्या जमीनीला भिडलेली होती.

11 आशेर आणि इस्साखारच्या प्रांतातही मनश्शेच्या वंशजांची काही नगरे होती. बेथ-शान, इब्लाम आणि त्या भोवतालची खेडी मनश्शेच्या वंशजांची होती. ते दोर, एन-दोर, तानख, मगिद्दो ही शहरे व त्यांच्या भोवतालची छोटी गावे यात राहात होते. ते नफाथच्या तोज शहरात देखील राहात होते. 12 मनश्शेचे वंशज या शहराचा पाडाव करु शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक बाहेर न पडता तेथेच राहिले. 13 पण इस्राएल लोकाचे सामर्ध्य वाढले. तेव्हा त्यांनी कनानी लोकांना आपल्या कामाला जुंपले. असे असले तरी त्यांना इस्राएल लोकांनी घालवून दिले नाही.

14 योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, “तू आम्हाला जमिनीत एकच वाटा दिलेला आहेस पण आमची संख्या बरीच जास्त आहे. परमेश्वराने आम्हाला एवढी सगळी जमीन दिलेली असताना तू आम्हाला एकच हिस्सा का दिलास?”

15 यहोशवा त्यावर म्हणाला, “तुमची संख्या वाढली असेल तर मग त्या डोंगराळ प्रदेशात जा. सध्या ती जमीन परिज्जी व रेफाई यांच्या मालकीची आहे. पण एफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला अपुरा पडत असेल तर त्या जमिनीचा ताबा घ्या.”

16 योसेफचे वंशज म्हणाले, “एफ्राईसचा डोंगराळ प्रदेश फारसा मोठा नाही हे खरेच. पण तेथील कनानी लोकांकडे सामर्थ्यवान आयुधे आहेत, लोखंडी रथ आहेत. इज्रेलचे खोरे, बेथ-शान आणि आसपासची गावे यांवर त्यांची हुकमत आहे.”

17 तेव्हा योसेफाचे पुत्र एफ्राईम व मनश्शे यांना यहोशवा म्हणाला, “पण तुम्ही तर संख्येने केवढेतरी आहात आणि तुमचे सामर्थ्यही मोठे आहे. तेव्हा तुम्हाला एका हिश्श्यापेक्षा जास्त भाग मिळायलाच हवा. 18 तुम्ही तो डोंगराळ प्रदेश काबीज करा. ते जंगलच आहे पण झाडे तोडून तुम्ही राहायला चांगली सपाट जागा करून घ्या. तो प्रदेश तुमच्या मालकीचा होईल. कनानी लोकांना तुम्ही तेथून घालवून द्याल. ते लोक दणकट असले आणि सशस्त्र सज्ज असले तरी तुम्ही त्यांना पराभूत कराल.”

उर्वरीत प्रदेशाची वाटणी

18 सर्व इस्राएल लोक शिलोह येथे एकत्र जमले. तेथे त्यांनी सभामंडप उभारला. आता देश इस्राएल लोकांच्या हाती आला होता. त्यांनी त्या भागातील शत्रूना नामोहरण केले होते. देवाने वचन दिल्या प्रमाणे इस्राएल वंशजातील सात कुळांना जमिनीचा हिस्सा अजून मिळाला नव्हता.

तेव्हा यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुम्ही आपली जमीन ताब्यात घ्यायला कोठवर थांबणार? तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने ती तुमच्या हवाली केली आहे. आता प्रत्येक वंशातून तीन तीन जणांची निवड करा. त्यांना मी जमिनीची पाहणी करायला पाठवतो. त्यावरुन ते त्या जमिनीचे वर्णन काढतील व माझ्याकडे परत येतील. त्यांनी जमीनीचे सात वाटे करावेत. दक्षिणे कडील भाग यहूदाच्या लोकांकडे आहे. तो तसाच राहील. आणि उत्तरेकडील जमीन योसेफाच्या लोकांकडे आहे ती तशीच राहील. पण तुम्ही फक्त जमिनीचे वर्णन लिहून आणा आणि सात भाग पाडून माझ्याकडे या. कोणी कुठला वाटा घ्यायचा ते आपल्या परमेश्वर देवाच्या म्हणण्यानुसार ठरेल. लेवींना जमिनीत वाटा नाही. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे हाच त्यांचा वाटा. गादी, रऊबेनी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक यांना त्यांचा वाटा मिळालेला आहेच. यार्देनच्या पूर्वेकडील भाग परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यापूर्वीच दिलेला आहे.”

