Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the GW. Switch to the GW to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 23-25

उपासनेत सहभागी होण्याविषयी

23 “जो भग्नांड किंवा छिन्नेंद्रिय आहे त्याला परमेश्वराच्या उपासनेत सहभागी होण्यास मनाई आहे. ज्यांच्या आईवडीलांचा रीतसर विवाह झालेला नाही त्यानेही उपासनेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.

“अम्मोनी आणि मवाबी यांनी व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर उपासनेत सामील होवू नये. कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हाला अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच बलामला पैसे चारुन त्यांनी त्याला तुम्हांला शाप द्यायला लावले. (मेसोपोटेमियातील पथोर नगरामधला बौर याचा बलाम हा मुलगा.) तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याचा तुमच्यावर लोभ आहे. या अम्मोनी किंवा मवाबी लोकांबरोबर कधीही सलोखा करु नका. तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी मैत्री करु नका.

इस्राएलींनी कोणाला आपले म्हणावे?

“अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरींचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात. अदोमी आणि मिसरी यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांना इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या प्रार्थनेत सहभागी व्हायला हरकत नाही.

सैन्यातील शुचिता

“युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा. 10 एखाद्याला रात्री स्वप्नावस्था झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये. 11 मग संध्याकाळी स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे.

12 “प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी. 13 आपल्या शस्त्रास्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा. 14 कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याहातून शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबरच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हांला सोडून जायचा.

इतर नियम

15 “एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्याला मालकाच्या स्वाधीन करु नका. 16 त्याला तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्याला जाच करु नका.

17 “इस्राएलच्या स्त्रीपुरुषांपैकी कोणीही देवळातील वेश्या होऊ नये. 18 पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.

19 “आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याजी लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारु नका. 20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या प्रदेशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.

21 “तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल. 22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही. 23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. देव काही तुम्हाला ‘नवस बोला’ असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा.

24 “दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका. 25 कोणाच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण विळ्याने कापून नेऊ नका.

24 “एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी न आवडणारी गुप्त गोष्ट कळाली व ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे. त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरे लग्न करावे. 3-4 त्यातून समजा असे झाले की या नवऱ्याचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या नवऱ्याने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा नवरा वारला तरी पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये. कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे हे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने निंद्य आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका.

“एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्याला द्यावी.

“कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी तारण म्हणून ठेवून घेऊ नये. नाहीतर त्याच्या तोंडचा घासच काढून घेतल्यासारखे होईल.

“कोणी आपल्या इस्राएली बांधवाला पळवले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.

“कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील, ते ऐका. मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामेचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या.

10 “तुम्ही कोणाला कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरु नका. 11 बाहेरच थांबा. मग तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल. 12 तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले गरम कपडे आणील. तर ते रात्रभर तुम्ही स्वतःजवळ ठेवू नका. 13 त्याला रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्याला पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हाला दुवा देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय.

14 “तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो. 15 त्याला रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.

16 “मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आईवडलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आईवडलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्याला मिळावी.

17 “गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये. 18 मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगत आहे.

19 “शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्यांच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हांला तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. 20 जैतून वृक्षांची फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा पुन्हा तपासू नका. उरलेली फळे अनाथ, परकीय, विधवा यांच्यासाठी राहू द्या. 21 द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली सुरली द्राक्षेही त्यांच्यासाठीच राहू द्या. 22 तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हाला हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा.

25 “दोन व्यक्तिमंध्ये वाद झाल्यास त्यांनी न्याय मागण्यासाठी न्यायाधीशांकडे जावे. वादाचा निवाडा न्यायाधीश करील. दोषी व्यक्ति फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्याला फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी. चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास त्याचा जीव तुमच्या लेखी, महत्त्वाचा नाही असा त्याचा अर्थ होईल.

“धान्याची मळणी करताना बैल धान्यात तोंड घालील या भीतीने त्याच्या मुसक्या बांधू नका.

“दोन भाऊ एकत्र राहात असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या बायकोने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे. यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलमधून नामशेष होणार नाही. त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलमध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही. अशावेळी पंचानी त्याला बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल तर सर्वांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, ‘जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.’ 10 ‘जोडा काढून घेतलेल्याचे घराणे,’ अशी मग त्याची इस्राएलभर ख्याती होईल.

