Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 3-4

यार्देन नदीकाठचा चमत्कार

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून यहोशवा सर्व इस्राएल लोकांसह अकाशियाहून (अथवा शिट्टिमाहून) निघून यार्देन नदीपर्येत आला. नदी पार करण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. तीन दिवसांनंतर अधिकारी छावणीतून फिरले. त्यांनी लोकांना आज्ञा दिल्या. ते म्हणाले, “लेवी याजक तुमच्या परमेश्वर देवाच्या कराराचा कोश वाहून नेताना तुम्हाला दिसतील तेव्हा त्यांच्या पाठोपाठ जा. पण फार जवळून जाऊ नका. त्यांच्या पासून सुमारे एक हजार यार्ड अंतर ठेवा. या पूर्वी कधी या वाटेने तुम्ही गेला नाहीत. तेव्हा ती कळावी म्हणून त्यांच्या मागून जा.”

मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुचिर्भूत आणि पवित्र व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामार्फत अद्भुत गोष्टी करणार आहे.”

मग याजकांना यहोशवाने कराराचा कोश घेऊन सर्वांच्या आधी जायला सांगितले. तेव्हा याजकांनी कोश उचलला व ते सर्वांपुढे चालत निघाले.

परमेश्वर तेव्हा यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास सुरूवात करीन. म्हणजे मग मोशेला मी साथ दिली तशीच तुलाही देणार आहे हे लोकांना कळेल. याजक कराराचा कोश वाहून नेतील. त्यांना सांग यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत जा आणि प्रवाहात थांबा.”

यहोशवा मग इस्राएल लोकांना म्हणाला, “इकडे या आणि आपल्या परमेश्वराची वचने लक्षपूर्वक ऐका. 10 देव आपल्या संगती आहे याची ती साक्ष होय. तो कनानी, हिती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी अमोरी व यबूसी या आपल्या शत्रूंचा खात्रीने पराभव करील. त्यांना त्या प्रदेशातून हुसकावून लावील. 11 तुम्ही यार्देन पार करत असताना या परमेश्वराच्या कराराचा कोश तुमच्या समोर असेल. 12 आता, प्रत्येक कुळातील एक याप्रमाणे इस्राएल लोकांच्या बारा कुळातून बारा जणांची निवड करा. 13 याजक परमेश्वराच्या कराराचा कोश वाहतील. परमेश्वर म्हणजे साऱ्या विश्वाचा मालक होय. यार्देन नदीतून तुमच्यापुढे तो कोश नेतील. जेव्हा त्यांच्या टाचा नदीच्या प्रवाहाला स्पर्श करतील तेव्हा प्रवाह वाहायचा थांबेल. पाणी आहे त्याठिकाणी थांबून मागच्या मागे धरणाप्रमाणे अडवले जाईल.”

14 कराराचा कोश वाहणारे याजक निघाले आणि नदी पार करून जाण्यासाठी सर्व लोकांनी मुक्काम हलवला. त्या लोकांनी यार्देन नदी पार करायला सुरूवात केली. 15 (सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले. 16 आणि लगेच पाणी वाहायचे थांबले. पाण्याची जणू भिंत होऊन ते मागे अडवले गेले. थेट आदाम (सारातान जवळचे एक नगर) नगरापर्यंत पाणी सर्वदूर साठून राहिले. यरीहोजवळ लोकांनी नदी पार केली. 17 तेथील जमीन कोरडी झाली. याजक परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन नदीच्या मध्यावर आले व थांबले. सर्व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून यार्देन पलीकडे निघून जाईपर्यंत ते तिथेच थांबले.

आठवण म्हणून घेतलेले दगड

सर्वजण नदी पार करून गेल्यानंतर परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आता बाराजणांची निवड कर. प्रत्येक कुळातुन एकेक घे. याजक नदीत जेथे उभे होते त्या जागेवरचे बारा दगड त्यांना निवडायला सांग. ते बारा दगड उचलून, आज रात्री तुम्ही जेथे मुक्काम कराल तिथे ठेवा.”

