Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NLT. Switch to the NLT to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 31:1-32:27

नवा नेता यहोशवा

31 मग मोशेने सर्व इस्राएलांना ह्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय ‘यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे,’ परमेश्वरानेही मला सांगितले आहे. तुमचा देव परमेश्वर हा तुम्हांला साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.

“अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो याही वेळी तुमच्यासाठी करील. या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हाला साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे. शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”

मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर. परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा खचून जाऊ नका आणि निर्भय व्हा.”

मोशे शिकवण लिहून काढतो

नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलच्या वडिलधाऱ्या लोकांनाही मोशेने हे नियमशास्त्र दिले. 10 मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “दर सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा. 11 यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे. 12 पुरुष, बायका, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचा आदर करावा. शिकवणीचे जीवनात आचरण करावे. 13 ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लौकरच तुम्ही जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्यच विषयी आदर बाळगतील.”

परमेश्वराचे मोशे व यहोशवाला बोलावतो

14 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन दर्शनमंडपात ये. म्हणजे मी त्याला आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शन मंडपात गेले.

15 दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला. 16 तो मोशेला म्हणाला, “तू आता लौकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत्त होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील. 17 तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत. 18 पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही.

19 “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांना शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करुन घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरुद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील. 20 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील. 21 त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे या बद्दल जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”

22 तेव्हा त्याचदिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांना ते शिकवले.

23 मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंमत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहील.”

मोशे इस्राएलांना सावध करतो

24 मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर 25 लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वर कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला, 26 “हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. 27 तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल. 28 तुमच्या कुळातील अंमलदार व महाजन यांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगीन. 29 माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.”

मोशेचे गीत

30 सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले

32 “हे आकाशा, ऐक मी काय म्हणतो ते.
    वसुंधरे ऐक शब्द माझ्या मुखातले.
पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव होईल.
    तो बोध असेल जमिनीवरुन खळाळणाऱ्या पाण्यासारखा.
हिरवळीवर झिमझिमणाऱ्या पावसासारखा.
    झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरींसारखा.
घोषणा [a] करीन मी परमेश्वराच्या नावाची.
    तुम्हीही परमेश्वराची महती गा!

“तो आहे दुर्ग
    आणि त्याची कृती परिपूर्ण!
    कारण चोखाळतो तो उचित मार्ग!
देवच खरा आणि विश्वासू
    न्यायी आणि सरळ.
तुम्ही त्याची मुले नाहीत.
    तुमची पापे त्याला मळीन करतील.
    तुम्ही लबाड आहात.
मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो,
    परमेश्वराशी असे वागता?
तो तर तुमचा पिता,
    निर्माता कर्ता आणि धर्ता तोच.

“आठवा पूर्वी काय घडले
    ते अनेक वर्षा पूर्वी काय काय झाले
ते ध्यानात आणा आपल्या बापाला विचारा, तो सांगेल.
    महाजनांना विचारा, ते सांगतील.
परात्पर देवाने लोकांची विभागणी केली, राष्ट्रा राष्ट्रांमध्ये.
    प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला.
देवाने इस्राएल सीमा आखल्या.
    देवदूतांइतकी राष्ट्रे त्याने बनविली.
परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होय.
    याकोब परमेश्वराचा आहे.

10 “याकोब (इस्राएल) त्याला सापडला वाळवंटात
    भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात.
परमेश्वराने त्याला आपल्या कवेत घेतले
    आणि डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळले.
11 इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे.
    गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते.
त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते.
    पिले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते
आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते.
    तसा परमेश्वर इस्राएलला जपतो.
12 परमेश्वरानेच इस्राएलला पुढे आणले.
    दुसरा कोणी देव मदतीला नव्हता.
13 परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला.
    मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले.
परमेश्वराने त्याला खडकातून मध दिला,
    त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.
14 गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी, आणि दूध, पुष्ट मेंढ्या व कोकरे,
    बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे,
उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले.
    द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यायलात.