11 “दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची बायको आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने दुसऱ्याचे नाजूक इंद्रिय पकडू नये. 12 तसे केल्यास दयामाया न दाखवता तिचा हात तोडावा.

13 “बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अती जड किंवा अती हलकी नसावीत. 14 आपल्या जवळची मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत. 15 आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ राहाल. 16 खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव तिरस्कार करतो.

अमालेकांचा नाश करावा

17 “तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा. 18 त्यांना देवाविषयी आदर नव्हता. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले. 19 म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. देव तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात प्रवेश केल्यावर तुम्ही हे अंमलात आणा. इतर शत्रूंपासून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला विसावा दिल्यावर अमालेकांचा न विसरता समाचार घ्या.

लूक 10:13-37

जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना येशू इशारा देतो(A)

13 “खोराजिना तुझ्यासाठी हे वाईट होईल! बेथसैदा [a] तुझ्यासाठी हे वाईट होइल! कारण जे चमत्कार तुम्हांमध्ये घडले ते जर सोर व सिदोनमध्ये घडले असते तर त्यांनी फार पूर्वीच गोणपाट नेसून राखेत बसून पश्चात्ताप केला असता. 14 तरीसुद्धा सोर व सिदोन यांना न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोपे जाईल. 15 आणि कफर्णहूमा, तुला स्वर्गापर्यंत चढवले जाईल काय? तू तर अधोलोकातच जाशील.

16 “जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला नाकारतो.”

सैतानाचे पतन

17 ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभु, तुझ्या नावाने भुतेसुद्धा आम्हांला वश होतात!”

18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19 ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे. व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हांला अपाय होणार नाही. 20 तथापि तुम्हांला भुते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वार्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”

येशू पित्याला प्रार्थना करतो(B)

21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्हासित झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वार्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभु मी तुझी स्तुति करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.

22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”

23 आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य. 24 मी तुम्हांस सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छ बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”

चांगला शोमरोनी

25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

26 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यांत काय वाचतोस?”

27 तो म्हणाला, “‘तू तुझा देव प्रभु याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीति कर.’ [b] व ‘स्वतःवर जशी प्रीति करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर.’” [c]

28 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील.”

29 पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”

30 येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमाहून यरीहोस निघाला होता. आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. त्यांनी त्याला मारले, आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.

31 “तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्याला पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. 32 त्याच मार्गाने एक लेवी त्या ठिकाणी आला. लेव्याने त्याला पाहिले. व तो सुध्दा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.

33 “नंतर एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत तेथे आला. जेव्हा त्याने त्या मनुष्याला पाहिले, तेव्हा त्याला त्याच्याविषयी कळवळा आला 34 तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्या बांधल्या. नंतर त्या शोमरोन्याने त्याला आपल्या गाढवावर बसविले व त्याला उतारशाळेत आणले, व त्याची देखभाल केली. 35 दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार। [d] (सुमारे वीस रुपये) काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’”

36 लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, “त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”

37 तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्या गरजू जखमी प्रवाशावर दया मनापासून केली तो.”

तेव्हा येशू त्याला म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”

स्तोत्रसंहिता 75

प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवरचे आसाफाचे स्तोत्र

75 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो.
    आम्ही तुझी स्तुती करतो.
    तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.

देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली,
    मी बरोबर न्याय करीन.
पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल
    आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”

4-5 “काही लोक गर्विष्ठ असतात.
    ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते,
परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका.
    एवढे गर्विष्ठ बनू नका.’”

या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल
    अशी कोणतीही शक्ती नाही. [a]
देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो.
    देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो.
    देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे.
    परमेश्वराच्या हातात पेला आहे.
तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे.
    तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.
मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन.
    मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन
    आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.

नीतिसूत्रे 12:12-14

12 दुष्ट माणसाजवळ नेहमी चुकीच्या गोष्टी करायला असतात. पण चांगल्या माणसाजवळ जी शक्ती असते ती मुळाप्रमाणे खोल गेलेली असते.

13 दुष्ट माणूस मूर्ख गोष्टी करतो. स्वतःच शब्दात अडकतो. पण चांगला माणूस त्या प्रकारच्या संकटातून सुटतो.

14 जो चांगल्या गोष्टी सांगतो त्याबद्दल त्याला बक्षीस मिळते. त्याचप्रमाणे तो जे काम करतो ते त्याला लाभ मिळवून देते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center