तेव्हा या कामासाठी निवडलेली मंडळी जमिनीच्या पाहणीसाठी बाहेर पडली. त्या प्रदेशाचे वर्णन लिहून काढले व तो यहोशवाकडे परत आणण्यासाठी ती निघाली. यहोशवा त्या लोकांना म्हणाला, “जमिनीचे नीट निरीक्षण करुन त्यांचे वर्णन तयार करा. मग ते घेऊन शिलोह येथे मला येऊन भेटा. तेथे मी चिठ्ठ्या टाकीन. म्हणजे परमेश्वराच्या इच्छेनुसार जमिनीचे वाटप होईल.”

तेव्हा हे लोक तिकडे गेले. त्यांनी नीट पाहणी करून यहोशवासाठी तिचे वर्णन लिहून काढले. प्रत्येक नगराचा अभ्यास करुन त्यांनी त्या प्रदेशाच्या सात वाटण्या केल्या. वर्णन घेऊन मग ते शिलोह येथे यहोशवाला भेटायला आले. 10 यहोशवाने शिलोह येथे परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकल्या. अशा प्रकारे जमिनीची विभागणी होऊन प्रत्येक वंशाला जमिनीत आपापला वाटा मिळाला.

बन्यामीनचा वाटा

11 यहूदा आणि योसेफ यांच्या मधला जमिनीचा हिस्सा बन्यामीनच्या वंशाला मिळाला. त्याच्या वंशातील प्रत्येक कुळाचा त्यात हिस्सा होता. त्यांना मिळालेली जमीन अशी. 12 तिची उत्तरेकडील हद्द यार्देन नदीशी सुरु होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने जाते. मग ती पश्चिमेला डोंगराळ प्रदेशात जाऊन बेथ-आवेनच्या पूर्वेला भिडते. 13 तेथून ती दक्षिणेला लूज (म्हणजेच बेथेल) कडे वळते व खाली अटारोथ अद्दार येथवर जाते. अटारोथ-अद्दार हे बेथ-होरोनच्या दक्षिणेकडील टेकडीवर आहे. 14 तेथे ही हद्द दक्षिणेला वळून टेकडीच्या पश्चिम बाजूने जाते. किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) येथे तिचा शेवट होतो. हे यहूदाच्या वंशजांचे नगर ही झाली पश्चिम बाजू.

15 दक्षिणेकडील हद्द किर्याथ-यारीम येथ सुरु होऊन नफ्तोह नदीपर्यंत जाते. 16 रेफाई खोऱ्याच्या उत्तरेकडील बेन हिन्नोमच्या खोऱ्यानजीकच्या डोंगर पायथ्याकडे ती उतरत जाते. तेथून यबूसी नगराच्या दक्षिणेला हिन्नोम खोऱ्यात उतरुन एन-रोगेल कडे जाते. 17 तेथे उत्तरेला वळून एन-शेमेश कडे जाते. तशीच ती गलीलोथ पर्यंत जाते. (गलीलोथ हे पर्वतांमधल्या अदुम्मीम खिंडीजवळ आहे) रऊबेनाचा पुत्र बोहन याचे नाव दिलेल्या मोठ्या थोरल्या खडकाकडे ही सीमा उतरते. 18 बेथ-अराबाच्या उत्तरेकडील प्रदेशात जाऊन मग ती अराबात खाली उतरते. 19 बेथ-हाग्लाच्या उत्तरेला जाऊन क्षार समुद्राच्या उत्तर किनाऱ्याशी तिचा शेवट होतो. येथे यार्देन नदी समुद्राला मिळते. ही झाली दक्षिण हद्द.