15 “पण यशुरुन (इस्राएल) माजला आणि उन्मत्त बैलासारखा लाथा झाडू लागला.
    खाऊन पिऊन तो धष्ट पुष्ट झाला!
आणि त्याने आपल्या कर्त्या देवाचा त्याग केला!
    आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.
16 परमेश्वराच्या या प्रजेने इतर दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि परमेश्वराची इर्ष्या जागवली.
    मूर्ती त्याला मान्य नाहीत, तर या लोकांनी मूर्ती केल्या व परमेश्वराचा कोप ओढवला.
17 खरे देव नव्हेत अशा दैवतांना त्यांनी यज्ञार्पणे केली.
    अपरिचित दैवतांची पूजा केली.
    आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली.
18 आपल्या निर्माणकर्त्याचा दुर्गाचा त्यांनी त्याग केला.
    जीवनदायी परमेश्वराला ते विसरले.

19 “परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला.
    कारण प्रजेनेच त्याला क्रुद्ध केले होते!
20 तो म्हणाला, ‘मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो.
    त्यांचा शेवट कसा होणार आहे
    ते मला माहीत आहे.
ही माणसे बंडखोर आहेत.
    अभ्यास न करणाऱ्या मुलांप्रमाणे आहेत.
21 मूर्तीपूजा करुन यांनी माझा कोप ओढवला.
मूर्ती म्हणजे देव नव्हेत.
    क्षुल्लक मूर्ती करुन त्यांनी मला क्रुद्ध केले.
तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन.
    जे एकसंध राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत, मूढ राष्ट्राच्या योगे मी यांना इर्ष्येस पेटवीन.
22 माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.
    अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो.
पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती,
    पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.

23 “‘मी इस्राएलांवर संकटे आणील.
    त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन.
24 भुकेने ते कासावीस होतील.
    भयंकर रोगराईने ते नेस्तनाबूत होतील.
वन्यपशू त्यांच्यावर सोडीन.
    विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील.
25 रस्त्यावर सैन्य त्यांना मारेल
    व घरात ते भयभीत होतील.
तरुण पुरुष, स्त्रिया, लहानमुले
    व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल.

26 “‘लोकांच्या स्मृतीतून ते पुसले जातील इतका मी
    या इस्राएलांचा नाश केला असता.
27 पण त्यांचा शत्रू काय म्हणेल हे
    मला माहीत आहे.
आम्ही आमच्या सामर्थ्याने जिंकलो.
    “इस्राएलांचा नाश काही परमेश्वरामुळे झाला नाही,
    अशी ते बढाई मारतील.”’

लूक 12:8-34

येशूची लाज बाळगू नका(A)

“प्रत्येक जण जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या मनुष्याला देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील. परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.

10 “प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्याला क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला क्षमा केली जाणार नाही.

11 “जेव्हा ते तुम्हांला सभास्थान, सरकार, अधिकारी यांच्यासमोर आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका. 12 कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्यावेळी तुम्हांला शिकवील.”

येशू स्वार्था विरुद्ध सूचना देतो

13 नंतर लोकसमुदायातील एक जण त्याला म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!”

14 परंतु येशू त्याला म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?” 15 मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”

16 नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली: “कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले. 17 तो स्वतःशी विचार करुन असे म्हणाला, ‘मी काय करु, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’

18 “मग तो म्हणाला, ‘मी असे करीन की धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीन, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन. 19 आणि मी माझ्या जिवाला म्हणेन, जिवा, तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’

20 “पण देव त्याला म्हणतो, ‘मूर्खा, जर आज तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’

21 “जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”

देवाच्या राज्याला प्रभम स्थान देणे(B)

22 मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हांस सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करु नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करु नका. 23 कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यापेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. 24 कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात! 25 चिंता करुन तुम्हांपैकी कोण स्वतःच्या आयुष्यात एका तासाची भर घालू शकेल? 26 ज्याअर्थी तुम्ही ही लहान गोष्ट करु शकत नाही, तर इतर गोष्टीविषयी चिंता का करता?

27 “रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ते कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो शलमोनानेसुद्धा आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही पोशाख घातला नव्हता. 28 जर देवाने जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हांला तो कितीतरी अधिक (चांगला) पोशाख घालणार नाही काय!

