Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 26-28

यहूदाचा राजा उज्जीया

26 अमस्याचा मुलगा उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता. उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.

उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला. पुढे त्याने यरुशलेमवर 52 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या. ती यरुशलेमची होती. उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले. जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.

उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले. अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली. पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले. अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोंचली.

यरुशलेममध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली. 10 वाळवंटातही त्याने बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या निगराणीसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.

11 उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई. 12 सैन्यात एकंदर 2,600 प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत. 13 शत्रूवर तुटून पडणाऱ्या 307,500 वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात. 14 या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली. 15 काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेममध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोंपऱ्यांवर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.

16 पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. 17 तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी ऐंशी शूर याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले. 18 त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्याला म्हणाले, “उज्जीया, परमेश्वराला धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नयेस. अहरोनचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही.”

19 पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले. 20 मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला. 21 राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. मंदिरात त्याला मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा मुलगा योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.

22 उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा याने अथपासून इतीपर्यंत लिहिलेली आहेत. 23 उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजांसाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्याला पुरले. कारण “तो कुष्ठरोगी होता.” उज्जीयाच्या नंतर त्याचा मुलगा योथाम राजा झाला.

यहूदाचा राजा योथाम

27 योथाम राजा झाला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा. ती सादोकची मुलगी. योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे वडील जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे दुर्वर्तन चालूच होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले. यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले. अम्मोन्यांचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीनवर्षे अम्मोनी योथामला 3 3/4 टन चांदी, 62,000 बुशेल गहू (किंवा 10,000 कोर) गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.

परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मनःपूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले. त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांशजारी दफन केले गेले. दाविदनगरांत लोकांनी त्याला पुरले. योथामच्या जागी आहाज हा त्याचा मुलगा राज्य करु लागला.

यहूदाचा राजा आहाज

28 आहाज राजा झाला तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दावीद वागला तसे आहाजचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वराला मान्य होणारे नव्हते. इस्राएलच्या राजांच्या दुर्वर्तनाचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ती पूजेसाठी केल्या. बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या मुलांना त्याने अग्नीमध्ये आहूती करुन बळी दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना तिथून घालवले होते. आहाजने उंच स्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला.

5-6 आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामच्या राजाच्या हातून आहाजचा पराभव करविला. अरामच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजचा पाडाव करुन यहूदाच्या लोकांना कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजचा पराभव करवला. पेकहच्या वडलांचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे 1,20,000 शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला. जिख्री हा एफ्राइममधला एक शूर योध्दा. त्याने राजा आहाजचा मुलगा मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एलकाना यांना ठार मारले.

इस्राएलच्या सैन्याने यहूदात राहणाऱ्या 2,00,000 जणांना पकडून नेले. हे सर्व त्यांचे नातलगच होते. या कैद्यांमध्ये बायका मुलेही होती. तसेच यहूदातील किंमती वस्तूही लुटून नेल्या. ही लूट आणि बंदिवान यांना ताब्यात घेऊन ते शोमरोन या नगरात आले. तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांना मारलेत, त्यांना शासन केलेत. त्यामुळे आता परमेश्वराच्या क्रोधाचा रोख तुमच्यावर आहे. 10 यहूदाच्या व यरुशलेमच्या लोकांना गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे पाप केले आहे. 11 आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या भावाबहिणींना परत पाठवून द्या. परमेश्वराला तुमचा अनावर संताप आला आहे.”

12 एफ्राइमच्या काही प्रमुख मंडळींनी इस्राएलच्या सैनिकांना लढाईवरुन परतताना पाहिले. तेव्हा या प्रमुखांनी सैनिकांना भेटून चांगली समज दिली. योहानानचा मुलगा अजऱ्या, मशिल्लेमोथचा मुलगा बरेख्या, शल्लूमचा मुलगा यहिज्कीया, आणि हदलाईचा मुलगा अमासा ही ती नेते मंडळी होत. 13 ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलवर परमेश्वराचा कोप होईल.”

