Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NIV. Switch to the NIV to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
लेवीय 24:1-25:46

दीपवृक्ष आणि पवित्र भाकरs

24 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतुनाच्या हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे; अहरोनाने दर्शनमंडपात साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय. त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.

“तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोव्व्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर मैद्याचा करावा. त्यांच्या दोन रांगा करुन एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे देवाला अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. दर शब्बाथ दिवशी अहरोनने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. ती भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”

देवाला शिव्याशाप देणारा माणूस

10 त्याकाळीं कोणा एक इस्राएल स्त्रीला मिसरी-पुरुषापासून झालेला एक मुलग होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल माणसाशी भांडू लागला. 11 तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करुन शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नांव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती; 12 त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

13 मग परमेश्वरदेव मोशेला म्हणाला, 14 “तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या माणसाच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्याला दगडमार करुन मारुन टाकावे. 15 तू इस्राएल लोकांना अवश्य सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी. 16 जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.

17 “जर एखादा माणूस दुसऱ्या माणसाला ठार मारील तर त्याला अवश्य जिवे मारावे. 18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशु देऊन भरपाई करावी.

19 “जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्याला उलट त्याच प्रकारची दुखापत करावी. 20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्याला केली जावी. 21 पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.

22 “परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.”

23 मोशेने इस्राएल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या माणसाला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.

इस्राएल लोकांच्या देशासाठी विसाव्याचा समयs

25 सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना असे सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल त्यावेळी त्या देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याचा समय पाळावा. सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे; पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरु नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये. तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले ध्यान्य कापू नये; आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करु नयेत; देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे.

“तरी तुम्हाला भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्याबरोबर राहाणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल; आणि तुमची गायीगुरे व इतर पशू ह्यांनाही भरपूर खाद्य मिळेल.

योबेल वर्ष

“तसेच तुम्ही सात वर्षाचे सात गट मोजा-सात शब्बाथ वर्षे-म्हणजे सात गुणिले सात इतकी वर्षे मोजा; तो एकोणपन्नास वर्षाचा काळ होईल. मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे; 10 त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे, आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही ‘योबेल’ म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. 11 हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी ‘योबेल’ वर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेल कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत; 12 कारण ते ‘योबेल’ वर्ष होय; ते तुम्हांकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सांपडेल तो उपज तुम्ही खावा. 13 ह्या ‘योबेल’ वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे.

14 “तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका. 15 तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या ‘योबेल’ वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा; तुम्हाला जमीन विकावयाची असेल तर ‘योबेल’ वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा; त्या वर्षावरुन खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल कां? कारण तो फकत पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हाला विकत आहे. 16 जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हाला खरोखरी फक्त काही पिकेच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल. 17 तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे! मी परमेश्वर तुमचा देव आहे!

18 “माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा! म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल; 19 आणि भूमि तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित राहाल.

20 “तुम्ही कदाचित् म्हणाल, ‘आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहाणार नाही.’ 21 चिंता करु नका! सहाव्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हाला अशी बरकत देईन की जमीन तुम्हाला तीन वर्षाचे पीक देईल. 22 मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तो पर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल.

मालमत्तेविषयी नियम

23 “जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हाला कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा; 24 म्हणून लोक आपली जमीन विकतील खरी परंतु ती नेहमी त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळणार. 25 तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमतेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरिता खंडणी भरुन ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी. 26 आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या माणसाला आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वतःची ऐपत वाढली असेल. 27 तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि त्याला त्याने जमीन विकली असेल त्याला शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी. 28 पण ते वतन परत मिळविण्याची त्याला ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.

29 “एखाद्या माणसाने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्याला हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील. 30 परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यान्पिढ्या त्याच्या वंशात कायम राहील; योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही. 31 तटबंदी नसलेली नगरे उगड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यांतील घरे योबेल वर्षी त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.

32 “परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणावयाचे झाले तर त्यांतील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील. 33 एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल; कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतने होत; ती इस्राएल लोकांनी त्यांना दिलेली आहेत. 34 लेवी लोकांच्या नगराभोंवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.

गुलामांच्या मालकांकरिता नियम

35 “तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वतःचे [a] पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्याला परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे; 36 त्याला तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वरदेवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला [b] आपल्यापाशी राहू दे. 37 तू त्याला उसने दिलेल्या पैशावर व्याज घेऊ नको आणि त्याला विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको. 38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हाला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.

39 “तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वतःला तुला दास म्हणून विकले तर त्याला गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको; 40 योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी राहावे व तुझी सेवाचाकरी करावी. 41 त्या वर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे; 42 कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये. 43 तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको; आपल्या देवाचे भय धर.

44 “तुमच्या दास दासी विषयी; तुमच्या देशासभोंवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावे; 45 तसेच तुमच्या देशात राहाणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील; 46 तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांना तुम्ही कायमचे गुलाम करुन घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेंकावर कठोरपणाने चालवू नये.

मार्क 10:13-31

येशू मुलांचा स्वीकार करतो(A)

13 त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले 14 येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे. 15 मी तुम्हांस खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा तेथे कधीही प्रवेश होणार नाही.” 16 तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि आशिर्वाद दिला.

श्रीमंत मनुष्य अनुसरण्याचे नाकारतो(B)

17 येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुडे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

18 येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही. 19 तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”

20 तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरूणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.”

21 येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे सर्व आहे ते वीक. नंतर ते गोरगरिबांस वाटून टाक, स्वर्गात तूला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये.”

22 हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ति होती.

23 येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याचा देवाच्या राज्यात (श्रीमंतांचा) प्रवेश होणे किती कठीण आहे.”

24 त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतू येशू त्यास म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे! 25 श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उटांला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे.”

26 ते यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”

27 त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला अशक्य नाही. कारण सर्व गोष्टी देवाला शक्य आहेत.”

28 पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत.”

29 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, ज्या कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले किंवा शेतीवाडी सोडली, त्याचा छळ झाला तरी 30 त्याला शंभरपटीने फायदा मिळेल आणि येणाऱ्या युगात त्याला अनंतकाळचे जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. 31 परंतु ज्यांना सध्या मोठे स्थान आहे भविष्यात त्यांना खालचे स्थान मिळेल व ज्यांना खालचे स्थान आहे त्यांना मोठे स्थान मिळेल.”

स्तोत्रसंहिता 44:9-26

परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास.
    तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.
10 तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस.
    शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.
11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले.
    तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तत: विखरुन टाकले.
12 देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस.
    तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.
13 तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस.
    आमचे शेजारी आम्हाला हसतात.
    ते आमची मस्करी करतात.
14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत,
    ज्यांना स्वत:चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
15 मी लाजेने वेढला गेलो आहे.
    दिवसभर मला माझी लाज दिसते.
16 माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले
    माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.
17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस
    आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.
18 देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही.
    आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही.
19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस,
    मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.
20 आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का?
    आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.
21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात.
    त्याला आपल्या ह्रदयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.
22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत.
    मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
23 प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस?
    ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.
24 देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस?
    तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
25 तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस
    आम्ही धुळीत [a] पोटावर पडलो आहोत.
26 देवा, ऊठ! आम्हाला मदत कर.
    मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.

नीतिसूत्रे 10:20-21

20 चांगल्या माणसाचे शब्द शुध्द चांदीसारखे असतात. पण दुष्ट माणसाचे विचार कवडीमोलाचे असतात.

21 चांगल्या माणसांच्या शब्दांमुळे अनेकांना मदत होते. पण मूर्खाची मूर्खता त्यालाच मारु शकते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center