29 “आणि तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी खटपट करु नका. या गोष्टीविषयी चिंता करु नका. 30 कारण जगातील सर्व लोक हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची गरज तुम्हांला आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे. 31 त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे याही गोष्टी तुम्हांला दिल्या जातील.

धनावर विश्वास ठेवू नका

32 “लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हांला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समधानाचे वाटते. 33 तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना पैसे द्या. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा. जेथे चोर जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करु शकणार नाही. 34 कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

स्तोत्रसंहिता 78:32-55

32 परंतु लोकांनी पुन्हा पाप केले.
    देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांवर ते अवलंबून राहिले नाहीत.
33 म्हणून देवाने त्यांचे कवडी मोलाचे
    आयुष्य भयानक संकटात संपवले.
34 देवाने जेव्हा जेव्हा त्यातल्या काहींना ठार मारले तेव्हा तेव्हा उरलेले लोक पुन्हा त्याच्याकडे वळले.
    ते देवाकडे धावत परतले.
35 देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली.
    सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली.
36 आपण देवावर प्रेम करतो असे ते म्हणाले परंतु ते खोटे बोलले,
    ते मनापासून बोलत नव्हते.
37 त्यांचे मन खरोखरच देवाजवळ नव्हते.
    ते कराराशी प्रामाणिक नव्हते.
38 परंतु देव दयाळू होता.
    देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही.
देवाने अनेक वेळा स्वत:चा राग आवरला.
    त्याने स्वत:ला खूप राग येऊ दिला नाही.
39 ती केवळ माणसेच आहेत याची देवाने आठवण ठेवली.
    लोक वाऱ्याप्रमाणे आहेत. तो वाहातो आणि ओसरतो.
40 त्या लोकांनी वाळवंटात देवाला अनेक संकटांत टाकले
    त्यांनी त्याला खूप दु:खी केले.
41 मग लोकांनी पुन्हा पुन्हा देवाच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली,
    त्यांनी इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला खूप दु:ख दिले.
42 ते लोक देवाची शक्ती विसरले.
    देवाने त्यांचा किती वेळा त्यांच्या शत्रूंपासून बचाव केला हे ते विसरले.
43 मिसर देशातल्या चमत्कारा बाबत ते विसरले.
    सोअन प्रांतातला चमत्कारही ते विसरले.
44 देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले.
    मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत.
45 देवाने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले.
    ते मिसरमधल्या लोकांना चावले, देवाने बेडूक पाठवले.
    त्यांनी मिसरमधल्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला.
46 देवाने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली केली
    आणि इतर झाडांवर टोळ धाड पाठवली.
47 देवाने त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश करण्यासाठी गारांचा पाऊस पाडला
    आणि झाडांचा नाश करण्यासाठी त्याने बर्फाचा उपयोग केला.
48 देवाने गारांच्या वर्षावाने त्यांच्या प्राण्यांचा नाश केला
    आणि त्यांच्या पशुधनावर त्याने वीज पाडली.
49 देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला.
    त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले.
50 देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला.
    त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही.
    त्याने त्यांना एका भयंकर रोगाचे बळी केले.
51 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या सर्व पहिल्या मुलांना मारुन टाकले.
    त्याने हाम कुटुंबात जन्मलेल्या पहिल्या मुलांनाही मारले.
52 नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले.
    त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
53 त्याने त्याच्या माणसांना काळजीपूर्वक मार्गदर्शन केले
    देवाच्या माणसांना कशाचीच भीती वाटली नाही.
    देवाने त्यांच्या शत्रूंना लाल समुद्रात बुडविले.
54 देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात
    त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले.
55 देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले.
    देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला.
    देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्वःतचे घर दिले.

नीतिसूत्रे 12:21-23

21 चांगल्या लोकांवर दुर्दैव कोसळत नाही. पण दुष्टांवर मात्र अनेक संकटे येतात.

22 परमेश्वर खोटं बोलणाऱ्यांचा तिरस्कार करतो. पण परमेश्वर खरे बोलणाऱ्या लोकांबरोबर आनंदी असतो.

23 हुशार माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगत नाही. पण मूर्ख माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगतो आणि तो मूर्ख आहे हे दाखवतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center