यहोशवाने मग प्रत्येक कुळातून एक याप्रमाणे बाराजण निवडले. त्यांना जवळ बोला बोलावून तो म्हाणाला, “तुमच्या परमेश्वर देवाच्या पवित्र करार कोशासमोर नदीच्या मध्यभागी जा. तेथून प्रत्येकाने एकएक दगड उचलून आणा. इस्राएल मधील आपापल्या कुळाचे प्रतीक म्हणून तो राहील. तेव्हा असा दगड खांद्यावर घेऊन या. हा दगड म्हाणजे एक चिन्ह होय. ‘या दगडांचा अर्थ काय?’ असे पुढे तुमची मुले तुम्हाला विचारतील. परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहून नेत असताना नदी दुभंगली व परमेश्वराने यार्देनेचा प्रवाह रोखला ही गोष्ट इस्राएलांच्या कायम स्मरणात राहावी म्हणून हे दगड आहेत असे त्यांना सांगा.”

इस्राएल लोकांनी यहोशवाचे ऐकले. त्यांनी नदीच्या प्रवाहातून इस्राएलाच्या प्रत्येक कुळासाठी एक याप्रमाणे बारा दगड उचलून आणले. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली त्याप्रमाणे ते वागले. ते दगड वाहून आणून त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन ठेवले. परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश घेऊन याजक ज्या ठिकाणी थांबले तेथे यहोशवाने बारा दगड ठेवले. ते आजही त्याठिकाणी आहेत.

10 लोकांनी आता काय करावे हे सांगण्याची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिली. मोशेनेही यहोशवाला याच गोष्टी सांगितल्या होत्या. हे सर्व होईपर्यंत परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन याजक नदीच्या मध्यभागी उभे राहिले. आणि लोकांनी भराभर नदी पार केली. 11 लोक नदी ओलांडून गेल्यावर मग याजक पवित्र करारकोश घेऊन लोकांच्या पुढे गेले.

12 रऊबेनी, गादी आणि मनश्शाचा अर्धा वंशातील लोक मोशेच्या सांगण्याप्रमाणे हत्यारबंद होऊन, नदी ओलांडून इतरांच्यापुढे गेले. परमेश्वराने द्यायचा कबूल केलेला प्रदेश मिळवून द्यायला ते उर्वरित इस्राएल लोकांना मदत करणार होते. 13 सुमारे चाळीस हजार लोक युध्दाच्या तयारीने परमेश्वरासमोर यरीहोच्या मैदानाकडे चालून गेले.

14 सर्व इस्राएल लोकांच्या मनात त्या दिवशी परमेश्वराने यहोशवाबद्दल थोर असे महत्व बिंबवले. तेव्हापासून पुढे त्याचे आयुष्य असेपर्यंत त्यांनी मोशे प्रमाणेच यहोशवाविषयी आदर बाळगला.

15 याजक तो कोश घेऊन नदीच्या पात्रात उभे असताना परमेश्वर यहोशवाला म्हणाला, 16 “याजकांना नदीतून बाहेर यायला सांग.”

17 त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनबाहेर येण्याची आज्ञा केली.

18 यहोशवाचे ऐकून याजक करारकोश घेऊन नदीच्या पात्रातून बाहेर आले. याजकांचे पाय जमिनीला लागताच पाणी पुन्हा पूर्ववत वाहू लागले. नदी पुन्हा पहिल्यासारखी दुथडी भरून वाहू लागली.