20 यार्देन नदी ही पूर्वेकडील हद्द. बन्यामिनाचा वंशजांना मिळाला तो भाग हा. आता सांगितली ती तिची सीमारेषा. 21 प्रत्येक कुटुंबाला जमीन मिळाली. त्यांची नगरे म्हणजे यरीहो, बेथ होग्ला, एमेक-केसास, 22 बेथ अराबा, समाराईम व बेथेल, 23 अव्वीम, पारा, आफ्रा, 24 कफर-अम्मोनी, अफनी, गेबा ही बारा नगरे व आसपासची गावे.

25 गिबोन, रामा, बैरोथ. 26 मिस्पा, कफीरा, मोजा 27 रेकेम, इपैल, तरला, 28 सेला, ऐलेफ, यबूसी (म्हणजेच यरूशलेम) गिबाथ आणि किर्याथ ही चौदा नगरे आणि आसपासची गावे सुध्दा बन्यामीनाच्या वंशजांना मिळाली.

लूक 19:1-27

जक्कय

19 येशूने यरीहोत प्रवेश केला आणि यरीहोतून जात होता. तेथे जक्कय या नावाचा मनुष्य होता. तो मुख्य जकातदार होता आणि खूप श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना, कारण तो बुटका होता. तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता.

येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जक्कय याला म्हणाला, “जक्कया त्वरा कर आणि खाली ये. कारण आज मला तुझ्याच घरी राहायचे आहे.”

मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. सर्व लोकांनी ते पाहिले, ते कुरकूर करु लागले. व म्हणू लागले की, “तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे.”

परंतु जक्कय उभा राहिला व प्रभूला म्हणाला, “गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन.”

येशू त्याला म्हणाला, “आज या घराला तारण मिळाले आहे. कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा पुत्र आहे. 10 कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे.”

देव तुम्हांला देतो त्या गोष्टींचा उपयोग करा(A)

11 लोक या गोष्टी ऐकत असतानाच येशूने त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली, कारण तो यरुशलेमाजवळ होता म्हणून त्यांनी असा विचार केला की, देवाचे राज्य तत्काळ प्रगट होणार आहे. 12 मग येशू म्हणाला, “कोणी एक उच्च कुळातील मनुष्य आपली त्या भागाचा सरदार म्हणून नियुक्ती करुन घेण्यासाठी व पुन्हा परतण्यासाठी दूरच्या देशी गेला. 13 त्याने त्याच्या नोकरांपैकी दहा नोकरांना बोलाविले. त्यांना त्याने दहा मोहरा [a] दिल्या. आणि तो त्यांना म्हणाला, ‘मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.’ 14 परंतु त्याचे प्रजाजन त्याचा द्वेष करीत असत त्यांनी त्याच्यामागे एक शिष्टमंडळ पाठविले, व सांगितले की, ‘या माणसाला आमचा राजा करु नका.’

15 “परंतु त्याची राजा म्हणून नेमणूक झाली व तो परत आला. त्याने ज्या नोकरांना पैसे दिले होते त्यांना बोलावणे पाठविले. यासाठी की, त्यांनी त्यापासून किती फायदा मिळविला हे पाहावे. 16 पहिला वर आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’ 17 तेव्हा तो त्याला म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’

18 “मग दुसरा (नोकर) आला व म्हणाला, ‘तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ 19 आणि तो त्याला म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’

20 “मग दुसरा नोकर आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते. 21 आपण कठोर आहात, मला तुमची भीति वाटत होती. जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता, आणि जे पेरिले नाही, ते कापता.’

22 “धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट माणसा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा माणूस आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, 23 तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’ 24 त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्याजवळून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्याला द्या.’

25 “ते त्याला म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’

26 “धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, ज्याच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतले जाईल. 27 परंतु मी राज्य करु नये अशी इच्छा करणाऱ्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’”

स्तोत्रसंहिता 87

कोरहाच्या मुलाचे स्तुतिगीत

87 देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
    परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.

देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात.
    त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो.
    सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो.
    प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.

देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात.
    ते खूप आनंदी आहेत.
ते गाणी गातात, नाच करतात.
    ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”

नीतिसूत्रे 13:11

11 जर एखादा माणूस पैसे मिळवण्यासाठी फसवाफसवी करील तर त्याचे पैसे लवकरच जातील. पण जो माणूस कष्ट करुन पैसे मिळवतो त्याचे पैसे वाढतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center