Print Page Options Listen to Reading
Previous Prev Day Next DayNext

The Daily Audio Bible

This reading plan is provided by Brian Hardin from Daily Audio Bible.
Duration: 731 days

Today's audio is from the NET. Switch to the NET to read along with the audio.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 21-23

21 पुढे यहोशाफाट वारला. त्याचे त्याच्या पूर्वजांजवळ दफन केले. दावीद नगरात त्याला पुरले. यहोशाफाटच्या जागी त्याचा मुलगा यहोराम गादीवर बसला. अजऱ्या, यहीएल, अजऱ्या, मीखाएल व शफट्या हे यहोरामचे भाऊ, व यहोशाफाटचे मुलगे. यहोशाफाट हा यहूदाचा राजा होता. यहोशाफाटने आपल्या मुलांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्या-रुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याला त्याने राज्य दिले.

यहूदाचा राजा यहोराम

यहोराम आपल्या वडिलांच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. अहाबच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या राहणीला अनुसरुनच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या मुलीशी यहोरामने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या. पण परमेश्वराने दावीदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दावीदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दावीदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दावीदाशी करार केला होता.

यहोरामच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वतः आपला राजा निवडला. तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करुन गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. 10 तेव्हा पासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू राहिली आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामची सत्ता झुगारली. यहोरामने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले. 11 यहोरामने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली. असे करण्याने, परमेश्वराला लोकांनी जसे वागावे असे वाटत होते त्यात खंड पडला. यहोरामने यहूदा लोकांना परमेश्वरापासून दूर नेले.

12 एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामला असा संदेश आला:

“परमेश्वरा देवाने असे सांगितले आहे. तुझे पूर्वज दावीद यांचा हा परमेश्वर आहे, परमेश्वर म्हणतो, ‘यहोराम, तुझे आचरण आपले वडील यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही. 13 उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरुशलेममधील लोकांना तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वतःच्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते. 14 तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांना जबर शासन करणार आहे.तुझी मुले,बायका,मालमत्ता? यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे. 15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसे दिवस बळावेल. त्यात तुझी आतडी बाहेर पडतील.’”

16 कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामविरुध्द भडकावले. 17 या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी धनदौलत लुटून नेली. यहोरामच्या बायकामुलांनाही त्यांनी पळवले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा मुलगा तेवढा बचावला.

18 या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले. 19 त्या आजारात दोन वर्षांनी त्याची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडिलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामच्या सन्मानार्थ पेटवला नाही. 20 यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीदनगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरीत नव्हे.

यहूदाचा राजा अहज्या

22 यहोरामच्या जागी यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा सर्वांत धाकटा मुलगा अहज्या याला राजा केले. यहोरामच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामच्या इतर सर्व थोरल्या मुलांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला. त्यावेळी तो बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. तिच्या वडिलांचे नाव अम्री. अहज्याची वागणूकही अहाबच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्याला दुराचरण करण्यास प्रवृत्त केले. अहाबच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वराला मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अहाबच्या घराण्याने त्याला सल्ला द्यायला सुरुवात केली. त्यांचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. बदसल्ल्यामुळेच त्याचा मृत्यू ओढवला. अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामच्या बरोबर अरामचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा. योराम या लढाईत अराम्यांकडून जायबंदी झाला. तेव्हा तो दुखण्याला उतार पडावा यासाठी इज्रेल येथे परतला. रामोथ येथे अरामचा राजा हजाएल याच्याशी लढताना तो घायाळ झाला होता. योरामला भेटायला म्हणून अहज्या इज्रेल येथे गेला. यहूदाचा राजा यहोराम याचा अहज्या हा मुलगा. योरामच्या वडिलांचे नाव अहाब. दुखापतीमुळे तो इज्रेला आला होता.

अहज्या (किंवा यहोआहाज) योरामला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी धाडले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामबरोबर निमशीचा मुलगा येहू याला भेटायला गेला. अहाबच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती. अहाबच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले. यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या माणसांनी त्याला तो शोमरोनमध्ये लपण्याच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्याला ठार केले आणि त्यांनी त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वराला शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.

राणी अथल्या

10 अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला मुलगा मरण पावला आहे हे पाहिल्यावर यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला. 11 पण यहोशबाथ हिने अहज्याचा मुलगा योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामची मुलगी आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथने योवाशला लपवल्यामुळे अथल्या त्याला मारु शकली नाही. 12 परमेश्वराच्या मंदिरात त्याला याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने राणी म्हणून अंमल चालवला.