19 पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी नदी ओलांडून लोकांनी यरीहोच्या पूर्वेकडील गिलगाल येथे तळ दिला. 20 नदीतून उचललेले बारा दगड त्यांनी आणले होतेच. ते यहोशवाने गिलगाल येथे रचून ठेवले. 21 यहोशवा म्हणाला, “‘या दगडांचे महत्व काय? ते येथे कशासाठी?’ असे उद्या तुमची मुले तुम्हाला विचारतील. 22 तेव्हा त्यांना सांगा, ‘यार्देन नदीच्या कोरडचा पात्रातून इस्राएल लोक कसे आले त्याची ही आठवण आहे.’ 23 तेव्हा तुमच्या परमेश्वर देवाने नदीचा प्रवाह रोखला होता. आम्ही तांबडा समुद्र ओलांडला त्यावेळी झाले तसेच येथेही लोकांनी नदी ओलांडेपर्यंत नदीचे पात्र कोरडे होते. तांबडा समुद्रही परमेश्वराने असाच आटवला होता. 24 आपला परमेश्वर अतिशय प्रतापी आहे हे जाणून येथील लोकांना त्याचा धाक वाटावा म्हणून तुमच्या परमेश्वर देवाने असे केले.”

लूक 14:7-35

स्वतःला महत्त्व देऊ नका

मग त्याने पाहुण्यांना एक बोधकथा सांगितली, कारण त्याने पाहिले की, ते त्यांच्यासाठी मानाच्या जागा शोधीत होते. तो त्यांना म्हणाला, “जेव्हा एखादा तुम्हांला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका. कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल, आणि तुम्हांला म्हणेल, ‘या माणसाला तुझी जागा दे.’ मग खजील होऊन तुम्हांला खालच्या जागी बसावे लागेल.

10 “पण जेव्हा तुम्हांला आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या (शेवटच्या) जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हांला म्हणेल, ‘मित्रा, वरच्या आसनावर येऊन बैस.’ तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझा मान होईल. 11 कारण जो कोणी स्वतःला उच्च करितो त्याला लीन केले जाईल व जो स्वतःला लीन करील त्याला उच्च केले जाईल.”

तुम्हांला बक्षीस दिले जाईल

12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14 आणि तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही. कारण नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”

मोठ्या मेजवानीविषयीची गोष्ट(A)

15 आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्यात जेवतो, तो प्रत्येक जण धन्य!”

16 मग येशू त्याला म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले. 17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या, कारण सर्व तयार आहे’ हे सांगण्यासाठी नोकराला पाठविले. 18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’ 19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे, कृपा करुन मला क्षमा कर.’ 20 आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’

21 “म्हणून जेव्हा तो नोकर परत आला, तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगारातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’

22 “नोकर म्हणाला, ‘आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे. आणि तरीही जागा आहे.’ 23 मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरुन जाईल. 24 कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या आमंत्रित केलेल्या कोणालाही माझ्या मेजवानीतली चव पाहायला मिळणार नाही.’”

प्रथम तुम्ही योजना आखा(B)

25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, 26 “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जिवाचासुद्धा द्धेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. 27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.

28 “जर तुम्हांपैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करुन तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? 29 नाहीतर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करु शकणार नाही. आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, 30 ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करु शकला नाही!’

31 “किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय? 32 जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रु दूर अंतरावर असतानाच तो शिष्टमंडळ पाठवून शांततेसाठी तहअटींची विचारणा करील.

33 “त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही.

तुमचा प्रभाव गमावू नका(C)

34 “मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्याला खारटपणा कशाने येईल? 35 ते पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील.

“ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको!”

स्तोत्रसंहिता 80

प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.

80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
    तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
    आम्हाला तुला बघू दे.
इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
    ये आणि आम्हाला वाचव.
देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
    आणि आम्हाला वाचव.
सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
    आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
    तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
    आमचे शत्रू आम्हाला हसतात.
सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
    आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.

भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
    तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
    आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
    त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
    मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
    तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
    आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
    रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
    तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
    तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
    तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.

17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
    तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
    त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
    आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.

नीतिसूत्रे 12:27-28

27 आळशी माणूस त्याला हव्या असलेल्या गोष्टीच्या मागे जाणार नाही पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते.

28 जर तुम्ही योग्य रीतीने जगलात तर तुम्हाला खरे जीवन मिळेल. सदैव जगण्याचा तोच मार्ग आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center