14 तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले. 15 तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिज्कीया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यांतील उघड्या नागड्या लोकांना त्यांनी लुटीतले कपडेलत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. मर्दनासाठी तेल दिले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरीहो या त्यांच्या गावी घरी नेऊन सोडले. यरीहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात. मग ही चार वडिलधारी मंडळी शोमरोनला परतली.

16-17 याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करुन त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांना कैद करुन नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली. 18 पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली. 19 परमेश्वराने यहूदाला संकटांनी जेरीला आणले कारण यहूदाचा राजा आहाज याने यहूद्यांना दुर्वर्तनाला प्रवृत्त केले होते. आहाजने परमेश्वराचे उल्लंघन केले होते. 20 तिल्गथ-पिल्नेसर हा अश्शूरचा राजा. यानेही आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला. 21 आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.

22 या संकटकाळात आहाजच्या दुर्वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला. 23 दिमिष्काच्या लोकांच्या दैवतांसाठी त्याने यज्ञ केले. या दिमिष्कांनी त्याला हरवले होते. तेव्हा त्याने विचार केला, “अरामचे लोक ज्या देवाची पूजा करतात ते देव त्यांना साहाय्य करतात. तेव्हा मी ही त्यांच्यासाठी यज्ञ केले तर ते मला सोडवतील.” म्हणून आहाज त्या दैवतांना शरण गेला. त्याच्या या कृत्यांमुळेच त्याचा आणि इस्राएल लोकांचा नाश होत गेला.

24 आहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणी गोळा करुन त्यांची मोडतोड करुन विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करुन घेतली. वेद्या केल्या आणि त्या यरुशलेममध्ये चौका चौकात बसवल्या. 25 यहूदातील सर्व गावांमध्ये इतर देवतांच्या पूजेला धूप जाळण्यासाठी म्हणून उंच स्थाने केली. अशाप्रकारे वागून आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाचा त्याने क्रोध ओढवून घेतला.

26 आहाजच्या बाकीच्या गोष्टी आणि त्याचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे आचरण यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहे. 27 आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरुशलेम नगरात लोकांनी त्याला पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजचा मुलगा हिज्कीया हा पुढे राजा झाला.

रोमकरांस 13

Obey Your Government Rulers

13 प्रत्येकाने वरिष्ठ अधिकान्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत. परिणामी, जो अधिकाऱ्याला विरोध करतो, तो स्वतःला जे देवाने आज्ञापिले आहे त्याला विरोध करतो व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वतःवर न्याय ओढवून घेतील. अधिकारी चांगल्या कृत्यांसाठी नाही तर वाईट कृत्यांसाठी धाक असतात. तुला अधिकाऱ्याची भीति वाटू नये काय? चांगले ते कर म्हणजे तुझी प्रशंसा होईल.

होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे, परंतु वाईट करशील तर त्याची भीति बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही. त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे. यासाठी देवाचा राग जो केवळ शिक्षेद्वारे प्रगट होतो त्याच्यामुळे नव्हे, तर तुझ्या सद्विवेकबुध्दीने अधीन राहणे आवश्यक आहे.

आणि त्यामुळेच तुम्ही कर देता. कारण ते देवाचे अधिकारी आहेत. व हेच काम ते करतात. तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक. ज्यांना कर द्यावयाचा त्यांना कर दे. ज्यांना जकात द्यावयाची त्यांना जकात दे. ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर. ज्याला मान द्यायचा त्याला मान दे.

लोकांवर प्रीति करणे हाच एक नियम

एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे. “व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, वाईटाचा लोभ धरु नको” [a] या आज्ञांमुळे मी असे म्हणतो आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” [b] या शब्दात सामावलेली आहे. 10 प्रीति शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीति नियमशास्त्राची पूर्णता आहे.

11 आणि तुम्ही हे करा कारण तुम्हांस ठाऊक आहे की, आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे, कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे. 12 रात्र जवळ जवळ संपत आली आहे आणि “दिवस” जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करु. 13 दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो, तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको, 14 तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि आपल्या पापी वासना मध्ये गुंतून राहू नका.

स्तोत्रसंहिता 23

दावीदाचे स्तोत्र.

23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
    ते मला नेहमी मिळत राहील.
तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
    तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
    तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
    तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
    कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
    तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
    तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
    आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]

नीतिसूत्रे 20:11

11 लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center