Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the CSB. Switch to the CSB to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 26-27

पहिले उत्पन्न

26 “लौकरच तुम्ही तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे राहाल. तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व उत्पन्न गोळा कराल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा. त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की परमेश्वराने आमच्या पूर्वजांना आम्हांला जमीन देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे मी येथे पोहोंचलो आहे, हे सांगायला मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दारी आलो आहे!

“मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील. तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, ‘आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले. तेथे मिसरी लोकांनी आम्हाला वाईट वागणूक दिली. आम्हाला गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला. मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले. मग त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठे चमत्कार प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले. आणि येथे आम्हाला आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हाला दिली. 10 आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.’

“मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वराला वंदन करा. 11 त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करुन घ्या.

12 “दर तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तृप्त होतील. 13 या वेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही. 14 मी दु:खी [a] मनःस्थितीत यातील काही खाल्लेले नाही. तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही. मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी तुझे ऐकले आहे. तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे. 15 आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांना आशीर्वाद दे. आम्हाला दिलेल्या भूमिला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हाला द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस.

परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करा

16 “तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हाला आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मनःपूर्वक पाळा. 17 परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे. 18 परमेश्वराने आज तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हाला त्याने सांगितले आहे. 19 इतर सर्व राष्ट्रांपेक्षा तो तुम्हाला महान करणार आहे. तो तुम्हाला प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही त्याची खास प्रजा व्हाल.”

लोकांसाठी स्मारक शिला

27 मोशे आणि इस्राएलमधील वडीलधारे लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा. तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लौकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठ्या शिला उभारा. त्यांना गिलावा करा. त्यावर या आज्ञा आणि शिकवण लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्या दिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या धनधान्यसंपन्न भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हाला देण्यासाठी वचन दिले आहे.

“यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर या गिलावा केलेल्या शिला उभारा. तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका. वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर होमबली अर्पण करा. तेथे शांत्यार्पणांचे यज्ञ करुन भोजन करा. सर्वजण आनंदाने एकत्र जमून हे करा. मग शिलांवर ही वचन सुवाच्य अक्षरात लिहा.”

शापवाणीला लोकांची मान्यता

मोशे आणि याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, “हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास. 10 तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे वागा. मी आज देतो त्या त्याच्या आज्ञा आणि नियम पाळा.”

11 त्याच दिवशी मोशेने लोकांना हे ही सांगितले, 12 “ते यार्देन नदी पार करुन जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन यांनी आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे. 13 तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली यांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

14 “लेवींनी सर्वांना मोठ्याने असे सांगावे,

15 “‘मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो. या मूर्ती म्हणजे कोणा कारागिराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वराला अशा गोष्टींचा तिटकारा आहे!’

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

16 “नंतर लेवींनी लोकांना सांगावे ‘आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

17 “परत लेवींनी म्हणावे, ‘शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

18 “लेवींनी म्हणावे, ‘आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

19 “लेवींनी म्हणावे, ‘परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

20 “लेवींनी म्हणावे, ‘वडीलांच्या बायकोशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

21 “लेवींनी म्हणावे, ‘पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

22 “लेवींनी म्हणावे, ‘सख्क्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

23 “लेवींनी म्हणावे, ‘सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’

24 “लेवींनी म्हणावे, ‘दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’

25 “लेवींनी म्हणावे, ‘निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’

26 “लेवींनी म्हणावे, ‘जो ही नियमशास्त्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.’

“तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’

लूक 10:38-11:13

मरीया आणि मार्था

38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करुन आदरातिथ्य केले. 39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. 40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”

41 प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. 42 पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

येशू प्रार्थने विषयी शिकवितो(A)

11 मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. प्रार्थना संपल्यावर शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “प्रभु, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली: त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना कशी करावी ते आम्हास शिकवा.”

मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा:

‘पित्या, तुझे नाव पवित्र राखले जावो.
    तुझे राज्य येवो,
आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हांला दे,
आणि आमच्या पापांची आम्हांला क्षमा कर,
    कारण आम्ही सुद्धा जे आमचे वाईट करतात त्यांची क्षमा करतो.
आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाइटापासून सोडीव.’”

मागत राहा(B)

5-6 मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी कोणाला तरी एक मित्र होता. आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा मित्र नुकताच प्रवास करुन माझ्याकडे आला आहे. आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! अगोदरच दार लावलेले आहे. आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही.’ मी तुम्हाला सांगतो जरी तो उठून त्याला कांही देण्याची टाळटाळ करील तरी त्याच्या मित्राच्या आग्रही वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ते देईल. आणि म्हणून मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. 10 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल. जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. 11 तुम्हांमध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? 12 किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल? 13 जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हांला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे समजते, तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता किती तरी अधिक पवित्र आत्मा देईल?”

स्तोत्रसंहिता 76

प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र

76 यहुदातील लोकांना देव माहीत आहे.
    इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
देवाचे मंदिर शालेममध्ये आहे.
    देवाचे घर सियोन डोंगरावर आहे.
देवाने त्या ठिकाणी धनुष्य बाण, ढाली, तलवारी
    आणि इतर शस्त्रांचा नाश केला.

देवा, तू ज्या डोंगरावर शत्रूचा पराभव केलास
    त्या डोंगरावरुन परतताना तू वैभवशाली दिसतोस.
त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते.
    परंतु आता ते रणांगणावर मरुन पडले आहेत.
त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू ओरबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत.
    या शूर सैनिकांपैकी कुणीही स्वत:चे रक्षण करु शकला नाही.
याकोबाचा देव त्या सैनिकांवर ओरडला
    आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरुन पडले.
देवा, तू भयकारी आहेस.
    तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
8-9 परमेश्वर न्यायाधीश म्हणून उभा ठाकला.
    त्याने त्याचे निर्णय जाहीर केले.
देवाने देशातल्या दीन लोकांना वाचवले त्याने स्वर्गातून निर्णय दिला.
    सर्व पृथ्वी शांत आणि घाबरलेली होती.
10 तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात.
    तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.

11 लोकहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत.
    आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा.
प्रत्येक ठिकाणचे लोक देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात.
    ते देवासाठी भेटी आणतात.
12 देव मोठ्या नेत्यांचा सुध्दा पराभव करतो.
    पृथ्वीवरचे सर्व राजे त्याला घाबरतात.

नीतिसूत्रे 12:15-17

15 मूर्ख माणसाला नेहमी स्वतःची पध्द्त सर्वश्रेष्ठ वाटते. पण विद्वान माणूस दुसरे लोक जे सांगतात तेही ऐकतो.

16 मूर्ख माणसाला फार लवकर राग येतो. पण हुशार माणूस कुणी काही चुकीचे बोलले तर चटकन् क्षमा करतो.

17 जर एखादा माणूस खरे बोलत असेल तर तो ज्या गोष्टी सांगतो त्यातही तो प्रामाणिक असतो. पण जर एखादा खोटं बोलत असेल तर त्याचे बोलणे संकटाकडे नेते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center