संदेष्टा यहोयादा आणि राजा योवाश

23 यहोयादाने सहा वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामचा मुलगा अजऱ्या यहोहानानचा मुलगा इश्माएल, ओबेदचा मुलगा अजऱ्या, अदायाचा मुलगा मासेया आणि जिक्रीचा मुलगा अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला. त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरुशलेम येथे गेले. तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला.

यहोयादा या लोकांना म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्याला अनुसरुन राजाचा मुलगा गादीवर येईल. आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक तृतीयांश याजक आणि लेवी शब्बाथच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा. एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या आवारात राहावे. कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये. सेवा करणारे याजक आणि लेवी यांनाच काय ते परमेश्वराच्या मंदिराच्या आत येता येईल कारण ते शुचिर्भूत असतात. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपापली कामे करायची आहेत. लेवींनी राजाच्या निकट राहायचे. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.”

लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली. दावीद राजाचे भाले, छोट्या ढाली आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या. 10 आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपापले शस्त्र होते. मंदिराच्या थेट उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच. 11 मग त्यांनी राजपुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुगुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याची मुले यांनी त्याला अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.

12 मंदिराकडे लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलका आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती मंदिरात लोकांकडे आली. 13 पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजा जवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक म्हणत होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखवण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी, फितुरी” असे ती ओरडली.

14 याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्याला तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.” 15 राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.

16 यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता. 17 मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.

18 यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदिरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले 19 सर्वार्थाने शुध्द-शुचिर्भूत होऊनच मंदिरात यावे, तसे नसणाऱ्याना अडवले जावे म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले.

20 सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले. 21 अथल्याचा तलवारीने वध झाला त्या नंतर यहूदा लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरुशलेम नगर शांत झाले.

रोमकरांस 11:13-36

13 तर तुम्ही जे यहूदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो कारण मी यहूदीतरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो. 14 या आशेने की, माझ्या हाडामांसातल्यांना ईष्योवान करुन त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे. 15 जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडून स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का? 16 जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.

17 परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करुन लावले गेलात व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात. 18 तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्यांहून मोठे आहात अशी बढाई मारु नका. लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही, तर मूळ तुमचे पोषण करते. 19 आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.” 20 त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या हे खरे आहे परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका. तर भीति बाळगा. 21 कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हांलाही राखणार नाही.

22 अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल. 23 आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. 24 म्हणून तुम्ही जे निसर्गत; रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील!

25 परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशतः कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. 26 आणि नंतर इस्राएलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल, असे लिहीले आहे,

“मुक्त करणारा सीयोनातून येईल,
    तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व अभक्ती दूर करील.
27 जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन.
    तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.” (A)

28 जेथ पर्यंत सुवार्तेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो. 29 कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. 30 कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे. 31 त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. 32 कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी.

देवाचे गौरव

33 देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे. 34 पवित्र शास्त्र सांगते.

“प्रभूचे मन कोणाला माहीत आहे
    किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” (B)

35 “प्रथम कोणी काही त्याला दिले
    का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?” (C)

36 कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्या द्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन.

स्तोत्रसंहिता 22:1-18

प्रमुख गायकासाठी “पहाटेचे हरिण” या सुरांवर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.

22 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
    तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस.
    तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली
    परंतु तू उत्तर दिले नाहीस
आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.

देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस
    तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला.
    होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली.
    त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही.
म्हणून मी कीटक आहे का?
    मी मनुष्य नाही का?
    लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो.
    ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग.
    कदाचित् तो तुला मदत करेल.
    तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”

देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस.
    मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस.
मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस.
    आणि माझे सांत्वन केले आहेस.
10 मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस
    मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.

11 तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत
    आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12 माझ्याभोवती लोक आहेत
    ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.
13 प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या व त्यांना फाडणाऱ्या
    सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे.

14 माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या
    पाण्यासारखी नाहीशी झाली आहे,
माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत
    माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
15 फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे.
    माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
    तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहेस.
16 “कुत्री” माझ्या भोवती आहेत
    मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापळ्यात पकडले आहे
    सिंहाप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायाला जखमा केल्या आहेत. [a]
17 मला माझी हाडे दिसू शकतात.
    लोक माझ्याकडे टक लावून पाहतात
    आणि पाहातच राहतात.
18 ते माझे कपडे त्यांच्यात वाटून टाकतात
    आणि माझ्या लांब झग्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या [b] टाकल्या आहेत.

नीतिसूत्रे 20:7

चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center